बालक दिन आला की येतो मातीचा गोळा घेऊन बसलेला कुंभार आणि गुलाबाचे फूल कोटाला लावलेले चाचा नेहरू! अलिकडे नाही म्हणायला दप्तरांची ओझी वाहणारी मुलेही डोकावतात याच मुहूर्तावर!
हल्लीच्या परिस्थितीचा विचार करता मुलांना मातीचे गोळे समजण्यापेक्षा बर्फाचे गोळे म्हणावे का असे वाटते. कारण कुंभाराने आकार दिल्यावर भट्टीत भाजलेला मातीचा गोळा पुढे तसाच टिकतो. मात्र बर्फाचा तयार झालेला आकार सतत टिकवून ठेवण्याची कसरत करावी लागते----विरघळला तर?
आजच्या अधिक कल्पकता वाढवण्याच्या, ज्ञानार्जनाचे नवनवीन साहित्य उपलब्ध होण्याच्या, वेगळ्या वाटा चोखाळण्याच्या झटपट बदलणाऱ्या युगात तोच तो आकार वर्षानुवर्षे कायम ठेवणे मागासलेपण समजावे का? याउलट दिला आकार, सांभाळला काही काळ, पुन्हा विरघळून टाकला नवीन आकार देण्यासाठी ह्याला समंजसपणा म्हणावा का?
अगदी लहानपणापासून एक खेळणे खेळून काही तास होताच दुसर्या कडे धावणे, एक अभ्यासक्रम नाही झेपला तर असंख्य अनेक, एक जोडीदार नाही वाटला मनासारखा तर दुसऱ्याची तयारी हेच प्रकार भोवताली वाढताना दिसत आहेत. यातलं काय चूक काय बरोबर?
या संदर्भात Cattell या मानसशास्त्रज्ञाने मांडलेला बुद्धिमत्तेचा सिद्धांत आठवला. बुद्धिमत्ता अर्थात intelligence ही दोन प्रकारची सांगितली आहे .Fluid Intelligence हा प्रकार आपण सवयीने आत्मसात केलेल्या गोष्टींवर अवलंबून नसलेला, त्या त्या प्रसंगानुरूप कारणमिमांसा करुन वापरता येणारा आणि वाढत्या वयाबरोबर कमी होणारा आहे. दुसरा Crystal Intelligence हा प्रकार शैक्षणिक सांस्कृतिक अनुभवांनी सम्रुद्ध होणारा आणि वाढत्या वयाबरोबर वाढत जाणारा बुद्धिमत्तेचा प्रकार आहे. या दोन्ही प्रकारांचा पुरेपूर वापर करत आजच्या बालकांना पुढे एक समृद्ध व्यक्तिमत्त्व घडवायला मदत करणे ही आज खरी गरज आहे.
नवनवीन अनुभवांनी मुलांना सम्रुद्ध करणे ---निसर्गाशी जवळीक, वेगवेगळ्या कलांची ओळख, क्रिडाप्रकारांची ओळख, छोट्यामोठ्या घरगुती कामांमध्ये, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग, इ. मधून व्यक्ती प्रसंग ओळखून त्यांना हाताळण्याचे स्वातंत्र्य मुलांना मिळावे. यातूनच सुजाणता येऊन पुढे अनुभव ज्ञानाच्या बळावर संपादित बुद्धिमत्तेचा वापर यशस्वी व्हायला मदत करतो.
केवळ यंत्राप्रमाणे मुलांचा वापर करण्यापेक्षा जीवन जगण्याची तंत्रे शिकत मुलांना घडू द्यावे ---कधी बर्फाचा गोळा व्हावे आणि कधी मातीचा हे त्यांचे त्यांना ठरवू द्यावे ही आजच्या बालक दिनानिमित्त शुभेच्छा!
No comments:
Post a Comment