'ती' आम्हाला बघून लगेच ओळखीच आणि मनमोकळ हसली. '' महा स्वाभाव असाच हाये व माय, मी मजाक लई करतो राग नको मानू बर '' इति 'ती' आणि लगेच मी माझ्या विमनस्क अवस्थेतून खाडकन जागी झाले. कारण त्या स्थळी पोचल्या पासून तेथील एक एक विदारक दृश्य आणि परिस्थिती बघून पाषाणालाही पाझर फुटेल....
काल कॉलेज मधील बारावीच्या विद्यार्थिनींना वृद्धाश्रमात भेट देण्यासाठी नेले होते. तेथील पाहिल्या दालनात प्रवेश करताच, एक वृद्ध स्त्री डोळ्यात पूर्ण पिकलेले मोतीबिंदू घेऊन शून्यात नजर लावून बसली होती, आम्ही तिला प्रश्न विचारले पण एक ना दोन, नजर ढिम्म हलेना, अंगावरील कपड्यांचे भान नव्हते, हातावर बुंदीचा लाडू आणि पेढा ठेवल्यावर सुद्धा तोंडात टाके ना, मग एका विद्यार्थिनीने भरवले तेव्हा जरा खाल्ले.
दुसर्या पलंगा वरील आजीने आम्हाला बघताच तिला तिच्या घरात मुलगा व सून कशी वाईट वागणूक देत होते आणि मी एक दिवशी कसे रागावून निघून आले याचे वर्णन केले पण आता तिला तिच्या मुलाशी फोन वर बोलायचे म्हणून आम्हाला फोन लावून द्या असा तगादा लावत होती कारण आता तिला चालताही येत नव्हते आणि ईथे काळजी घेणारे कुणी नाही हे तिच्या लक्षात आले. आम्ही जड अंतःकरणाने तिथून पुढल्या दालनात प्रवेश घेतला, तिथे एकच पलंग मच्छरदाणी लावून मध्यभागी ठेवला होता आणि त्यावरील आजी निपचित पडून होत्या पण आमची चाहूल लागताच त्यांनी कोण आहे असे विचारले आणि आम्ही कुणीतरी नवीन आहोत हे कळल्यावर रडायला सुरुवात केली आणि '' मी खूप एकटी आहो व माय , माझ्याशी बोला, मले इथून बाहेर न्या, बाहेर काय आहे मले बघू द्या'' असा टाहो फोडला, आणि माझ्या सकट सर्व मुलींच्या डोळ्यात पाणी आले दोन मुलींना तर सावरणे कठीण झाले. सर्व मुलींना घेऊन मऊ लगेच बाहेर पडले कारण कुणालाच रडू आवारत नव्हते. बाहेर आल्यावर दोघींच्या लक्षात आले की त्या आजीला लाडू आणू पेढा द्यायचा राह्यलाय, म्हणुन त्या दोघी ते द्यायला परत आत गेल्या, त्यावर आजी त्यांना म्हणाली '' पोरी यापेक्षा मला घरी सोड माझ्या" आता मात्र त्या दोघी धाय मोकलून रडू लागल्या. कसेबसे त्यांना सावरले आणि बाहेर आणले. आता आम्ही सर्वच पुरते हेलावून गेलो होतो
त्याच मनःस्थितीत भोजन कक्षात प्रवेश केला. तिथे 4 आजी स्वैपाक करत होत्या. एक आजी चुलीजवळ पाठमोरी बसलेली आणि बाकीच्या आमच्या समोर भकास चेहर्याने यंत्रवत पोळ्या लाटणे, कांदा, लसूण चिरणे अशी कामे करत होत्या . आणि "ती " आजी पोळ्या शेकत होती आमचा आवाज येताच तोंड भरून प्रसन्न हसली आणि म्हणाली "या व सार्या जणी चटणी भाकरी खायले तुमी मोठे असले म्हणून काय झाले? पोट तर देवाने सार्याना दिले, मंग खुशीन खाव मिळेल ते" इति आजी आणि पुढे ह्या ह्या ह्या करून दात नसलेले बोळके प्रसन्न हसले.... किती विरोधाभास. कुठे आम्हाला रडवणारी आजी अन कुठे ही हसणारी प्रसन्न आजी. दोघींनाही घरच्यांनी नकोशी म्हणून इथे आणून सोडलेले पण एकीने स्वतः सोबत दुसर्यांना रडवले आणि दुसरीने दुःखात कसे हसुन जगावे याचा परिपाठच दिला .
कुठे आले होते मी आज? तेही माझ्या विद्यार्थिनींना घेऊन पण एका अर्थी त्यांना इथे आणले हा निर्णय योग्यच होता असे वाटू लागले कारण 12 व्या वर्गातील मुली म्हणजे लवकरच कुणाच्या तरी सुना होणार.... आणि कदाचित त्याही आपल्या सासू सासऱ्यांना अविचाराने घराबाहेर काढू शकतात आणि नाईलाजाने त्या वृद्धांना वृद्धाश्रमाची वाट धरावी लागु शकते . त्यामुळे या विद्यार्थिनींना वृद्धाश्रमात आणून तेथील वृद्धांची दयनीय स्थिती बघून रडू कोसळले असतांना त्यांच्या या मनस्थिती चा फायदा घेऊन '' ठेवाल का तुमच्या आई वडिलांना किंवा सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात ? '' या माझ्या प्रश्नावर एकसुरात '' अजिबात नाही '' हे उत्तर मिळाल्यावर वृद्धाश्रमाला भेट दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले ..
No comments:
Post a Comment