मनिमाऊ आणि तिचे तीन पिल्लं आमच्या घरीच राहात होते. पिल्लाला वाचवण्यासाठी माऊने स्वतः ची जान कुर्बान केली. आधीच राहत असणाऱ्या पिल्लांची जबाबदारी अजूनच आली. तशीही होतीच. जास्त लक्षपूर्वक त्यांना खाऊपिऊ घालू लागलो. पिल्ल हळूहळू आमच्या सोबत मैत्रीपूर्ण राहू लागले. पण त्यातलं एक पिल्लू मात्र खूपच घाबरट होतं. काहीकेल्या ते आमच्या सोबत मैत्री करायला धजत नव्हतं. खायला दिले कि ते पिल्लू यायचं नाही. तोपर्यंत इतर दोन पिल्लं सगळं संपवून टाकायची. मग आम्ही दोन वेगळ्या वाट्या केल्या तेव्हा कुठे ते घाबरट पिल्लू खाऊ लागला. एव्हाना त्यांचे नामकरणही झाले होते. घाबरट पिल्लू चे ल्यूसी, दुसरी मिस्टी आणि तिसरा निमो. अवंती ने अगदी हौसेने नेट वर शोधून त्यांचे नामकरण केले होते. पिल्ल बिचारे आई विना अगदी पोरके झाले होते. आजूबाजूला असलेल्या धोक्यांचा इशारा देण्यास त्याची आई नव्हती ना! त्यांचं त्यांनाच ते शिकायचं होतं. खरच माऊ उगीचच गेली पिल्लांना एकटं करून. त्यामुळे बोक्या खूपच त्रास द्यायचा त्यांना. दिवसा आणि रात्री उशिरापर्यंत आम्ही त्या तिघांना बोक्यापासून वाचवत होतो. पण अपरात्री ते आम्हाला पण शक्य नव्हते.
इतकं सगळं असूनही मांजरीचे पिल्लं खूप खेळकर होती. मस्त हुंदडायचे. एकमेकांच्या अंगावर लोळायचे, दबा धरून एकमेकांवर हल्ले करुन खोटखोट भांडायचे. लाॅनवर धावत सुटायचे. फुल टाईम पास. कंपाऊंड च्या भिंतीवर चढायला शिकले. तिथे बर्याच वेलींची दाट गर्दी होती. त्यात लपून रस्त्यावर ची गंमत बघत बसायचे. कुत्रे, गाड्या काय काय धोके आहेत ते बघत असतील का? काय चालू असेल त्यांच्या छोट्याश्या डोक्यात? हळूहळू रस्ता ओलांडत समोरच्या घरी जाऊ येऊ लागले.
एक दिवस आम्ही नागपूर ला गेलो होतो. रात्री उशिरापर्यंत घरी पोहचलो. दुसर्या दिवशी सकाळी कळलं पिल्लांवर बोक्याने हल्ला केला होता आणि एक पिल्लू जखमी झाले आहे.
बघितलं तर ल्यूसी जखमी झाली होती आणि प्रचंड घाबरलेली होती. नेमकी ती समोरच्या घरी आणि तिचे भावंड आमच्या घरी. काही केल्या ल्यूसी जवळ येऊ देईना. खायला दिले तर ते पण खात नव्हती. कसतरी करुन तिला आमच्या घरी पिटाळली. भावंड पण बिचारी भेदरलेली आणि सैरभैर झाली होती. पण एकत्र आल्याने त्यांना एकमेकांचा आधार वाटला. सगळे त्या हल्ल्यातून सावरले. थोड खाऊपिऊ लागले. बिचारी पिल्ल त्यांच्या जगाचे टक्के टोणपे खात बर्यापैकी जगत होते. ल्यूसी बरी झाली. थोडीशी पुन्हा खेळू लागली. पण लंगडत चालायची. आणि... अचानक एक दिवस नाहिशी झाली. कुठे गेली? कशी गेली? काहीच कळलं नाही. आजूबाजूला शोध घेतला पण काही दिसलीच नाही.
मग मिस्टी आणि निमो दोघेच राहिले. असेच दिवस जात होते. आणि एक दिवस मिस्टी एकदम शांत शांत वाटू लागली. एरवी छान खेळणारी, एकदम फास्ट असलेली मिस्टी अशी का झाली काही समजलं नाही. तिचं खाणं खेळणं सगळच एकदम थांबलं. आम्हाला कळेना काय झालं मिश्टीला! मी तिला लाडाने मिश्टी म्हणायचे. होतीच ती तशी गोड, निरागस! पांढरी आणि थोडी काळे ठिपके असलेली. निमो खेळण्यासाठी तिची मनधरणी करायचा तर त्याला पण उडवून लावायची. मला आपली उगीच एक शंका आली मांजरी मोठ्या होतांना अशा शांत होत असतील का? कि तिला बर वाटत नसेल? पण काही दिवसात ती पण नॉर्मल झाली. आणि ल्यूसी सारखीच गायब झाली. बहुतेक मांजरी जिवाच्या भिती ने घरे बदलत असतील.
मग राहिला निमो एकटा. तो घरातच जास्त राहायचा. अवंती बरोबर खेळायचा. सेलोटेप, दोरी, पिना असं कशाशीही खेळायचा. अवंती अभ्यास करत असली कि मांडीत बस, पुस्तकावर बस अस सुरु असायचं. कितीही उठवलं आणि मनात नसलं तर ढिम्म हलायचा नाही. निमोला मांडीवर बसायला खूप आवडायचं. टिव्ही पण बघायचा कुतुहलाने. इतका गोड दिसायचा जेव्हा टिव्ही पहात बसायचा त्याचे फोटो पण काढले होते. तर असा हा निमो आमच्या कुटुंबातील एक होऊन गेला.घरात कुठल्याही कोपर्यात, खुर्ची वर, पलंगावर, खिडकीत कुठेही मस्त ताणून द्यायचा.इतर बोक्यांची भिती निमो ला कधी वाटली नाही.चचांगला धीट होता तो. कधी कधी आम्हाला भिती वाटायची पण तो बिनधास्त असायचा.
अचानक एक दिवस तो ही गायबच झाला. अवंती खूप अपसेट झाली. रोज वाट पहात असायची. आणि आला कि निमो बरोबर तीनचार दिवसांत. मग काय अवंती जाम खुश झाली. पण हि खुशी फार टिकली नाही. पुन्हा निमो गायब झाला. आठ दिवस झाले तरी आला नाही. आम्ही अवंती ची समजूत घातली. यावेळी 8,10 दिवसांनी निमो आला.
असेच दिवस जात होते आणि आम्हाला निमो थोडा अंगात भरल्या सारखा वाटू लागला. असं वाटलं वाढीला लागला म्हणून असेल. मग आणखी काही दिवसांनी त्याच पोट अजूनच दिसायला लागले. मी अवंती ला तसं म्हटलं कि हा निमो आहे का? कि दुसरी मांजर आली आपल्या कडे? मी काही दिवसांनी पुन्हा पोटाचा आकार निर्देशित केला. तर मला सगळे म्हणू लागले कि काहीतरी खाल्ले असेल मारून. असं एक दोन वेळा झालं. कोणी म्हणे उंदीर खाल्ला असेल कोणी म्हणे कबुतर खाल्लं असेल. मी पण दुर्लक्ष केले.
काही दिवसांनी आम्ही सुट्टीचे म्हणून पुण्याला आलो. अवंती ने हट्टाने निमो ची खिडकीतून यायची जायची छोटीशी फट उघडी ठेवली. जेणे करून निमोला केव्हाही घरात झोपायला मिळेल बोक्याची पण भिती नाही. आम्ही पुण्याला चांगले 10, 12दिवस होतो.
त्यानंतर आम्ही घरी पोहचलो आणि नेहमी प्रमाणे निमोची वाट बघत होतो. आशिष कडून त्याचा हालहवाल कळला होता. त्याचे कॅटफूड, दूध आशिष त्याला खाऊ घालत होता. चला म्हणजे बोकोबा मस्त आहे तर आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. रात्री निजानीज झाली. आणि पहाटे साडेतीन ला मला जाग आली आवाजाने. उठून पाहिले तर निमो होता. तो खुश तर झाला पण तरीही नेहमी सारखा वाटला नाही. सारखा कपाटाच्या दाराला समोरच्या पायांनी ओरबाडत होता. मॅव मॅव करत होता. लाडवला नाही नेहमी सारखा. मला वाटलं निमो नसावा त्याच्या सारखा कोणी दुसरा असेल. मग मी अवंती ला तिच्या खोलीतून उठवून आणलं म्हटलं अगं हा निमो आहे न? तर हो म्हणाली. निमो चा एक कान थोडा कापलेला होता त्याची ओळखीची खूण होती. निमोची ओळख परेड झाली तरी कपाटाच्या दारावर पाय मारणं सुरू च होत. मला आणि अवंती ला निमो आल्यामुळे जितका आनंद झाला तितका निमोच्या वागणुकीत दिसत नव्हता. आम्ही निमोचे लाड करत होतो आणि हा सारखा कपाटाकडे धाव घेत होता. शेवटी एकदाच मी दार उघडलं...... आणि निमो अतिशय घाईने आत गेला..... आणि पहातो तर काय..... तीन गुबगुबीत पांढरे पिल्लं....??? मला भिती वाटली ह्या निमोने पिल्लांना मारून टाकले तर? दुसर्या कोण्या माऊचे पिल्लं, बिचारी नाहक बळी पडतील. म्हणून आम्ही निमोला बाहेर काढायचे प्रयत्न केले. तर तो जाम ऐकेना. उलट मस्त बैठक मारून दूध पाजू लागला.... पहाटे साडेतीन, चार वाजता हा प्रकार काय काहीच कळेना. मी आणि अवंती तर बघतच बसलो.डोळे चोळून चोळून बघू लागलो. एकमेकींना आश्चर्यचकित होऊन विचारु लागलो कसं शक्य आहे हे??? मला तर वाटलं मी स्वप्नातच आहे कि काय? पण ते शक्य होत कारण तो निमो होता पण तो तो नसून ती आहे हे आम्हाला पहाटे साडेतीन/चार ला कळले आणि आम्ही उडालोच. धक्क्यातून सावरल्या वर खो खो हसत सुटलो. म्हणजे मी जे म्हणत होते कि निमोचे पोट दिसते तर माझ्या कडे लक्ष दिले नाही. ते पोट दिसणं म्हणजे 'तो' नव्हे 'ती' निमी च होती तर.... आमची तर झोपच उडाली. तरी कसंबसं निजलो. सकाळी उठल्यावर मग दोघी मायलेकी हसत सुटलो. पिल्ल फारच गोजिरवाणी होती. निमो नाही नाही निमी राखाडी काळ्या रंगाची होती पण पिल्ल पांढरी होती. गुबगुबीत पांढरी पिल्लं पाहून मला एक खूप जुनं गाणं आठवलं
छान छान मनिमाऊ चं बाळं कसं गोर गोरपान
इवलीशी जिवणी इवलेसे दात
चुटुचुटु खाती कसा दूध आणि भात
इवलेसे डोळे आणि इवलेसे कान
छान छान.... अगदी असेच होते निमीचे पिल्लं. हळूहळू पिल्ले वाढत होते. आमचाही वेळ मस्त जात होता त्यांचे व्हिडिओ, फोटो काढण्यात. आज किती मोठे झाले आज काय नविन खेळ केला. निमी पण मस्त खाऊन पिऊन सुखी होती. पिल्लांची काळजी नव्हती तिलाही. छान सुरक्षित जागी तिचे पिल्लं वाढत होते.
आणि अचानक एका रात्री पिल्लांच्या वेगळ्याच आवाजाने मला जाग आली. अर्धवट झोपेत मला काही कळेपर्यंत एका पिल्लू तोंडात घेऊन मांजरीची आकृती आमच्या रुममध्ये दिसली मला वाटलं निमीच आहे पण पिल्लाचे भयभीत झालेल्या आवाजाने लगेचच माझ्या लक्षात सगळा प्रकार आला. तो एखाद्या अट्टल चोरा सारखा हळूच घरात शिरला आणि सराईतपणे सगळ्यात मागच्या खोलीत पलंगा खाली सुरक्षित असलेल्या पिल्लांवर झडप घालून एक पिल्लू उचलून घेऊन गेला. आम्ही हाकले पर्यंत तर पसार झाला होता तो बोक्या. किती क्रुर असेल तो इतक्या गोंडस पिल्लाला असा कसा मारू शकतो? खूप खूप वाईट वाटलं. रडायलाच आले. पुढची रात्र झोपच उडाली आमची.
मी आणि अवंती ने उठून शोध घेतला हा निष्ठुर बोक्या आत आलाच कसा आणि कुठून? निमीला येण्यासाठी जी खिडकी ची बारीकशी फट उघडी ठेवली त्यातूनच बोक्या आला आणि डाव साधला. आम्ही ती फट लगेच बंद केली. निमी कुठे गेली असेल इतक्या रात्री? पिल्लं सोडून का गेली होती? ती असती पिल्लांजवळ तर पिल्लू वाचलं असतं. असाच किती वेळ गेला काही समजलं नाही अचानक बेडरूम च्या खिडकीवरील नेट कोणीतरी उचकटून टाकण्याचा प्रयत्न करतोय हे नाईटलॅम्प च्या अंधुक उजेडात दिसले. नीट पहातो तर मांजर. आम्हाला कळेना निमी आहे कि पुन्हा बोक्या! लाईट लावून नीट खात्री करून घेतली ती निमीच होती. मग लगेच तिला घरात घेतले. तिचा येण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता तर ही लांबून अवघड उड्या मारून कशी तरी गॅलरीत येऊन पोहचली होती. आल्या आल्या निमी च्या लक्षात आलच काय झाले ते. बिचारी माऊ मोठ्याने मॅव मॅव करत, वास घेत खोलीत फिरत होती. इतर खोल्या खराब करतील म्हणून कसतरी त्यांना मागच्या खोलीत नेले आणि दार बंद करून घेतले. सकाळ होण्याची वाट बघत बसलो. सकाळी माऊचे ओरडणे अजून वाढले. जणू विचारत होती इतक्या सुरक्षित घरातून माझं पिल्लू असं कसं बोक्याने उचलून नेलं? आम्ही पण हेल्पलेस होतो. वाईट तर खूपच वाटत होते. मी अवंती ला म्हटलं आता हिने घर बदलायला पाहिजे. बोक्या चांगलाच सोकावला आहे पुन्हा पुन्हा येऊन पिल्लं पळवून खाऊन टाकली तर? आता थोडावेळ वाट बघावी नाहीतर आपणच पिल्लांना टोपलीत घालून खालच्या अडगळीच्या खोलीत लपवून ठेऊ. निमीच्या समोरच घेवून जाऊ असं आम्ही ठरवलं. आणि काय आश्चर्य निमी एका पिल्ला ला अलगद तोंडात धरून खालच्या मजल्यावर जावू लागली...आम्हीच खूष झालो. अवंती धावतच खाली गेली आणि अडगळीची खोली उघडून दिली. निमीला जणू आमची भाषा कळली होती तिने बरोबर तेच केलं जे आम्ही बोललो होतो. मग लगेचच दुसरं पिल्लू पण घेवून गेली. आम्ही सुटकेचा श्वास सोडला.
अडगळीच्या खोलीची खिडकीतून फक्त निमीच येऊ शकेल अशी बारीक जाळी त्या खिडकीला होती. शिवाय लपायलाही भरपूर जागा होती. आता आम्ही, निमी, पिल्लं सगळे निर्धास्त झालो. पिल्ले पण नवीन जागी एकदम खूष होती. काही दिवसांनी पिल्लं मोठी झाली ती त्या खोलीत बसेना फटीतून बाहेर येऊन अंगणात बागडू लागली. आमचा जीव पुन्हा टांगणीला लागला. पण आता पुरेशी मोठी झाली होती आणि धोका असला तर काय करायचं, कुठे दडून बसायच हे त्याच्या लक्षात आलं होतं. जरा कुठे खुट्ट वाजलं कि धूम पळायचे आणि कुठल्या तरी छोट्याश्या फटीत लपून रहायचे. आता दूध बिस्किटे, कॅट फूड खाता यायचं आवडायचं. असं सगळं व्यवस्थित वाटत असलं तरी रात्री मात्र आम्हाला बोक्याची भिती होतीच. कारण अधूनमधून निमीचे आणि बोक्याचे भांडणं सुरूच असायचे. पण बोक्याला त्या बारक्याशा फटीतून पिल्लांपर्यंत पोहचता येतं नव्हतं. पण कसे कोण जाणे दोन पिल्लातून एक पिल्लू पुन्हा एकदा नाहिसे झाले. निमिने घरं बदलले असते तर नक्कीच वाचले असते. निमीची पहिलीच वेळ असल्याने तिला सुचले नाही की काय? की आमच्या घराची तिला सवय झाली होती म्हणून ती सोडून जात नव्हती? आम्ही जेव्हा ते घर सोडले तेव्हा एका पिल्लाबरोबर निमी बागेत झोपाळ्यावर बसली होती. मी मायेने तिला थोपटले, गोंजारले. पिल्लाकडे आणि स्वतः कडे लक्ष ठेव नीट रहा असं माझ्या भाषेत सांगितले. तिला कसे कळणार ते? पण माझ्या समाधानासाठी बोलले. आणि जड अंतःकरणानी तिचा आणि घराचा निरोप घेतला. मन उदास होतं. डोळ्यात अश्रू येऊ नये यासाठी मी आटोकाट प्रयत्न केला. निमीचे पुढे काय झाले काहीही समजले नाही.
मांजरांना घरातील माणसांपेक्षा घर जास्त प्रिय असतं असं म्हणतात. कुत्रे मात्र घरापेक्षा मालकावर जास्त प्रेम करतात. मालक नसला तर झुरून स्वतः चा जीव सोडल्याचे कथा वाचल्या आहेत. अनुभव नाही. पण कुठलाही प्राणी पाळू नये हे मात्र नक्की आहे. मन गुंतवणे नकोच ते. त्यांना काही झाले तर मनाला यातना होतात.
No comments:
Post a Comment