तो माझा सखा...आजवरच्या वाटचालीतला आश्वासक वाटणारा साथी...त्यानं मला कधी दगा दिला नाही. पण इतरांना त्याचा तितकासा भरवसा वाटला नाही.
कधी बरं त्याची नि माझी गाठ पडली? असेल साधारणपणे वयाचं 14 वं अथवा 15 वं वर्ष! तसं जरा नासमजच! दुनियादारीची ओळख नाही. जे कोणी सांगेल त्यावर विश्वास ठेवण्याचं ते वय! अशा त्या वयात आम्ही एकमेकांसमोर येण्याआधी अनेकांनी अनेक भितीदायक अनुभव सांगितले होते. दडपण, भिती, धडधड अशा संमिश्र भावनांनी मी त्याला सामोरे गेले होते. आधी 'नाही नाही' म्हणत मागेमागे सरत होते. पण मग कशी कोणजाणे कधी त्याच्या प्रेमात पडले कळलंच नाही. आम्ही पहिल्यांदा एकमेकांसमोर आलो तेंव्हा मी अक्षरशः थरथरले होते. माझ्या आधी कितीजणांनी त्याची आर्जव केली होती,कोण जाणे! तो तसा बिनभरवशाचा म्हणूनच ओळखल्या जायचा. कधी धोका देईल याचा नेम नाही, हा सावधगिरीचा इशारा अनेकांनी दिलेला. त्यामुळेच की काय त्याच्यावर विश्वास ठेवणं कठिण होतं. पण मैत्रिणीने धीर दिला. म्हणाली,"ठेव ग त्याच्यावर विश्वास!"
एवढं सांगतेय तर म्हटलं, ठेवावा भरवसा! काहींना त्यानं दगा दिलाय, कदाचित आपल्यालाही देईल. होईल काय? फारतर दुःख! ते किती लावून घ्यायचं नि किती कुरवाळत बसायचं? ते आपल्याच हातात आहे. काळाची मलमपट्टी आहेच की...! हं...नाही म्हणायला जनापवादाची भिती होती. पण मग आठवलं की, लोकं घोड्यावर बसूही देत नाहीत की पायी चालूही देत नाहीत. मग? फक्त आपल्यातील सारासार बुद्धीवर विश्वास ठेवावा. तेच केलं. मागचा पुढचा विचार केलाच नाही. त्याच्या प्रेमात स्वतःला दिलं झोकून! तोही मोठा बिलंदर! कितीतरी रूपं बदलत माझ्यासमोर येत राहिला. प्रेम करत राहिला.
भेटायची ठिकाणं एक का आहेत? कधी इथे तर कधी तिथे...हे गाव ते गाव...विविध जागी नाचवत राहतो सारखा! आज इतकी वर्षे झालीत पण पहिल्या भेटीत होती तिच धडधड, तेच दडपण प्रत्येक भेटीत असतं. त्याला सामोरं जाताना आताशा भिती कमी झाली आहे. अविश्वासाची जागा भरवश्यानं व्यापली आहे. तो मला धोका देणार नाही, हा समज दरवेळी दृढ होतोय. त्याच्यावरचं माझं प्रेम अधिकच वाढतंय.
त्याला दगाबाज म्हणणा-यांनी कदाचित त्याच्यावर विश्वास ठेवला नसावा किंवा त्याला दुखावलं तरी असावं. पण आमचं तसं नाही. मी त्याच्यावर प्रेम केलं. त्याला मी एकटीच नाही. आणिक कित्येक आहेत, ही कल्पना असूनही...मी त्याच्यावर जीव जडवला. अनेकांचा असलेला तो...कधी तरी माझ्या वाटेला येतो. पण एकदा आला की मलाच एकनिष्ठ राहतो. न् म्हणूनच तो माझा प्रिय सखा असतो. त्याच्यासमोर कसं उभं राहायचं? त्याला कसं हाताळायचं? हे मला आता सांगावं लागत नाही. किती अंतरावर त्याला आपलेपणा वाटतो नि किती जवळीकता आगावूपणा...ह्याचं आकलन मला आपोआप होवू लागलंय.तो कोण?
ओळखलं नं तुम्ही? हो तोच तो...! जो माझा आहे तोच आवाज अधिक सुबकतेनं इतरांपर्यन्त पोहचविणारा मायक्रोफोन! माईक! जुन्या काळातील जाडजूड ते आताच्या काॅर्डलेस पर्यंत अनेक रूपं पालटत आलेला. पहिल्यांदा अजस्त्र राक्षसाप्रमाणे ज्यानं घाबरवलं होतं. पण मग मात्र हळूहळू कधी नि कशी त्याची सवय झाली कळलंच नाही. असा तो माईक! स्टुडीयोच्या बंद दाराआडचा एकमेव सखा! विशाल अशा कार्यक्रमात विश्वासानं साथ देणारा सोबती! प्रियकराच्या आत्मियतेनं हाताळलं तर सहज, सरल असणारा! अन्यथा एखाद्या सापापेक्षा कमी भितीदायक नसणारा...तो माईक!
शरद पवारांची मुलाखत असो की मतमोजणी विश्लेषण...अशोक पत्कींसह स्टुडीओतली चर्चा असो की अरूण दातेंच्या संगीत मैफलीचं निवेदन...ह्रदयनाथांची गुगली परतवून लावणे असो की जगजीतसिंगचा परिचय...लोकसभा सभापती मनोहर जोशींचा नागरी सत्कार असो की शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकरांसह गप्पागोष्टी! प्रत्येक वेळी माझ्यासह होता माईक! रूप वेगवेगळं असलं तरी कशी कोण जाणे त्याच्या समोर मी सहज होते. आधीची धडधड त्याच्यासमोर आलं की कुठल्या कुठे पळते. पहिल्या उच्चाराबरोबरच तो आज मला कशी सोबत करणार, हे कळतं नि त्याप्रमाणं चढउताराला सुरूवात होते. आवाजाला धार चढते. कधी बेस मिळतो.
परवाही तसंच काहीसं झालं की...आजवर अनेकदा जाहिर कार्यक्रमांमध्ये बोलले. पण अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद् घाटन सोहळ्यामध्ये सूत्रसंचालनासाठी पहिल्यांदाच उभे राहिले होते. प्रचंड गदारोळाच्या पार्श्वभूमीवरचं ते सूत्र संचालन म्हणजे परिक्षाच होती. पहिला शब्द उच्चारेपर्य॔न्त स्वतःलाच स्वतःची खात्री नव्हती. पण...पण त्याच्यासमोर, म्हणजेच माईकसमोर उभे राहिले. पहिला नमस्कार उच्चारला नि खात्री पटली... की आपला हा साथी आजही आपल्याबरोबर आहे. तो आहे म्हटल्यावर मग कशाची भिती?
म्हणून कायम जाणवलेलं पुन्हा एकदा म्हणते...तो माझा सखा आहे. तो माझा सोबती आहे.
No comments:
Post a Comment