फडके सरांचा फोन म्हणजे उत्साहाची नवी लाट।माहितीचा नवा साठा।हास्याचं नवं कारंजं।ही विशेषणं खरी ठरवतच ते नेहमीप्रमाणे अघळपघळ बोलले नि म्हणाले "ये भेटायला ।मग मी पुण्याला जातोय।रविवारी"
"परत केव्हा येताय सर ?त्यानंतर येईन भेटायला",मी सहज म्हणाले तसे सर भरल्या आवाजात म्हणाले " आता ते नाही ठाऊक पोरी।रविवारी जातोय दोघंही एवढ़ंच ठाऊक।"
हा धक्काच होता ।सर अकोला सोडून जातायत की काय? माझ्या मनातला प्रश्न कळल्यासारखं सर म्हणाले"अगं ऐंशी वर्ष पूर्ण झाली आता ।पोरं तिकडे पुण्यात, आम्ही दोघं म्हातारे इथे ।काही दुखलं खुपलं की धावत यावं लागतं मुलांना।ते नाही म्हणतात गं आता एकटं रहायला"।
मी फोन ठेवला आणि सरळ कपडे बदलून निघाले।बोटावर मोजण्यासारखी श्रद्धास्थानं उरलीयत आजकाल।त्यात एक म्हणजे फडके सर।जुन्या पिढीतले शिक्षक।ते अकोला सोडून जाणार असतील तर त्याआधी एकदा भेटायलाच हवं।चार शहाणपणाच्या गोष्टी चार मार्गदर्शक गोष्टी हव्या असतील तर जायलाच हवं, म्हणत मी गाडीची किल्ली हातात घेतली।आणि अचानक वाटलं की रिकाम्या हाती कसं जाऊ? एखादी वस्तू तरी न्यायला हवी ,ज्यामुळे त्यांना माझी आठवण राहील।आता काय द्यावं सरांना?चार दोन वस्तूंची नावं आठवली आणि त्याच वेगानं रदद् ही झाली।तेवढयात लक्षं गेलं' रावणायन' नावाच्या पुस्तकाकडे।पंधरा दिवसापूर्वी मीच माझ्यासाठी घेतलेलं आणि अजून वाचायला सुरुवातही न केलेलं।विचार केला सरांना आवडेल हे।
गेले।सरांशी भरपूर बोलणं झालं । निघताना मी त्यांच्या हातात पुस्तक ठेवत म्हणाले,"माझी आठवण म्हणून हे आणलंय तुमच्यासाठी।"
"बरं झालं।पुस्तक आणलंस ।नाहीतर तुझी आठवणच आली नसती मला अजिबात",असं म्हणत सर डोक़्यावर टपली मारत गडगडाटी हसले।"अकोल्याचा हालहवाल कळवत जा गं।विशेषतः पावसाचा ",असं म्हणत त्यांनी निरोप दिला।
मी घरी आले । सरांच्या अनेक आठवणी मनात गर्दी करुन होत्या ।ते अर्थशास्राचे प्राध्यापक नि नामांकित महाविद्यालयाचे विभागप्रमुख होते।पण त्याबरोबरच ते उत्तम वाचक आणि प्रभावी वक्ता होते ।साहित्य,नाटय,काव्यापासून रामायण महाभारतापर्यंत कुठल्याही विषयाचं वावडं त्यांना नव्हतं ।मराठी इतकंच इंग्रजीवर प्रभुत्व होतं।ऐकणाऱ्याला खिळवून ठेवण्याची ताकद होती।नाटकात कामं सुद्धा केलेली त्यांनी।गोरापान रंग ,धारदार नाक,आरपार वेध घेणारे घारे डोळे ही त्यांच्या लोकप्रियतेमागची खरी दौलत।अजूनही रोज सात वर्तमानपत्रं घेऊन ती बारकाईनी पूर्ण वाचणारा,ऐंशीच्या घरातला मी पाहिलेला हा एकमेव माणूस।निवृत्ती नंतर तक्रारीचे पाढ़े न वाचता, स्पर्धा परीक्षेच्या मुलांना निःशुल्क मार्गदर्शन करणारे सर म्हणजे कुठलेसे साधक किंवा ऋषीच वाटायचे।एकदा "माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा"म्हणून मी महाविद्यालयात बोलावलेलं त्यांना।तर स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची यादी नि स्वतः तयार केलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकेच्या शंभर कॉपी घेऊनच आले ते।"नुसतं बोलून काय उपयोग?डेमो नको द्यायला?",असं म्हणत सोडवून घेतले पेपर मुलांकडून ।दोन तास सलग उभं राहून बोलले,तेही माईक शिवाय।
सरांच्या अशा आठवणी काढतच आठ दिवस गेले नि परत सरांचा फोन आला।खुशालीचं बोलणं घाईनी संपवत सर म्हणाले"रावणायन संपलं बरं वाचून।मस्तच आहे ।मला माहीत नसलेल्या खूप गोष्टी होत्या त्यात । तू वाचलंस की नाही?"
" नाही"म्हणताना माझाच आवाज शरमेनी अगदी खाली आला।
" अगं,वाच वाच।तुला गंमत सांगतो ,मला पुस्तकाच्या लेखिका इंद्रायणी सावकारांचा फोन नंबर मिळाला त्यात।मी फोनही केला त्यांना।विचारलं त्यांना ,की वाल्मिकी रामायणात - तुलसी रामायणात नसलेल्या कितीतरी गोष्टी तुमच्या पुस्तकात आहेत।त्या कुठे वाचायला मिळाल्या? तर स्वाती, त्यांनी इतके संदर्भ दिले! अर्धा तास बोलत होत्या त्या।अनेक पुस्तकं, अनेक अभ्यासकांचे निष्कर्ष,सगळं भरभरून सांगितलं त्यांनी।ऐंशीच्या पुढे आहेत त्या बाई ,पण थकवा म्हणून नाही आवाजात ।विचारत होत्या की मला कुठे मिळालं पुस्तक त्यांचं म्हणून ,तर सांगितलं मी की माझ्या चिमुकल्या मैत्रिणीनी भेट दिलंय म्हणून।तू ही वाच हं परत मिळवून ते।"
सरांनी आणखी काही बोलून फोन ठेवला।पण माझी मलाच लाज वाटायला लागली,की पुस्तक आणून पंधरा दिवस झाले,मी ते उघडलंही नाही।सर ते बारकाईनी वाचून फोन नंबर घेऊन आपल्या शंकांबाबत लेखिकेशी बोलून मोकळेही झाले।त्यांचा या वयातला हा उत्साह, ही अभ्यासू वृत्ती,हे कुतूहल नि मला सगळं कळवण्याचा आनंद ,यातलं अंशमात्र तरी घेता येईल का मला त्यांच्याकडून?ते नेहमीच मला छोटीशी मैत्रीण म्हणतात।पण ती योग्यता आहे का माझी?माझी आठवण म्हणून मी पुस्तक दिलं खरं त्यांना ,पण त्या पुस्तकानी सरांच्या आठवणींचं साठवण केलं माझ्या मनात।कायमचंच।
पुन्हा सरांचा फोन येण्याआधी
" रावणायन"शोधून वाचणे आहे।आहे का कोणाकडे????
No comments:
Post a Comment