Wednesday, March 13, 2019

शब्देविण संवादू

मी -नमस्कार ताई
  ती- नमस्ते मॅडम जी ।मै जरा जल्दी मे हूँ ।फिर मिलती हूँ आपसे।
   मी -ठीक आहे, भेटू .
 ती घाईने अंग चोरत ,हात पाय घट्ट आवळल्या सारखे करत ,नजर भिरभिर करत, चेहऱ्यावर कसनुसं हसू आणत "सटकली"
 माझ्या लक्षात आले की हीने आपल्याशी संवाद टाळला .पण कारण लक्षात येईना. कॉलनीत चार घरे पलीकडे नवीन राहायला आलेल्या कुटुंबातील ही स्त्री सुरुवातीच्या दोन भेटींमध्ये चांगली बोलली.  माहितीची देवाणघेवाण झाली आणि त्यानंतर मात्र माझ्या समोर आली की घाईगडबडीने हिला कुठे निघून जायचे असते समजेना !पुढे महिन्याभराने तिच्याशी चांगली मैत्री झालेल्या माझ्या शेजारणीकडून कळले हिच्या वागण्याचे खरे कारण .मी चेहरा बघूनच माणूस ओळखते ,मनातले विचार समजतात मला कारण मानसशास्त्राचा अभ्यास झाला आहे माझा! आणि तिचा स्वभाव चांगलाच तापट ,काहीसा आक्रमक. मग मी तिची खरी ओळख चेहरा बघूनच पटवली कि चार लोकांना सांगेन आणि नवीन ठिकाणी राहायला आल्यावर कोणाशीही चांगले संबंध राखता येणार नाही या घालमेलीत तिने माझ्यासमोर येणेच टाळायला सुरुवात केली होती .
खरे कारण कळल्यावर मला हसू फुटले .संध्याकाळी तिच्या घरी गेले .तिला विश्वासात घेतले. फक्त चेहरा बघून समोरच्या व्यक्तीच्या एकंदर स्वभावाचा अंदाज येत असला तरी तो कोणालाही सरावाने जमू शकेल .मानसशास्त्रातला हा एक छोटासा भाग आहे .चेहऱ्यावरील हावभावांवरून व्यक्ती समजू शकतो पण त्याला बर्‍याच इतर गोष्टींची शास्त्रीय जोड देऊन देहबोली समजून अशाब्दिक संवादाची प्रक्रिया पूर्ण होत असते .त्या माझ्या होऊ घातलेल्या मैत्रिणीच्या शंका दूर होत आहेत असे वाटू लागले. मग तिला नैसर्गिक अवलोकनाची शास्त्रीय पद्धत पण समजावून सांगितली. जसे एखादी लहान मुलगी खूप संकोची ,घाबरट आहे असे पालकांना सांगितल्यावर त्या मुलीचे तिच्या नैसर्गिक वातावरणात जसे घरी ,शाळेत ,बागेत खेळताना निरीक्षण करून तिच्याशी प्रत्यक्ष न बोलताही तिच्या वर्तनाचा आणि विचार ,भावनांचा अभ्यास करता येतो त्यावरून काढलेल्या निष्कर्षांवरून आवश्यकतेप्रमाणे तिचे समुपदेशन करता येते .ही निरीक्षणाची पद्धत किंवा चेहऱ्यावरील हावभाव देहबोलीचा अभ्यास हे आम्ही चिकित्सा पद्धत म्हणून वापरतो. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाबद्दल त्यातून काही निष्कर्ष काढून गैरसमज पसरवण्यासाठी नाही करत !एवढे सगळे समजावून सांगितल्यावर आज ती माझी चांगली मैत्रीण आहे हे वेगळे सांगायला नकोच .
आता ती चांगली रुळली होती. एकदा मला म्हणाली- आज मी मैत्रीण म्हणून नाही तर क्लायंट म्हणून काही विचारायला आले आहे. नवीन ओळखी होताना मला नेहमी धास्ती वाटते. समोरच्यांना माझ्या तापट स्वभावा बद्दल समजले तर ?मी त्यामुळे अस्वस्थ असते .मैत्री करणे कठीण होते. संकोच असतो त्यामुळे माझा मलाच राग येतो .मग पुन्हा चिडचिड वाढत जाते ,काय करावे सांग ना .

तिला सुचवले मग प्रयत्नपूर्वक, सरावाने आत्मसात करण्याची काही तंत्रे .अशाब्दिक संवादाची काही लक्षणे इतरांची बघावी शिकावी त्यातून आपण कशी तयारी करायची याचे आपोआप प्रशिक्षण मिळते. इतर माणसांना "वाचताना" आपल्याला  इतरांकडून कसे योग्य पद्धतीने "वाचल्या"जाईल हे शिकता येते.

 संवाद हा तीन प्रकारे होऊ शकतो -शाब्दिक, अशाब्दिक आणि लिखित स्वरूपात .भाषा शिकण्यापुर्वीच अशाब्दिक संवाद सुरू होतो .अशाब्दिक संवाद आणि वर्तनाचा सर्वप्रथम शास्त्रीय अभ्यास १८७२सालि चार्ल्स डार्विन च्या "द एक्स्प्रेशन ऑफ द इमोशन इन मॅन अंड अनीमल्स "च्या प्रकाशनाने झाला. चेहऱ्यावरील भाव ,हातवारे ,देहबोली ,डोळ्यातील भाव ,आवाजातील चढ-उतार ,हात मिळवताना जाणवणारा दाब ,केशभूषा ,इतर व्यक्तींपासून ठेवलेले अंतर इत्यादी सर्वच गोष्टी अशाब्दिक संवादासाठी आवश्यक असतात .याचा अभ्यास पुढील पद्धतींनी करता येतो

1 )अशाब्दिक संकेतांकडे लक्ष देणे .समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांचा संपर्क, हावभाव ,पवित्रा ,हालचाली इत्यादी अभ्यासून स्वतःची अशाब्दिक संवादाची क्षमता आपण वाढवू शकतो .उदाहरणार्थ समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांचा संपर्क पुरेसा नसेल तर त्याचे बोलणे परिणामकारक होत नाही हे लक्षात आल्यावर आपण स्वतः त्याबाबतीत सराव करू शकतो 
2 )असंगत  वर्तनाची लक्षणे -अशाब्दिक संकेत हे शाब्दिक संवादाच्या सुसंगत नसतील तर त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे लागते .उदा, विशेषतः मुलगी लग्न होऊन सासरी गेल्यावर आई-वडिलांना तिच्याबद्दल काळजी वाटते. ते पहिल्यांदा तिला भेटल्यावर विचारतात कसे आहे सगळे? तर तिने सगळे छान आहे हे बोलून दाखवले पण चेहर्‍यावर प्रसन्न भाव नसतील तर आई-वडिलांना लागलीच ते खटकते 
3) शब्द उच्चारतांना, बोलताना आवाज कसा आहे हे महत्त्वाचे अशाब्दिक लक्षण तपासावे लागते आवाजावरून संवाद उत्साही होतो आहे, रोचक होतो आहे ,वादाकडे जातो आहे किंवा कसे हा अंदाज बांधता येतो. आपल्याला समोरच्याशी मैत्री करायची तर संवाद साधतांना आवाजातूनही सकारात्मकता जाणवुन देण्याची खबरदारी बाळगावी लागते
 4 )डोळ्यांचा संपर्क आवश्यक तेवढा ठेवणे यातूनही महत्त्वाचे संकेत मिळतात .डोळ्यात सतत डोळे घालून बघणे समोरच्याला जाचक वाटू शकते .अजिबात न बघता बोलणे संकोचाचे ,आत्मविश्वासाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते .सामान्यतः चार ते पाच सेकंद डोळ्यांचा संपर्क ठेवणे नैसर्गिक स्वाभाविक संवादाला आवश्यक असते 
5 )अशाब्दिक संवादाबद्दल प्रश्न विचारणे 
आपण समजलेला अर्थ योग्य आहे का हे तपासण्यासाठी अशाब्दिक संवादातील लक्षणांनुसार समोरच्याला थेट विचारयेतो- तुझ्या म्हणण्याचा असा अर्थ आहेका---?  म्हणजे गैरसमज न होता सुसंवाद घडतो
 6 )संवाद अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी काही संकेत वापरता येतात 
माझ्या संपर्कातील एका पदवीधर मुलीने शिक्षिकेची नोकरी स्वीकारली .हायस्कूलच्या मुलांना शिकवण्याचे काम तिच्यावर सोपवल्या गेले .वर्गात गेल्यावर काही द्वाड मुलांमुळे हिला विषयात पारंगत असूनही शिकवणे जड जात होते .तिने माझ्याशी सल्लामसलत केल्यावर तिला सांगितले -तू तुझे महत्व अशाब्दिक संकेताने पटवून दे .मी सक्षम आहे .मला स्वतःबद्दल खात्री आहे हे समोरच्यांना समजायला वर्गात एका जागी आत्मविश्वासाने उभी रहा .खांदे समोर न झुकवता उभे राहून दोन्ही पायांवर समान भार देऊन ठाम आवाजात बोलायला सुरुवात कर. हळूहळू तिला या अशाब्दिक संकेतांचा परिणाम दिसायला लागला 
7 )बाह्य परिस्थितीचा विचार करून समयोचित संकेत वापरल्यास इतरांशी नाते दृढ होते 
कामाच्या ठिकाणी ज्येष्ठतेचा विचार करून औपचारिकता देहबोलीतून दर्शवत संवाद ठेवावा विरंगुळ्याच्या वेळी, सहलीच्या ठिकाणी वातावरण हलकेफुलके ठेवण्यासाठी योग्य शाब्दिक संकेत जसे मैत्रीपूर्ण स्पर्श ,टाळी देणे, चेहऱ्यावर उत्साही भाव, उच्च स्वरात शब्दोच्चार इत्यादीचा सहज वापर करावा
 8 )संकेतांचा चुकीचा अर्थ लावण्या पासून सावध राहणे आवश्यक आहे
 जसे समोरच्या व्यक्तीशी हात मिळवताना दृढपणे हात मिळवणे योग्य आत्मविश्वासाचे लक्षण आहे याउलट थरथरत्या हाताने ही क्रिया करणे स्वतःबद्दलच्या शंकेचे लक्षण असू शकते पण त्याच बरोबर एखाद्या शारीरिक व्याधी जसे संधिवातामुळे पण असे घडू शकते हे लक्षात घ्यावे 

अशाप्रकारे विविध अशाब्दिक संकेतांचा अभ्यास सराव करून संवाद यशस्वी होऊ शकतो. नातेसंबंध दृढ व्हायला, आपली प्रतिमा उच्च करायला, आपले व्यक्तिमत्व उत्तम करायला, हे आवश्यक आहे .कारण संवादांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे शब्दात बोलून नं दाखवलेले ऐकण्याचा !

No comments:

Post a Comment