Monday, February 4, 2019

मानवतेची सूक्ते गाणारा प्रतिभावंत

२७ फेब्रुवारी. मराठी राजभाषा दिन. त्याहीपेक्षा तो ’किरणांचा पसारा उघडून काळोखावर तेजाची लेणी
खोदित बसलेल्या एका देवदूताचा’ जन्मदिन. ह्या देवदूताला पंख लाभले होते प्रतिभेचे. मराठी साहित्याच्या
असीम आकाशात तो यथेच्छ विहरला. दु:खी, कष्टी, निराश मनांवर आपल्या काव्याची हळुवार फुंकर घालून
त्यांना आशेचे किरण दाखवत राहिला. भरकटलेल्या मनांना ध्येयाची आठवण करून देत राहिला. दीन
दुबळ्यांच्या व्यथांना वाचा फोडत राहिला. अन्यायाविरुद्ध बंड करण्याची स्फूर्ती देत राहिला. कधी कोणा
प्रतिभावंताचं मुक्त मनाने कौतुक केलं तर कधी उन्मत्त दांभिकाना त्यांची जागा दाखवली. स्वत:ला नास्तिक
म्हणवून घेत मानवातल्या देवत्वाची दखल घेता झाला. आणि म्हणूनच या पृथ्वीपल्याड जाऊन आकाशातला
तारा बनला... होय, मराठी वाचक- रसिकांना प्रात:स्मरणीय असणार्‍या, मराठी कवितेवर अर्धशतकाहून
अधिक काळ अधिराज्य गाजवणार्‍या कुसुमाग्रजांबद्दलच मी बोलतेय.

आधुनिक मराठी काव्याचा आरंभ केशवसुत युगापासून झाला असं आपण मानतो. त्यात केशवसुत,
टिळक, गोविंदाग्रज, बालकवी, यांच्या पाठोपाठ तांबे, यशवंत आणि रविकिरण मंडळ लोकप्रिय असताना एका
नव्या तेजस्वी तार्‍याचा उदय झाला. ऐतिहासिक दृष्ट्या तो काळ गुलामगिरीचा. देशात इंग्रजांचं राज्य.
स्वातंत्र्यसंग्रामाचं स्थंडिल सतत धगधगतं. प्रत्येक जण अपापल्या परीने त्यात आहुती देत होता. कुणी
क्रांतीचे मंत्र म्हणत तर कुणी शांतीची सूक्ते. एखादे खाडिलकर नाटकांच्या माध्यमातून तर एखादे टिळक
किंवा शि. म. परांजपे पत्रकारितेतून जनजागृती करीत होते. अशा भारलेल्या वातावरणात मराठी
काव्यक्षितिजावर विशाखा नक्षत्राचा उदय झाला तो क्रांतीचा जयजयकार करीतच. स्वातंत्र्याच्या या होमात
कुसुमाग्रजांची ही समिधा विलक्षण लोकप्रिय झाली. त्यापूर्वी प्रकाशित झालेल्या जीवनलहरीपेक्षाही विशाखाने
जास्त लोकप्रियता मिळवली. आणि त्यानंतरही किनारा, समिधा, मराठी माती, हिमरेषा, वादळवेल रसयात्रा,
छंदोमयी, मुक्तायन, स्वगत हे त्यांचे संग्रह गाजले.
मात्र देशप्रेम हा कुसुमाग्रजांच्या कवितेचा एकमेव विषय नव्हता. ही कविता मानवतेची कविता होती. मानवाच्या
आयुष्यात असंख्य भावभावनांना स्थान असतं. प्रेम, क्रोध, आशा, निराशा, अन्याय, शोषण, संघर्ष, हे मानवाच्या जीवनाचे
विविध पैलू. या सर्वांनाच स्पर्श करत एका नव्या, ताज्या दमाच्या कवीची वाटचाल सुरू झाली.
कुसुमाग्रजांच्या कवितेत सामाजिक विषमता हा महत्त्वाचा विषय होता. बळी, लिलाव, पाचोळा, सहानुभूती, माळाचे
मनोगत, म्हातारा म्हणतोय,पर्वणी, घृणास्पद, याच मातीतून अशा कवितांमधून तो व्यक्त होतो. मात्र केवळ या विषमतेला
वाचा फोडून कवी गप्प बसत नाही. तर संघर्ष, क्रांती करण्याची प्रेरणा देतो. अहिनकुल, आव्हान, आगगाडी व जमीन अशा
कविता त्यादृष्टीने महत्त्वाच्या.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कवीचं जागरूक मन चुकीच्या प्रथा-परंपरांवर आसूड ओढत राहिलं. उणीव, अखेर कमाई,
गाभारा, विशेषणे, प्रार्थना, ज्योतीराव या कवितांमधून ते दिसून येतं.
दुर्दम्य आशावाद हे कुसुमाग्रजांचं आणखी एक वैशिष्ट्य. ’अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा’ हे ब्रीद
मानणाराच अफाट सागरालाही किनारा आहे म्हणून ’पामर’ म्हणू शकतो.

निसर्गाचे कवी ही कुसुमाग्रजांची ओळख कधीच नव्हती. तरी त्यांच्या कवितेत निसर्गाचा मुक्त संचार आढळतो.
त्यात ‘हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा’ श्रावण येतो, तसा मेघांच्या पळसाचा अस्तावर दिसणारा जाळही. डोळे
नसलेल्या काळोखातून चंद्रकिरणांचे रुपेरी वर्ख येतात अन केवड्यात रुतून बसतात. वर्षाऋतूचं आगमन होताच माती
‘पुलकित गंधित होते’ आणि तृणाची बीजे गर्भामधून नवा हुंकार देतात. कधी एखादा निशिगंध काळोखात दरवळत राहतो
तर कधी ‘गगनपथाचा स्वैर मुशाफिर’ असलेला वारा रांगडे गीत गातो.
प्रेम हा कवितेचा एक चिरंतन विषय आहे. मग कुसुमाग्रजांच्या कवितेतून तो कसा सुटेल? मात्र कुसुमाग्रजांच्या
कवितेतील प्रेम आंधळ किंवा अपरिपक्व नाही. या प्रेमात त्याग आहे, समर्पण आहे, उदात्तता आहे. म्हणूनच हे प्रेम मातीमध्ये
उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहचू शकतं. मानवी जीवनाच्या पलीकडे जाऊन थेट सूर्यावर प्रेम करणार्‍या ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ गाऊ
शकतं. दुर्बळांचा क्षुद्र शृंगार झुगारून देऊन आपल्या उदात्त प्रियकराची दूरता साहू शकतं. मात्र प्रेमात आकंठ बुडाल्यावरही या
कवितेतील प्रेमीजन वास्तवतेचं भान विसरत नाहीत. त्यामुळेच क्षितिजाच्या पलीकडे दिवसाचे दूत दिसू लागताच प्रियकर
प्रेयसीला विनंती करतो, “काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात”. हेच प्रेम पुढे प्रौढपणी अधिक परिपक्व होतं, तेव्हा ’ती’
’चांदण्याचे हात असलेली भावुक प्रणयिनी’ न राहता बनते एक किनारा. ‘भरकटलेल्या गलबताचा एकमेव निवारा’.
आयुष्याच्या प्रवासात तिने लाटांचं उसळलेलं तांडव मुकाट्याने सोसलेलं असतं तसे ओहोटीच्या वेळी वाळूचे कणन कण
प्राणपणाने जपलेले असतात. वादळवार्‍यात गलबताचं रक्षण करण्यासाठी ‘आपलं किनारेपण टिकवणे’ हा एकमेव ध्यास
तिच्या आयुष्याचे उद्दिष्ट बनून बसतो. मात्र प्रेमाला प्रत्येकच वेळी पूर्णता लाभत नाही. कृष्णावर प्रेम करणार्‍या गोपीच्या
रूपात कालिंदीच्या वृक्षाखाली भूतकाळचे धागे जुळवत, प्रीतीचं पूजन करत एक कृष्ण निराशा बसलेली दिसते. तिच्या
गालावर ओघळलेला सनातन अश्रू आपल्या काळजाचा ठाव घेतो. कुसुमाग्रजांच्या कवितेत भेटणारं प्रेम केवळ स्त्रीपुरुषाच्या
प्रेमापुरतं मर्यादित राहत नाही. ते एक वृत्ती म्हणून सर्व प्राणिमात्राला, चराचराला, भावभावनांना व्यापून राहतं. ते
काळाच्याही पल्याड जाऊन आपलं अस्तित्व टिकवून ठेवतं. म्हणूनच कवीच्या दृष्टीकोनातून ’प्रेम आहे माणसाच्या/ संस्कृतीचा
सारांश/ त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष/ आणि भविष्य कालातील/ त्याच्या अभ्युदयाची आशा/ एकमेव!
स्वत:ला नास्तिक म्हणवणाऱ्या या कवीच्या कवितांमध्ये देवही डोकावून जातोच. ‘देवाच्या दारी’ उभा राहूनही
कवीच्या मनात प्रश्न असतो, ‘आहेस की नाही/ मुळात तू’. मग ‘माझ्या जीवनाचा मीच शिलेदार’ हा साक्षात्कार झाल्यावर
‘आहेस की नाही/ आता नसे चिंता’ अशी परिस्थिती होते. सगुण साकार देवाची भक्ती, त्याच्या मूर्तीची पूजा कवीला मान्य
नाही. कवी सतत मानवात दडलेलं देवत्व शोधत असतो. त्यामुळेच बाबा आमटे यांच्यासारख्या महामानवात त्याला ईश्वरी
तत्त्व आढळतं. कवीचं ईश्वरवंदन अवकाशाकडे चालतं. ‘जेथे अस्तित्व संपले/ राहे केवळ अभाव’ अशा शून्याकडे धाव घेतं.
आणि ईश्वराकडे एकच मागणं मागतं, ‘आदित्य या तिमिरात व्हा, ऋग्वेद या हृदयात व्हा, सुजनत्व द्या, द्या आर्यता,
अनुदारता दुरिता हरा..’
...आणि ईश्वराने या नास्तिकाची मागणी पुरी केली. निराशेच्या तिमिराने झाकोळून गेलेल्या जीवांना याच्या काव्य
किरणांनी नवसंजीवनी दिली. याचं काव्य ऋग्वेदाप्रमाणेच उदात्त आणि शाश्वत ठरलं अन रसिकांच्या हृदयात ठसलं. याच्या
सुजनत्वाने अन उदारतेने अनेकांचं दुरित हरलं...
रसिकांच्या मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या ह्या प्रतिभावंताला राजमान्यताही मिळाली. साहित्य अकादमी,
ज्ञानपीठ यांसह असंख्य पुरस्कारांना कुसुमाग्रजांनी सन्मानित केलं. होय, ‘कुसुमाग्रजांना दिलं जाणं’ हा त्या पुरस्कारांचा
सन्मान होता. आपल्यासारखे वाचक, आस्वादक त्या प्रतिभेला वंदन करून एवढंच म्हणू शकतात,

“कोठून कुठे आलास खगा, केलेस मनोहर कूजन रे
ती रुमझुमता तव नादफुले हे पुलकित झाले निर्जन

No comments:

Post a Comment