Sunday, June 9, 2019

बीस साल बाद

व्हाट्सए आणि फेस बुक मुळे जी  गेट टूगेदर ची लाट आली त्यावर स्वार होवून ,आम्ही पण गेट टुगेदर ठरवलं।आम्ही 8 वी ते 10 वी इंग्लिश मीडियम मध्ये 10,12 जणीच होतो ,त्यातल्या 10 जणी तर तिन्ही वर्ष होतो,बाकी येऊन जाऊन होत्या।कमी जणी असल्याने  छान एकी आणि जवळीक  होती आमच्यात.शाळा संपल्यावर,Non whats ap era मधे ही आम्हीं बऱ्याच जणी संपर्कात होतो.काहींच्या भेटी पण व्हायच्या तर काहींना अनेक वर्षांपासून भेटलो नसलो तरी कोण कुठे आहे इतपत माहिती होती।
गेट टूगेदर मुळे सगळ्याच 20,22 वर्षांनी एकत्र भेटलो।
गप्पांना अंत नव्हता.आपण कशी मस्ती करायचो ,कशी लोकांची टर उडवायचो याची उजळणी सुरू होती।बोलता बोलता ज्योती म्हणाली "आपल्यात किती एकी होती नाही!आपण वैशु ला सुद्धा पुरून उरलो,तिला एकट पाडलं"। एकमेकींना टाळी देऊन आम्ही जोरात हसलो ,वैशु पण त्यात सामील झाली।
गेट टूगेदर पार पडल .निरोप घेताना, किती मज्जा आली, खुप छान वाटलं,आता नेहमी भेटत जाऊ वगैरे म्हणून झालं होतं।तरी सगळ्या आपापल्या घरी पोचल्यावर रिवाजाप्रमाणे त्याच आशयाच्या पोस्ट व्हाट्सअप वर सुरू झाल्या।वैशु ची पोस्ट थोडी वेगळी वाटली म्हणून वाचली अन खाडकन डोळे उघडले।
"आपण खूप दिवसांनी भेटलो त्यामुळे छान वाटलं,तुम्ही सगळ्या खूप चांगल्या आहात पण यापुढे कधीच कोणाला एकट पाडू नका अन त्याचा अभिमान तर अजिबात बाळगू नका। एकट पडल्यावर काय वाटत ते मी सहन केल आहे".
हे वाचलं आणि नकळत मन मागे गेलं।
बुलढण्याला एडेड शाळेत मी 8 वीत असताना गेले, अजून दोघी तिघी मुली नवीन आल्या।पण सगळ्यांची लवकरच गट्टी जमली।त्याच वर्षी पण बरीच उशिरा वैशु आमच्या वर्गात आली। आम्ही सगळ्या लहान चणींच्या तर ती धिप्पाड अन आडदांड होती।
तिचे वडील दारू सुरू करण्याच्या (हा आमचा शब्द! ) म्हणजे  दारूच परमिट देणाऱ्या ऑफिस मध्ये काम करायचे.त्याकाळी दारू ला आजच्या सारखी प्रतिष्ठा नव्हती। दारू पिणारा अतिशय वाईटच असतो अस समजण्याचे ते दिवस!  सूची चे वडील दारू च परमिट देतात म्हणचे ते जणू दारू चा प्रसार करतात,म्हणजे ते वाईट अस आमचं ठाम मत। त्यात वैशु चा स्वभाव डोमिनेटिंग होता।चुगल्या करण ,भांडण लावणं शिव्या देण, हा तिचा हातखंडा! हे आमच्या लक्षात आल्याबरोबर आम्ही सावध झालो,तिला डावलण सुरू केल। डबा खाताना, खेळतांना ती यायची आमच्यात पण आम्ही फारस बोलायचो नाही। तिनी वह्या मागितल्या तर जीवावर आल्यासारखं द्यायचो ,कारण नाही दिल्या तर ती  वाईकरबाई (आमच्या क्लास टीचर) ना सांगेल ही भीती!
एकदा ऑफ पिरियड मध्ये  साखळी खेळताना ,तिच्यावर डाव आला,आम्ही ठरवून तिच्यावरचा डाव जाऊ दिला नाही ,ती रडकुंडीला आली .पोट दुखतंय म्हणाली। तिची तेंव्हा mc सुरू होती (हे आम्हाला तिनी नंतर सांगीतल) आम्हा कोणालाच हा प्रकार माहीत नव्हता,त्यामुळे ती खोट बोलतेय अस वाटलं। तीनी डाव दिला नाही।आम्ही सगळ्यांनी नंतर तिला खूप चिडवलं. त्यानंतर पूर्णच बहिष्कार टाकला तिच्यावर!
तिनी हे सगळं आईला सांगितलं असावं, एक दिवस ,वाईकर बाईं शिकवत असताना तिची आई सरळ वर्गात शिरली ,बाईंकडे तक्रार न करता आम्हाला जोरजोरात रागवायला लागली।बाईना हे काय सुरू आहे कळेना। त्यांनी कसबस तिच्या आई ला शांत केलं ,अन काय झालं ते विचारलं।तिच्या आई नी मग आमच्या तक्रारींचा पाढाच वाचला। त्यांची समजूत घालुन त्यांना घरी पाठवलं अन मग मात्र आमची अशी खरडपट्टी काढली की बास रे बास !आम्ही पण आमची बाजू मांडली ।त्यांनी दोघांनाही समजावलं अन यापुढे अस झालं तर शिक्षा करेन म्हणाल्या। बाई म्हणजे आमचं दैवत ! त्यांनी सांगीतल्यावर ऎकावच लागलं। नंतर  हळूहळू वैशुला आमच्यात सामावून घेतलं।
तिच्या घरी पण जायला लागलो।गावापासून थोडं दूर  आजूबाजुला फारशी वस्ती नसलेल्या ठिकाणी टिनाच्या दोन खोल्या म्हणजे तीच घर! घरी टॉयलेट पण नाही (पुढे काही दिवसांनी ते बांधलं)हा आमच्यासाठी फार मोठा धक्का होता।
वडील खूप दारू प्यायचे ,मारहाण,शिवीगाळ तर रोजचीच.
आमच्या सारख्या मध्यवर्गीय सरळमार्गी लोकांना हे सगळं नवीनच होत।असेही वडील असतात?
या अशा वातावरणामुळेच तिचा स्वभाव असा बनला असेल  नाही का? पण हे कळण्याची तेंव्हा अक्कल नव्हती। तिचा स्वभाव असा असण्यामागे  काही कारण असू शकतात अस समजण्याची परिपक्वता तेंव्हा नव्हती। त्यामुळेच सगळं रामायण घडल।
नंतर मात्र आमची छान मैत्री झाली। 10 वी ला असताना ,वडील घरी दारू पिऊन धिंगाणा घालतात,अभ्यास होत नाही, म्हणून ती बरेच वेळा  माझ्याघरी यायची ।अगदी बोर्ड च्या फायनल परिक्षेला सुद्धा!
नंतर आमची  बुलढण्याहून बदली झाली ,बाकी सगळ्यांच्या ही वाटा बदलल्या।
तिनी पुढे BAMS केल ,लग्नानंतर ती मुंबई ला असते एवढं कळलं होतं।
10-12 वर्षांपूर्वी तनु च्या मॅचेस साठी ठाण्याला गेले तेंव्हा तिचा फोन.नं. मिळवून फोन केला ।ती वाशी ला राहायला होती।मला ठाण्याला घ्यायला आली,तिच्या फ्लॅट वर घेऊन गेली। bams झाल्यावर तीच लग्न तीनच ठरवलं(पेपर मध्ये जाहिरात देऊन) ,नवरा पण BAMS डॉक्टर।2 मुलं आहेत। मुलुंड ला क्लिनिक सुरू केलं तिथे छोट्या प्रमाणात आयुर्वेदिक औषध पण बनवतात।
क्लिनिक बघून आम्ही परत ठाण्याला आलो ,वाईकर बाई ठाण्याला होत्या ,त्यांना भेटायला गेलो ,मग तिनी मला बहिणीकडे सोडलं।
"तुमच्यामुळे मला कुटुंब म्हणजे काय ,घर काय असत ते कळलं ,तुम्हा सगळ्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर ,तुझ्यासाठी खर तर साडीच घेणार होते पण वेळ नाही मिळाला" अस म्हणून क्रिस्टल च महागडं शो पीस गिफ्ट केलं।
बापरे !इतका विचार करते ही ,किती काय काय साचलय हिच्या मनात!
घरा सारख घर आणि कुटुंब आमचं त्यात वेगळं काय! पण ज्याला हे सगळं मिळत नाही त्यालाच त्याच महत्व कळत, नाही!
नंतर भेट झाली नाही तरी व्हाट्सअप मुळे संपर्क होताच।
तिनी संस्कृत मध्ये Ph.D केलं,
आकाशवाणी वर व्याख्यान ,पेपर मध्ये लेख ,जवळपास होणाऱ्या सगळ्या स्पर्धा,(योगा क्वीन,भारुड गीत ,सुगम संगीत ,मॅरेथॉन ,सौंदर्यवती स्पर्धा) यात तिचा असणारा सक्रिय सहभाग ही तिची प्रगती बघून आम्हा सगळ्यांना खूप आनंद झाला।
त्यानंतर आम्ही डायरेक्ट 4 वर्षा पूर्वी गेट टूगेदर
ला भेटलो। जिथे हा किस्सा घडला।
30 वर्षांपूर्वीच्या उपेक्षेची बोच तिच्या मनात अजूनही आहे हे कळल्यावर,आपण एका चांगल्या मुलीला नकळत का होईना त्रास दिला ही बोच आमच्याही मनात राहील, कायमचीच!

No comments:

Post a Comment