घटना क्षुल्लक होती. पण...चैतन्य भडकलाच. नागरिकशास्त्राचे साधे नियम न पाळणा-यांवर चिडला नि बोलता बोलता सुजयला म्हणाला, "कोणी यांना स्वातंत्र्य दिलं? कसं रहावं, कोणते सामाजिक संकेत पाळावेत, हे सुद्धा माहित नसणा-या आपल्या या समाजाला खरंतर गुलामगिरीतच ठेवायला हवं होतं. मग कळलं असतं".
"छे, छे! असं कसं? स्वातंत्र्य तर हवंच होतं. या मूठभर लोकांसाठी का आपण आपलं स्वातंत्र्य गमवायचं होतं?..." सुजय म्हणाला.
झालं! तो अप्रिय प्रसंग तर बाजूलाच राहिला पण दोघा मित्रांमध्ये वादावादी सुरू झाली. वेळीच थांबली म्हणून बरं! नाही तर...!
या दोघा मित्रांची ही वादावादी ऐकताना, बघताना विचारांची दिशा कधी भूतकाळाकडे वळली ते कळलंच नाही. खरंच! आधी संपूर्ण स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा? हा वाद जुनाच आहे. 1880 नंतर त्याला तोंड फुटलं तरी पण त्याही आधीपासून कदाचित तो वाद मनामनामध्ये असावा. काळाच्या प्रवाहात इतकं काही घडत असताना...स्वातंत्र्यप्राप्तीच् या इतक्या वर्षानंतरही तोच वाद दोन मित्रांमध्ये झडत असताना, आठवण झाली ती इतिहासातील अशाच प्रसिद्ध वादाची! आणि त्यावरूनच आठवले ते दोन व्यक्तींचे मित्रत्व! समान वैचारिक धाग्यांनी बांधलेले मित्र! आणि त्याच प्रखर वैचारिक जाणिवांमुळे एकमेकांपासून दुरावलेले मैत्र!
असं म्हणतात की, प्रत्येकाचं आयुष्य घडविणारी देशकाल परिस्थिती अगदी वेगवेगळी असते. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व घडविणारी मातीही वेगळी असते. एक माणूस दुस-या सारखा घडत नाही, तरीपण दोन व्यक्तींमध्ये मित्रत्व जुळतं ते काही समानतेमुळे! आणि ते दुरावतं विचारभिन्नतेमुळे!
इतिहासानं असंच एक मैत्र अनुभवलं. दोघं मित्र! दोघांचीही देश-काल-परिस्थिती वेगळी! पण ध्येय एक! यामुळे दोघं एकत्र आले. स्वप्न पाहिल्याशिवाय वाट सापडत नाही, या जाणीवेनं त्यांनी स्वप्न पाहिली. ही स्वप्नं समाजामध्ये पेरावी लागतात, पुढच्या पिढ्यांसाठी अशी काही स्वप्नं वारसा म्हणून द्यावी लागतात. ती त्यांनी दिली. पण ही स्वप्नं पेरत असताना दोघांमध्ये वैचारिक संघर्षाची नकळत ठिणगी पडली आणि बघता बघता त्याचा वणवा पेटला. तो थांबला मृत्यूनंतरच!
टिळक आणि आगरकर...इतिहासावर आपली कालमुद्रा उमटविणारे दोन महान व्यक्तिमत्व! एक प्रचंड कणखर तर दुसरा तितकाच हळवा! एक विलक्षण मानी तर दुसरा तर्कशुद्ध आकलन आणि विवेचनावर भर देणारा! दोघांच्याही मनोवृत्ती तशा भिन्न पण प्रेरणा मात्र एकच! राष्ट्रोद्धार! लोकोद्धार!
'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्' या वचनावर गाढ विश्वास असणारे बाळ गंगाधर टिळक आणि निरर्थक क्रिया कर्मांवर विश्वास नसणारे गोपाळ गणेश आगरकर, हे ते दोन व्यक्तिमत्व! दोघं महाविद्यालयीन जीवनात एकत्र आलेत. 1879 दरम्यानच्या निखळ मैत्रीच्या आठवणी दोघांच्याही चरित्रात आहेत. आगरकर एम. ए. करिता आणि टिळक एल. एल. बी. करिता अभ्यास करण्यासाठी काॅलेजात होते. तेंव्हा विविध विषयांवर चर्चा नि क्वचित प्रसंगी वाद घडत असत, ही आठवण स्वतः आगरकरांनी लिहून ठेवली आहे. त्यांचा हा सहवास आणि हितवाद 1880 मध्ये शाळा स्थापनेच्या रूपानं फळास आला.
'शिक्षण संपत आले, पुढे काय?' या गहन प्रश्नाचा काथ्याकुट टिळकांनी इतर सवंगड्यांसोबत पुष्कळदा केला परंतू या शुष्क काथ्याकुटाला लोकहिताच्या निश्चित ध्येयाचे रूप आगरकरांनी दिले, असे टिळकांचे चरित्रकार सांगतात. 'जे कार्य मनापासून पत्करले त्याची अंतिमसिद्धीपर्य॔त पाठ सोडायची नाही' हा टिळकांचा बाणा होता. तर दुस-याचा एखादा कठोर शब्दही जिव्हारी लागणारे आगरकर अतिशय भावनावश होते. साहजिकच भिन्न भूमिकांमुळे दोघांच्यात मनोमिलना पाठोपाठ मनोमालिन्य येणे क्रमप्राप्त होते. ते तसे झाले. या वादात परस्परांवर जिव्हारी लागण्यासारखे शाब्दिक हल्ले चढवतानाही टिळकांनी एक पथ्य काटेकोर पाळलं. आपण स्थापन केलेल्या संस्थेचं ज्यामुळे अहित होईल असा वागवा मजकूर त्यांनी स्वतः लिहिला नाही. तसाच तो 'केसरी'त अन्य कोणी लिहिणार नाही, याचीही खबरदारी त्यांनी घेतली, हे आपल्याला विसरता येणार नाही. आज मात्र काय दिसतं? आपसातलं वैर चव्हाट्यावर आणलं जातंच पण त्यास पातळी सोडून शाब्दिक युद्धाचं स्वरूप येतं.
असं म्हणतात की, जो समाज केवळ आपल्या महापुरूषांचं नाममहात्म्य जपत राहतो आणि त्यांच्या विचारांना मात्र विस्मृतीत टाकतो, तो समाज इतिहासाचं केवळ ओझं वाहत असतो. आम्ही नेमकं हेच करतो आहोत. महापुरूषांचे विचार बासनात गुंडाळून ठेवलेत नि प्रतिमा, पुतळ्यांचं अवडंबर माजवत नाममहात्म्यात अडकलो आहोत.
टिळक आणि आगरकर दोघंही जाज्वल्य देशाभिमानी होते. दोघांचेही वैचारिक मतभेद होते. 'राजकीय सुधारणा प्रथम की सामाजिक सुधारणा प्रथम' या वादानं दुरावलेल्या या मैत्रीला अंतःस्थ ओलाव्याची हळवी किनार होती. डोंगरीच्या तुरूंगात एकशे एक दिवस दोघांनी शिक्षा एकत्र भोगली होती. पण बंधमुक्त झाल्यावर स्वभाव भिन्नतेला मतभिन्नतेची जोड मिळाली. 'होळकर देणगी प्रकरण, संमती वयाबद्दलचे वादळ तसंच ग्रामण्य प्रकरण' या निमित्तानं दोघंही एकमेकांवर कडवट भाषेत तुटून पडत होते. मतभिन्नता होती. भुमिका दोघांचीही परिवर्तनाचा पुरस्कार करणारी होती. खरं तर परिवर्तनाच्या दिशा आणि वेग यांचे भान येण्यासाठी काही काळ जावा लागतो. पण तो जाणून न घेतल्यामुळे एक सुंदर वैचारिक मैत्री तुटली. विचारांचे वेगळेपण मैत्रीत आडकाठी निर्माण करते झाले. तरी मृत्यूनंतर मात्र ते राहिले नाही. मित्राच्या मृत्यूनंतर टिळक हळवे झाले होते. मृत्यूलेखाचा मजकूर लेखनिकाला सांगताना अस्वस्थ झाले होते, अशी आठवण टिळकांच्या चरित्रात आहे. 'मैत्र' हे असेच असावे. कितीही मतभेद असलेत तरी अंतर्मनातील आपलेपणा कधीतरी व्यक्त होतच असतो. 'आगरकरांच्या स्मारकासाठी निधी जमविण्यासाठी आयोजित सभेत टिळकांनी 30 रूपये देणगी दिल्याचं वृत्त, 26 ऑगस्ट 1897 च्या 'सुधारक' मध्ये छापून आलं होतं, असं इतिहास आपल्याला सांगतो तेव्हा मैत्रीची ही बाजू जाणून आपणही नकळत हेलावून जातो.
टिळक नि आगरकर! दोघं मित्र! मित्र दुरावले पण त्या दुराव्यातील ओढ मात्र संपली नव्हती, हे काळाने सिद्ध केले. काळ! तो आपल्या गतीनं चालतो आहे. मागे पाऊलखुणा उमटवत जातो आहे.
चैतन्य- सुजयच्या वर्तमानातील वादानं भूतकाळात नेलं नि जाणवलं की, माणसं जुळतात ती प्रेमानं आणि सहवासानं! त्यातूनच कार्य उभं राहतं. जीवाला जीव देणारी माणसं तयार होतात. समाजाच्या भल्याचं काही करायचं असेल तर अशा माणसांचं पाठबळ लागतं. मैत्र असावं लागतं. मैत्र टिकावं लागतं.
- सीमा शेटे (रोठे), अकोला.
(17 जून...! गोपाळ गणेश आगरकर यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने हा लेख)
No comments:
Post a Comment