Wednesday, April 1, 2020

भाग ३

आपण ठरवतो एक आणि घडतं भलतंच!
 बरोबर ना?
असा अनुभव मला पहिल्यांदा आला माझं वैद्यकीय शिक्षण घेताना. एक वर्ष अभ्यासक्रम सुरू होऊन झालं होतं. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी रुळायला लागल्या होत्या त्यातच कुटुंबामध्ये पुण्याला स्थायिक होण्याचे वारे वाहू लागले होते .अर्थात माझ्या शैक्षणिक प्रवासाला चांगलाच फायदा होणार होता .त्यामुळे "विद्येच्या माहेरघरी" पुढचं शिक्षण घेण्याला मी तयार झाले. मात्र प्रकरण एवढं साध नव्हतं. पुणे विद्यापीठातल्या नंबर एक वर असलेल्या टिळक आयुर्वेद कॉलेज मध्ये ट्रान्सफर घ्यायला बारा अर्ज आले  होते आणि जागा तीन होत्या .माझ्या बाबांची चिकाटी आणि या सरकारी कामातली समज यावेळी खूप महत्त्वाची ठरली. बड्या राजकीय असामीं चा वशिला असलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचा कट त्यांनी  मुंबईत वैद्यकीय संचालनालयाच्या ऑफिसमध्ये सतत पाठपुरावा करून हाणून पडला आणि माझी ऍडमिशन ऑन ट्रान्सफर नक्की झाली.

या आनंदात आपण नागपूरच्या बऱ्याच गोष्टी सोडून जातोय याचं भानच राहिले नाही .आमच्या तिघींची गट्टी असलेल्या आपण आता दोघीच मैत्रिणी उरणार म्हणून त्या दोघी नाराज झाल्या. कॉलेजमधल्या पंडितजींनी (सर )बाबांना अर्ज देतांना स्वतः येऊन म्हटले- रहने दो वर्षा को यही| हॉस्टेल में  रहकर पूरी करने दो  डिग्री |  अनँटाँमी शिकवणाऱ्या  मॅडम भयंकर कडक शिस्तीच्या! वर्षभर कोणाशीही चेहर्‍यावर विशिष्ट त्रासिक उग्र भाव ठेवल्याशिवाय न बोललेल्या !मात्र त्या  सुद्धा जेव्हा- एकाच ठिकाणी पूर्ण होऊ द्या तिचं शिक्षण. चांगली स्टुडन्ट आहे ती. नका करू तिला डिस्टर्ब.- असे स्वतःहून येऊन बाबांना म्हणाल्या तेव्हा मी थक्क होऊन त्यांच्याकडे बघत राहिले. वर्षभर जाम त्रस्त केलेल्या मॅडमनी( त्यामुळे आम्ही त्यांचं टोपणनाव रक्तपिपासू ठेवलं होतं) चक्क अस्पष्ट का होईना हसरे भाव ठेवून असे म्हटले यावर विश्वास बसत नव्हता .मात्र अखेरीस पूर्ण कुटुंब पुण्याला निघाल. त्यावेळी पहिल्यांदा ट्रेनच्या फर्स्ट क्लासमध्ये मी, आई, बाबा बसलो होतो. गाडी सुटली तशी बाहेरच्या प्लॅटफॉर्मवर माझ्या  दोघी मैत्रिणी पाणावलेल्या डोळ्यांनी  बाय करत होत्या.

पुण्यातल्या कॉलेजमध्ये जाताना सगळीकडे उत्साह भरून गेला होता .छानच वाटलं कॉलेज. लहान बिल्डिंग असली तरी इथे आयुर्वेद शिकणं भाग्याचं आहे याची कॉलेजचा राऊंड मारताना खात्री मिळाली. कॉलेजला संलग्न ताराचंद हॉस्पिटल पुण्यातल्या जुन्या नावाजलेल्या हॉस्पिटल्स पैकी एक .तिथल्या डिपार्टमेंटच्या पाट्या वाचताना एकापेक्षा एक बडी नावं येत होती. वैद्य नानल वैद्य गोगटे वैद्य तनुजा नेसरी , डॉक्टर पां ह कुळकर्ण ,डॉक्टर डोळे ...या मिळालेल्या संधीचं  चीज करण्याचा निश्चय मी त्यादिवशी केला.

कॉलेजमध्ये माझ्याबरोबरच एक मुंबईच्या सायन कॉलेजहून आणि दुसरी नाशिकच्या कॉलेजहून ट्रान्सफर घेतलेली पण मूळची सदाशिव पेठ पुण्याची असलेली अशा दोघी जणी होत्या. म्हणजे थोडक्यात आम्ही  "मुंबईकर ,पुणेकर, नागपूरकर" तिथे एकत्र आलो आणि आमची मैत्री पण चांगली झाली. कॉलेज च्या घरापासून च्या अंतराचा मात्र प्रश्न होता .18 किलोमीटर बसने रोज जायचे आणि पुढे दहा मिनिटे चालत जायचे एवढं रोज करावे लागणार होतं आजच्यासारखे तेव्हा मी धष्टपुष्ट नव्हते चेपायला त्रास होऊ लागला. झेपायला त्रास होऊ लागला.  घरी येऊन अभ्यासाची शक्ती उरायची नाही. मग कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये राहावे म्हणून तयारी केली.  गादी सकट सगळे सामान होस्टेलला घेऊन निघाले. सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार-रविवार घरी येणार वगैरे सांगून होस्टेलला पोचले. पहिल्या रात्री झोप लागली नाही, दुसऱ्या दिवशी जेवण गेलं नाही तिसऱ्या दिवशी सकाळी उठून चंबूगबाळं बांधून परत घरी आले. "अपडाऊन करेन पण होस्टेलला राहणार नाही" यावर शिक्कामोर्तब झालं. 

मग नऊ वाजता च्या क्लिनिक्स, 12 ते 4 कॉलेज असं करायला 7:30 च्या बसणे निघायचं आणि 5:30 पर्यंत परत यायचं असं रुटीन सुरू झालं. पुढची दोन्ही वर्ष शिकणे ,वाचणे, प्रॅक्टिस भरपूर सुरू होती. कॉलेजच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने बरेच शिकायला मिळत होते. एका एका प्रोफेसर ची शिकवण्याची पद्धत ,पेशंट तपासण्याची पद्धत, पुण्यात आणि आसपासच्या तालुक्यांमध्ये अटेंड केलेली आरोग्य शिबिरे, प्रायव्हेट क्लिनिक्स मधून शिक्षण सुरू होतं. एक सुखद आठवण म्हणजे दुसऱ्या वर्षी "मिस आयुर्वेद" झाल्याची !लेखी परीक्षा, परीक्षकांची तोंडी परीक्षा स्टेजवर देणे यावर हे टायटल मिळालं होतं. याशिवाय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची ट्रॉफी आमच्या कॉलेजला मिळाली आणि प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस मला मिळाले होते.
याशिवाय बारामतीचा कॅम्प जिथे अँप्रन नं  नेल्यामुळे सर्जिकल गाऊन घालून रुग्ण तपासले होते ,भिमाशंकरला औषधी वनस्पतींच्या अभ्यास शिबिराला मधमाशांनी केलेली आमची भीतीदायक फजिती ,हर्बेरियम करताना सलग तीन रात्री आणि दिवस आम्ही  दहा मैत्रिणींनी एकत्र केलेली मेहनत इत्यादी इत्यादी खूप कडूगोड अनुभव आणि आठवणी आहेत. त्या सगळ्यातून शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केली.नानल हॉस्पिटल आणि देहूगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही इंटर्नशिप होती. त्यावेळी बरेचदा प्रत्यक्ष औषधी कल्प तयार करणे( शतावरी कल्प,  च्यवनप्राश यासारखे) तसेच सलाईन लावणे ,सर्पदंशाच्या केसेस, डिलिव्हरी करणे असे खूप काम सीनियर च्या मार्गदर्शनात केले आणि अनुभवाची शिदोरी वाढवत नेली.

 डॉक्टर म्हणून रजिस्ट्रेशन झाल्यावर मला बाबांकडून स्कूटीचे बक्षीस मिळाले. पुण्यातल्या शोरूम पासून घरी बावीस किलोमीटर ती नवीन स्कुटी बाबांना मागे बसवून चालवत आणली तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. सोबत माझा भाऊ त्याच्या बाईकवर वहिनी बरोबर होताच. याच भावाने फायनल परीक्षेच्या संपूर्ण दहा-बारा दिवसात मला दोन वाजता सेंटरवर पोचवून पाच वाजता घ्यायला येण्याचं काम आपल्या कंपनीचं काम सांभाळून  केलं होतं. अशा प्रकारे एक क्वालिफाईड डॉक्टर ,आयुर्वेद तज्ञ होण्यापर्यंत मजल मारली होती. आता खरे आव्हान स्वतःच्या प्रॅक्टिस चे होते. प्रॅक्टिस करावी का पुढे शिकावं? आधी लग्न करावं (आई-बाबांच्या म्हणण्याप्रमाणे) आणि मग प्रॅक्टिस करावी? काही दिवस या विचारातून पुढचा मार्ग ठरवून पुढच्या प्रवासाला लागले ...त्याबद्दल पुढच्या भागात......

No comments:

Post a Comment