फुकेट क्राबी ला गेलो तेंव्हाच संजीवभाई अन ईशाभाभी नी फेब्रुवारी मधे असलेल्या त्यांच्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच आमंत्रण दिलं. चंदिगढ ,लुधियाना ,कर्नाल सगळीकडे काम ही होईल अन फंक्शन पण अटेंड करता येईल असा विचार करून जायचं ठरवलं.
आदल्या दिवशी मेहेंदी संगीत अन दुसऱ्या दिवशी रिसेप्शन असा प्रोग्रॅम होता.
5 वाजता कर्नाल ला पोचलो थोडा आराम करून त्यांच्या घरी गेलो.
घरात लग्न घर असल्यासारखी लगबग सुरू होती. सगळीकडे फुलांच्या माळा सोडल्या होत्या,फोटो साठी एक सोफा फुलांनी खास सजवला होता. मेहेंदी काढणारे,मेंहेंदी लावून देत होते,फोटोग्राफर फोटो,व्हिडीओ साठी तैनात होता. ईशाभाभी नी नव्या नवरी सारखी पूर्ण हातभर अन पायावर मेंहेंदी काढली होती, फुलांचे दागिने घातले होते. आलेल्या सगळ्यांना मांग टिक्का (बिंदी सारख) लावून देणं सुरू होत.मेहेंदी काढता काढता विविध प्रकारच्या स्नॅक्स चा आस्वाद सगळे घेत होते.सगळ्यांची मेंहेंदी झाल्यावर,मेहेंदी वाले हात भाभी भोवती वेगवेगळ्या आकारात धरून फोटो काढले. त्या दोघांचे पण विविध पोज मध्ये व्हिडीओ काढणं झालं. गावातले नातेवाईक अन जवळची मित्र मंडळी असे जवळ जवळ पन्नास एक लोक होते.
बाहेर मोठ्या टेबल वर बसून पुरुष मंडळींचा पिण्याचा प्रोग्रॅम सुरू होता. थोड्या बाजूला ज्युनिअर मंडळी पित बसले होते(किती हा मोठ्यांबद्दल आदर!).
इशाभाभी तयार होऊन बाहेर आल्या अन मग डीजे वर डान्स सुरू झाला.खरच सगळे खूप छान,बेधुंद आणि दिल खोलके नाचत होते, पण किती वेळ ! त्यांचा डान्स काही केल्या संपेना ,आम्ही दिवस भर प्रवास करून थकलो होतो, शेवटी आम्ही उठून जेवायला घेतलं.आम्हाला हॉटेल ला सोडायच तर ,आता कोण सोडणार ,सगळेच प्यायलेले! "बेटे आपको जादा हो गई है ,आप किसींको लेके सिर्फ साथ मे जाओ' अस संजीव भाईंनी विशालला (त्यांचा मुलगा) सांगितलं. शेवटी एक न प्यायलेला त्यांचा नातेवाईक सापडला, त्यांनी आम्हाला सोडून दिलं.मेहेंदी प्रोग्रॅम इतक्या थाटामाटात केलेला पाहून उद्या याही पेक्षा जबरदस्त काही बघायला मिळेल हे लक्षात आलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही फॅक्टरी अन ऑफीस ला जाऊन आमचं काम केलं.
लंच त्यांच्या घरी केला,चक्क एकदम साधासा होता.मग हॉटेल ला आलो.
रात्री 7.30 ला हॉल वर जाण्यासाठी घ्यायला येणार होते.
हॉल भला मोठा,हजार एक लोक मावतील एवढा!(आमंत्रित फक्त 300,400 होते) स्टेज खूप सुंदर सजवला होता,त्याच्या बाजूला मोठ्ठा स्क्रीन ,डीजे,जोडीला ढोल वाजवणारे ही होते.हॉल मधे मोठे मोठे गोल टेबल मांडून बसायची सोय केली होती.आम्ही पण एक टेबल पकडून बसलो. एक एक आमंत्रित येण सुरू झालं,सगळ्यांच्या हातात मोठे मोठे गिफ्ट बॉक्स किंवा पुष्पगुच्छ होते.एकेकाचे ड्रेस, हेअर स्टाइल मेकअप बघण्यासारखे होते. कोणतंही कपल अंनिव्हर्सरी कपल म्हणून खपल असत इतके भारी भारी कपडे अन दागिने घातले होते.
निरीक्षण करता करता छान वेळ जात होता.सात -आठ प्रकारचे स्नॅक्स ,मॉंकटेल घेऊन वेटर सतत फिरत होते अन इतकं सारख विचारत होते ,की दे बाबा एकदाच अस म्हणत आम्ही खात होतो. जेवणात ही खूप प्रकार,व्हेज नॉनव्हेज ,पाच तर स्वीट डिशच होत्या.बार काउंटर वेगळा लावला होता.
थोड्या वेळानी अंनिव्हर्सरी कपलच वाजत गाजत ,पुष्पवर्षाव झेलत,नाचतच आगमन झालं.खूप धूम नाचले ,किती तरी वेळ डान्स सुरूच होता.मग दोघ आलेल्या पाहुण्यांना भेटले.
बाजूच्या मोठ्या स्क्रीन वर त्यांचे लग्ना पासूनचे फोटो दाखवणं झालं.मग स्टेज वर कोरिओग्राफर कडून बसवून घेतलेले डान्स सुरू झाले.एक दोन डान्स नंतर रिंग सेरीमनी,अन वरमाला घातल्या.
मग एक एक जण स्टेज वर त्यांना शुभेच्छा द्यायला गेले.
त्यानन्तर परत, स्टेज वर अन खाली डीजे च्या तालावर सगळे थिरकायला लागले.
तिथे डान्स आणि दारू हे कुठल्याही फंक्शन च अविभाज्य अंग आहे अस एकंदरीत लक्षात आलं.त्यासाठी तर वाढदिवस 25 ला होता तरी पार्टी 24 ला दिली. कारण मंगळवारी तिथे नॉनव्हेज अन दारू घेत नाहीत!
कोणी गेस्ट आले की लगेच ते पण नाचायला लागायचे अन बाकी लोक तर तयारच असायचे. थोड्या थोड्या वेळाने बंदुकीच्या फैरी झडतात तस डान्स च्या फैरी झडत होत्या.आम्ही ठरलो बाथरूम डान्सर ,तरी थोडे हात पाय आम्ही पण हलवले!
प्रत्येक वेळेला डान्स बरोबरच नोटा उडवण सुरू होत.पूर्ण प्रोग्रॅम होईपर्यंत 8,10 हजार रुपये तरी उडवले असतील!त्या उधळलेल्या नोटा नाचताना पायदळी तुडवल्या जात होत्या ,त्या घेण्यासाठी लहान मूल ( बहुदा डीजे ,ढोल वाल्याबरोबर असलेली मुलं) मधे घुसत होती. हे दृश्य मात्र अजिबात आवडलं नाही,पण तिथे हे सर्रास चालत.
सून अन सासू नाचतेय ,सासरा त्यांच्यावर नोटा उडवतोय अन मुलगा दारूचा ग्लास हातात घेऊन व्हिडीओ काढतोय! आपल्या इथे अस दृश्य डोळ्यासमोर आणलं तरी मेंदूला झिणझिण्या येतील!
हा खाणे, पिणे ,नाचणे सिलसिला 12 पर्यंत सुरू होता. मग तीन मजली केक आणला ,केक कापून झाला तो तोंडाला फासण्याचा कार्यक्रम पण पार पडला
आता सगळं आटोपलं अस वाटेपर्यंत परत डान्स सुरू झाला.
तिथे आलेल्या प्रत्येक फॅमिली ला (150 फॅमिली तरी असतील) जाताना,एक सुंदर कुंदननी सजवलेला मोठा बॉक्स दिला,आतमध्ये खारवलेले काजू बदाम च्या काचेच्या बरण्या आणि मिठाई होती.
खूप उशीर झाला होता आम्ही पण निघायचं ठरवलं.
आदल्या दिवशी सारखा न प्यायलेला बकरा शोधला. दोघांचा निरोप घेऊन कार्यक्रम खूप छान झाल्याचं सांगितलं.
ते म्हणाले "हा ठीक हुआ फंक्शन ,कोई नाराज नहीं हुआ ,हमारे यहा सबको बहुत पुछना पडता है, नही तो लोग नाराज हो जाते है।' त्यांनी अस म्हंटल्यावर लक्षात आल ,प्रत्येक वेळेला ,स्टेज वर वरमाला घालणं झाल्यावर असो केक कापून झाल्यावर किंवा नाचताना,आम्ही जिथे कुठे असू तिथून ते आवर्जून आम्हाला फोटो साठी बोलावत होते.
विरे दि वेडिंग (विरी गेलेल्या जोडप्याची का असेना) मस्तच झाली. खूप जिंदादिल लोक आहेत तीकडली ,खाओ पीओ नाचो ऐश करो हा तिथला फंडा!
मला आठवत अमोल(पुतण्या) च्या लग्नाच्या रिसेप्शनला संजीवभाई अन फॅमिली आले होते. तेंव्हा आमचं त्यांच्याशी नुकतंच डिलिंग सुरू झालं होतं,फारशी ओळख नव्हती.
ते रिसेप्शन त्यांना किती मिळमिळीत वाटलं असेल! नाच नाही दारू नाही ,हल्ला गुल्ला नाही.लोक आपले येतायत ,भेटून जेऊन परत जातायत! त्यांनी पण तिकडे जाऊन असच सांगितलं असेल नाही का!
मी पंजाब मधलं फंक्शन पाहिल्यांदा च अटेंड केलं.दोन्ही संस्कृती मधला फरक खूपच ठळकपणे जाणवला.
हा संस्कृती मधला फरक असला तरी, आपल्याकडच्या एका लग्नाच्या खर्चायेवढा खर्च अंनिव्हर्सरी साठी केलेला पाहून किती ही उधळपट्टी ,असा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही.
हौसेला मोल नाही अजून काय!
No comments:
Post a Comment