Tuesday, April 14, 2020

या चिमण्यांनो.....

नाशिकला रोज सकाळी उठवणार चिमण्यांचं झाड बघून गंमत वाटते . हो चिमण्यांचं झाडच ! सकाळी सहा ते
साडे सहाच्या दरम्यान गॅलरीतून दिसणार्‍या बाजूच्या घरातल्या फणसाच्या झाडावर असंख्य चिमण्यांचा
चिवचिवाट जागं करतो. थोड्यावेळानी सात साडेसात वाजेपर्यंत शांतता होते तसेच संध्याकाळी देखील साडेसहा
पावणे सातच्या दरम्यान परत एकदा चिमण्यांचं झाड जागं होतं आणि जणूकाही दिवसभराचा इतिवृत्तांत
एकमेकांना सांगून झाल्यावरच शांतता होते. तसेच माझ्या कार्यालय परिसरात देखील रोज संध्याकाळी एक
वाळक्या झाडावर चिमण्या चिवचिव करत असतात. तसे बुलबुल,पारवा, कोतवाल,विविध प्रकारचे सुर्यपक्षी
,भारद्वाज,क्वचित पोपट, वेडाराघू, हे दोन्ही परिसरात पुष्कळ प्रमाणात आहेत.आणि त्यातल्या चिमण्या ,सुर्यपक्षी
माझ्या किचन च्या खिडकीत नेहमी कोवळी गुलाबाची पाने, तुळशी ची पाने खायला येतात म्हणून मी
त्यांच्यासाठी भांड्यात पाणी आणि थोडे बाजरीचे दाणे ठेवते. सकाळी जेव्हा मी किचन मध्ये काम करत असते
तेव्हा त्यांचा मधुर चिवचिवाट मन प्रसन्न करतो.

नाशिकला मला चिमणींची संख्या खूप लक्षणीय वाटली आणि तसे माझ्या मैत्रिणीला मी बोलून देखील दाखवले
पण जेव्हा सहज गुगल वर एक लेख वाचण्यात आला तेव्हा कळले की नाशिक येथील मोहम्मद दीलावर यांनी
चिमणी संवर्धनाकरता विशेष प्रयत्न केल्यामुळेच ही स्थिती आज दिसते आहे. आणि त्यांच्या अथक प्रयनांमुळेच
जागतिक चिमणी दिवस 2010 पासून साजरा होण्यास सुरुवात झाली. कुतूहल वाटले आणि त्यांची माहिती
गुगलून काढली. मोहम्मद दीलावर हे नाशिक येथून पर्यावरणाचे शिक्षण घेत असतानाच त्यांचा संबंध बॉम्बे
नॅचरल हिस्ट्री सोसायटी आला आणि 2009 पासून त्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या कॉमन बर्ड
मॉनिटरिंग प्रोग्राम या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शहरी पर्यावरणातील नेहमी
आढळणाऱ्या 18 पक्षांची नोंद केल्या गेली. त्यात कबूतर, पोपट, राखी वटवट्या तसेच हुदहुद पक्षाचा समावेश
होतो. आणि यातूनच त्यांना नुसत्या चिमण्याच नव्हे तर इतर ही नेहमीच्या आढळणाऱ्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी
काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी पक्ष्यांसाठी बर्ड फीडर आणि कृत्रिम घरटे माफक किमतीत घरोघरी वाटले. त्यांच्या या प्रयत्नामुळे चिमण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. त्यांना लहानपणापासूनच चिमण्यांचे विशेष
आकर्षण होते लहानपणी कशा चिमण्या सगळीकडे दिसायच्या सगळ्यांच्या घरामध्ये देखील चिमण्यांचं एखादं घर तरी असायचं जणू काही ते आपल्या कुटुंबाचाच एक भाग होत्या आणि तसं म्हटलं तर दहा हजार वर्षापासून
चिमण्या या माणसाच्या सोबती आहेत. काही वर्षांपूर्वी इंग्लंडमधील चिमण्या कमी होत आहेत यावर एक
वैज्ञानिक लेख वाचला आणि त्या अनुषंगाने भारतात काय परिस्थिती आहे याच त्यांना कुतूहल वाटले तेव्हा
त्यांना असं लक्षात आलं की यापूर्वी कधीही चिमण्यांच्या संख्येची मोजदाद केली गेली नाही किंवा इतर
साधारणपणे आढळणाऱ्या कुठल्याही पक्षांची मोजदाद केली गेली नाही आहे आणि त्यांच्या संवर्धनासाठी पण
कुठल्याही प्रकारचं कार्य आपल्या देशात केल्या गेल नाही आहे, तेव्हा त्यांनी या दिशेने काम करायला सुरुवात
करायचा निर्णय घेतला. हे काम करत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबाचा देखील पुरेपूर सहभाग मिळाला. जेव्हा
पूर्ण जग त्यांच्यावर हसत होतं तेव्हा त्यांचे कुटुंबीय मात्र त्यांच्या सोबत उभे होते. चिमण्या या निसर्गातील
नैसर्गिक इनसेक्ट कंट्रोलर आहेत. त्यांच्या पिल्लांचे ,किडे हेच खाद्य असते तसेच चिमण्या या भरपूर प्रमाणात
आढळत असल्यामुळे त्या देखील कुणाचातरी खाद्य असतात .आणि त्यांची संख्या जर कमी झाली तर
त्यांच्यावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांची संख्या देखील कमी होईल. निसर्गातल्या प्रत्येक घटक प्रत्येक प्राणी
अगदी मुंगी पासून हत्ती पर्यंत विशेषच आहे .एखादी प्रजाती समूळ नाहीशी होणे हे नैसर्गिक साखळी विस्कळीत
होण्याचे लक्षण आहे.

आज चिमण्या नाहीश्या होत आहेत कदाचित उद्या आपण देखील...... त्यामुळे आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की आपण या अन्नसाखळीचा एक घटक आहोत आणि बाकीच्या घटकांवर आपले जीवन
अवलंबून आहे. इतर प्राणी, पक्षी माणसांशिवाय आनंदाने जगू शकतील पण माणूस मात्र , प्राणी ,झाडं ,पक्षी
यांच्या शिवाय जगूच शकणार नाही. त्यासंदर्भात त्यांनी चीनमधील माओ झेडोंग यांची गोष्ट सांगितली 1957
मध्ये जेव्हा तेथील हरितक्रांती निष्फळ ठरली त्याचा दोष त्यांनी उंदीर , माश्या , डास आणि चिमण्या यांच्यावर
ठेवला आणि जवळपास 200000 चिमण्यांना मार्च ते नोव्हेंबर 1958 मध्ये मारण्यात आले. खरंतर किडे हे
चिमण्यांचे भक्ष असल्यामुळे त्यांचा उपयोगच होत होता . पण या कत्तलीचा परिणाम व्हायचा तोच झाला.
किड्यांनी 1959 चा धान्याचा हंगाम पूर्णपणे खराब झाला, तसेच समाजातल्या दुबळ्या आणि गरीब
माणसांविरुद्ध ची हिंसा ही राष्ट्रीय हितासाठी म्हणजेच लोकांच्या हितासाठी आहे असं तिथल्या नवीन पिढीला
वाटू लागलं .आणि पुढे जाऊन 1960 ते 62 मध्ये दुष्काळाने चाळीस लाख चायनीज लोक मृत्युमुखी पडले.
भारतात मात्र आता चिमण्या विषयी जागरूकता वाढीस लागली आहे सरकारने देखिल याच यात लक्ष घातले
आहे दिल्ली राज्याला स्वतःचा असा राज्यपक्षी नव्हता. मोहम्मद दीलावर यांच्या संस्थेने पुढाकार घेतल्यामुळे
2016 मध्ये चिमणीला दिल्ली राज्याचा राज्य पक्षी म्हणून घोषित केले गेले. लोकांमधली जागरुकता देखील
वाढीस लागली आहे, चिमण्यांच्या संवर्धनासाठी ते पुढे येत आहेत.यामागे मोहम्मद दीलावर यांच्या संस्थेचे आठ
-दहा वर्षाचे अथक प्रयत्न आहेत ते मात्र याचे श्रेय लोकांना देतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकांनी सहभाग
घेतल्यामुळे या योजनेला यश मिळत आहे लोकांना देखील यात आनंद मिळतो आहे जेव्हा ते पक्षांचे घरटे
पाहतात त्यांच्यात छोटे छोटे पिल्लू पाहतात तेव्हा त्यांना हे दृश्य मानसिक आनंद देते . निसर्ग संवर्धन हे
आनंदी आणि सहज करता येऊ शकेल असे आहे. त्यासाठी वैज्ञानिक किंवा फक्त सरकारी यंत्रणा काम करू
शकतात असे नाही तर सुजाण नागरिक देखील स्वयंप्रेरणेने चांगले काम करू शकतात. तसेच फक्त पैशानेच हे
काम होते असे नाही अनेक संस्था फक्त पैशासाठी निसर्गप्रेमी असल्याचे दाखवतात पण प्रत्यक्षात काही काम
करत नाहीत मोहम्मद दीलावर यांची संस्था बर्ड फिडर हे अतिशय माफक किमतीत उपलब्ध करून देते अर्थात
त्यांची क्वालिटी ठेवूनच. मोहम्मद दीलावर यांची संस्था तीन तत्त्वावर काम करते पक्षांना चिमणी तसेच इतरही
नेहमी आढळणाऱ्या पक्षांना घर आणि अन्नाची सोय करून देणे हे सर्व करीत असतांना नागरिकांमध्ये पक्षांत
प्रति जागृती तसेच प्रेम निर्माण होण्यास मदत करणे आणि उच्च प्रतीचे बर्ड फिडर आणि घरटे बनवण्यासाठी
निधी संकलन करणे. खूप चांगला प्रतिसाद त्यांना या कार्यात मिळाला आहे.

“ I ❤️ sparrows “
ही या वर्षीच्या जागतिक चिमणी दिवसाची थीम आहे, चला तर मग आपण पण चिऊताई च्या स्वागताची ,
पाणी चारा आणि जमत असल्यास निवारा म्हणजे लाकडाचे घरटे ठेवून जय्यत तयारी करू या.☺️

@गौरी-शितल राजूरकर
माहिती स्रोत :- गुगल, रेडिफ.कॉम

No comments:

Post a Comment