माझ्या आतला आवाज मला सांगत असतो की स्त्री मग ती आई,बहीण,काकू,आत्त्या ,सासु, मुलगी जी एक स्वतंत्र व्यक्ती आहे पण तिला आपणच कधी पूर्णत्व बहाल केलं नाही तिची ओळख वडिलांच्या नावावर तर कधी नवर्याच्या नावावर करुन दिली जाते .बघितल आहे कधी नवरा बायकोच नांव लावताना !.....जर ते शिव-शक्ती स्वरुप आहे असं आपण मानतो तर एकमेकांशिवाय पूर्णत्व येऊच शकणार नाही आणि एकमेकांमुळे पूर्णत्व येण्यासाठी फक्त बायकोने नवर्याचेच नाव लावावे असे कां? नवरा पण बायकोचे नाव लावूच शकतो. असो इथे मुद्दा मुळात आहे तो समरुपतेचा .समसमान मानण्याचा. भावनिकदृष्ट्या सतत होणारे खच्चीकरण रोखण्याचा.मी असे कां म्हणते, तर आज स्त्री बर्यापैकी स्वतंत्र आहे असे आपणाला वरवर दिसते आहे तर मग तिला कशाकशा पद्धतीने जखडू शकतो याचे विविध फंडे पुरुषी मानसिकतेतून डोकावताना दिसतात.त्याचे प्रत्यंतर आपल्याला वृत्तपत्रातील ! बातम्यांमधून सहजच निदर्शनास येतात किंवा सभोवताली अगदी आजूबाजूला घडणार्या घटनांमधूनसुद्धा दिसून येतात. परवा आम्ही सगळ्या मैत्रिणी "थप्पड" सिनेमा बघून आलो आणि तेव्हापासुन डोक्यात विचारांनी जाळ विणायला सुरुवात केली.
पहिली प्रतिक्रिया , अरे इतकं कशाला ताणलं तिने एकच तर थप्पड खाल्ली त्याचा किती इशु केला तिने .इतका चांगला संसार कां मोडला तिने जरा अतीच वागली असं नाही वाटत कां? ..........आणि इथेच माझे विचारचक्र सुरु झाले .पहिलेतर सहन करणं म्हणजे ती खरी उत्तम गृहिणी हा मुद्दाच डोक्यात गेला. जी बाई घरादारासाठी स्वतःच अस्तित्व गुंडाळून घरच्यांसाठी समर्पित होते .तिला मानसन्मानाची काय गरज असं गृहीतक डोक्यात ठेवणारी पुरुषी मानसिकता सिनेमातून स्पष्टपणे दिग्दर्शकाने मांडली आहे .ते दाखवताना अगदी सकाळपासुनचे तीचे ठराविक वेळापत्रक अर्थात कामाचे हे इतके छान अधोरेखित केले की सुन असावी किंवा बायको असावी तर अशी असं मनात येऊन जातं . नवर्याच्या प्रमोशन पार्टीत सगळे आनंदात सेलिब्रेट करत असताना अचानक त्याला फोनवरुन कळतं की आपण प्रोजेक्ट हेड नसून कुणाच्यातरी हाताखाली काम करणार आहोत त्याक्षणी दुय्यमपणाची भावना त्याला असह्य होते तो बाॕसच्या अंगावर जातो त्याला आवरताना बायको मध्ये पडते आणि रागाच्या भरात सनकन तिच्या गालावर पडते आणि खर्या अर्थाने तेव्हा ती शुद्धीवर येते.तिच्या मनात चाललेला कल्लोळ ती न बोलताही प्रेक्षकांपर्यंत पोहचवते ही तिच्यातल्या कलाकाराची जमेची बाजू सहजच आपणही त्या पात्राशी स्वतःला जोडत असतो आणि तिच्या भावनांची होणारी घुसमट ही आपलीच होऊन जाते. सुरवातिला म्हंटलं की एका थप्पडने इतक काय आभाळ कोसळल्यासारखी ही वागते पण तिथेच खरा मुद्दा आहे" म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो!"आणि ती झालेल्या अन्यायाला वाचा फोडताना सगळ्यांच्या प्रश्नांना नेटाने उत्तरं देते.आई वडिलांकडे घर सोडून आली असुनही अचानक आजारी पडलेल्या सासुच्या सेवेत कसुर करत नाही. सिनेमात काही पात्र अधोरेखीत केली तीपण खूप काही सांगून जातात. त्यात तिच्याघरची कामवाली सुनिता,तिची ए ग्रेड लाॕयर,तिची भावजय, आई, सासु ह्या प्रत्येक व्यक्तीरेखेतून त्यांची होणारी मानसिक,भावनिक कुचंबना दाखविली जिच्याकडे आपण रोजच्या दैनंदिन जीवनात हे अस घडतच असतं त्यात काय एवढं असं म्हणून सोडून देतो.पण स्त्रीने स्वतंत्र व्यक्ती म्हणून समाजात मान्यता मिळवायची पुरुषी मानसिकतेला खतपाणी न घालता त्याला शिव-शक्ती संकल्पना स्पष्ट कळण्यासाठी मला वाटतं हा सिनेमा खूप काही सांगून जातो.
सुरवातीला संथ वाटणारा हा सिनेमा मध्यंतरानंतर चांगलीच पकड घेतो .मला स्वतःला एका महत्त्वपूर्ण विषयाला दिग्दर्शकाने हात घातल्याबद्दल त्याला धन्यवाद द्यावेसे वाटतात. सगळ्या पात्रांचे स्थान त्या त्या भुमिकेत चपखल होते काही नवोदित होते पण तस कुठेही जाणवलं नाही आणाखी एक आणि महत्त्वाचे सिनेमात कुठेही गाणि कुचकली नाहीत या धाडसाबद्दल विशेष कौतुक नाहीतर ॲटमसाँगच्या नावाखाली कथेत गरज नसताना जो काही तमाशा पहावा लागतो तो टाळला आणि सिनेमाचा कथास्वरुप आस्वाद घेता आला ही आवडलेली बाजू. अशा सिनेमांना प्रेक्षकांनीच प्रोत्साहीत करायला हवं नाही कां!.....
@अर्चना संजय मुळ्ये
No comments:
Post a Comment