Wednesday, March 4, 2020

जीव गुंतला गुंतला

ऋतुचक्र कसं नियमित फिरत असतं, नाही का? पावसाळा, हिवाळा नि उन्हाळा! प्रत्येकाचं आपलं असं वैशिष्ट्य! सजीवांसाठी आवश्यक! त्या त्या ऋतुमानानुसार आहार नि विहार ठरलेले. प्रत्येक ऋतुंच्या आपल्या अशा लोककथा विविध भाषेत आहेत. कुठे सुर्याची प्रेयसी आहे तर कुठे धरणी मातेची लेक आहे. कुठे प्रतारणेनं दु:खी आहे तर कुठे आनंदानं अंगोपांगी मोहरलेली आहे. माणसानं स्वत:चं जीवन सृष्टीत गुंफून विविध लोककथा निर्माण केल्या. जगाच्या पाठीवर जिथे जिथे त्याचं अस्तित्व आहे तिथे तिथे त्या कथा रुजल्या. बहरल्या, फोफावल्या.
हे सगळं आज का आठवलं? तर आता पुन्हा एकदा ऋतू कुस पालटतो आहे...जीर्णता झटकून नवी कोवळीकता धारण करतो आहे. मानवी आयुष्यात पुन्हा एकदा एका ऋतुची भर पडते आहे. अनुभवाची वाढ होते आहे. मात्र सृष्टीत आणि त्याच्यात एक फरक आहे, जुनं झटकून नव्यानं उभं राहणं त्याला सहज जमत नाही. फांदीफांदीवर लगडलेली पानं जास्तं शोषण करतात, अधिक पाणी पितात म्हणून सोयीनुसार झाड त्यांचा त्याग करू शकतं. पण माणसाचं तसं नाही. त्याला जुनं काहीच टाकणं जमत नाही. ते घट्ट पकडून ठेवायचा त्याचा आटोकाट प्रयत्न असतो. हल्ली काय ती...'मिलिनिझियम' का काय ती थिअरी आली आहे. पण नाॅस्टेल्जीयात रमणा-या आपल्या मनाला ते काढून टाकणं अवघड जातं. आता हेच बघा की उन्हाळ्याची चाहूल लागली आणि वाळवणाच्या आठवणी पिंगा घालू लागल्या. कुरडया, सांडगे, भरल्या मिरच्या, पापड, वड्या, खारोड्या, सरगुंडे, लोणचं...असे एक एक पदार्थ आठवू लागले. खरं तर माझ्या पिढीनं ते कधी केले सुद्धा नाहीत. पण आईच्या पिढीला ते सहजतेनं करताना मात्र बघितले आहे. चार-पाचजणी मिळून शेवयाचा उंडा या हातावरुन त्या हातावर करत अशा काही लांबवत जायच्या की त्याचे वीस-पंचवीस पदर एका झटक्यात काडीवर टाकले जायचे. लहानपणी प्रयत्न करुन पाहिला पण ते गणित कधी जमलंच नाही. एकतर तो हातातला गोळा कधी लांबायचाच नाही आणि दुसरं म्हणजे कुठे जाड, कुठे बारिक असे एखादं दोन पदर मोठ्या कष्टाने निघायचे. त्यामुळे तो प्रयोग करून पाहण्याला बहुदा मज्जावच केल्या जायचा. कुरडयांचंही तसंच...चिक खायला आवडायचा. सोरा दाबून एकसारखी वेटोळी मात्र जमायचीच नाही. पापडाच्या लाट्यांचा सुगंध भरभरून घ्यायचा न् तेलात बुडवून
गपकन् तोंडात सरकवायचा, मस्त जमायचं. पण तेच पापड लाटायला बसवलं की गोल वगळता सगळे आकार जमायचे. मग काय? त्यातूनही सुट्टी मिळायची. मूगवड्याचा घाट बहुदा सकाळीच असायचा. पाट्यावर वाटणा-या आईकडून ताटलीत गोळा घ्यायचा नि अंगणात एकसारख्या वड्या घालणा-या ताईपर्यंत नेऊन द्यायचा. बस्स इतकेच काम! मूगवड्या तर नाही पण खारोड्या मात्र कुर्रम् कुर्रम् खायला फार आवडायच्या. गाजर, पोहे, टमाटर, तीळ, मिरचीचे एकत्र गोळे आई वाळवायची तेंव्हा त्याची नवलाई नव्हती वाटत पण गरमागरम खिचडी सोबत भाजलेला पापड, तळलेली मिरची नि सांडग्यांचा कुस्करा...अहाहा... अशी काही त्याची चव असायची की बस्स! 
अशा एक ना अनेक आठवणींमध्ये अडकायला आपल्याला आवडतं. उन्हाळ्यातलं सायंकाळचं सपासप अंगणात पाणी मारणं, एका रांगेत खाटा टाकणं. दिवसभर तापलेली अंथरुणं ठंड व्हावीत म्हणून पसरवून ठेवणं. डास चावू नयेत म्हणून मच्छरदाणी लावणं, 'चल रे घोड्या' करत उशा दामटवणं, अंगणातली अंगतपंगत, भूताच्या गोष्टी नि वाटणारी भिंती पळवून लावण्यासाठी रामरक्षा...अशा कितीतरी आठवणी या ऋतुसह हलकेच मनाला स्पर्शून जातात. कैरीच्या गरात बुडवून आईस्क्रीम पाॅटसह गरगरगर फिरवत ठेवतात. तेच चाक कधी मोठं रुप धारण करुन बैलगाडीत बसवून आतेभावाच्या शेतातील हौदात मनसोक्त डुंबवून वारीच्या मारोती पर्यंत कुटुंबसहल घडवून आणतं. कधी आत्याच्या आमराईतील घनगर्द सावलीतून मावशीच्या मिणमिणत्या प्रकाशातील मायेच्या झोपडीतून आजोळच्या दगडी हवेलीची झुळूक लपेटवून जातं. 
ऋतू बदलतो. आठवणींचा कल्लोळ उठतो. मन आक्रंदतं...कुठे गेले ते दिवस? कुठे गेली ती माणसं? निसर्गाच्या सान्निध्यात, टाकून देणं हा निसर्ग धर्म आम्हाला का साधत नाही? का अजूनही माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये, पाखरांमध्ये, वस्तूंमध्ये जीव गुंततो? 'जीव गुंतला'चा आकांत उठतो? समांतर पातळीवर भूत नि वर्तमान जगणं कसं साध्य होतं? मला वाटतं, हा व्यवहार ज्याला जमतो तो शहाणा ठरतो नि त्यात अडकत न् अडकत जातो तो भावनाप्रधान 'वेडा' ठरतो.
मी विचार करते आहे, गुंतते आहे...
मी....वेडी...की....???
सीमा शेटे (रोठे), अकोला

(फोटो सौजन्य : गुगल)

No comments:

Post a Comment