Wednesday, March 4, 2020

माझे वैद्यकीय अख्यान भाग-2

या विषयावर लिहायला सुरुवात केल्यावर उगाचच आत्मचरित्र लिहिल्यासारखे वाटते आहे! पण एकापाठोपाठ एक येणाऱ्या आयुष्याच्या टप्प्यातून जातांना सुरुवात कुठून ,कशी झाली हे आठवणे हा एक विसावा वाटतो आहे. मला स्वतःला या सगळ्या प्रसंगांचे घटनांचे पुन्हा स्मरण करणे आनंददायी वाटते आहे आणि म्हणूनच पुढे याबद्दल लिहीते आहे. काही मैत्रिणींनी वाचून सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने हुरूप अजून वाढला आहे .
बी ए एम एस ला ऍडमिशन घेतल्याचे मागच्या भागात सांगितले होते. त्या प्रवेश प्रक्रियेच्या कामासाठी पहिल्यांदा महाविद्यालयात गेले तर आमच्या शाळा आणि ज्युनियर कॉलेज पेक्षा लहान असलेली बिल्डींग बघून मला आश्चर्यच वाटले. दोन मजल्यांचे पूर्ण झालेलं बांधकाम ,तिसऱ्या मजल्यावर अपूर्ण अवस्थेत काही भाग ,अगदीच साधारण क्षमतेचा वाहनतळ आणि पटांगण वगैरे तर कुठे दिसतच नव्हते. असे कसे हे कॉलेज? असे वाटून गेले. आत विद्यार्थ्यांची थोडीफार गर्दी बघून प्रवेश प्रक्रिया कुठे कशी करायची ते बघावं म्हणून चौकशी कक्षाकडे वळले. मागून कोणीतरी पाठीवर हात ठेवून बोलावले. बघते तर माझी ज्युनिअर कॉलेजमध्ये जनरल ग्रुपला असलेली  मैत्रीण दिसली. तिने माझं नाव आधीच लिस्टमध्ये वाचल होतं .खूप उत्साहात ती मला आपण दोघीही कशा एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतोय सांगू लागली .आणखी एका शाळेत तीन वर्षे एकत्र असलेल्या मैत्रिणीचे नावही लिस्टमध्ये बघितले .इतर नावांमध्ये काही विद्यार्थी नागपूरचे तर बहुतेक विद्यार्थी चंद्रपूर, गोंदिया, लातूर, बीड, नाशिक-पुणे इत्यादी ठिकाणचे दिसले. 
60 मुलांच्या वर्गामध्ये आम्ही तिघी पहिल्या दिवशी एका बेंचवर बसलो. काय तर पूर्वी कधीमधी एकमेकींना भेटायचो ,थोडीफार ओळख होती म्हणून. दिवसभर एकत्र बसल्यावर लक्षात आले की आम्हाला तिघींनाही या कॉलेजमध्ये रॅगिंग होऊ शकते, सिनियर्स कसे जूनियर्स ची टिंगल करू शकतात इत्यादी गोष्टींनी बहुतेक जास्त जवळ आणले होते !त्या पहिल्या दिवसापासून आम्ही एकत्र आलो ते कायम एकत्र राहिलो .इतक्या घट्ट मैत्रीच्या धाग्यात बांधल्या गेलो की आजही एकमेकींच्या संपर्कात आहोत. बरेवाईट अनुभव एकमेकींना सांगून, गप्पा मारून दूर असलो तरी मनाने खूप जवळ राहू शकलो आहोत.
 पहिल्या वर्षी वैद्यकीय महाविद्यालयात अँनाटाँमी फिजिओलॉजी या दोन विषयांशी सामना(?) करावा लागतो. बी ए एम एस च्या विद्यार्थ्यांची गंमत तर अशी की त्यांना प्राचीन आयुर्वेद ग्रंथातील अभ्यास आणि तितकेच मॉडन मेडिकल सायन्स चे ज्ञान आत्मसात करावे लागते. म्हणजे हे दोन्ही केले तरच खरे परीक्षा देऊन पुढे प्रॅक्टिस आत्मविश्वासाने करता येते. उदाहरण द्यायचे झालेच तर ॲनाटोमी अर्थात शरीरशास्त्र विषयासाठी मानवी शरीरावर डिसेक्शन करायचे ,त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच वेळी चरकाचार्यांनी कुठल्या रक्तवाहिनीला कुठल्या नावाची धमनी म्हटले आहे ते लक्षात ठेवायचे. डायग्राम काढायचा आणि लेबल शास्त्रोक्त इंग्रजी आणि ग्रंथोक्त संस्कृत अशा दोन्ही भाषांमध्ये करायचे.
 संस्कृत हा एक स्वतंत्र पेपर परीक्षेला होता. शाळेत संस्कृत विषय असल्याने राम, नदी, लता ,इ शब्द "चालवणे "वगैरे संस्कृत समजत होते. पण आता तर लघुसिद्धान्तकौमुदी म्हणजे संस्कृत व्याकरण तपशीलवार शिकायचे होते !त्यासाठी सगळेच विद्यार्थी ट्युशन लावतात असे सिनियर्स कडून कळल्याने आमची अख्खी बॅच सकाळच्या सहा च्या संस्कृत क्लासला जाऊ लागली. त्या सरांना कॉलेज  मध्ये सगळे पंडितजी म्हणायचे. त्यांचा वेषही लालूप्रसाद यादवां सारखा धोतर नेसलेला असा होता. केशभूषा मात्र चांगली होती!! त्या क्लासला पण आम्ही तिघी मैत्रिणी एकत्र जायचो. दोन गाड्या शेअर करायचो -एक लुना आणि एक कायनेटिक होंडा. पंडित जी आमच्याशी कायम शांतपणे, प्रेमाने बोलायचे आणि आम्ही कशा नियमित अभ्यासू आहोत वगैरे कौतुक करायचे .त्यामुळे दररोज सकाळी पाच वाजता उठण्याचा त्रास कमी जाणवायचा!!

पहिल्या वर्षी आणखी एक अनाकलनीय विषय- पदार्थविज्ञान -याचाही पेपर होता .यातील संकल्पना समजून वाचून आपण डॉक्टर कमी आणि तत्वज्ञ अधिक बनतोय का वाटायचे! मात्र हा विषय शिकवणारे सर तिशीचे ,तरुण, उत्साही होते .कॉलेजच्या अनेक कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घ्यायचे आणि विद्यार्थ्यांना पण सहभागी करून घ्यायचे. त्यामुळे त्या विषयाकडे मी जरा कमी तिरस्काराने बघू लागले. स्वतः नोट्स काढून त्याचा अभ्यास वगैरे केला म्हणून की काय त्यातही डिस्टिंक्शन चे मार्क पडले होते.
 अशा काही संमिश्र अनुभवांमधून आमचा वैद्यकीय प्रवास सुरू होता. त्याच वेळी कुठे आरोग्य विषयक शिबिरे असली की आम्ही जूनियर्स तिथे हजर असायचो. समोर गर्दी केलेल्या इतर डॉक्टरांच्या खांद्यांवरून ,मधून  जितकं दिसायचं ऐकू यायचं त्यातून काही  स्वतःच्या नोंदी करून  ठेवायचो. प्रॅक्टिस सुरू केल्यावरही बरीच वर्षे या वह्या मी जपून ठेवल्या होत्या .ओपीडी मध्ये रुग्ण पत्रक लिहायला उभ राहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटायची. प्रॅक्टिशनर सांगायचे लिहा- नाडी अमुक-तमुक, श्वसन असे, हे एवढं भराभर केस पेपरवर उतरवत आमचे क्लिनीक सुरू झाले होते .शिवाय मोठ्या सुट्ट्यांमध्ये ओळखीच्या डॉक्टरांच्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये जायला सुरुवात केली होती. सगळ्यात मजा म्हणजे आठवड्याचे तीन दिवस अलोपॅथी प्रॅक्टिशनर कडे आणि तीन दिवस आयुर्वेद प्रॅक्टिशनर कडे असा वात-पित्त-कफ आणि ब्लड प्रेशर, ईसीजी,  ब्लड टेस्ट चा समन्वय साधता साधता पुढील वैद्यकीय प्रवासाचे मनसुबे रचत पहिल्या वर्षीची परीक्षा दिली होती

No comments:

Post a Comment