त्यादिवशीचीच गोष्ट ! सकाळी स्नानाला गेले तेव्हा केस पुसतांना इअररिंग्ज ला हलकासा धक्का बसला अन त्याचे लॉक उघडले. मी तेव्हाच काढून ठेवायचे इअररिंग्ज तर कानातच नुसतं मागे सरकवले म्हटलं आधी केस कोरडे करू यात मग आरशात बघून व्यवस्थित त्याचं लॉक लावू या. झालं!, बाथरूम च्या बाहेर आले आणि पूर्ण विसरून गेले. चेहऱ्याला क्रीम बीम लावलं, केस विंचरले, टॉवेल वॉशिंग मशीन मध्ये टाकला आणि रोजच्यासारखी पूजा करायला देवघराकडे यायला लागले तर तेवढ्यात बेल वाजली म्हणून दार उघडले तर कामवाल्या बाई आलेल्या. आज उशीरच झाला सगळं आटोपायला असा विचार करत मी घाईघाईत पूजा करायला लागले आणि बाई आपल्या झाडूपोछा करायला लागल्या. माझी आपली ५ मिनिटांची झटपट पूजा लगेच आटोपली अन मी पटापट एकीकडे गॅसवर कुकर चढवून सोफ्यावर पुरवणी वाचत बसले. बाईंचं आपलं कुठे काय झालं वगैरे वगैरे सांगणं सुरूच होतं. मी आपली मधनं मधनं हं हं करत होती. ह्या बाई इतक्यातच मागच्या महिन्यापासून लागलेल्या. त्यांचा नवरा ५,६ वर्षांपूर्वी हार्ट अटॅक ने अचानकच गेला त्यामुळे त्यांच्यावर हे काम करण्याची वेळ आलेली. चांगलं करायच्या काम. फक्त आल्यापासून त्यांची काहीतरी टकळी सुरु असायची. काही बाही सांगत बसायच्या. कधीकधी त्याचा त्रास व्हायचा एवढंच. अशा वेळी मग मी पेपर वाचत बसायची. त्यांच्या 2,3 वाक्यांना माझा काही रिस्पॉन्स नाही आला कि मग त्यांनाही लक्षात येत असावे की आता थोडं चूप राहावं म्हणून. आजही तसेच झाले मी पेपर वाचण्यात गुंग झालेली बघून बाईंनी आपली बडबड आवरती घेत कामाकडे लक्ष द्यायला सुरवात केली अन पटापट झाडूपोछा आटोपला नंतर भांडे घासले मशीन मधले कपडे वाळत टाकले अन "येते ताई !" म्हणून लगोलग गेल्याही. नंतर मी भाजी काय करायची ह्या यक्षप्रश्नात फ्रिज च दार उघडून खालच्या भाज्यांच्या ट्रे ला थोडंसं पुढे करून ओणवी होऊन बघू लागली. फ्लॉवर 2,3 दिवसांपासून पडून होता म्हणून "चला, आज ह्याचा नंबर!" असं मनाशीच म्हणत फ्लॉवर बाहेर काढला अन भाजी करायला घेतली. बाकीचेही हातासरशी आटोपून घेतले अन घरात एकटीच होती मग कशाला उगाच रेंगाळत रहायचं म्हणत जेवण देखील उरकले. हुश्श ! एकदाचं जेवण झालं की मोठ्ठ काम झाल्यासारखं वाटतं हे बाकी खरंच! आता मी माझे उद्योग करायला मोकळी असा विचार करतच होती तर एकदम कानातल्या रिंग ची आठवण झाली अन त्याचं लॉक बरोबर करते म्हणत कानाला हात लावला तर काय? कानात काहीच नाही! बापरे! एकदम धस्स झालं! कुठे पडली असेल बाई रिंग! एकदम चक्रावल्या सारखं झालं. मी बाथरूम मधून बाहेर निघतांना मला पक्के आठवत होते रिंग कानातच होती. घरात नुकत्याच फक्त बाईच येऊन गेलेल्या. मी बाथरूम मधून बाहेर आल्यापासून काय काय केले ते आठवायला लागली. वाटलं केस झटकले, विंचरले तेव्हा धक्का लागून रिंग पडली असावी. ड्रेसिंग टेबल, मागची गॅलरी, वॉशिंग मशीनच्या आजूबाजूला सगळीकडे चारचारदा बघितले. पण कुठ्ठे नाही सापडले. मग झाडणी घेतली हातात अन पलंगाच्या मागे, कपाट, फ्रिज, सोफा सगळ्यांच्या खाली फिरवून झाली. तरीही नाही ! आता बाकी धीर सुटला. बाईशिवाय कुणीच आलं नव्हतं. नक्की तिनेच मारली असणार. सोन्याची रिंग सापडल्यावर ती कशाला सोडतेय? महागाई कोण वाढलीय. तिला कसला मोह आवरतोय? आज साडेतीन चार हजाराची तरी नक्कीच असणार. माझंच चुकतं, ती झाडते तेव्हा थोडं लक्ष ठेवायला हवं मी. नविन बाई आहे, आपण थोडं सतर्क रहायला हवं. आता काय, बसल्या जागी केवढं नुकसान झालं? अन तेव्हाच्या तेव्हा रिंगचं लॉक पक्क करायला काय झालं होतं मला! वगैरे वगैरे डोक्यात नुसतं काहूर सुरु! असं काही माझ्याच हलगर्जीपणाने नुकसान झालं की मला मोठ्ठ वाईट वाटतं. काही काही जणांना कसं पटकन सोडून देता येतं, जाऊ द्या झालं ते झालं म्हणून. पण मला नाही जमत तसं.
त्यामुळे पुन्हा एकदा सगळं घर बारकाईने झाडून काढलं. कुठ्ठे नाही! नक्की बाईच असणार! आता अगदी कन्फर्मच झालं. नाहीतर असं काय जादूसारखं घरातून गायब थोडीच होणार होतं कानातलं? आपण मेलं किती चांगलं वागतो तिच्याशी. आत्ता मागच्याच आठवड्यात कपाट आवरलं तेव्हा 2,3 अगदी चांगल्या साड्या काढून दिल्यात. छोटूचे 5,6 टी शर्ट्सही दिलेत, चपला दिल्यात. चार दिवसांपूर्वीच 500 रुपये मागितल्याबरोबर तेही लगेच दिलेत. सतत काहीना काही देणं सुरूच असतं आपलं! काही जाणीव नसते ह्या लोकांना अन आपण कित्तीही चांगलं वागा काही किंमत नसते त्यांना! माझं कश्शात मन लागेना. मधूनच पुन्हा पुन्हा इकडे बघ, तिकडे बघ सुरूच होतं. हे आल्यावर पून्हा सगळा पाढा वाचून झाला.
तरी हे म्हणालेच, "घरातच पडलीय ना? मग सापडेल नक्की इकडेतिकडे कुठेतरी!" मी परत धुसफुसली "सगळं घर धुंडाळून झालंय चारचारदा! आता कुष्णार्पण म्हणायचं अन चूप बसायचं झालं!" एव्हाना संध्याकाळ झाली होती. मी देवासमोर दिवा लावून रामरक्षा म्हटली. रामरक्षा संपत नाही तोच हे म्हणाले "आज संध्याकाळी मस्त झणझणीत पिठलं अन HMT कर. HMT म्हणजे दुसरं तिसरं काही नसून "हिरव्या मिरच्यांचा ठेचा" बरं का ! आमचा खास शॉर्ट फॉर्म! "ठीकाय!" म्हणत मी मिरच्या काढायला फ्रिज उघडला अन खालचा ट्रे थोडा पुढे ओढून चार मिरच्या काढल्या आणि परत ट्रे मागे सरकवायला गेली तर ट्यूबलाइट च्या प्रकाशात एकदम काहीतरी लक्कन चमकलं! बघते तर काय, सकाळपासून जी शोधत होती ती माझी कानातली रिंग! पटकन उचलली अन देवाला कृतज्ञतेने हात जोडले! म्हटलं "देवा, तुला बरोब्बर काळजी असते सगळ्यांची. तुझी कृपा अशीच राहू दे बाबा नेहमीसाठी". दुसऱ्याच क्षणी एकदम गेले 6,7 तास मी बाईंबद्दल काय काय विचार करत होती ते सगळं आठवून स्वतःची इतकी लाज वाटली की विचारू नका. वाटलं किती सहज पणे आपण तिच्यावर संशय घेऊन मोकळे झालो. ती बिचारी गरीब, अशिक्षित, गरजू म्हणूनच ना! खुप अपराधी वाटलं. देवाची मनापासून माफी मागितली अन तेव्हापासून कानाला खडा लावला की परत असा कुणावरही बिनबुडाचा संशय कध्धी घेणार नाही. चांगलाच धडा मिळाला! दुसऱ्या दिवशी बाई आल्याआल्या मस्त आलं टाकून वाफाळता चहा तिच्या समोर ठेवला (पापाचं कणभर परिमार्जन म्हणा हवं तर..!) अन म्हटलं, "घ्या! थंडीचा आधी चहा घ्या गरम गरम अन मग करा काम!" गरमागरम चहाचा कप बघताच एकदमच कळी खुलली तिची. लगेच म्हणाली "ताई, आज गॅलरी धून टाकते! लई खराब झालीया!" अन लगोलग खराटा घेऊन गॅलरी धुवायला गेलीसुद्धा! मला अजूनच कानकोंडं झालं. किती सहजपणे ती त्या घोटभर चहाच्या बदल्यात जास्तीचं काम करायला गेली लगेचच. अन आपण..? वाटलं हरवले ते गवसले तर खरंच पण सोबतच एक धडा शिकवून गेले हे पण महत्वाचे! नाही का ?
मधुमती वऱ्हाडपांडे
अकोला
No comments:
Post a Comment