ड्रायविंग शिकत असतानाचा अद्भूतरम्य अनुभव म्हणजे पहिला गिअर टाकून क्लच सोडणे आणि अॅक्सिलेटर देणे।ट्रेनर ड्रायव्हरने(त्याच्या भाषेत डायवेर)खूप व्यवस्थित सूचना दिल्या ,मग घोकंपट्टी मग जागच्या जागी रिहर्सल आणि मग गेट सेटगो !परिणाम?खटकन गाड़ी बंद पडली।सूचनांचा पुन्हा भडिमार, परत प्रॅक्टीस ,परत गेटसेटगो!परिणाम?पुन्हा गाडी बंद। डायवेर सरांची थोडी सूचनांची रिवीजन। " क्लच एकदम नाय सोडायचा ,"......एक नवीन सूचना।ट्राय....।परिणाम?गाडी बंद। " आता थोडा अॅक्सिलेटर ज्यादा द्यायचा ",
पुन्हा एक नवीन सूचना।ट्राय......।आणि गाडी बंद। शेवटी दार उघडून बाहेर पडले।हाताची घड़ी घालून उभी राहिले।या.......या य:कश्चित गाडीमुळे एवढा अपमान?तो ही जेमतेम ड्रायविंग स्कूल चालवणाऱ्या डायवेरपुढे?माझ्या डोळ्यात कढत पाणी जमा झालं।श्वास वाढला।थोड़ी थरथरले।आणि म्हणाले " मला नाही शिकायचं,नाही चालवायची गाडी"डायवेर शांतपणे म्हणाला "मग मला कशाला बोलावलं?"त्याच्या या थंड प्रतिक्रियेमुळे परत रागारागाने गाडीत बसून पहिला गिअर टाकला आणि क्लच हळू सोडत अॅक्सिलेटर दिला।गाड़ी सुरु झाली।डायवेर गालातल्या गालात हसला।आणि "अरेच्या!जमलं का?"या धक्क्यातून सावरायला मला वेळच लागला।
आता सराईतासारखी गर्दीतून नि गल्ली बोळातून ग़ाड़ी चालवते तेव्हा हा सगळा प्रसंगा आठवून हसू येतं।पण मध्येच मनात प्रश्न येतो की "हीच गोष्ट पोहणं शिकताना नाही झाली का?" एकतर पोहता आल्याशिवाय पाण्यात पाय ठेवणार नाही असा खाक्या।त्यात त्या पोहण्याच्या टँकमधलं सळसळतं हलतं खोलपाणी आणि त्याखालच्या निळ्याशार टाईल्स पाहिल्या की अंगावर सर्रकन काटा यायचा।यात आपण बुडून मरणार याची दोनशे टक्के खात्रीच असायची।पण मग पाण्यात पाय बुडवून काठावर बसण्यापासून सुरुवात झाली।हळूहळू कमी खोल टँकमध्ये उभं राहणं आणि केव्हाही पाय टेकून उभं राहता येईल एवढ़याच इवल्याशा पाण्यात हातपाय मारणं सुरु केलं।आणि आलं की राव हळूहळू पोहता।
मग मोठया टॅकमध्येही आलं।नि मग सहजता आली।मी बुडून जाणार होते त्याऐवजी भीती बुडून गेली।
पुढे मग आणखी नव्या क्षेत्रात आणखी एक नवा प्रयोग करून पाहिला।शास्त्रीय नृत्य!सुरुवातीला नृत्यवर्गातल्या मुली सराईतासारख्या बोटांवर ताल मात्रा मोजायच्या।पटपट पायाने तेच बोल उमटवायच्या।तोडे म्हणायच्या।त्रिताल,एकताल,दादरा ,रुपक,रासताल,झपताल असं सुरु असायचं।प्रत्येक तालाच्या मात्रांची संख्या वेगळी।टाळी,काल वेगळ्या मात्रेवर ।पायाचा ठेका दरवेळी निराळा।"ये तो पक्का अपने बस की बात नही बॉस" ठरवून टाकलं।नुसतं बसून पाहण्याचा कंटाळा आला तेव्हा पहिल्यांदा उठले।नाही येणार त्याच क्षणी क्लास सोडून टाकण्याचा निश्चय करून ठेवला।नि चुकतमाकत सुरुवात झाली।हळूहळू जमायला लागलं आणि मजा यायला लागली।आणि मग जमलंच।
आता वारंवार या गोष्टी घडून कळायला लागलं की रस घेऊन प्रयत्न करून पाहिले तर जमतं काही काही।अगदी प्रत्येक गोष्टीत लता किंवा सचिन बनण्याचा अट्टाहास थोडीच असतो।करून पाहिलं,आवडलं,जमलं,हा सगळा मजेचा मामलाही असतो।अर्थात सुरुवातीला थोडं जड़ जातंच।अजून तर सफाईदार इंग्रजी बोलणं,फोटोग्राफी,चित्रकला गाता येणं अशी नवनवी क्षेत्रं पादाक्रांत करायची आहेत!!!!!!! "कशाला पण?"हा घरच्यांचा (रास्त )प्रश्न सराईतासारखा कानाआड करायला शिकलेच आहे।एक नक्की की या सगळ्याच्या सुरुवातीला धडपडायला होतंच ।आणि डायवेर सायबांचे शब्द आठवतात की "स्टार्टिंग ट्रबल तो आसतोच ना म्याडम!!"।असू दे।तरी गिअर टाकायचाच।द्यायचा अॅक्सिलेटर।स्टार्टिंग ट्रबल म्हणणारेच मग चलती का नाम गाड़ी पण म्हणू लागतातच हो!!
No comments:
Post a Comment