Wednesday, March 4, 2020

जोशी मिस

शाळेच्या वर्गाचं पुन्हा एकदा रियुनियन होतं. काही जणांशी संपर्क होताच तर काही जण वीस ते पंचवीस वर्षांनी भेटणारे. आमच्या वर्गातला एक जण आता मोठा उद्योगपती झालेला. त्याने पुढाकार घेऊन अगदी कॉर्पोरेट स्टाईलने, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या मदतीने झकास व्यवस्था केली होती. त्या कंपनीच्या थीमप्रमाणे सगळं वातावरण शाळेच्या वेळचं. अगदी चिंचगोळे, रावळगाव चॉकलेट पासून ’मैने प्यार किया’ मधल्या गाण्यापर्यंत सगळं जुन्या आठवणी जागवणारं. बसायला वर्गासारखी रचना.. .आमचा सातवीतला ग्रुप फोटो मोठ्ठा करून स्टेजवर लावलेला. त्यातली मित्रमंडळी ओळखण्याची एकमेकात स्पर्धा लागलेली. त्या फोटोत मधे बसलेल्या मंद स्मित करणार्‍या ’जोशी मिस’.. whatsapp वर त्यांच्या मुलाला मी भराभर सगळे फोटो पाठवले. त्याच्यामार्फत मिसचा रिप्लाय आला.. "वय झालं. प्रवास झेपत नाही. तुम्हा सर्वांना आशीर्वाद. असेच एकत्र राहा."
इतक्या शिक्षकांचा सहवास लाभला, ग्रुप फोटो तर दरवर्षी त्या त्या वर्गशिक्षकांबरोबर काढण्याची शाळेची प्रथा होती पण रियुनियन मधे हाच फोटो व्यासपीठावर लावण्यासाठी निवडण्याचं कारण एकच .. आमच्या सगळ्य़ांच्या लाडक्या ’जोशी मिस’.त्यानंतर आम्ही नाशिकला रियुनियन केलं ते खास त्यांना भेटता यावं म्हणून

आमच्या पाचवीच्या वर्गात पहिल्याच दिवशी ’क्लासटीचर’ म्हणून त्यांनी प्रवेश केला. उंच, सशक्त बांध्याच्या, गोर्‍यापान, हसर्‍या, रूबाबदार, पांढर्‍या होत चाललेल्या पण डाय न केलेल्या कुरळ्या केसांची आखूड वेणी घालणार्‍या, सोन्याची एक चेन आणि एक एक बांगडी सोडून कुठलाही दागिना न घालणार्‍या आणि साध्या कॉटनच्या पण सतेज रंगांच्या साड्या नेसणार्‍या जोशी मिस मला नेहमीच खूप आवडायच्या. (सुधा मूर्तींचा फोटो पहिल्यांदा पाहिला तेव्हा त्यांच्यातली साम्यस्थळे जाणवली) त्या माझ्या घराजवळ राहत आणि चौथीपर्यंत त्यांच्याशी संबंध नसला तरी शाळेत एरवीही मी त्यांना आदराने पाहत असे आणि दिसल्या की अभिवादन करत असे. त्यांनी शिकवावं याची मी जणू वाटच पाहत होते. त्या भाषा शिकवायला आल्या. त्यातला व्याकरणाचा भाग सुद्धा मला मजेदार वाटू लागला. त्या गप्पा मारल्यासारख्या शिकवत. मराठीतले ह्रस्व, दीर्घाचे नियम असोत किंवा गद्य. कविता शिकवताना त्या आम्हाला थेट त्या वातावरणात घेऊन जात. इंग्लीश शब्दाचे अर्थ त्याच्या वाक्यातल्या जागेनुसार कसे बदलतात असं काय काय त्या सांगत असायच्या. त्यांच्यामुळे मला ’भाषा’ हे प्रकरण भलतच आवडायला लागलं. इतर शिक्षकांमध्येही काही जण थोडे थोडे आवडायचे पण कुणाचा स्वभाव आवडायचा नाही, तर कुणाची शिकवण्य़ाची पद्धत. काही सर केवळ पाट्या टाकणारे, काही मिस छानछोकीत दंग. काहींना केवळ ओरडणं म्हणजे शिस्त लावणं असं वाटे तर काहींना विद्यार्थ्यांशी नीट संवादच साधता येत नसे. जोशी मिस या सगळ्य़ांमध्ये वेगळ्य़ा होत्या.

भाषा आवडायला लागल्याने दादाने वाचनालयातून आणलेली मॅक्झीम गॉर्कीची "आई" कादंबरी वाचली, बरीचशी कळली नाही पण त्यांना मी ’व्होडका’ बद्दल ’ती गोड लागते का?’ असे काहीतरी विचारल्याचे मला आठवते. त्या दचकल्या असाव्यात पण खुलाशात त्यांना मी ती कादंबरी वाचल्याचे सांगितल्यावर त्यांनी, माझा गालगुच्चा घेतल्याचे आठवते. आता ही पुस्तकं वाच, म्हणत त्यांनी एक यादीच करून दिली. त्यांच्यावर छाप टाकायला कोणाच्यातरी पुस्तकातली वाक्यं ’ढापून’ ती मी निबंधात घातली होती. त्यांनी तो निबंध वर्गात ’कौतुकाने’ वाचून दाखवला. त्याचबरोबर त्यातील ती वाक्ये कोणत्या लेखकाची, हे मला जाहीरपणे विचारले. माझा चेहरा उतरला. नंतर मला स्टाफरूममधे बोलावून "वाक्य कुठे पेरावे हे मुलांना कळावे म्हणून मी निबंध वाचला, पण ते वाक्य ज्याचे आहे त्याचा उल्लेख झाला नाही तर ती चोरी आहे हे तुला कळावे हा ही उद्देश होता" असे बरेच काही मला जवळ घेऊन म्हणाल्या. त्यानंतर आजही कुणाचे वाक्य उद्धृत करताना ते ’जाहीर वाचन’ मला आठवते. सहावीत त्या एकही विषय शिकवायला नव्हत्या.

शाळा कॉन्व्हेंट असली तरी दोन्ही माध्यमं होती. ख्रिश्चन मंडळी खूप, त्यांच्या फाडफाड इंग्रजीमुळे आम्ही त्यांना बिचकायचो. एका सिनीयर हाऊस-प्रमुख मुलीने माझा टाय लावायचा राहिला म्हणून मला असेंब्लीच्या बाहेर घालवले. मी लावला होता पण त्याचे बक्कल तुटले म्हणून तो पडला, हे काही मला तिला इंग्रजीत सांगता आले नाही. उशीरा वर्गात आल्यावर मिसला काय ते कळले, त्यांनी आधी त्या मुलीला बोलावून अस्खलित इंग्रजीत तिची हजेरी घेतली. ती गेल्यावर मला जवळ बोलवून खडसावले,"इंग्रजी बोलता येत नाही यात काय कौतुक आहे? का येत नाही? लिहीता येते तर बोलता का येत नाही? त्यासाठी तू वेगळे काय प्रयत्न केलेस? नुसता शाळेतला नंबर पुढे काही उपयोगी नसतो" वगैरे. दुसर्‍या दिवशी त्यांनी दोन छोटी इंग्रजी पुस्तकं मला आणून दिली, एनिड ब्लायटनची असावीत आणि या महिन्याअखेरीस परत कर म्हणून बजावले. मी तोवर अभ्यासाव्यतिरीक्त इंग्लीश म्हणजे फक्त कॉमिक्स वाचत असे. न वाचताच मी त्यांना पुस्तकं परत केली. त्यांनी ’आता यातली गोष्ट काय आहे ती सांग’ म्हटल्यावर नाईलाजाने मी खरे काय ते कबूल केले. पुढच्या असेंब्लीत त्यांना वचन दिल्याप्रमाणे इंग्लीशमधे बातम्या सांगितल्या म्हणजे वाचल्या. वक्तृत्वाची भीती कधीच नव्हती पण इंग्लीशमधे !! इंग्लीशचे व्याकरण नीट समजावून घेतले तरच इंग्लीशची भीती जाते असं त्या पुन्हा पुन्हा सांगायच्या, जोशी मिसमुळे त्या भाषेची भीती कायमची गेली. त्यांना तो विषय आम्हाला शिकवायला मिळाला नसला तरी इंग्रजी माध्यमाच्या सिनीयर मुलांनी ’कुसुमाग्रज, तांबे ,बोरकर’ इ.च्या सोप्या कवितांवर आणि मराठी माध्यमातल्यांनी ’वर्डस्वर्थ, बायरन, शेले’ इ.च्या सोप्या कवितांवर प्रोजेक्ट करायचा अशा अफलातून कल्पना फक्त त्यांनाच सुचायच्या.

गॅदरिंगमधे मी कशात भाग घेतला नाही असे कधी झालेच नव्हते. त्या वर्षी त्याच सुमारास नेमके गावाला जावे लागल्याने माझी निवड झाली नाही. मला फारच वाईट वाटले. जोशी मिसजवळ रडून-पडून मी एकदाची त्यात वर्णी लावली पण मला अगदीच फुटकळ भूमिका मिळाली. काय तर म्हणे येशूच्या जन्माने आनंद झालेला निळा ढग! पुढे तो मेंढपाळाचा सीन सुरू आणि मागे (आम्ही) रंगीत ढग मंडळींनी या विंगेकडून त्या विंगेकडे हात हलवत पक्षासारखं विहरत जायचं. त्यात पुन्हा ढग असल्याने तोंडाला कापूस सगळा. मला स्वत:चा संताप आला, काय अटटाहास माझा, भाग घेण्याचा! ते नाटक झालं, मी कपडे बदलून बाहेर आले. जोशी मिसजवळ जाऊन फुरंगटून उभी राहिले. त्यांचा जरा रागच आला होता. त्या मला निदान ’चंद्र’ करू शकल्या असत्या. माझी तेवढी वट त्यांच्याकडे नक्कीच होती. मी कुरकूर केल्यावर त्या बरच काही म्हणाल्या, त्याचा सारांश आठवतोय.. "नेहमी आपणच मुख्य भूमिकेत असू असं नसतं. आणि सगळेच असं म्हणाले तर कसं चालेल. अशाही अनुभवाची एक गंमत असते." मला नंतर पटलं त्यांचं आणि मी जाऊन सॉरी म्हणाले त्यांना. त्या गोड हसल्या.

आठवीत त्या आम्हाला काहीच शिकवायला नव्हत्या. स्पर्धांच्या निमित्त्याने माझा त्यांच्याशी संपर्क यायचाच. ’टिट्बिट्स’ नावाचं एक पत्रक शाळेत निघत असे. त्यात मराठी विभाग सुरू झाला तो जोशी मिसमुळेच. त्याची मी संपादक होते. त्यासाठी त्या छान विषय सुचवायच्या. त्यांची मी आवडती आहे याचा मला अभिमान वाटायचा. एव्हाना आम्हालाही थोडी शिंग फुटली होती. शाळेत काही मुली solo नृत्यांसाठी प्रसिद्ध होत्या. त्यांचा नाच हे गॅदरिंगचे प्रमुख आकर्षण असायचे. मी बरी नाचायचे पण बॉबकट मुळे बहुतेक वेळा मला आयब्रो-पेन्सीलने मिशी काढून, पांढरा कुर्ता-चुडीदार, डोक्याला आणि कमरेला ओढणी अशा वेशात एखाद्या ’गोरीचा’ ’सजना’ किंवा फार तर लुंगी-तिरकी टोपी घालून आणि वल्हे घेऊन ’नाखवा’ बनूनच नाचावे लागायचे. सोनेरीबिनेरी झगमगता ड्रेस घालून, उघडझाप करणार्‍या रंगीत दिव्यांच्या प्रकाशात, एखादा थिरकता डान्स करून अख्ख्या शाळेला थक्क करून टाकायचे अशी माझी एक सुप्त महत्वाकांक्षा होती.
ऑडीशनला गेले तर निवड-समितीत नेमक्या जोशी मिस. मी जाऊन कॅसेट दिली. गाणं वाजू लागलं.. बहुतेक कैदी सिनेमातलं. आईला सांगितलच नव्हतं, मैत्रिणींनी म्हटलं होतं "कर बिनधास्त." जोशी मिस माझ्याकडे अशा काही पाहत होत्या की मला आपले काहीतरी प्रचंड चुकते आहे एवढे कळले. मी त्यांच्या बाजूच्या मिसजवळ i need to practise more असे काही तरी पुटपुटले आणि तिथून धूम ठोकली. त्यांनी दुसर्‍या दिवशी मला वाटेत थांबवले. तू चांगली नाचली असतीस तरी मी तुला निवडले नसते. तुला त्या गाण्याचे शब्द कळतात? तुला किती गोष्टी उत्तम येतात, त्यात स्वत:ला घडव, आणि नाच इतका आवडत असेल ना तर क्लासीकल शिक, व्यवस्थित वेस्टर्न शिक. मग नीट गाणं निवड, त्याचा अर्थ समजून घेऊन नाच बसव.. वगैरे बरच काही बोलल्या. मी घरी येऊन रडले..पण ते शब्द डोक्यात पक्के बसले. आता रिअ‍ॅलिटी शो मध्ये लहान मुली अप्रतिम नाचतात. बरेचदा संगीताने शब्दांवर कुरघोडी केलेली असते. नाचाचे फॉर्म्स बदललेत. जागतिक झालेत. फक्त लहान मुलींसाठी गाणं निवडताना डान्सफॉर्म कोणताही असला तरी शब्द वयानुरुप आहेत ना याकडे पालकांनी, आयोजकांनी लक्ष द्यावं असं मनापासून वाटतं.

दिवाळीच्या सुटीअखेर आमची गणिताची पुन्हा परीक्षा घेण्यात आली, का तर गणिताच्या मिस म्हणे सुटीत ट्रीपला गेल्या होत्या आणि रेल्वेगाडीत खिडकीपाशी बसून पेपर तपासत होत्या, अचानक वारा आला आणि बरेचसे पेपर उडून गेले. प्रिंन्सिपलची त्यांना खूप बोलणी बसली. मामाकडची सुटीची धमाल सोडून चरफडत मी (आणि सगळेच) परीक्षा द्यायला आले. जोशी मिसला म्हटलं की मला आता काही आठवत नाहीये. त्या म्हणाल्या गणित हा विषय असा आहे की समजलं असलं की आठवावं लागत नाही. मग मात्र मी गणितं चक्क पाठ करते हे त्यांना सांगून टाकलं आणि त्या अवाक झाल्या. दुसर्‍या शाळेच्या एका प्रख्यात सरांकडे ताबडतोब शिकवणी लावा असं त्यांनी थेट आईला भेटून सांगितलं. मला शिकवणी लावणं फारच कमीपणाचं वाटलं पण केवळ त्या म्हणाल्या म्हणून लावली. माझा गणिताचा न्यूनगंड तर कायमचा गेलाच पण दहावीत गणितात केवळ एक मार्क गमावला, गणितावर प्रेम बसलं तेव्हा मला वाटलं याचं श्रेय जोशी मिसचच..

दहावीच्या यशाची त्यांनी दिलेली छोटीशी पार्टी आठवतेय. मला आणि आणि माझ्या एका वर्गमित्रालाच त्यांनी घरी बोलावलं होतं. मला आपण कुणी तरी खास आहोत असं वाटलं. त्यांच्या आतल्या गॅलरीत त्यांनी खुर्च्या मांडल्या होत्या. काचेच्या बशीत खोबरं, कोथिंबीर पेरलेला वाफाळता उपमा, बर्फी, सरबत. वर्गातल्या दोन मुलांसाठी! मला अप्रूप वाटलं. टीपॉयवर टाईम्स ची घडी, घरातल्या काचेच्या कपाटात पुस्तकं रचलेली. सुबक विणकाम केलेल्या कोचावरच्या उशा. स्वच्छ, छान वाटत होतं नजर जाईल तिथे. त्यांच घर मी असच कल्पिलं होतं. त्यांची मुलं शिकायला पुण्याला आणि पती अकाली गेलेले. एकट्या असून सदासतेज, आनंदी. तेव्हाची मध्यमवर्गीयांची काहीशी गबाळी राहणी आणि मिसच्या घराचं नीटनेटकं वेगळेपण याची मनात नोंद झाली. साधेपणातलं सौंदर्य होतं त्या घरात. त्यांनी काहीतरी भेटवस्तू पण दिली होती. पुढे काय करणार याबद्दल त्या आणि तो मित्र बरच काही बोलले ,एरवी सतत बडबडणारी मी मिसकडे नुसती बघत बसले होते. मला त्यांच्यासारखं समाधानी व्हायचंय.. माझ्या घरात असाच पुस्तकांचा एक छानसा कप्पा असेल.. असे काही तरी विचार करत.

मग भेटी कमी होत गेल्या. वडील गेले तेव्हा त्या घरी आल्या. जवळ घेऊन म्हणाल्या ’रडू नकोस, करून दाखव’. त्यांच्याकडे पाहताना वाटलं, यांचे यजमान गेले तेव्हा यांची मुलं माझ्याएवढीच किंवा थोडी लहानच असतील. तरी्ही त्यांच्या डोळ्यात सतत एक प्रसन्न हास्य तेवत असायचं. कुठून येतं ते! पुढे कॉलेजमध्ये रमले, सुट्टीत घरी आले की ठरवायचे मिसला भेटायला जावं. दिवस संपून जायचे, त्यातच कळलं त्या स्वेच्छानिवृत्त होऊन नाशिकला मुलाकडे गेल्या. त्यांच्या घरापाशीच एक मैत्रिण राहायची. तिच्याकडे गेलं की नजर आधी मिसच्या गॅलरीतल्या बंद खिडकीकडे जायची. काहीतरी रिकामं, उदास वाटायचं. आधार तुटल्यासारखं.. आपण त्यांना नियमित का नाही भेटलो असं वाटून अपराधीही वाटायचं. कित्येक वर्षांनी शाळेच्या ग्रुपमधले काही जण भेटले. आता कुणी कुठे, कुणी परदेशात. आम्ही सगळे एकत्र शाळेत गेलो. जोशी मिसची आठवण नेहमीच यायची पण तेव्हा फारच प्रकर्षाने आली. घरी आल्या आल्या बरीच धडपड करून मी त्यांचा नंबर मिळवला. त्यांना फोन केला, मला वाटलं त्या ओळखतील का! पण त्यांनी अगदी लगेच ओळखलं, खूप खूष झाल्या. तोच आवाज, तेच हसणं, मी आता कुठे असते, काय करते विचारलं. नाशिकला आलीस की नक्की घरी ये म्हणाल्या. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं.. मला कितीतरी बोलायचं होतं.पण.. ’तुमची खूप आठवण येते’ इतकं कसंबसं सांगितलं.

त्या भेटल्याच नसत्या तर... आयुष्यात आपल्याला नक्की काय हवं आहे हे तर कधी कळलच नसतं. निवडीचे अनेक प्रसंग आले, मग तो आयुष्याचा जोडीदार असो, व्यवसाय असो, राहण्याचं गाव असो, भोवतालची माणसं असो, वैचारिक भूमिका असो... तेव्हा कामी येणारा ठामपणा मनात रूजला नसता. शब्दांवर प्रेम करण्यातली गंमत कळलीच नसती. पुढे सगळा अंधार दिसत असतानाही there is always a tomorrow ही उमेद मिळाली नसती. मी त्यांना बदल्यात काय दिलं !
त्यांच्या हाताखालून गेलेल्या कित्येक बॅचेसमधल्या शेकडो विद्यार्थ्यांपैकीच मी एक, पण इतक्या वर्षांनी त्यांनी नुसतं नाव सांगताच मला ओळखावं यात मला सारं मिळालं.
- Mohini

No comments:

Post a Comment