नात्यातील एकीचा फोन आला. लेकीच्या लग्नाला बोलावणे केले. लग्न समारंभ छोटासाच आहे घरचेच लोक आहेत अगदी आटोपशीर करणार आहे, पत्रिका पण छापल्या नाही, व्हॉटस् अप वरच टाकते आहे तुला पण टाकली आहे, बघ आणि लग्नाला ये. असा आमचा फोनवर एकतर्फीच संवाद झाला. मी पत्रिका बघितली काही केल्या मुलाचे नाव काय लक्षात येईना. अर्थातच मुलगा जाती धर्माचा तर सोडाच पण दुसर्या देशाचाच आहे हे मला दुसर्या एका जवळच्या नातेवाईकांकडून समजलं होतं. मला हसू आलं म्हटलं इथे आपल्याला नाव वाचता येईना ही मुलगी प्रेमात काय पडते आणि लग्न पण करते. लग्न पण ग्लोबल होऊ लागली आहेत की काय? कारण मोठा जावई (मुस्लिम) बोहरी आहे आणि हा ख्रिश्चन. मोठ्या मुलीच्या लग्नाच्या वेळीच आमची एक भुवई वर आणि डोळे ताणले गेले होते. कारण लव्ह जिहाद चे इतके काही ऐकले होते म्हणून मुलीची काळजी वाटणं स्वाभाविक होतं. पण आमच्या आणि तिच्याही सुदैवाने बोहरी लोकं चांगले आहे. या लहान मुलीच्या लग्नासाठी सहकुटुंब आले होते. गोंडस गोजिरवाण्या मुलाची आई पण झालीये ती मोठी मुलगी.
आजकाल फोनवरचे आमंत्रण म्हणजे घरी येऊन दिल्या सारखंच असतं हा नवा रिवाज झाला आहे. हो नाही करता लग्नाला गेले. तिथला थाटमाट बघण्यासारखाच होता. हॉटेलच्या नावातच मॅजेस्टिक होतं मग काय आणखी हवं. मी मुलाकडच्या वर्हाडींना शोधू लागले तर ते इनमिन तीन लोकं. नवरा मुलगा, त्याची आई, आणि एक मित्र. लग्नाच्या भारतीय पोषाखात ते तिघेही जरा अनकंर्फटेबलच होते. पण एन्जॉय करत होते. गुरुजींना इंग्रजी येणं शक्यच नव्हतं. म्हणून नवरी मुलगी प्रत्येक ओळीचे रुपांतर इंग्लिश मध्ये करून त्याला सांगत होती आणि तशी कृती त्याच्या कडून करून घेत होती. त्याच्या आईला तर इंग्लिश पण येत नाही फक्त फ्रेंच. नवरीचे मित्रराष्ट्र भक्कमपणे उभे राहून सगळं व्यवस्थित पार पाडत होते. सगळं काही नवरी आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी ठरवलं. हॉल बुकिंग पासून तर अगदी हनिमून ला पाठवे पर्यंत सगळं. आणि ते ही सुरळीतपणे पार पडत होतं.
आजच्या मुली किती फॉरवर्ड आहेत. किती कॉनफिडंट आहे. मला खूप कौतुक वाटलं त्यांचं. कुठेही लाजणं, घाबरणं नाही इतक्या नातेवाईकांसमोर त्यांचा वावर अगदी बिनधास्त होता. किंबहुना त्यांचाच वावर जास्त होता. कार्यक्रमाचे संचलन असू दे की डान्स करणं असू दे एकदम परफेक्ट! कुठेही अडखळणं नव्हतं.
विवाहाचे महत्त्वाचे विधी, जसे की हळकुंड हातात बांधले, मंगळसूत्र गळ्यात घातले, कन्यादान, सप्तपदी इ. इ. मोठ्या हौसेने केले. पण विहिणबाई अगदी निर्विकार चेहर्याने बघत होत्या. सप्तपदीला रंगीत ब्लाउजपीसवर फुलांची सजावट केली होती. तीन तीन फोटोग्राफर होते. एक फक्त फोटो काढत होता, दुसरा फक्त व्हिडिओ चित्रीकरण करत होता आणि तिसरा स्पेशल इफेक्ट्स देत होता. हे भारतीय पध्दतीने झालं मग संचालन करणार्या मैत्रिणीने घोषणा केली वधूवर ड्रेस चेंज करून येईपर्यंत वर्हाडी मंडळींनी जेवून घ्यावे. इटालियन रेड, व्हाईट पास्त्यापासून तर थेट महाराष्ट्रीयन श्रीखंडापर्यंत व्हाया पंजाबी पदार्थ अशा डिशेसची रेलचेल होती मेनूत. सगळ्यांची जेवणं आटोपतायता तोपर्यंत वधूवर निरनिराळ्या पोझ देऊन फोटोसेशन करून मग ड्रेस, मेकअप बदलवून आले ते थेट ख्रिश्चन पध्दतीचे कपडे घालून. मग केक कटींग, रिंग सेरेमनी, एकमेकांना वचनं देणे (ख्रिश्चन धर्मानुसार) आणि मग खास वधूवरांचा एका इंग्लिश रोमॅन्टिक गाण्यावर डान्स, हल्ली हा डान्स म्हणजे लग्नाच्या विधीतील अनिवार्य भाग झाला आहे त्याशिवाय लग्न झाले असे मानले जात नाही. मग तिचा इंग्लिश उखाणा आणि त्याचा मराठी उखाणा. विवाह संपन्न झाला. मला तर ते लग्न न वाटता एखाद्या सिनेमाचं शूटिंग वाटत होतं. कारण काही वेळापूर्वी हौसेने बांधलेले मंगळसूत्र गळ्यात नव्हतं, डान्स करता करता हळकुंड पण कुठेतरी जाऊन पडलं होतं. काय अर्थ होता का त्या विधींना! उगाच काहीतरी देखावा वाटला. आणि आम्ही प्रेक्षक! फक्त बघे लोकं!अगदी आईवडील सुध्दा प्रेक्षकांच्या भूमिकेत वावरताना वाटत होते. नाही म्हणायला जन्मदातेच असल्याने थोडीफार involment होती.
सगळंच करायचं हे पण ते पण! आणि सगळ्यांना ते दाखवायचं अगदी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम सगळीकडे. आजच्या या so called bridal आणि groom च्या पार्श्वभूमीवर पूर्वीचे नवरा नवरी म्हणजे अगदीच वेगळी वाटतात. पूर्वीची नवरी कावरीबावरी दिसायची आत्ताच्या या ब्रायडल सराईता सारख्या दिसतात. लाजणं, घाबरण वगैरे काही नाही उलट ग्रुमशी मस्त गप्पा, हास्यविनोद करतात. (अरेंज्ड मॅरेज असले तरी) आपण सासरी जाणार, आईवडीलांना सोडून जाणार ही हुरहुर जराही नसते. कारण संपर्काचे कितीतरी साधनं बोटाच्या एका क्लिकवर उपलब्ध आहे. अजूनही बरीच कारणं आहेत. मुली शिक्षणा निमित्त घरापासून दूर राहतात , लग्न होईपर्यंत वयाने मोठ्या होतात आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असतात. वगैरे.
माझी पिढी कितीतरी मागे होती. काळ बदलला, बदलाचा वेगही प्रचंड आहे. माझ्या पिढीला न झेपणारा. आपल्या पिढीचे त्यावेळचे लग्न आणि आत्ताच्या पिढीचे लग्न अशी समांतर मांडणी मनातल्या मनात सुरू होती. काळानुरूप पिढ्या बदलतात, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, त्यांच्या जडणघडणीनुसार त्यांचे विचार बदलले की आपोआप जगण्याबद्दलच्या अनेक संकल्पना बदलत जातात. त्यात प्रेमाची संकल्पनाही बदलणारच. दोन पिढ्यांमधील अंतर जाणवू लागले. त्यावेळी आपली पिढी गोंधळलेली होती. त्यावेळी आपल्या पिढीचे लग्न आणि आत्ताच्या पिढीचे लग्न त्या अर्थाने ही पिढी प्रेम, लग्न समारंभ यात गोंधळलेली नाहीत. त्यांचे विचार, आचार ठाम आणि चोख आहेत.
पारंपरिकता आणि आधुनिकता यांचे फ्युजन म्हणजे हल्लीचे विवाह सोहळे असे वर्णन करता येईल थोडक्यात. मेंदी, हळद हे पूर्वीच्या तुलनेत अधिक सोपे आणि मनोरंजक झाले आहे.
हे लग्न बघून माझे मन धास्तावले आहे सून आणि जावई कसे असतील? पण मनाची तयारी करण्याची संधी या विवाह सोहळ्यामुळे मला मिळाली... पण मग विचार येतो की "वसुधैवकम् कुटुंबम् " हीच आपली भारतीय संस्कृती आहे नाही का! आशीर्वाद दिले नांदा सौख्य भरे!
अंजली
No comments:
Post a Comment