Thursday, March 5, 2020

इजिप्तायन -3

                  आजचं  साइट सिइंगचं पहिलं  ठिकाण  होतं,  ताहरीर चौकातलं, ''इजिप्शियन  नॅशनल  म्युझिअम''! पर्यटकांची  तुडुंब  गर्दी! त्यामुळे  बाहेरून  इमारतीचे  निरीक्षण  करायला बराच वेळ  मिळाला. विटकरी  रंगाची  आकर्षक  इमारत! समोरच  नाइल नदी, तितकीच  तुडुंब  पाण्याने भरलेली! तिथल्या बागेत,शँपोलिअन,चित्रलिपीच्या अर्थाचा  जन्मदाता,त्याचा  सुंदर  संगमरवरी  पूर्ण  पुतळा  आहे. 
दोन  मजली इमारत, आत गेलो  तर,लांबच लांब,प्रशस्त  दालनं.पाच सहा हजार  वर्षांपूर्वीचा इतिहास, त्यामुळे  प्राचीन  वस्तूंचा  खजिनाच  जणू! खूपशा  वस्तू  अजून  बासनात  आहेत. तरी असं  म्हणतात की तिथे  मांडलेल्या  प्रत्येक  वस्तूपुढे एक  मिनीट  जरी  उभे  रहायचे  ठरवले,तरी  संपूर्ण  म्युझिअम  बघायला  नऊ महिने  लागतील! (आता  आली  ना थोडी कल्पना? )त्यामुळे  आमचा  गाइड ,महत्वाच्या  आणि  पहायलाच  हव्या  अशा  गोष्टीच आम्हाला  दाखवित  होता. काय  आणि किती  पाहू ?अशी  स्थिती झाली  माझी! पुतळे, भांडी, दागिने, कपडे, शस्त्रास्त्रे, स्क्राॅल्स आणि  मुख्य म्हणजे  घरंदाज  ममीज!
               सर्वात  आधी गेलो, तुतनकामेनच्या विभागात! सर्वात  किमती,आकर्षक  भाग, जिथे  जगातील  अनमोल  खजिना  आहे.जो पहायला  जगभरातील  पर्यटकांनी  गर्दी केली होती. आत गेल्याबरोबर तुतनकामेनचे  दोन भरीव  लाकडाचे  पुतळे  रक्षकाच्या वेशात उभे होते. त्या  काळ्या  अंगावर  लख्ख  सोन्याचे  अलंकार! पायातली  चप्पल सुद्धा शुद्ध  सोन्याची! (कोल्हापुरीसारखी  वाटली )पुढे  सोन्याचे  कोरीवकाम  केलेले ,नक्षीकाम  असलेले  मोठाले  पेटारे आहेत. दालनात अगदी  मध्यभागी  सोन्याचे  सिंहासन  आहे. त्यावर  बसून  तो  राज्यकारभार करायचा. त्या  सिंहासनाच्या  पाठीवर  मात्र  अगदी  घरगुती  असा  देखावा  कोरलेला  आहे. डोळे दिपतात आपले  अक्षरशः!
आणखी  अनेक  आसनं  होती तिथे!  हस्तिदंताचं  कोरीवकाम  असलेलं  आसन लाजवाब  होतं! त्याच्यावर  सिंह, नाग आणि  गिधाडांची  डोकी  कोरलेली  होती. पुढे  त्याच्या  कबरीत सापडलेल्या  छोट्या  नौका  होत्या. बैल  आणि  सिंहाच्या  डोक्यांनी सुशोभित  केलेले  पलंग होते, वेताचे,लाकडाचे! (भरपूर  प्राणी  भेटतात  इथे! )
       ममीफिकेशन प्रोसेसमध्ये आतडी, फुफ्फुसे इ. अवयव  काढून  ठेवतात. तर ते एका  नक्षीदार  कपाटात, स्फटिकाच्या  चार  बरण्यांमध्ये भरून  ठेवलेले आहेत. त्याला  फेरोंच्या  मस्तकाची  झाकणे  आहेत. पेटीच्या  चार  कोपर्‍यात  असलेल्या  संरक्षक  देवता, त्या  अवयवांचे  रक्षण  करतात  म्हणे! (माझ्याकडे  याचे  फोटो आहेत. आत फोटोग्राफीला  परवानगी  होती  चक्क! फक्त  फ्लॅश  नको.)
             आता  आम्ही  आलो, इथल्या  सर्वात  महत्वाच्या  दालनात! मुंगीलाही शिरायला  वाव नाही,अशी  गर्दी! दालनात  मधोमध,  तुतनकामेनच्या  ममी च्या  चेहर्‍यावर  अकरा  किलो  वजनाचा, शुद्ध  सोन्याचा  जगप्रसिद्ध  मुखवटा  ठेवलेला आहे. 3 पेट्या, एकातएक अशा, त्यावर अतिशय सुंदर  रत्नजडित,सुवर्णकाम,कोरीवकाम, सगळं पहाताना  आपल्याला  दोनच  डोळे  आहेत,  याची  खंत  वाटली! इथे  पाहू की  तिथे? हे पाहू  की  ते अशी  सतत  द्रुष्टी भिरभिरते आपली!माणिक,मोती,  पोवळी विविध  रंगांच्या, आकाराच्या  मण्यांच्या  माळा, अप्रतिम  कारागिरी! पण इतकी  गर्दी आणि  कलकल! मला वाटलं की  काहीतरी  जादू  व्हावी आणि सगळे  पर्यटक  गायब  होऊन,  मी  एकटीने शांतपणे हे  सगळं  अनुभवावं!
               शेवटचं दालन  होतं,  फेरो-ममीचं! 3000 वर्षांपूर्वी  धर्मगुरूंनी, त्या  लुटारूंच्या  हाती लागू  नयेत म्हणून, कोरड्या  विहीरीत पुरल्या  होत्या. पण  जवळपास  सव्वाशे  वर्षांपूर्वी  थडगेचोरांना त्या  अचानक सापडल्या! त्या  ज्या  
कापडात गुंडाळल्या  होत्या, त्यावर  नावं  असल्याने  त्या  कुणाच्या  आहेत, हे समजलं!
             हे दालन  वातानुकूलित  आहे,  ममी टिकाव्यात म्हणून  22 अंशांवर  तापमान  होतं  तिथे! काचेच्या  स्वतंत्र  पेट्यांतून एकूण  अकरा  शवं (ममीज )आहेत  तिथे. वाळून गेलेली,हाडा-कातड्याची आणि  विद्रूप  अशी  ती  शरीरं! पण  3000 वर्षांपूर्वी  ज्यांच्यामुळे इजिप्तचं भवितव्य  घडलं  अशा  व्यक्तींची!  सेकन्रे --ऐन लढाईत मरण  पावला, तर  रणांगणावरचा  त्याचा  आक्रसलेला चेहरा आणि  पिळवटलेले हात  अजूनही  वेडेवाकडे  दिसतात. रामसिस-- इजिप्तचा महान,सर्वात प्रसिद्ध  फेरो.ज्याकाळी आयुमर्यादा तीस वर्षे  होती, त्याकाळी  तो  ब्याण्णव वर्षे  जगला. त्याची  ममी  म्हणजे  अति वृद्ध  नि पूर्ण  झडलेले असे  शरीर! भयानक  वाटतं  पहाताना!त्याच्या डोक्यावर एका  बाजूला  मेंदीने रंगवलेले  केस  पाहून  आश्चर्य  वाटले. त्याच्या  पायाची  तिरकी  झालेली  बोटं, माझ्या  नेहमीच लक्षात  राहतील! सुरवातीला  उत्साह वाटत  होता  पहायचा,  पण नंतर  ते नकोसही वाटायला  लागलं. हे पहात असताना,तीन -साडेतीन हजार  वर्षे  ही  शवं  कशी  टिकवली  असतील? याचे  आश्चर्य  तर वाटतेच, पण अशा  व्यक्तींचे  फक्त  पुतळे  करून,  त्यांचे होते  तसे रुप लोकांच्या मनात  कोरलेले  ठेवले  असते, तर काय  बिघडले असते? त्यांचं  असं केविलवाणं  रूप  का केले असेल? असे  सारखे  वाटत  रहाते. 
        नाइलच्या  काठावरच्या देवळात  मृत्यूनंतर राजाची  ममी  बनवत  असत. हे  काम चाळीस  दिवसांतच करावं लागे. मग आचार्य  ती ममी  पिरॅमिड मध्ये  ठेवत. मग  ती  कधीच  पहाता नसे.म्हणून मुस्लिमांमध्ये  चाळीस  दिवस  शोक  पाळण्याची प्रथा आहे! म्हणजे  आपल्या  जवळपास  तिप्पट  दिवस!(आपल्यात  तेरा  दिवस  शोक पाळून, चौदाव्या  दिवशी  गोड  खाऊन, संपलं सुतक! )
       पुनर्जन्म  झाल्यावर  आत्म्याला  प्रवेश  करण्यासाठी, मृत  शरीरं, ममीफिकेशन करुन  जपण्याचा हा खटाटोप,आपल्या तरी  डोक्यात  शिरणं  जरा  अवघडच! 
(क्रमशः )

No comments:

Post a Comment