Monday, August 12, 2019

मोरनगर

इंदा च जामनगर ला पोस्टिंग झाल्याचं कळलं अन ते तीथे पोचायच्या आधीच आमचं जामनगर ला जायचा प्लॅन आखून झाला पण!
त्यांना क्वार्टर मिळालं,जेमतेम सामान लागलं असेल अन 'वायू' च्या पाठोपाठ (वायू तर चकमा देऊन निघून गेला) आम्ही जाऊन धडकलो!
अहमदाबाद हुन गाडी लेट झाल्याने रात्री दोन ला घरी पोचलो.
सकाळी जागआली ती मोराच्या आवाजाने! 

कॉफी घेऊन बाहेर येऊन बसले अन अगदी समोर,बगीच्यात पिसारा फुलवलेला देखणा,रुबाबदार मोर दिसला.
इंदा नलिया ला असताना त्यांच्या एअरफोर्स कॅम्पस मध्ये खुप मोर बघितले होते.आपल्याकडे रस्त्यांनी जसे कुत्री,डुक्कर हिंडतात तसे तिथे मोर फिरत होते.
पण या जामनगर च्या मोराची बातच काही और होती!इतक्या जवळून,भरगच्च पिसारा फुलवलेला मोर बघण्याचा हा पहिलाच प्रसंग!
बगीचा खूप मोठ्ठा आहे,सगळीकडे त्याचा मुक्त संचार होता,पिसारा मात्र हक्काची जागा असल्यासारखा त्या विशिष्ट ठिकाणीच फुलवायचा.कदाचित त्या जागेच्या बरोब्बर समोर सोफा,खुर्च्या असल्याने त्याने ती जागा निवडली असावी.शेवटी त्यालाही आपल्या भरगच्च फुललेल्या पिसाऱ्याच कौतुक करायला प्रेक्षक लागत असतीलच न!आम्ही अगदी 5 फुटावरून त्याचा विडिओ काढला तरी तो घाबरला नाही की निघून गेला नाही.आमच्याकडे ढुंकूनही न बघता त्याचा नाच सुरू होता. दोन तीन दिवस तिथे होतो,त्यात हे अवर्णनीय दृश्य दिवसातून तीन चारदा तरी बघितलं,पण मन भरलं नाही.दिल मांगे मोअर(मोर)!
खिडकीतून,त्या जागी मोर आलेला दिसला की लहान मुलासारखं धावत जाऊन तो पिसारा कधी फुलवतो याची वाट बघत बसायचे.त्याची रुबाबदार चाल,डौलदार पदन्यास,ऐटीत घेतलेली झेप,सगळं सगळं अगदी मनसोक्त अनुभवलं आणि कॅमेऱ्यात कैद पण केल.जामनगर च नामकरण मी माझ्यापुरतं तरी 'मोरनगर' अस करून टाकलं.

जामनगर हे गुजरातमधलं पाचव्या नंबरच मोठं शहर.रणजी ट्रॉफी ज्यांच्या नावाने आहे ते महाराज रणजितसिंगजी जडेजा यांच हे (नवानगर) संस्थान.आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे हे पहिले भारतीय खेळाडू!त्यांचे वारस दिग्विजयसिंह,हे पण क्रिकेटर होते.खूप आधी सुनील गावस्करांनी केलेली 'दिगजाम सुटिंग'ची जाहिरात येत होती,ती दिगजाम फॅक्टरी जामनगरचीच! दिग्विजयसिंग अन जामनगर याची आद्याक्षर घेऊन हे नाव दिल.तिथे बऱ्याच ठिकाणी दिगजाम चे होर्डिंग्स दिसले. पण ही फॅक्टरी आता मात्र बंद होण्याच्या मार्गावर आहे.
रिलायन्स ची जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी जामनगर ला आहे।रिलायन्स नी आपलं एक वेगळं शहरच तिथे वसवलय.
महाराजा दिग्विजयसिंग जे जामसाहब म्हणून ओळखले जायचे त्यांचा समर पॅलेस जामनगर हुन 30km.वर असलेल्या बालाचडीलाआहे.भारतात ज्या काही 50-60 सैनिक शाळाआहेत त्यातली एक सैनिक शाळा आता त्याजागी आहे.त्याचे प्राचार्य (जे सैन्यातीलऑफिसर च असतात) प्रशांत चे बॅच मेट!त्यांनी आम्हाला शाळा बघायला बोलावलं होत.गावापासून बरच दूर,आत ही शाळा आहे.तिथे शिकणारी मुलं ,शिक्षक,त्यांचा परिवार,येवढीच तिथे वस्ती .
संध्याकाळी त्यांच्या कडे गेलो.महाराजा दिग्विजयसिंग यांचा जो राजवाडा होता,ते आता प्रचार्यांचं क्वार्टर!घर उंचावर,अतिशय भव्य(राजवाडाच तो) अन दोन बाजूनी समुद्राने वेढलेलं आहे.घराच्या दिवाणखान्यातून,समोरच्या अंगणातून अन मागच्या गॅलरीतुनअथांग समुद्र नजरेस पडत होता.मागच्या गॅलरीतुन खाली पायऱ्या होत्या,ज्या थेट समुद्रात उतरायच्या.इतका प्रचंड अन थंड वारा होता तिथे की बस! त्यांनी सांगितलं,जेंव्हा ओहोटी येते समुद्राचं पाणी एक दीड किमी.मागे जात,तेंव्हा आम्ही बरेच वेळा तिथे पायी फिरायला जातो.काय खास अनुभव असेल नाही!  ऐकून त्यांचा हेवा वाटला. पण रात्री,एवढ्या मोठ्या घरात, लाटा अन भणाणत्या वाऱ्याच्याआवाजात,वस्तीपासून दूर राहण मात्र फारस आनंददायक नसावं. 
त्यांचा पाहुणचार घेऊन शाळा बघायला निघालो.शाळेची जुनी इमारत जी भूकंपामधे ढासळली ती बाजूलाच आहे.ही नवीन इमारत आणि आजूबाजूचा परिसर मात्र स्वछ आणि नीटनेटका होता।रविवार असल्याने सगळं सामसूम होत. 
या शाळेतून कोण कोण ऑफिसर झालेत कोण कोणत्या उच्च पदावर पोचलेत,त्यांच्या नावाची यादी दर्शनी भागात लावली होती.अनेक फोटो होते।त्यापैकी एक फोटो आठ-दहा पोलिश नागरिक अन क्रिकेटर अजय जडेजा जो रंणजितसिंग जडेजांचा वंशज आहे,यांचा होता.त्या फोटोबद्दल विचारल्यावर त्यांनी जे सांगितलं ते अस....

1939 साली दुसऱ्या महायुद्धात जर्मनी ने पोलंड वर हल्ला केला ,दुसऱ्या बाजूने USSR नी आक्रमण केलं।हजारो पोलिश नागरिकाना USSR मधे अनेक ठिकाणी, त्यात सायबेरिया पण होत लेबर कॅम्प मध्ये नेण्यात आल.पुढे जेंव्हा जर्मनी ने USSR वर हल्ला चढवला बऱ्याच पोलिश बायका व मुलांना तिथून निघायची परवानगी देण्यात आली.बोटीत बसून हे सगळे आश्रयाच्या शोधात निघाले.या खडतर प्रवासात अनेक जणाचा मृत्यू झाला,अनेक मुलं अनाथ झाले.भटकत भटकत अनेक देशांचे नकार घेत ते मुंबई बंदरात पोचले.ब्रिटिश गव्हर्नर नी पण नकारघंटा वाजवली।हे जेंव्हा महाराजा दिग्विजय सिंग यांना कळले त्यांना खूप वाईट वाटले.त्यांनी लगेच जामनगर बंदरावर बोटीला जागा दिली आणि त्यातील शरणार्थींना बालाचडी येथे आश्रय दिला.एवढा मोठा प्रवास करून आलेले ते शरणार्थी अतिशय थकलेले अन कुपोषित झाले होते।महाराजांनी फक्त त्यांची राहण्या खाण्याची सोय केली नाही तर त्यांचे शिक्षण पण सुरू केले .त्यांना परकं वाटू नये म्हणून त्यांच्या रूढी परंपरा जपल्या,ख्रिसमस  साजरा केला. ब्रिटिश गव्हर्नर नी जेंव्हा या शरणार्थी ना ठेवून घेण्यावर आक्षेप घेतला ,तेंव्हा महाराजा दिग्विजयसिंगनी त्या सगळ्या मुलांना दत्तक घेतल अन आपलं नाव दिलं। 
जवळ जवळ  सहा वर्ष हे शरणार्थी  तिथे राहिलेत.
पोलंड स्वतंत्र झाल्यावर मग ते आपल्या देशात परतले.
महाराजां प्रती कृतज्ञता म्हणून, पोलंड ची राजधानी असलेल्या वारस्वा(Warswa) येथील अनेक रस्त्याना(good maharaja square)  तसेच एका शाळेला महाराजांचे नाव दिले आहे.तिथल्या अनेक योजना महाराजांच्या नावाने आहेत.दरवर्षी तेथील वर्तमानपत्रात  त्यांच्याबद्दल लेख लिहून येतात.
एवढ्या दूर अंतरावरचे देश केवळ,'अतिथी देवो भव' या भारतीय संस्कारामुळे कायमचे प्रेमाच्या बंधनात बांधले गेले.
ह्या शरणार्थींपैकी सहा जण,जे आता नव्वदीचे आहेत, जवळ जवळ 70 वर्षांनी जामनगर ला भेट द्यायला आले होते.तेंव्हाचा तो फोटो होता.
तिथून आल्यावर किती तरी वेळ ही घटना सारखी डोळ्यासमोर येत होती.

इंदा नुकतीच जामनगर ला गेल्यामुळे ,तिथे अजून काय काय बघण्यासारखं आहे हे तिलाही माहिती नव्हतं।इतकंच काय, जामनगर बांधणी साठी प्रसिद्ध आहे,म्हणून शॉपिंग ला गेलो तर तिथलं मार्केट 1ते 4 बंद असत हे तिथे गेल्यावरच कळलं.सगळीच दुकान बंद होती ,जी काही उघडी होती त्याचे मालक आरामात गाद्यावर पहुडले होते।
क्षणभर पुण्याला आल्याचा फील आला।
एक होलसेल दुकान (म्हणजे त्याचा मालक) जाग दिसलं म्हणून तिथे शिरलो। सगळीकडे रंगीबेरंगी बांधणीच्या कापडांचे ढीग लावलेले होते,उभं राहायला जेमतेम जागा होती.बांधणीच्या त्या ढिगाच्या मधे उभं राहिल्यावर शे दोनशे इंद्रधनुष्यांमध्ये उभं आहोत अस वाटलं.खूप विविधता होती बांधणी ची! बांधणी इथून एक्स्पोर्ट पण होते.
जामनगर ला मरीन पार्क ,एक हनुमानाचे देऊळ (जिथे पन्नास वर्षांपासून अविरत राम नामाचा जप सुरू आहे),ज्याची गिनीज बुक मध्ये नोंद घेतली आहे, बघण्यासारखं आहे अस इंदा ला कुठून तरी कळलं, द्वारका सोमनाथ ही राहील होत पण आता जाण्याचा दिवस जवळ आला .
यासगळ्या गोष्टींसाठी अन सगळ्यात महत्वाचं म्हणजे देखण्या पिसारा फुलवलेल्या मोरासाठी ' एक जामनगर ट्रिप तो बनती ही है'.
बघू कधी जमतंय!

No comments:

Post a Comment