Thursday, March 5, 2020

वीरें दी वेडिंग


फुकेट क्राबी ला गेलो तेंव्हाच संजीवभाई अन ईशाभाभी नी फेब्रुवारी मधे असलेल्या त्यांच्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच आमंत्रण दिलं. चंदिगढ ,लुधियाना ,कर्नाल सगळीकडे काम ही होईल अन फंक्शन पण अटेंड करता येईल असा विचार करून जायचं ठरवलं.
आदल्या दिवशी मेहेंदी संगीत अन दुसऱ्या दिवशी रिसेप्शन असा प्रोग्रॅम होता.
5 वाजता कर्नाल ला पोचलो थोडा आराम करून त्यांच्या घरी गेलो.
घरात लग्न घर असल्यासारखी लगबग सुरू होती. सगळीकडे फुलांच्या माळा सोडल्या होत्या,फोटो साठी एक सोफा फुलांनी खास सजवला होता. मेहेंदी काढणारे,मेंहेंदी लावून देत होते,फोटोग्राफर फोटो,व्हिडीओ साठी तैनात होता. ईशाभाभी नी नव्या नवरी सारखी पूर्ण हातभर अन पायावर मेंहेंदी काढली होती, फुलांचे दागिने घातले होते. आलेल्या सगळ्यांना मांग टिक्का (बिंदी सारख) लावून देणं सुरू होत.मेहेंदी काढता काढता विविध प्रकारच्या स्नॅक्स चा आस्वाद सगळे घेत होते.सगळ्यांची मेंहेंदी झाल्यावर,मेहेंदी वाले हात भाभी भोवती वेगवेगळ्या आकारात धरून फोटो काढले. त्या दोघांचे पण विविध पोज मध्ये व्हिडीओ काढणं झालं. गावातले  नातेवाईक अन जवळची मित्र मंडळी असे जवळ जवळ पन्नास एक लोक  होते.
बाहेर मोठ्या टेबल वर बसून पुरुष मंडळींचा पिण्याचा प्रोग्रॅम सुरू होता. थोड्या बाजूला ज्युनिअर मंडळी पित बसले होते(किती हा मोठ्यांबद्दल आदर!).
इशाभाभी तयार होऊन बाहेर आल्या अन मग डीजे वर डान्स सुरू झाला.खरच सगळे खूप छान,बेधुंद आणि दिल खोलके नाचत होते, पण किती वेळ ! त्यांचा डान्स काही केल्या संपेना ,आम्ही दिवस भर प्रवास करून थकलो होतो, शेवटी आम्ही उठून जेवायला घेतलं.आम्हाला हॉटेल ला सोडायच तर ,आता कोण सोडणार ,सगळेच प्यायलेले! "बेटे आपको जादा हो गई है ,आप किसींको लेके सिर्फ साथ मे जाओ' अस संजीव भाईंनी विशालला (त्यांचा मुलगा) सांगितलं. शेवटी एक न प्यायलेला त्यांचा नातेवाईक सापडला, त्यांनी आम्हाला सोडून दिलं.मेहेंदी प्रोग्रॅम इतक्या थाटामाटात केलेला पाहून उद्या याही पेक्षा जबरदस्त काही बघायला मिळेल हे लक्षात आलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही फॅक्टरी अन ऑफीस ला जाऊन आमचं काम केलं.
लंच त्यांच्या  घरी केला,चक्क एकदम साधासा होता.मग हॉटेल ला आलो.
रात्री 7.30 ला हॉल वर जाण्यासाठी घ्यायला येणार होते. 
हॉल भला मोठा,हजार एक लोक मावतील एवढा!(आमंत्रित फक्त 300,400 होते) स्टेज खूप सुंदर सजवला होता,त्याच्या बाजूला मोठ्ठा स्क्रीन ,डीजे,जोडीला ढोल वाजवणारे ही होते.हॉल मधे मोठे मोठे गोल टेबल मांडून बसायची सोय केली होती.आम्ही पण एक टेबल पकडून बसलो. एक एक आमंत्रित येण सुरू झालं,सगळ्यांच्या हातात मोठे मोठे गिफ्ट बॉक्स किंवा पुष्पगुच्छ होते.एकेकाचे ड्रेस, हेअर स्टाइल मेकअप बघण्यासारखे होते. कोणतंही कपल अंनिव्हर्सरी कपल म्हणून खपल असत इतके भारी भारी कपडे अन दागिने घातले  होते.
 निरीक्षण करता करता छान वेळ जात होता.सात -आठ प्रकारचे स्नॅक्स ,मॉंकटेल घेऊन वेटर सतत फिरत होते अन इतकं सारख विचारत होते ,की दे बाबा एकदाच अस म्हणत आम्ही खात होतो. जेवणात ही खूप प्रकार,व्हेज नॉनव्हेज ,पाच तर स्वीट डिशच होत्या.बार काउंटर वेगळा लावला होता.
थोड्या वेळानी अंनिव्हर्सरी कपलच वाजत गाजत ,पुष्पवर्षाव झेलत,नाचतच आगमन झालं.खूप धूम नाचले ,किती तरी वेळ डान्स सुरूच होता.मग दोघ आलेल्या पाहुण्यांना भेटले.
बाजूच्या मोठ्या स्क्रीन वर त्यांचे लग्ना पासूनचे फोटो दाखवणं झालं.मग स्टेज वर कोरिओग्राफर कडून बसवून घेतलेले डान्स सुरू झाले.एक दोन डान्स नंतर रिंग सेरीमनी,अन वरमाला घातल्या.
मग एक एक जण स्टेज वर त्यांना शुभेच्छा द्यायला गेले.
 त्यानन्तर परत, स्टेज वर अन खाली डीजे च्या तालावर सगळे थिरकायला लागले.
तिथे डान्स आणि दारू हे कुठल्याही फंक्शन च अविभाज्य अंग आहे अस एकंदरीत लक्षात आलं.त्यासाठी तर वाढदिवस 25 ला होता तरी पार्टी 24 ला दिली. कारण मंगळवारी तिथे  नॉनव्हेज अन दारू घेत नाहीत!  
कोणी गेस्ट आले की लगेच ते पण नाचायला लागायचे अन बाकी लोक तर तयारच असायचे. थोड्या थोड्या वेळाने बंदुकीच्या फैरी झडतात तस डान्स च्या फैरी झडत होत्या.आम्ही ठरलो बाथरूम डान्सर ,तरी थोडे हात पाय आम्ही पण हलवले!
प्रत्येक वेळेला डान्स बरोबरच नोटा उडवण सुरू होत.पूर्ण प्रोग्रॅम होईपर्यंत 8,10 हजार रुपये तरी उडवले असतील!त्या उधळलेल्या नोटा नाचताना पायदळी तुडवल्या जात होत्या ,त्या घेण्यासाठी लहान मूल ( बहुदा डीजे ,ढोल वाल्याबरोबर असलेली मुलं) मधे घुसत होती. हे दृश्य मात्र अजिबात आवडलं नाही,पण तिथे हे सर्रास चालत.
 सून अन सासू नाचतेय ,सासरा त्यांच्यावर नोटा उडवतोय अन मुलगा दारूचा ग्लास हातात घेऊन व्हिडीओ काढतोय! आपल्या इथे अस दृश्य डोळ्यासमोर आणलं तरी मेंदूला झिणझिण्या येतील!
 हा खाणे, पिणे ,नाचणे सिलसिला 12 पर्यंत सुरू होता. मग तीन मजली केक आणला ,केक कापून झाला तो तोंडाला फासण्याचा कार्यक्रम पण पार पडला
आता सगळं आटोपलं अस वाटेपर्यंत परत डान्स सुरू झाला.  
 तिथे आलेल्या प्रत्येक फॅमिली ला (150 फॅमिली तरी असतील) जाताना,एक सुंदर कुंदननी सजवलेला मोठा बॉक्स दिला,आतमध्ये खारवलेले काजू बदाम च्या काचेच्या बरण्या आणि मिठाई होती.
 खूप उशीर झाला होता आम्ही पण निघायचं ठरवलं.
 आदल्या दिवशी सारखा न प्यायलेला बकरा शोधला. दोघांचा निरोप घेऊन कार्यक्रम खूप छान झाल्याचं सांगितलं.
 
ते म्हणाले "हा ठीक हुआ फंक्शन ,कोई नाराज नहीं हुआ ,हमारे यहा सबको बहुत पुछना पडता है, नही तो लोग नाराज हो जाते है।' त्यांनी अस म्हंटल्यावर लक्षात आल ,प्रत्येक वेळेला ,स्टेज वर वरमाला घालणं झाल्यावर असो केक कापून झाल्यावर किंवा नाचताना,आम्ही जिथे कुठे असू तिथून ते आवर्जून आम्हाला फोटो साठी बोलावत होते. 
विरे दि वेडिंग (विरी गेलेल्या जोडप्याची का असेना) मस्तच झाली. खूप जिंदादिल लोक आहेत तीकडली ,खाओ पीओ नाचो ऐश करो हा तिथला फंडा! 
मला आठवत अमोल(पुतण्या) च्या लग्नाच्या रिसेप्शनला संजीवभाई अन फॅमिली आले होते. तेंव्हा आमचं त्यांच्याशी नुकतंच डिलिंग सुरू झालं होतं,फारशी ओळख नव्हती. 
ते रिसेप्शन त्यांना किती मिळमिळीत वाटलं असेल! नाच नाही दारू नाही ,हल्ला गुल्ला नाही.लोक आपले येतायत ,भेटून जेऊन परत जातायत! त्यांनी पण तिकडे जाऊन असच सांगितलं असेल नाही का!
मी पंजाब मधलं फंक्शन पाहिल्यांदा च अटेंड केलं.दोन्ही संस्कृती मधला फरक खूपच ठळकपणे जाणवला.
  हा संस्कृती मधला फरक असला तरी, आपल्याकडच्या एका लग्नाच्या खर्चायेवढा खर्च अंनिव्हर्सरी साठी केलेला पाहून किती ही उधळपट्टी ,असा विचार  मनात आल्याशिवाय राहिला  नाही.
हौसेला मोल नाही अजून काय!


इजिप्तायन -3

                  आजचं  साइट सिइंगचं पहिलं  ठिकाण  होतं,  ताहरीर चौकातलं, ''इजिप्शियन  नॅशनल  म्युझिअम''! पर्यटकांची  तुडुंब  गर्दी! त्यामुळे  बाहेरून  इमारतीचे  निरीक्षण  करायला बराच वेळ  मिळाला. विटकरी  रंगाची  आकर्षक  इमारत! समोरच  नाइल नदी, तितकीच  तुडुंब  पाण्याने भरलेली! तिथल्या बागेत,शँपोलिअन,चित्रलिपीच्या अर्थाचा  जन्मदाता,त्याचा  सुंदर  संगमरवरी  पूर्ण  पुतळा  आहे. 
दोन  मजली इमारत, आत गेलो  तर,लांबच लांब,प्रशस्त  दालनं.पाच सहा हजार  वर्षांपूर्वीचा इतिहास, त्यामुळे  प्राचीन  वस्तूंचा  खजिनाच  जणू! खूपशा  वस्तू  अजून  बासनात  आहेत. तरी असं  म्हणतात की तिथे  मांडलेल्या  प्रत्येक  वस्तूपुढे एक  मिनीट  जरी  उभे  रहायचे  ठरवले,तरी  संपूर्ण  म्युझिअम  बघायला  नऊ महिने  लागतील! (आता  आली  ना थोडी कल्पना? )त्यामुळे  आमचा  गाइड ,महत्वाच्या  आणि  पहायलाच  हव्या  अशा  गोष्टीच आम्हाला  दाखवित  होता. काय  आणि किती  पाहू ?अशी  स्थिती झाली  माझी! पुतळे, भांडी, दागिने, कपडे, शस्त्रास्त्रे, स्क्राॅल्स आणि  मुख्य म्हणजे  घरंदाज  ममीज!
               सर्वात  आधी गेलो, तुतनकामेनच्या विभागात! सर्वात  किमती,आकर्षक  भाग, जिथे  जगातील  अनमोल  खजिना  आहे.जो पहायला  जगभरातील  पर्यटकांनी  गर्दी केली होती. आत गेल्याबरोबर तुतनकामेनचे  दोन भरीव  लाकडाचे  पुतळे  रक्षकाच्या वेशात उभे होते. त्या  काळ्या  अंगावर  लख्ख  सोन्याचे  अलंकार! पायातली  चप्पल सुद्धा शुद्ध  सोन्याची! (कोल्हापुरीसारखी  वाटली )पुढे  सोन्याचे  कोरीवकाम  केलेले ,नक्षीकाम  असलेले  मोठाले  पेटारे आहेत. दालनात अगदी  मध्यभागी  सोन्याचे  सिंहासन  आहे. त्यावर  बसून  तो  राज्यकारभार करायचा. त्या  सिंहासनाच्या  पाठीवर  मात्र  अगदी  घरगुती  असा  देखावा  कोरलेला  आहे. डोळे दिपतात आपले  अक्षरशः!
आणखी  अनेक  आसनं  होती तिथे!  हस्तिदंताचं  कोरीवकाम  असलेलं  आसन लाजवाब  होतं! त्याच्यावर  सिंह, नाग आणि  गिधाडांची  डोकी  कोरलेली  होती. पुढे  त्याच्या  कबरीत सापडलेल्या  छोट्या  नौका  होत्या. बैल  आणि  सिंहाच्या  डोक्यांनी सुशोभित  केलेले  पलंग होते, वेताचे,लाकडाचे! (भरपूर  प्राणी  भेटतात  इथे! )
       ममीफिकेशन प्रोसेसमध्ये आतडी, फुफ्फुसे इ. अवयव  काढून  ठेवतात. तर ते एका  नक्षीदार  कपाटात, स्फटिकाच्या  चार  बरण्यांमध्ये भरून  ठेवलेले आहेत. त्याला  फेरोंच्या  मस्तकाची  झाकणे  आहेत. पेटीच्या  चार  कोपर्‍यात  असलेल्या  संरक्षक  देवता, त्या  अवयवांचे  रक्षण  करतात  म्हणे! (माझ्याकडे  याचे  फोटो आहेत. आत फोटोग्राफीला  परवानगी  होती  चक्क! फक्त  फ्लॅश  नको.)
             आता  आम्ही  आलो, इथल्या  सर्वात  महत्वाच्या  दालनात! मुंगीलाही शिरायला  वाव नाही,अशी  गर्दी! दालनात  मधोमध,  तुतनकामेनच्या  ममी च्या  चेहर्‍यावर  अकरा  किलो  वजनाचा, शुद्ध  सोन्याचा  जगप्रसिद्ध  मुखवटा  ठेवलेला आहे. 3 पेट्या, एकातएक अशा, त्यावर अतिशय सुंदर  रत्नजडित,सुवर्णकाम,कोरीवकाम, सगळं पहाताना  आपल्याला  दोनच  डोळे  आहेत,  याची  खंत  वाटली! इथे  पाहू की  तिथे? हे पाहू  की  ते अशी  सतत  द्रुष्टी भिरभिरते आपली!माणिक,मोती,  पोवळी विविध  रंगांच्या, आकाराच्या  मण्यांच्या  माळा, अप्रतिम  कारागिरी! पण इतकी  गर्दी आणि  कलकल! मला वाटलं की  काहीतरी  जादू  व्हावी आणि सगळे  पर्यटक  गायब  होऊन,  मी  एकटीने शांतपणे हे  सगळं  अनुभवावं!
               शेवटचं दालन  होतं,  फेरो-ममीचं! 3000 वर्षांपूर्वी  धर्मगुरूंनी, त्या  लुटारूंच्या  हाती लागू  नयेत म्हणून, कोरड्या  विहीरीत पुरल्या  होत्या. पण  जवळपास  सव्वाशे  वर्षांपूर्वी  थडगेचोरांना त्या  अचानक सापडल्या! त्या  ज्या  
कापडात गुंडाळल्या  होत्या, त्यावर  नावं  असल्याने  त्या  कुणाच्या  आहेत, हे समजलं!
             हे दालन  वातानुकूलित  आहे,  ममी टिकाव्यात म्हणून  22 अंशांवर  तापमान  होतं  तिथे! काचेच्या  स्वतंत्र  पेट्यांतून एकूण  अकरा  शवं (ममीज )आहेत  तिथे. वाळून गेलेली,हाडा-कातड्याची आणि  विद्रूप  अशी  ती  शरीरं! पण  3000 वर्षांपूर्वी  ज्यांच्यामुळे इजिप्तचं भवितव्य  घडलं  अशा  व्यक्तींची!  सेकन्रे --ऐन लढाईत मरण  पावला, तर  रणांगणावरचा  त्याचा  आक्रसलेला चेहरा आणि  पिळवटलेले हात  अजूनही  वेडेवाकडे  दिसतात. रामसिस-- इजिप्तचा महान,सर्वात प्रसिद्ध  फेरो.ज्याकाळी आयुमर्यादा तीस वर्षे  होती, त्याकाळी  तो  ब्याण्णव वर्षे  जगला. त्याची  ममी  म्हणजे  अति वृद्ध  नि पूर्ण  झडलेले असे  शरीर! भयानक  वाटतं  पहाताना!त्याच्या डोक्यावर एका  बाजूला  मेंदीने रंगवलेले  केस  पाहून  आश्चर्य  वाटले. त्याच्या  पायाची  तिरकी  झालेली  बोटं, माझ्या  नेहमीच लक्षात  राहतील! सुरवातीला  उत्साह वाटत  होता  पहायचा,  पण नंतर  ते नकोसही वाटायला  लागलं. हे पहात असताना,तीन -साडेतीन हजार  वर्षे  ही  शवं  कशी  टिकवली  असतील? याचे  आश्चर्य  तर वाटतेच, पण अशा  व्यक्तींचे  फक्त  पुतळे  करून,  त्यांचे होते  तसे रुप लोकांच्या मनात  कोरलेले  ठेवले  असते, तर काय  बिघडले असते? त्यांचं  असं केविलवाणं  रूप  का केले असेल? असे  सारखे  वाटत  रहाते. 
        नाइलच्या  काठावरच्या देवळात  मृत्यूनंतर राजाची  ममी  बनवत  असत. हे  काम चाळीस  दिवसांतच करावं लागे. मग आचार्य  ती ममी  पिरॅमिड मध्ये  ठेवत. मग  ती  कधीच  पहाता नसे.म्हणून मुस्लिमांमध्ये  चाळीस  दिवस  शोक  पाळण्याची प्रथा आहे! म्हणजे  आपल्या  जवळपास  तिप्पट  दिवस!(आपल्यात  तेरा  दिवस  शोक पाळून, चौदाव्या  दिवशी  गोड  खाऊन, संपलं सुतक! )
       पुनर्जन्म  झाल्यावर  आत्म्याला  प्रवेश  करण्यासाठी, मृत  शरीरं, ममीफिकेशन करुन  जपण्याचा हा खटाटोप,आपल्या तरी  डोक्यात  शिरणं  जरा  अवघडच! 
(क्रमशः )

हॉस्टेल के दिन भी क्या दिन थे

अनंत अडचणी पार केल्यावर जेव्हा मी बी एस सी होम सायन्स फर्स्ट क्लास मध्ये पास झाले ,त्यानंतर घरच्यांना जरा वाटू लागलं आता बहुदा ही शिकू शकते पुढे ! म्हणून मग माझ्या पदव्युत्तर शिक्षणाचा विचार करण्यात आला . त्यासाठी फूड अँड न्यूट्रिशन या विषयाची निवड मी आधीच करून ठेवली होती. (अगदी अनुरूप विवाह संस्थे सारखी).पण तेव्हा अकोल्यात हा विषय कोणत्याच कॉलेजमध्ये शिकवला जात नव्हता. मग दोन पर्याय उपलब्ध होते ,नागपूर (जिथे दोन्ही बहिणी नांदा सौख्य भरे संसार करत होत्या, आणि तेव्हा माझ्यासाठी नागपूर घर अंगण होतं,लौकिकार्थाने खूप मोठं शहर,त्या वयात ज्याची सहज भुरळ पडली असती) आणि दुसरा परभणी !(जिथे माझा जन्म झाला होता!)अजून एक भक्कम कारण म्हणजे परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संलग्नित असलेले एम एस सी फूड अँड न्यूट्रिशन अपने आप मे खास था । म्हणजे संपूर्ण देशात केवळ 2 कृषी विद्यापीठाने होम सायन्स  चे  अभ्यासक्रम राबवले आहेत ,नालंदा विद्यापीठ आणि दुसरे परभणीचे मराठवाडा कृषी विद्यापीठ ! मग काय आपल्याला सरधोपट मार्गापेक्षा वेगळ्या पण आडमार्गाने  जाणं नेहमीच आवडतं .म्हणून परभणीलाच पहिली पसंती दिली . पण तिथला प्रवेश सोपा खचितच नव्हता! केवळ 4 प्रवेश घेतले जातात पैकी 2 प्रवेश त्यांच्या कॉलेज चे, एक महाराष्ट्रातील इतर विद्यापीठासाठी राखीव आणि एक प्रवेश उर्वरित भारतातील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी ! म्हणजे काय एकूण अवघड जागेचं दुखणं ! प्रवेश मिळेल की नाही याची प्रचंड धाकधूक ! त्यात मोठ्या बहिणींचे पदव्युत्तर शिक्षणासाठी चे प्रवेश एका एका गुणांनी हुकलेले ! असा अनुभव गाठीशी बांधून अर्ज केला. 
        मग काय गजानन महाराजांचा धावा ! पण नशिबाने साथ दिली आणि मला प्रवेश मिळाला . इथूनच माझ्या आधीपेक्षा वेगळ्या, अनोख्या आणि काहीश्या खडतर पण interesting प्रवासाची सुरुवात झाली . 
        कृषी विद्यापीठाच्या अतिशय निसर्गरम्य वातावरणात माझं हे नवं कॉलेज होतं . अर्थात लहानपणापासून बाबा pkv त असल्यामुळे या वातावरणाची सवय होतीच. शिवाय माझा जन्म याच परिसरातील एका quarter मध्ये झालेला , पण मी वर्षाची होण्या आधीच बाबांची बदली अकोल्याला झाली. त्यामुळे उगाचच सगळं ओळखीचं वाटत होतं . 
          कॉलेज च्या फाटकातून आत प्रवेश केल्यावर पाहिले डाव्या बाजूला  वर्षा गर्ल्स हॉस्टेल होतं. आणि उजव्या बाजूला कॅन्टीन आणि बी एस सी गृहविज्ञान चे टुमदार कॉटेज ! पुढे अगदी 20 मीटर अंतरापासून  गर्द झाडीत लपलेली कॉलेज ची प्रशस्त इमारत सुरू होत होती.कॉलेज वर प्रथम तुज पाहता ,असं प्रेमच जडलं जणू ! 
 सुरुवातीला तळमजल्यावर बालविकास शाखेची बालवाडीची  अतिशय देखणी नमुनेदार रचना असलेली हवेशीर इमारत तसेच प्रयोगशाळा डाव्या बाजूला तर उजव्या बाजूला वस्त्रशास्त्राचे भव्य दालन आणि वर्ग खोल्या . दोन्ही बाजूने वरच्या मजल्यावर माझ्या कर्मभूमीवर जाण्यासाठी 2 जीने ! उजव्या बाजूच्या जिन्याने वर प्रवेश करताच मोठा पॅसेज त्याच्या दोन्ही बाजूला आमच्या विषय शिक्षकांचे स्वतंत्र मोठाले दालन,आणि सुरुवातीला  एक वर्ग खोली . अतिशय सुसज्ज प्रयोगशाळा .मधला पूल पार केल्यावर वर्गखोल्या. (मला हा पूल विशेष आवडायचा  ,कारण तिथे उभं राह्यल्यावर थेट कॉलेज चं फाटक दिसायचं ,शिवाय सगळ्या मॅडमच्या केबिन मोठाल्या खिडक्या असल्यामुळे आतून दिसायच्या म्हणजे मॅडम जागेवरून उठल्या की वर्ग गाठायची वेळ झाली असं कळायचं ).असा सगळा सरंजाम बघून आपण आता शास्त्रज्ञ वगैरे होणार याची खात्री पटली. 
        आता उत्सुकता होती ती वर्षा गर्ल्स हॉस्टेल (VGH) आतून बघण्याची . होस्टेलच्या मुख्य दारात गुडघ्यापर्यंत धोतर नसलेले उंचपुरे,करड्या नजरेचे काटक चौकीदार कायम उभे असायचे ,(ज्यांना मुली मामा म्हणत). दाराच्या डाव्या बाजूला हॉस्टेलच ऑफिस. त्या ऑफीस   मध्ये प्रेमळ आयेशा बी (जिला आपा म्हणायचे ) हॉस्टेल ची attendent बसलेली असायची.त्यापुढे recreation room होती . त्यामध्ये TV, छोटेसे वाचनालय,Home - science च्या मुलींची गरज लक्षात घेऊन तिथे शिलाई मशीन पण होती. पण हॉस्टेल मध्ये home science व्यतिरिक्त  agriculture, horticulture, veterinary या विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर करणाऱ्या मुली पण राहायच्या . हॉस्टेल ची रचना अगदी चौसोपी वाड्यासारखी होती.तळ मजला +2 मजले होते. पैकी तळमजल्यावर मुख्य दारातून प्रवेश करताच आतल्या चौकोनी इमारतीची कल्पना यायची. मध्यभागी मऊ लॉन लावलेले होते आणि चारही बाजूनी असलेल्या खोल्यांमध्ये मुली राहात . खोलीच्या समोर सलग कॉरिडॉर ! म्हणजे कॉरिडॉर मध्ये आलं की सगळ्यांना खालचं लॉन आणि एकमेकींच्या खोल्या दिसायच्या. या चौकोनी इमारतीच्या दोन्ही डायगोनाल कॉर्नर ला 4 बाथरूम आणि 4 संडास होते ,(जिथे फक्त सकाळी 1 तास पाणी यायचं पाणी आलं की दिवसभरासाठी साठवून ठेवायचं )आणि दुसऱ्या डायगोनल कॉर्नर ला 2 जिने होते.  आपानेच मला प्रथम पूर्ण हॉस्टेल तसेच मला देण्यात आलेली खोली दाखवली आणि तिथले सगळे नियम समजावून सांगितले . लगेच मी हॉस्टेल आणि कॉलेज ची एका सेमिस्टर ची  60 +45 रुपये एवढी फी भरली आणि  परभणीला या निसर्गरम्य हॉस्टेल आणि कॉलेज मध्ये डेरेदाखल झाले. 
                                              क्रमशः
                                              ©️ मीनल सोमण

Wednesday, March 4, 2020

जोशी मिस

शाळेच्या वर्गाचं पुन्हा एकदा रियुनियन होतं. काही जणांशी संपर्क होताच तर काही जण वीस ते पंचवीस वर्षांनी भेटणारे. आमच्या वर्गातला एक जण आता मोठा उद्योगपती झालेला. त्याने पुढाकार घेऊन अगदी कॉर्पोरेट स्टाईलने, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या मदतीने झकास व्यवस्था केली होती. त्या कंपनीच्या थीमप्रमाणे सगळं वातावरण शाळेच्या वेळचं. अगदी चिंचगोळे, रावळगाव चॉकलेट पासून ’मैने प्यार किया’ मधल्या गाण्यापर्यंत सगळं जुन्या आठवणी जागवणारं. बसायला वर्गासारखी रचना.. .आमचा सातवीतला ग्रुप फोटो मोठ्ठा करून स्टेजवर लावलेला. त्यातली मित्रमंडळी ओळखण्याची एकमेकात स्पर्धा लागलेली. त्या फोटोत मधे बसलेल्या मंद स्मित करणार्‍या ’जोशी मिस’.. whatsapp वर त्यांच्या मुलाला मी भराभर सगळे फोटो पाठवले. त्याच्यामार्फत मिसचा रिप्लाय आला.. "वय झालं. प्रवास झेपत नाही. तुम्हा सर्वांना आशीर्वाद. असेच एकत्र राहा."
इतक्या शिक्षकांचा सहवास लाभला, ग्रुप फोटो तर दरवर्षी त्या त्या वर्गशिक्षकांबरोबर काढण्याची शाळेची प्रथा होती पण रियुनियन मधे हाच फोटो व्यासपीठावर लावण्यासाठी निवडण्याचं कारण एकच .. आमच्या सगळ्य़ांच्या लाडक्या ’जोशी मिस’.त्यानंतर आम्ही नाशिकला रियुनियन केलं ते खास त्यांना भेटता यावं म्हणून

आमच्या पाचवीच्या वर्गात पहिल्याच दिवशी ’क्लासटीचर’ म्हणून त्यांनी प्रवेश केला. उंच, सशक्त बांध्याच्या, गोर्‍यापान, हसर्‍या, रूबाबदार, पांढर्‍या होत चाललेल्या पण डाय न केलेल्या कुरळ्या केसांची आखूड वेणी घालणार्‍या, सोन्याची एक चेन आणि एक एक बांगडी सोडून कुठलाही दागिना न घालणार्‍या आणि साध्या कॉटनच्या पण सतेज रंगांच्या साड्या नेसणार्‍या जोशी मिस मला नेहमीच खूप आवडायच्या. (सुधा मूर्तींचा फोटो पहिल्यांदा पाहिला तेव्हा त्यांच्यातली साम्यस्थळे जाणवली) त्या माझ्या घराजवळ राहत आणि चौथीपर्यंत त्यांच्याशी संबंध नसला तरी शाळेत एरवीही मी त्यांना आदराने पाहत असे आणि दिसल्या की अभिवादन करत असे. त्यांनी शिकवावं याची मी जणू वाटच पाहत होते. त्या भाषा शिकवायला आल्या. त्यातला व्याकरणाचा भाग सुद्धा मला मजेदार वाटू लागला. त्या गप्पा मारल्यासारख्या शिकवत. मराठीतले ह्रस्व, दीर्घाचे नियम असोत किंवा गद्य. कविता शिकवताना त्या आम्हाला थेट त्या वातावरणात घेऊन जात. इंग्लीश शब्दाचे अर्थ त्याच्या वाक्यातल्या जागेनुसार कसे बदलतात असं काय काय त्या सांगत असायच्या. त्यांच्यामुळे मला ’भाषा’ हे प्रकरण भलतच आवडायला लागलं. इतर शिक्षकांमध्येही काही जण थोडे थोडे आवडायचे पण कुणाचा स्वभाव आवडायचा नाही, तर कुणाची शिकवण्य़ाची पद्धत. काही सर केवळ पाट्या टाकणारे, काही मिस छानछोकीत दंग. काहींना केवळ ओरडणं म्हणजे शिस्त लावणं असं वाटे तर काहींना विद्यार्थ्यांशी नीट संवादच साधता येत नसे. जोशी मिस या सगळ्य़ांमध्ये वेगळ्य़ा होत्या.

भाषा आवडायला लागल्याने दादाने वाचनालयातून आणलेली मॅक्झीम गॉर्कीची "आई" कादंबरी वाचली, बरीचशी कळली नाही पण त्यांना मी ’व्होडका’ बद्दल ’ती गोड लागते का?’ असे काहीतरी विचारल्याचे मला आठवते. त्या दचकल्या असाव्यात पण खुलाशात त्यांना मी ती कादंबरी वाचल्याचे सांगितल्यावर त्यांनी, माझा गालगुच्चा घेतल्याचे आठवते. आता ही पुस्तकं वाच, म्हणत त्यांनी एक यादीच करून दिली. त्यांच्यावर छाप टाकायला कोणाच्यातरी पुस्तकातली वाक्यं ’ढापून’ ती मी निबंधात घातली होती. त्यांनी तो निबंध वर्गात ’कौतुकाने’ वाचून दाखवला. त्याचबरोबर त्यातील ती वाक्ये कोणत्या लेखकाची, हे मला जाहीरपणे विचारले. माझा चेहरा उतरला. नंतर मला स्टाफरूममधे बोलावून "वाक्य कुठे पेरावे हे मुलांना कळावे म्हणून मी निबंध वाचला, पण ते वाक्य ज्याचे आहे त्याचा उल्लेख झाला नाही तर ती चोरी आहे हे तुला कळावे हा ही उद्देश होता" असे बरेच काही मला जवळ घेऊन म्हणाल्या. त्यानंतर आजही कुणाचे वाक्य उद्धृत करताना ते ’जाहीर वाचन’ मला आठवते. सहावीत त्या एकही विषय शिकवायला नव्हत्या.

शाळा कॉन्व्हेंट असली तरी दोन्ही माध्यमं होती. ख्रिश्चन मंडळी खूप, त्यांच्या फाडफाड इंग्रजीमुळे आम्ही त्यांना बिचकायचो. एका सिनीयर हाऊस-प्रमुख मुलीने माझा टाय लावायचा राहिला म्हणून मला असेंब्लीच्या बाहेर घालवले. मी लावला होता पण त्याचे बक्कल तुटले म्हणून तो पडला, हे काही मला तिला इंग्रजीत सांगता आले नाही. उशीरा वर्गात आल्यावर मिसला काय ते कळले, त्यांनी आधी त्या मुलीला बोलावून अस्खलित इंग्रजीत तिची हजेरी घेतली. ती गेल्यावर मला जवळ बोलवून खडसावले,"इंग्रजी बोलता येत नाही यात काय कौतुक आहे? का येत नाही? लिहीता येते तर बोलता का येत नाही? त्यासाठी तू वेगळे काय प्रयत्न केलेस? नुसता शाळेतला नंबर पुढे काही उपयोगी नसतो" वगैरे. दुसर्‍या दिवशी त्यांनी दोन छोटी इंग्रजी पुस्तकं मला आणून दिली, एनिड ब्लायटनची असावीत आणि या महिन्याअखेरीस परत कर म्हणून बजावले. मी तोवर अभ्यासाव्यतिरीक्त इंग्लीश म्हणजे फक्त कॉमिक्स वाचत असे. न वाचताच मी त्यांना पुस्तकं परत केली. त्यांनी ’आता यातली गोष्ट काय आहे ती सांग’ म्हटल्यावर नाईलाजाने मी खरे काय ते कबूल केले. पुढच्या असेंब्लीत त्यांना वचन दिल्याप्रमाणे इंग्लीशमधे बातम्या सांगितल्या म्हणजे वाचल्या. वक्तृत्वाची भीती कधीच नव्हती पण इंग्लीशमधे !! इंग्लीशचे व्याकरण नीट समजावून घेतले तरच इंग्लीशची भीती जाते असं त्या पुन्हा पुन्हा सांगायच्या, जोशी मिसमुळे त्या भाषेची भीती कायमची गेली. त्यांना तो विषय आम्हाला शिकवायला मिळाला नसला तरी इंग्रजी माध्यमाच्या सिनीयर मुलांनी ’कुसुमाग्रज, तांबे ,बोरकर’ इ.च्या सोप्या कवितांवर आणि मराठी माध्यमातल्यांनी ’वर्डस्वर्थ, बायरन, शेले’ इ.च्या सोप्या कवितांवर प्रोजेक्ट करायचा अशा अफलातून कल्पना फक्त त्यांनाच सुचायच्या.

गॅदरिंगमधे मी कशात भाग घेतला नाही असे कधी झालेच नव्हते. त्या वर्षी त्याच सुमारास नेमके गावाला जावे लागल्याने माझी निवड झाली नाही. मला फारच वाईट वाटले. जोशी मिसजवळ रडून-पडून मी एकदाची त्यात वर्णी लावली पण मला अगदीच फुटकळ भूमिका मिळाली. काय तर म्हणे येशूच्या जन्माने आनंद झालेला निळा ढग! पुढे तो मेंढपाळाचा सीन सुरू आणि मागे (आम्ही) रंगीत ढग मंडळींनी या विंगेकडून त्या विंगेकडे हात हलवत पक्षासारखं विहरत जायचं. त्यात पुन्हा ढग असल्याने तोंडाला कापूस सगळा. मला स्वत:चा संताप आला, काय अटटाहास माझा, भाग घेण्याचा! ते नाटक झालं, मी कपडे बदलून बाहेर आले. जोशी मिसजवळ जाऊन फुरंगटून उभी राहिले. त्यांचा जरा रागच आला होता. त्या मला निदान ’चंद्र’ करू शकल्या असत्या. माझी तेवढी वट त्यांच्याकडे नक्कीच होती. मी कुरकूर केल्यावर त्या बरच काही म्हणाल्या, त्याचा सारांश आठवतोय.. "नेहमी आपणच मुख्य भूमिकेत असू असं नसतं. आणि सगळेच असं म्हणाले तर कसं चालेल. अशाही अनुभवाची एक गंमत असते." मला नंतर पटलं त्यांचं आणि मी जाऊन सॉरी म्हणाले त्यांना. त्या गोड हसल्या.

आठवीत त्या आम्हाला काहीच शिकवायला नव्हत्या. स्पर्धांच्या निमित्त्याने माझा त्यांच्याशी संपर्क यायचाच. ’टिट्बिट्स’ नावाचं एक पत्रक शाळेत निघत असे. त्यात मराठी विभाग सुरू झाला तो जोशी मिसमुळेच. त्याची मी संपादक होते. त्यासाठी त्या छान विषय सुचवायच्या. त्यांची मी आवडती आहे याचा मला अभिमान वाटायचा. एव्हाना आम्हालाही थोडी शिंग फुटली होती. शाळेत काही मुली solo नृत्यांसाठी प्रसिद्ध होत्या. त्यांचा नाच हे गॅदरिंगचे प्रमुख आकर्षण असायचे. मी बरी नाचायचे पण बॉबकट मुळे बहुतेक वेळा मला आयब्रो-पेन्सीलने मिशी काढून, पांढरा कुर्ता-चुडीदार, डोक्याला आणि कमरेला ओढणी अशा वेशात एखाद्या ’गोरीचा’ ’सजना’ किंवा फार तर लुंगी-तिरकी टोपी घालून आणि वल्हे घेऊन ’नाखवा’ बनूनच नाचावे लागायचे. सोनेरीबिनेरी झगमगता ड्रेस घालून, उघडझाप करणार्‍या रंगीत दिव्यांच्या प्रकाशात, एखादा थिरकता डान्स करून अख्ख्या शाळेला थक्क करून टाकायचे अशी माझी एक सुप्त महत्वाकांक्षा होती.
ऑडीशनला गेले तर निवड-समितीत नेमक्या जोशी मिस. मी जाऊन कॅसेट दिली. गाणं वाजू लागलं.. बहुतेक कैदी सिनेमातलं. आईला सांगितलच नव्हतं, मैत्रिणींनी म्हटलं होतं "कर बिनधास्त." जोशी मिस माझ्याकडे अशा काही पाहत होत्या की मला आपले काहीतरी प्रचंड चुकते आहे एवढे कळले. मी त्यांच्या बाजूच्या मिसजवळ i need to practise more असे काही तरी पुटपुटले आणि तिथून धूम ठोकली. त्यांनी दुसर्‍या दिवशी मला वाटेत थांबवले. तू चांगली नाचली असतीस तरी मी तुला निवडले नसते. तुला त्या गाण्याचे शब्द कळतात? तुला किती गोष्टी उत्तम येतात, त्यात स्वत:ला घडव, आणि नाच इतका आवडत असेल ना तर क्लासीकल शिक, व्यवस्थित वेस्टर्न शिक. मग नीट गाणं निवड, त्याचा अर्थ समजून घेऊन नाच बसव.. वगैरे बरच काही बोलल्या. मी घरी येऊन रडले..पण ते शब्द डोक्यात पक्के बसले. आता रिअ‍ॅलिटी शो मध्ये लहान मुली अप्रतिम नाचतात. बरेचदा संगीताने शब्दांवर कुरघोडी केलेली असते. नाचाचे फॉर्म्स बदललेत. जागतिक झालेत. फक्त लहान मुलींसाठी गाणं निवडताना डान्सफॉर्म कोणताही असला तरी शब्द वयानुरुप आहेत ना याकडे पालकांनी, आयोजकांनी लक्ष द्यावं असं मनापासून वाटतं.

दिवाळीच्या सुटीअखेर आमची गणिताची पुन्हा परीक्षा घेण्यात आली, का तर गणिताच्या मिस म्हणे सुटीत ट्रीपला गेल्या होत्या आणि रेल्वेगाडीत खिडकीपाशी बसून पेपर तपासत होत्या, अचानक वारा आला आणि बरेचसे पेपर उडून गेले. प्रिंन्सिपलची त्यांना खूप बोलणी बसली. मामाकडची सुटीची धमाल सोडून चरफडत मी (आणि सगळेच) परीक्षा द्यायला आले. जोशी मिसला म्हटलं की मला आता काही आठवत नाहीये. त्या म्हणाल्या गणित हा विषय असा आहे की समजलं असलं की आठवावं लागत नाही. मग मात्र मी गणितं चक्क पाठ करते हे त्यांना सांगून टाकलं आणि त्या अवाक झाल्या. दुसर्‍या शाळेच्या एका प्रख्यात सरांकडे ताबडतोब शिकवणी लावा असं त्यांनी थेट आईला भेटून सांगितलं. मला शिकवणी लावणं फारच कमीपणाचं वाटलं पण केवळ त्या म्हणाल्या म्हणून लावली. माझा गणिताचा न्यूनगंड तर कायमचा गेलाच पण दहावीत गणितात केवळ एक मार्क गमावला, गणितावर प्रेम बसलं तेव्हा मला वाटलं याचं श्रेय जोशी मिसचच..

दहावीच्या यशाची त्यांनी दिलेली छोटीशी पार्टी आठवतेय. मला आणि आणि माझ्या एका वर्गमित्रालाच त्यांनी घरी बोलावलं होतं. मला आपण कुणी तरी खास आहोत असं वाटलं. त्यांच्या आतल्या गॅलरीत त्यांनी खुर्च्या मांडल्या होत्या. काचेच्या बशीत खोबरं, कोथिंबीर पेरलेला वाफाळता उपमा, बर्फी, सरबत. वर्गातल्या दोन मुलांसाठी! मला अप्रूप वाटलं. टीपॉयवर टाईम्स ची घडी, घरातल्या काचेच्या कपाटात पुस्तकं रचलेली. सुबक विणकाम केलेल्या कोचावरच्या उशा. स्वच्छ, छान वाटत होतं नजर जाईल तिथे. त्यांच घर मी असच कल्पिलं होतं. त्यांची मुलं शिकायला पुण्याला आणि पती अकाली गेलेले. एकट्या असून सदासतेज, आनंदी. तेव्हाची मध्यमवर्गीयांची काहीशी गबाळी राहणी आणि मिसच्या घराचं नीटनेटकं वेगळेपण याची मनात नोंद झाली. साधेपणातलं सौंदर्य होतं त्या घरात. त्यांनी काहीतरी भेटवस्तू पण दिली होती. पुढे काय करणार याबद्दल त्या आणि तो मित्र बरच काही बोलले ,एरवी सतत बडबडणारी मी मिसकडे नुसती बघत बसले होते. मला त्यांच्यासारखं समाधानी व्हायचंय.. माझ्या घरात असाच पुस्तकांचा एक छानसा कप्पा असेल.. असे काही तरी विचार करत.

मग भेटी कमी होत गेल्या. वडील गेले तेव्हा त्या घरी आल्या. जवळ घेऊन म्हणाल्या ’रडू नकोस, करून दाखव’. त्यांच्याकडे पाहताना वाटलं, यांचे यजमान गेले तेव्हा यांची मुलं माझ्याएवढीच किंवा थोडी लहानच असतील. तरी्ही त्यांच्या डोळ्यात सतत एक प्रसन्न हास्य तेवत असायचं. कुठून येतं ते! पुढे कॉलेजमध्ये रमले, सुट्टीत घरी आले की ठरवायचे मिसला भेटायला जावं. दिवस संपून जायचे, त्यातच कळलं त्या स्वेच्छानिवृत्त होऊन नाशिकला मुलाकडे गेल्या. त्यांच्या घरापाशीच एक मैत्रिण राहायची. तिच्याकडे गेलं की नजर आधी मिसच्या गॅलरीतल्या बंद खिडकीकडे जायची. काहीतरी रिकामं, उदास वाटायचं. आधार तुटल्यासारखं.. आपण त्यांना नियमित का नाही भेटलो असं वाटून अपराधीही वाटायचं. कित्येक वर्षांनी शाळेच्या ग्रुपमधले काही जण भेटले. आता कुणी कुठे, कुणी परदेशात. आम्ही सगळे एकत्र शाळेत गेलो. जोशी मिसची आठवण नेहमीच यायची पण तेव्हा फारच प्रकर्षाने आली. घरी आल्या आल्या बरीच धडपड करून मी त्यांचा नंबर मिळवला. त्यांना फोन केला, मला वाटलं त्या ओळखतील का! पण त्यांनी अगदी लगेच ओळखलं, खूप खूष झाल्या. तोच आवाज, तेच हसणं, मी आता कुठे असते, काय करते विचारलं. नाशिकला आलीस की नक्की घरी ये म्हणाल्या. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं.. मला कितीतरी बोलायचं होतं.पण.. ’तुमची खूप आठवण येते’ इतकं कसंबसं सांगितलं.

त्या भेटल्याच नसत्या तर... आयुष्यात आपल्याला नक्की काय हवं आहे हे तर कधी कळलच नसतं. निवडीचे अनेक प्रसंग आले, मग तो आयुष्याचा जोडीदार असो, व्यवसाय असो, राहण्याचं गाव असो, भोवतालची माणसं असो, वैचारिक भूमिका असो... तेव्हा कामी येणारा ठामपणा मनात रूजला नसता. शब्दांवर प्रेम करण्यातली गंमत कळलीच नसती. पुढे सगळा अंधार दिसत असतानाही there is always a tomorrow ही उमेद मिळाली नसती. मी त्यांना बदल्यात काय दिलं !
त्यांच्या हाताखालून गेलेल्या कित्येक बॅचेसमधल्या शेकडो विद्यार्थ्यांपैकीच मी एक, पण इतक्या वर्षांनी त्यांनी नुसतं नाव सांगताच मला ओळखावं यात मला सारं मिळालं.
- Mohini

हरवले ते गवसले पण ..

त्यादिवशीचीच  गोष्ट ! सकाळी स्नानाला गेले तेव्हा केस पुसतांना इअररिंग्ज ला हलकासा धक्का बसला अन त्याचे लॉक उघडले. मी तेव्हाच काढून ठेवायचे इअररिंग्ज तर कानातच नुसतं मागे सरकवले म्हटलं आधी केस कोरडे करू यात मग आरशात बघून व्यवस्थित  त्याचं लॉक लावू या. झालं!, बाथरूम च्या बाहेर आले आणि पूर्ण विसरून गेले. चेहऱ्याला क्रीम बीम लावलं, केस विंचरले, टॉवेल वॉशिंग मशीन मध्ये टाकला आणि रोजच्यासारखी पूजा करायला देवघराकडे यायला लागले तर तेवढ्यात बेल वाजली म्हणून दार उघडले तर कामवाल्या बाई आलेल्या. आज उशीरच झाला सगळं आटोपायला असा विचार करत मी घाईघाईत पूजा करायला लागले आणि बाई आपल्या  झाडूपोछा करायला लागल्या. माझी आपली ५ मिनिटांची झटपट पूजा लगेच आटोपली अन मी पटापट एकीकडे गॅसवर कुकर चढवून सोफ्यावर पुरवणी वाचत बसले. बाईंचं आपलं कुठे काय झालं वगैरे वगैरे सांगणं सुरूच होतं. मी आपली मधनं मधनं हं हं करत होती. ह्या बाई इतक्यातच मागच्या महिन्यापासून लागलेल्या. त्यांचा नवरा ५,६ वर्षांपूर्वी हार्ट अटॅक ने अचानकच गेला त्यामुळे त्यांच्यावर हे काम करण्याची वेळ आलेली. चांगलं करायच्या काम. फक्त आल्यापासून त्यांची काहीतरी टकळी सुरु असायची. काही बाही सांगत बसायच्या. कधीकधी त्याचा त्रास व्हायचा एवढंच. अशा वेळी मग मी पेपर वाचत बसायची. त्यांच्या 2,3 वाक्यांना माझा काही रिस्पॉन्स नाही आला कि मग त्यांनाही लक्षात येत असावे की आता थोडं चूप राहावं म्हणून. आजही तसेच झाले मी पेपर वाचण्यात गुंग झालेली बघून बाईंनी आपली बडबड आवरती घेत कामाकडे लक्ष द्यायला सुरवात केली अन पटापट झाडूपोछा आटोपला नंतर भांडे घासले  मशीन मधले कपडे वाळत टाकले अन "येते ताई !" म्हणून लगोलग गेल्याही. नंतर मी भाजी काय करायची ह्या यक्षप्रश्नात फ्रिज च दार उघडून खालच्या भाज्यांच्या ट्रे ला थोडंसं पुढे करून ओणवी होऊन बघू लागली. फ्लॉवर 2,3 दिवसांपासून पडून होता म्हणून "चला, आज ह्याचा नंबर!" असं मनाशीच म्हणत फ्लॉवर बाहेर काढला अन भाजी करायला घेतली. बाकीचेही हातासरशी आटोपून घेतले अन घरात एकटीच होती मग कशाला उगाच रेंगाळत रहायचं म्हणत जेवण देखील उरकले. हुश्श ! एकदाचं जेवण झालं की मोठ्ठ काम झाल्यासारखं वाटतं हे बाकी खरंच! आता मी माझे उद्योग करायला मोकळी असा विचार करतच होती तर एकदम कानातल्या रिंग ची आठवण झाली अन त्याचं लॉक बरोबर करते म्हणत कानाला हात लावला तर काय? कानात काहीच नाही! बापरे! एकदम धस्स झालं! कुठे पडली असेल बाई रिंग! एकदम चक्रावल्या सारखं झालं. मी बाथरूम मधून बाहेर निघतांना मला पक्के आठवत होते रिंग कानातच होती. घरात नुकत्याच फक्त बाईच येऊन गेलेल्या. मी बाथरूम मधून  बाहेर आल्यापासून काय काय केले ते आठवायला लागली. वाटलं केस झटकले, विंचरले तेव्हा धक्का लागून रिंग पडली असावी. ड्रेसिंग टेबल, मागची गॅलरी, वॉशिंग मशीनच्या आजूबाजूला सगळीकडे चारचारदा बघितले. पण कुठ्ठे नाही सापडले. मग झाडणी घेतली हातात अन पलंगाच्या मागे, कपाट, फ्रिज, सोफा सगळ्यांच्या खाली फिरवून झाली. तरीही नाही ! आता बाकी धीर सुटला. बाईशिवाय कुणीच आलं नव्हतं. नक्की तिनेच मारली असणार. सोन्याची रिंग सापडल्यावर ती कशाला सोडतेय? महागाई कोण वाढलीय. तिला कसला मोह आवरतोय? आज साडेतीन चार हजाराची तरी नक्कीच असणार. माझंच चुकतं, ती झाडते तेव्हा थोडं लक्ष ठेवायला हवं मी. नविन बाई आहे, आपण थोडं सतर्क रहायला हवं. आता काय, बसल्या जागी केवढं नुकसान झालं? अन तेव्हाच्या तेव्हा रिंगचं लॉक पक्क करायला काय झालं होतं मला! वगैरे वगैरे डोक्यात नुसतं काहूर सुरु! असं काही माझ्याच हलगर्जीपणाने नुकसान झालं की मला मोठ्ठ वाईट वाटतं. काही काही जणांना कसं पटकन सोडून देता येतं, जाऊ द्या झालं ते झालं म्हणून. पण मला नाही जमत तसं.
त्यामुळे पुन्हा एकदा सगळं घर बारकाईने झाडून काढलं. कुठ्ठे नाही! नक्की बाईच असणार! आता अगदी कन्फर्मच झालं. नाहीतर असं काय जादूसारखं घरातून गायब थोडीच  होणार होतं कानातलं? आपण मेलं किती चांगलं वागतो तिच्याशी. आत्ता मागच्याच आठवड्यात कपाट आवरलं तेव्हा 2,3 अगदी चांगल्या साड्या काढून दिल्यात. छोटूचे 5,6 टी शर्ट्सही दिलेत, चपला दिल्यात. चार दिवसांपूर्वीच 500 रुपये मागितल्याबरोबर तेही लगेच दिलेत. सतत काहीना काही देणं सुरूच असतं आपलं! काही जाणीव नसते ह्या लोकांना अन आपण कित्तीही चांगलं वागा काही किंमत नसते त्यांना! माझं कश्शात मन लागेना. मधूनच पुन्हा पुन्हा इकडे बघ, तिकडे बघ सुरूच होतं. हे आल्यावर पून्हा सगळा पाढा वाचून झाला. 
तरी हे म्हणालेच, "घरातच पडलीय ना?  मग सापडेल नक्की इकडेतिकडे कुठेतरी!" मी परत धुसफुसली  "सगळं घर धुंडाळून झालंय चारचारदा! आता कुष्णार्पण म्हणायचं अन चूप बसायचं झालं!" एव्हाना संध्याकाळ झाली होती.  मी देवासमोर दिवा लावून रामरक्षा म्हटली. रामरक्षा संपत नाही तोच हे म्हणाले "आज संध्याकाळी मस्त झणझणीत पिठलं अन HMT कर. HMT म्हणजे दुसरं तिसरं काही नसून "हिरव्या मिरच्यांचा ठेचा" बरं का ! आमचा खास शॉर्ट फॉर्म!  "ठीकाय!" म्हणत मी मिरच्या काढायला फ्रिज उघडला अन खालचा ट्रे थोडा पुढे ओढून चार मिरच्या काढल्या आणि परत ट्रे मागे सरकवायला गेली तर ट्यूबलाइट च्या प्रकाशात एकदम काहीतरी लक्कन चमकलं! बघते तर काय, सकाळपासून जी शोधत होती ती माझी कानातली रिंग!  पटकन उचलली अन देवाला कृतज्ञतेने हात जोडले! म्हटलं "देवा, तुला बरोब्बर काळजी असते सगळ्यांची. तुझी कृपा अशीच राहू दे बाबा नेहमीसाठी". दुसऱ्याच क्षणी एकदम गेले 6,7 तास मी बाईंबद्दल काय काय विचार करत होती ते सगळं आठवून स्वतःची इतकी लाज वाटली की  विचारू नका. वाटलं किती सहज पणे आपण तिच्यावर संशय घेऊन मोकळे झालो. ती बिचारी गरीब, अशिक्षित, गरजू म्हणूनच ना! खुप अपराधी वाटलं. देवाची मनापासून माफी मागितली अन तेव्हापासून कानाला खडा लावला की परत असा कुणावरही बिनबुडाचा संशय कध्धी घेणार नाही. चांगलाच धडा मिळाला! दुसऱ्या दिवशी बाई आल्याआल्या मस्त आलं टाकून वाफाळता चहा तिच्या समोर ठेवला (पापाचं कणभर परिमार्जन म्हणा हवं तर..!) अन म्हटलं, "घ्या! थंडीचा आधी चहा घ्या गरम गरम अन मग करा काम!" गरमागरम चहाचा कप बघताच एकदमच  कळी खुलली तिची. लगेच म्हणाली "ताई, आज गॅलरी धून टाकते! लई खराब झालीया!" अन लगोलग खराटा घेऊन गॅलरी धुवायला गेलीसुद्धा! मला अजूनच कानकोंडं झालं. किती सहजपणे ती त्या घोटभर चहाच्या बदल्यात जास्तीचं काम करायला गेली लगेचच. अन आपण..? वाटलं हरवले ते गवसले तर खरंच पण सोबतच एक धडा शिकवून गेले हे पण महत्वाचे! नाही का ?

मधुमती वऱ्हाडपांडे
अकोला 

स्टार्टिंग ट्रबल

ड्रायविंग शिकत असतानाचा अद्भूतरम्य अनुभव म्हणजे पहिला गिअर टाकून क्लच सोडणे आणि अॅक्सिलेटर देणे।ट्रेनर ड्रायव्हरने(त्याच्या भाषेत डायवेर)खूप व्यवस्थित सूचना दिल्या ,मग घोकंपट्टी मग जागच्या जागी रिहर्सल आणि मग गेट सेटगो !परिणाम?खटकन गाड़ी बंद पडली।सूचनांचा पुन्हा भडिमार, परत प्रॅक्टीस ,परत गेटसेटगो!परिणाम?पुन्हा गाडी बंद। डायवेर सरांची थोडी सूचनांची रिवीजन। " क्लच एकदम नाय सोडायचा ,"......एक नवीन सूचना।ट्राय....।परिणाम?गाडी बंद। " आता थोडा अॅक्सिलेटर ज्यादा द्यायचा ",

पुन्हा एक नवीन सूचना।ट्राय......।आणि गाडी बंद। शेवटी दार उघडून बाहेर पडले।हाताची घड़ी  घालून उभी राहिले।या.......या य:कश्चित गाडीमुळे एवढा अपमान?तो ही जेमतेम ड्रायविंग स्कूल चालवणाऱ्या डायवेरपुढे?माझ्या डोळ्यात कढत पाणी जमा झालं।श्वास वाढला।थोड़ी थरथरले।आणि म्हणाले " मला नाही शिकायचं,नाही चालवायची गाडी"डायवेर शांतपणे म्हणाला "मग मला कशाला बोलावलं?"त्याच्या या थंड प्रतिक्रियेमुळे परत रागारागाने गाडीत बसून पहिला गिअर टाकला आणि क्लच हळू सोडत अॅक्सिलेटर दिला।गाड़ी सुरु झाली।डायवेर गालातल्या गालात हसला।आणि "अरेच्या!जमलं का?"या धक्क्यातून सावरायला मला वेळच लागला।
       आता सराईतासारखी गर्दीतून नि गल्ली बोळातून ग़ाड़ी चालवते तेव्हा हा सगळा प्रसंगा आठवून हसू येतं।पण मध्येच मनात प्रश्न येतो की "हीच गोष्ट पोहणं शिकताना नाही झाली का?" एकतर पोहता आल्याशिवाय पाण्यात पाय ठेवणार नाही असा खाक्या।त्यात त्या पोहण्याच्या टँकमधलं सळसळतं हलतं खोलपाणी  आणि त्याखालच्या निळ्याशार टाईल्स पाहिल्या की अंगावर सर्रकन  काटा यायचा।यात आपण  बुडून मरणार याची दोनशे टक्के खात्रीच असायची।पण मग पाण्यात पाय बुडवून काठावर बसण्यापासून सुरुवात झाली।हळूहळू कमी खोल टँकमध्ये उभं राहणं आणि केव्हाही पाय टेकून उभं राहता येईल एवढ़याच इवल्याशा पाण्यात हातपाय मारणं सुरु केलं।आणि आलं की राव हळूहळू पोहता।
मग मोठया टॅकमध्येही आलं।नि मग सहजता आली।मी बुडून जाणार होते त्याऐवजी भीती बुडून गेली।

पुढे मग आणखी नव्या क्षेत्रात आणखी एक नवा प्रयोग करून पाहिला।शास्त्रीय नृत्य!सुरुवातीला नृत्यवर्गातल्या मुली सराईतासारख्या बोटांवर ताल मात्रा मोजायच्या।पटपट पायाने तेच बोल उमटवायच्या।तोडे म्हणायच्या।त्रिताल,एकताल,दादरा,रुपक,रासताल,झपताल असं सुरु असायचं।प्रत्येक तालाच्या मात्रांची संख्या वेगळी।टाळी,काल वेगळ्या मात्रेवर ।पायाचा ठेका दरवेळी निराळा।"ये तो पक्का अपने बस की बात नही बॉस" ठरवून टाकलं।नुसतं बसून पाहण्याचा कंटाळा आला तेव्हा पहिल्यांदा उठले।नाही येणार त्याच क्षणी क्लास सोडून टाकण्याचा निश्चय करून ठेवला।नि चुकतमाकत सुरुवात झाली।हळूहळू जमायला लागलं आणि मजा यायला लागली।आणि मग जमलंच।

आता वारंवार या गोष्टी घडून कळायला लागलं की रस घेऊन प्रयत्न करून पाहिले तर जमतं काही काही।अगदी प्रत्येक गोष्टीत लता किंवा सचिन बनण्याचा अट्टाहास थोडीच असतो।करून पाहिलं,आवडलं,जमलं,हा सगळा मजेचा मामलाही असतो।अर्थात सुरुवातीला थोडं जड़ जातंच।अजून तर सफाईदार इंग्रजी बोलणं,फोटोग्राफी,चित्रकला गाता येणं अशी नवनवी क्षेत्रं पादाक्रांत करायची आहेत!!!!!!! "कशाला पण?"हा घरच्यांचा (रास्त )प्रश्न सराईतासारखा कानाआड करायला शिकलेच आहे।एक नक्की की या सगळ्याच्या सुरुवातीला धडपडायला होतंच ।आणि डायवेर सायबांचे शब्द आठवतात की "स्टार्टिंग ट्रबल तो आसतोच ना म्याडम!!"।असू दे।तरी गिअर टाकायचाच।द्यायचा अॅक्सिलेटर।स्टार्टिंग ट्रबल म्हणणारेच मग चलती का नाम गाड़ी पण म्हणू लागतातच हो!!

एक पाऊल धाडसाच !

माझ्या आतला आवाज मला सांगत असतो की स्त्री मग ती आई,बहीण,काकू,आत्त्या ,सासु, मुलगी जी एक स्वतंत्र व्यक्ती आहे पण तिला आपणच कधी पूर्णत्व बहाल केलं नाही तिची ओळख वडिलांच्या नावावर तर कधी नवर्याच्या नावावर करुन दिली जाते .बघितल आहे कधी नवरा बायकोच नांव लावताना !.....जर ते शिव-शक्ती स्वरुप आहे असं आपण मानतो तर एकमेकांशिवाय पूर्णत्व येऊच शकणार नाही आणि एकमेकांमुळे पूर्णत्व येण्यासाठी फक्त बायकोने नवर्याचेच नाव लावावे असे कां? नवरा पण बायकोचे नाव लावूच शकतो. असो इथे मुद्दा मुळात आहे तो समरुपतेचा .समसमान मानण्याचा. भावनिकदृष्ट्या सतत होणारे खच्चीकरण रोखण्याचा.मी असे कां म्हणते, तर आज स्त्री बर्यापैकी स्वतंत्र  आहे असे आपणाला वरवर दिसते आहे तर मग तिला कशाकशा पद्धतीने जखडू शकतो याचे विविध फंडे पुरुषी मानसिकतेतून डोकावताना दिसतात.त्याचे प्रत्यंतर आपल्याला वृत्तपत्रातील ! बातम्यांमधून सहजच निदर्शनास येतात किंवा सभोवताली अगदी आजूबाजूला घडणार्या घटनांमधूनसुद्धा दिसून येतात. परवा  आम्ही सगळ्या मैत्रिणी "थप्पड" सिनेमा बघून आलो आणि तेव्हापासुन डोक्यात विचारांनी जाळ विणायला सुरुवात केली.
पहिली प्रतिक्रिया  , अरे इतकं कशाला ताणलं तिने एकच तर थप्पड खाल्ली त्याचा किती इशु केला तिने .इतका चांगला संसार कां मोडला तिने जरा अतीच वागली असं  नाही वाटत कां? ..........आणि इथेच माझे विचारचक्र सुरु झाले .पहिलेतर सहन करणं म्हणजे ती खरी उत्तम गृहिणी हा मुद्दाच डोक्यात गेला. जी बाई घरादारासाठी स्वतःच अस्तित्व गुंडाळून घरच्यांसाठी समर्पित होते .तिला मानसन्मानाची काय गरज असं गृहीतक डोक्यात ठेवणारी पुरुषी मानसिकता सिनेमातून स्पष्टपणे दिग्दर्शकाने मांडली आहे .ते दाखवताना अगदी सकाळपासुनचे तीचे ठराविक वेळापत्रक अर्थात कामाचे हे इतके छान अधोरेखित केले की सुन असावी किंवा बायको असावी तर अशी असं मनात येऊन जातं  .                                          नवर्याच्या प्रमोशन पार्टीत सगळे आनंदात सेलिब्रेट करत असताना अचानक त्याला फोनवरुन कळतं की आपण प्रोजेक्ट हेड नसून कुणाच्यातरी हाताखाली काम करणार आहोत त्याक्षणी दुय्यमपणाची भावना त्याला असह्य होते तो बाॕसच्या अंगावर जातो त्याला आवरताना बायको मध्ये पडते  आणि रागाच्या भरात सनकन तिच्या गालावर पडते आणि खर्या अर्थाने तेव्हा ती शुद्धीवर येते.तिच्या मनात चाललेला कल्लोळ ती न बोलताही प्रेक्षकांपर्यंत पोहचवते ही तिच्यातल्या कलाकाराची जमेची बाजू सहजच आपणही त्या पात्राशी स्वतःला जोडत असतो आणि तिच्या भावनांची होणारी घुसमट ही आपलीच होऊन जाते. सुरवातिला म्हंटलं की एका थप्पडने इतक काय आभाळ कोसळल्यासारखी ही वागते पण तिथेच खरा मुद्दा आहे" म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो!"आणि ती झालेल्या अन्यायाला वाचा फोडताना सगळ्यांच्या प्रश्नांना नेटाने उत्तरं देते.आई वडिलांकडे घर सोडून आली असुनही अचानक आजारी पडलेल्या सासुच्या सेवेत कसुर करत नाही. सिनेमात काही पात्र अधोरेखीत केली तीपण खूप काही सांगून जातात. त्यात तिच्याघरची कामवाली सुनिता,तिची ए ग्रेड लाॕयर,तिची भावजय, आई, सासु ह्या प्रत्येक व्यक्तीरेखेतून त्यांची होणारी मानसिक,भावनिक कुचंबना दाखविली जिच्याकडे आपण रोजच्या दैनंदिन जीवनात हे अस घडतच असतं त्यात काय एवढं असं म्हणून सोडून देतो.पण स्त्रीने स्वतंत्र व्यक्ती म्हणून समाजात मान्यता मिळवायची पुरुषी मानसिकतेला खतपाणी न घालता त्याला शिव-शक्ती संकल्पना स्पष्ट कळण्यासाठी मला वाटतं हा सिनेमा खूप काही सांगून जातो.
सुरवातीला संथ वाटणारा हा सिनेमा मध्यंतरानंतर चांगलीच पकड घेतो .मला स्वतःला एका महत्त्वपूर्ण विषयाला दिग्दर्शकाने हात घातल्याबद्दल त्याला धन्यवाद द्यावेसे वाटतात. सगळ्या पात्रांचे स्थान त्या त्या भुमिकेत चपखल होते काही नवोदित होते पण तस कुठेही जाणवलं नाही आणाखी एक आणि महत्त्वाचे सिनेमात कुठेही गाणि कुचकली नाहीत या धाडसाबद्दल  विशेष कौतुक नाहीतर ॲटमसाँगच्या नावाखाली कथेत गरज नसताना जो काही तमाशा पहावा लागतो तो टाळला आणि सिनेमाचा कथास्वरुप आस्वाद घेता आला ही आवडलेली बाजू. अशा सिनेमांना प्रेक्षकांनीच प्रोत्साहीत करायला हवं नाही कां!.....
@अर्चना संजय मुळ्ये

जीव गुंतला गुंतला

ऋतुचक्र कसं नियमित फिरत असतं, नाही का? पावसाळा, हिवाळा नि उन्हाळा! प्रत्येकाचं आपलं असं वैशिष्ट्य! सजीवांसाठी आवश्यक! त्या त्या ऋतुमानानुसार आहार नि विहार ठरलेले. प्रत्येक ऋतुंच्या आपल्या अशा लोककथा विविध भाषेत आहेत. कुठे सुर्याची प्रेयसी आहे तर कुठे धरणी मातेची लेक आहे. कुठे प्रतारणेनं दु:खी आहे तर कुठे आनंदानं अंगोपांगी मोहरलेली आहे. माणसानं स्वत:चं जीवन सृष्टीत गुंफून विविध लोककथा निर्माण केल्या. जगाच्या पाठीवर जिथे जिथे त्याचं अस्तित्व आहे तिथे तिथे त्या कथा रुजल्या. बहरल्या, फोफावल्या.
हे सगळं आज का आठवलं? तर आता पुन्हा एकदा ऋतू कुस पालटतो आहे...जीर्णता झटकून नवी कोवळीकता धारण करतो आहे. मानवी आयुष्यात पुन्हा एकदा एका ऋतुची भर पडते आहे. अनुभवाची वाढ होते आहे. मात्र सृष्टीत आणि त्याच्यात एक फरक आहे, जुनं झटकून नव्यानं उभं राहणं त्याला सहज जमत नाही. फांदीफांदीवर लगडलेली पानं जास्तं शोषण करतात, अधिक पाणी पितात म्हणून सोयीनुसार झाड त्यांचा त्याग करू शकतं. पण माणसाचं तसं नाही. त्याला जुनं काहीच टाकणं जमत नाही. ते घट्ट पकडून ठेवायचा त्याचा आटोकाट प्रयत्न असतो. हल्ली काय ती...'मिलिनिझियम' का काय ती थिअरी आली आहे. पण नाॅस्टेल्जीयात रमणा-या आपल्या मनाला ते काढून टाकणं अवघड जातं. आता हेच बघा की उन्हाळ्याची चाहूल लागली आणि वाळवणाच्या आठवणी पिंगा घालू लागल्या. कुरडया, सांडगे, भरल्या मिरच्या, पापड, वड्या, खारोड्या, सरगुंडे, लोणचं...असे एक एक पदार्थ आठवू लागले. खरं तर माझ्या पिढीनं ते कधी केले सुद्धा नाहीत. पण आईच्या पिढीला ते सहजतेनं करताना मात्र बघितले आहे. चार-पाचजणी मिळून शेवयाचा उंडा या हातावरुन त्या हातावर करत अशा काही लांबवत जायच्या की त्याचे वीस-पंचवीस पदर एका झटक्यात काडीवर टाकले जायचे. लहानपणी प्रयत्न करुन पाहिला पण ते गणित कधी जमलंच नाही. एकतर तो हातातला गोळा कधी लांबायचाच नाही आणि दुसरं म्हणजे कुठे जाड, कुठे बारिक असे एखादं दोन पदर मोठ्या कष्टाने निघायचे. त्यामुळे तो प्रयोग करून पाहण्याला बहुदा मज्जावच केल्या जायचा. कुरडयांचंही तसंच...चिक खायला आवडायचा. सोरा दाबून एकसारखी वेटोळी मात्र जमायचीच नाही. पापडाच्या लाट्यांचा सुगंध भरभरून घ्यायचा न् तेलात बुडवून
गपकन् तोंडात सरकवायचा, मस्त जमायचं. पण तेच पापड लाटायला बसवलं की गोल वगळता सगळे आकार जमायचे. मग काय? त्यातूनही सुट्टी मिळायची. मूगवड्याचा घाट बहुदा सकाळीच असायचा. पाट्यावर वाटणा-या आईकडून ताटलीत गोळा घ्यायचा नि अंगणात एकसारख्या वड्या घालणा-या ताईपर्यंत नेऊन द्यायचा. बस्स इतकेच काम! मूगवड्या तर नाही पण खारोड्या मात्र कुर्रम् कुर्रम् खायला फार आवडायच्या. गाजर, पोहे, टमाटर, तीळ, मिरचीचे एकत्र गोळे आई वाळवायची तेंव्हा त्याची नवलाई नव्हती वाटत पण गरमागरम खिचडी सोबत भाजलेला पापड, तळलेली मिरची नि सांडग्यांचा कुस्करा...अहाहा... अशी काही त्याची चव असायची की बस्स! 
अशा एक ना अनेक आठवणींमध्ये अडकायला आपल्याला आवडतं. उन्हाळ्यातलं सायंकाळचं सपासप अंगणात पाणी मारणं, एका रांगेत खाटा टाकणं. दिवसभर तापलेली अंथरुणं ठंड व्हावीत म्हणून पसरवून ठेवणं. डास चावू नयेत म्हणून मच्छरदाणी लावणं, 'चल रे घोड्या' करत उशा दामटवणं, अंगणातली अंगतपंगत, भूताच्या गोष्टी नि वाटणारी भिंती पळवून लावण्यासाठी रामरक्षा...अशा कितीतरी आठवणी या ऋतुसह हलकेच मनाला स्पर्शून जातात. कैरीच्या गरात बुडवून आईस्क्रीम पाॅटसह गरगरगर फिरवत ठेवतात. तेच चाक कधी मोठं रुप धारण करुन बैलगाडीत बसवून आतेभावाच्या शेतातील हौदात मनसोक्त डुंबवून वारीच्या मारोती पर्यंत कुटुंबसहल घडवून आणतं. कधी आत्याच्या आमराईतील घनगर्द सावलीतून मावशीच्या मिणमिणत्या प्रकाशातील मायेच्या झोपडीतून आजोळच्या दगडी हवेलीची झुळूक लपेटवून जातं. 
ऋतू बदलतो. आठवणींचा कल्लोळ उठतो. मन आक्रंदतं...कुठे गेले ते दिवस? कुठे गेली ती माणसं? निसर्गाच्या सान्निध्यात, टाकून देणं हा निसर्ग धर्म आम्हाला का साधत नाही? का अजूनही माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये, पाखरांमध्ये, वस्तूंमध्ये जीव गुंततो? 'जीव गुंतला'चा आकांत उठतो? समांतर पातळीवर भूत नि वर्तमान जगणं कसं साध्य होतं? मला वाटतं, हा व्यवहार ज्याला जमतो तो शहाणा ठरतो नि त्यात अडकत न् अडकत जातो तो भावनाप्रधान 'वेडा' ठरतो.
मी विचार करते आहे, गुंतते आहे...
मी....वेडी...की....???
सीमा शेटे (रोठे), अकोला

(फोटो सौजन्य : गुगल)

एक थप्पड

" ऑखो मे जल रहा है पर
        बुझता नहीं धुआ
        उठता तो है घटा सा
        बरसता नहीं धुआ"  
गुलजार साहेबांच्या या ओळी म्हणजे माणसाच्या मनातील विचारांचा कल्लोळ,मनाची घालमेल, उलाघाल ह्या सर्व भावनांचं प्रतिबिंबच आहे.जिथे मन आहे तिथे विचार आहेत आणि जिथे विचार आहेत तिथे वैचारिक गुंताही आलाच, ओघाने. ; पण हा गुंता सुटायला हवा अशी इच्छा असणारे त्यातून बाहेर पडण्यासाठी विवेकाचा आधार घेतात. सारासार विचार करून निर्णय घेणे किंवा व्यावहारिक पातळीवर सर्व बाजूनी विचार करून निर्णय घेणे ज्याला जमते तो ह्या गुंत्यातून बाहेर पडण्यात बऱ्याच अंशी यशस्वी होऊ शकतो.
 'आत्मभान', 'आत्मसन्मान', 'सेल्फ रिस्पेक्ट' ----अत्यंत वजनदार शब्द. पेलायला जितके अवघड, पचवायला त्याहीपेक्षा कठीण. पचवायला गेलं तर आयुष्यच पणाला लागतं, विषमय होऊन जातं. त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न केला तर आयुष्य सावरूही शकतं.
      नुकताच "थप्पड" चित्रपट पहाण्याचा योग आला. विशेष म्हणजे सिनेमा  पहाण्याच्या एक दिवस अगोदर ह्या नावाचा सिनेमा आहे ही देखील कल्पना नव्हती. पण मैत्रिणींच्या ग्रुप वर चर्चा झाली काय, लगेच आम्ही 7/8 जणी ठरवून मोकळे झालो काय आणि "थप्पड" चा अनुभव घेतला काय ------
    खरं सांगायचं तर हे असले नाजूक, संवेदनशील विषय फक्त कथा- कादंबरी, नाटक ,सिनेमे ह्यात लिहिण्यासाठी, दाखवण्यासाठी असलेले, "पुरस्कार प्राप्त" विषय आहेत असे माझे प्रांजळ मत आहे. कारण आशा विषयांमध्ये भावनिक गुंता जास्त दाखवला जातो, मनाची कुतर ओढ, त्यातून निघण्याची धडपड आणि शेवटी मनाच्याच कोपऱ्यातून निघालेला आवाज ऐकण्याची तयारी----विषय असे भावनिक गुंत्याभवती फिरायला लागले की श्रोत्यांना चट्कन अपील होतात; पण वास्तवात पहाता, अशा केसेस मध्ये व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केल्यास प्रत्यक्ष आयुष्य जगण्यासाठी ते जास्त सोयीस्कर ठरते. अर्थात, "आतल्या आवाजाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून." 
      एक अनाहूत क्षण--अचानक उद्भवलेला--मनाच्या अत्यंत दोलायमान स्थितीत, फ्रस्टेशनच्या  मनःस्थितीत असलेल्या नवऱ्याचा तोल ढळू नये,त्याचा संताप विकोपाला जाऊ नये म्हणून त्याची पत्नी त्याला आवरू पहाते. त्याला शांत करण्याच्या हेतूने त्याला अडवायला मध्ये येते आणि----संतापाच्या अग्रीम टोकावर विराजमान असलेला नवरा, खाडकन  तिच्या थोबाडीत मारतो, त्याच्या स्वताच्याही नकळत."थप्पड" ---एक जोरदार थप्पड, अनपेक्षितपणे बसलेली, तेही काहीही चूक नसताना--भर पार्टीत--सर्व जमलेल्या लोकांच्या देखत----निश्चितपणे एका पत्नीसाठी, एका स्त्रीसाठी अत्यंत लाजिरवाणी, ओशाळवाणी आणि अपमानास्पद गोष्ट. पत्नी ही एकच व्यक्ती अशी असते नवऱ्यासाठी, जी त्याला हक्काची वाटते, जिला नंतर चुचकारून, गोडीगुलाबीने  मनवता येऊ शकतं, अगदी सहज अशी तमाम नवरेशाहीला पूर्ण खात्री असते,आणि ते वास्तव आहे. स्त्रियांना  "समजून घेण्याची" सवय झालेली असते. म्हणूनच कदाचित अशा "थपडा" मारल्या जातात, तिला परस्पर गृहीत धरूनच. मग त्या शाब्दिक असोत वा "डायरेक्ट". आणि हे गृहीत धरणच बायकांना नको असतं, नको होतं,त्यांच्या अस्मितेला धक्का पोचतो,त्यांचं आत्मभान जागृत होतं आणि त्या स्वतःविषयी वेगळ्याच दृष्टिकोनातून विचार करायला लागतात---अशी वेळ प्रत्येक स्त्री च्या आयुष्यात कधी ना कधी येतेच.अशा  परिस्थितीत जे निर्णय घेतले जातात, त्याने कधी कधी संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलून जाते. एकच नव्हे तर एकाच वेळी त्यांच्याशी जोडली गेलेली अनेक आयुष्य विस्कळीत होऊन जातात. पार कोलमडून पडतात. म्हणून हाच खरा कसोटीचा क्षण असतो. माणसाची सारासार विवेकबुद्धी त्याला कोणता निर्णय घयायला भाग पाडते ह्यावर पुढील भविष्याचे निर्णय ठरत असतात. त्या व्यक्तीच्या ही आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या नात्यांचेही. मी ह्या ठिकाणी मुद्दामच "माणूस" हा शब्द वापरलाय कारण आशा प्रकारच्या अनाहूत चुका फक्त पुरुषांच्या हातूनच होतात असे नाही तर स्त्रियांच्याही हातून संतापाच्या, भावनेच्या भरात  घडतात चुका आणि त्यातूनच टोकाचे निर्णय घेतले जातात.अशा वेळी शांत राहून एकमेकांना समजून घेणं,त्यातून योग्य तो मार्ग काढणं ही दोघांचीही जबाबदारी  असते. 
     थप्पड सिनेमाविषयी बोलूया. मला काही समीक्षा वगैरे करायची नाहीये त्यामुळे कथा, पटकथा, दिग्दर्शन, संवाद ह्या बद्दल न बोलता जे मनात विचार आले सिनेमा पाहून त्याविषयी च बोलते. (लिहिते)  
    पतीने पत्नीच्या अंगावर हात टाकणे ह्या गोष्टीचे समर्थन मी स्वतः कधीच करत नाही, करणारही नाही.पण----
पण ह्या सिनेमाविषयी बोलायचे झाले तर काही मुद्दे मांडावेसे वाटतात.1) --नायिकेचा नवरा हा काही सराईत "मारकुट्टया" नवरा नाहीये, किंवा त्याने हेतुपुरस्सर तिच्या अंगावर हात टाकला नाहीये. तो सतत तिला मारहाण करतो, तिचा छळ करतो, डॉमिनेट करतो, तिला घरात दुय्यम वागणूक दिली जाते, असे काहीही दाखवले नाहीये. मग तोल गेलेल्या मनःस्थितीत  झालेल्या चुकीला कालांतराने का होईना माफी का मिळू नये? बरं माफी तरी कुणाला? आपल्या जवळच्याच व्यक्तीला ना? रस्त्याने जाताना कुणी  जाणून बुजून धक्का दिला, वेडे वाकडे बोललं तर नाईलाजाने दुर्लक्ष करतोच की आपण. मग ही तर आपलीच माणसे,सतत आपल्या अवतीभवती असणारी,  आपल्यासाठी धडपडणारी, आपल्यासाठी जगणारी---- आपली मुलं, जी आपल्या काळजाचा तुकडा असतात, ज्यांना जिवापलीकडे जपतो आपण, ती देखील मोठी झाल्यावर आपल्याला कधी तोडून बोलतात, अपमानास्पद वागणूक देतात, मन दुखावले जाईल असे वागतात, त्याना दूर लोटू शकतो आपण? त्यांच्यावर प्रेम करणे सोडून देतो? मग नवरा- बायकोच्याच नात्यात हा इतका "इगो" का? त्याला कितीही गोंडस नावे दिलीत तरी "इगोच" असतो तो शेवटी. आणि मुख्य म्हणजे एकदा  चूक झाली तर आधीच्या वागण्याचे सगळे संदर्भच बदलून जातात लगेच? त्याने/तिने त्याआधी केलेले भरभरून प्रेम, घेतलेली काळजी ह्याला काहीच अर्थ उरत नाही?  एका "थप्पड" ने संपतं सगळं? मन, भावना थिजतात लगेच, आतल्याआत?  मग पुढील आयुष्य तरी कुठल्या भावनेवर जगणार?
  2)---नवऱ्याकडून अपमान झालेल्या स्त्रीचा आत्मसन्मान एका थपडेने नष्ट होत असेल तर बाहेरच्या जगाकडून, समाजाकडून तरी तिला "त्या" सन्मानाची अपेक्षा म्हणण्यापेक्षा   विश्वास असतो का?
एक "घटस्फोटित" किंवा समाजाच्या दृष्टीने "नवऱ्याचे घर सोडून आलेली बाई" असा शिक्का बसलेल्या बाईला समाज तरी कितपत स्वीकारतो? किती रिस्पेक्ट देतो? बाहेरच्या लोकांचे जाऊ देऊ एकवेळ; पण घरातलीच अगदी जवळची  समजली जाणारी नातलग मंडळीही वाट्टेल तसे ताशेरे ओढायला कमी करत नाही. आई वडील ह्यांना काळजाचा तुकडा म्हणून संभाळावेच लागते, समजून घयावेच लागते, पण भाऊ भावजय, दिर, जावा सगळेच समजून नाही घेऊ शकत. कटू असले तरी वास्तव आहे ते. समाजाची मानसिकता इतक्या वर्षात बदलू शकलेलो नाही आहोत आपण, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत. त्यात चूकही आपलीच आहे, अर्थात. लहानपणापासून मनावर तेच बिंबवले जाते, पुरुष प्रधान संस्कृतीतील पुरुषी वरचढ पणाआणि स्त्रियांना कायम नमते घ्ययची लावलेली सवय.   ह्या सिनेमात एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते, की नवरा जर आपली चूक मनापासून कबूल करत असेल, तिचे त्याच्या जीवनातील स्थान, महत्व मान्य करून भविष्यात अशी चूक न होण्याची ग्वाही देत असेल तर ---अर्थात सरेंडर व्हायला तयार असेल तर बायकोनेही फार ताणून धरू नये.
3)- -अजून एक महत्वाचे, ते म्हणजे घरातल्या भानगडी घराबाहेर गेल्या विशेषतः नवरा बायकोमधले वाद बाहेर गेले तर त्यांच्या नात्याची कशी चिरफाड होते ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कोर्ट, वकील, वकिली सल्ले आणि डावपेच.. व्यक्तीगत भांडणे, हेवेदावे, द्वेष,वैमनस्य ह्याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले की आयुष्याचा खेळखंडोबा व्हायला वेळ लागत नाही. शेवटी कोर्टाचे काम दोन्ही बाजू ऐकून निकाल देणे, वकिलांचे काम, स्वतःची केस स्ट्रॉंग करण्यासाठी प्रतिपक्षावर वाट्टेल तसे आरोप ठोकून केस जिंकण्याचा प्रयत्न करणे. त्यांना कुणाच्याही मानसिक अवस्थेशी, अंतरंगातील आंदोलनाशी काहीही देणं घेणं नसतं. मग अशा वेळी आपल्या आयुष्यचा गुंता आपणच सोडवणे केव्हाही  योग्य नाही का? आपल्या आयुष्याचे निर्णय इतरांवर सोपवले की त्याचा विचका झालाच म्हणून समजायला हरकत नाही. सिनेमात गोस्ट जरी शेवटी कोटात जात नाही तरी ज्या मनस्तापाला तोंड द्यायचे ते द्यावेच लागते. 
4)-- स्वाभाविकपणे प्रेक्षक जो विचार करू शकतात तो वेगळेपण जपणाऱ्या दिग्दर्शकांना मान्य नसतो त्यामुळे अगदीच वेगळा, अपेक्षे पेक्ष्या वेगळाच शेवट दाखवणे हे काही दिग्दर्शकाचे उद्दिष्ट असते . चित्रपट समीक्षकांसाठी देखील असे विषय आणि असे "शेवट" भारी ठरतात. असो. नायिकेला आपण प्रेग्नन्ट असल्याचे कळते तेव्हा साहजिक प्रेक्षकांना एक आशा वाटून जाते की चला बुवा, आता "सेटलमेंट" व्हायला हरकत नाही.;पण ह्या वेगळेपण जपणाऱ्या दिग्दर्शकांना ते मान्य नसते. प्रत्यक्ष व्यवहारात खोलवर विचार केला तर हेच जाणवते की अशा केसेस मध्ये बिचाऱ्या त्या "होणाऱ्या बाळाचा" काय दोष असतो हो? आई बापाची ताटातूट त्या निष्पाप जिवाने का म्हणून सहन करावी? त्याचा पूर्ण अधिकार नाही का, आई बापाचे प्रेम एकाच वेळी एकाच छताखाली मिळवण्याचा?  त्याच्या भविष्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा विचार नवरा-बायको दोघांनीही करायलाच हवा, तेही समन्वयाने.
      एक गोष्ट मात्र 100% पटली, सिनेमात, नायिका जेव्हा तिच्या सासूला म्हणते, "त्याने जेव्हा मला थप्पड मारली, त्याच वेळी त्याला दिलगिरी व्यक्त करायला कुणीच कसे सांगितले नाही? त्याच्याकडून चूक झालीये माझ्याबाबतीत, हे कुणीच कसे त्याच्या लक्ष्यात आणून दिले नाही? माझ्या भावनांचा कुणालाच कसा विचार करावा वाटला नाही? उलट मलाच समज दिली गेली की संसारात तडजोड करावीच लागते, तीही बायकानाच. माझ्या मनावरचे ओरखडे कुणालाच जाणवले कसे नाहीत?"  खरे आहे अगदी. मुलांच्या मनात लहानपणापासून हेच बिंबवले जाते की स्त्री आणि पुरुषामध्ये हा फरक आहेच आणि तो तसाच रहाणार आहे. त्यामुळे तशीच मानसिकता घडतही जाते.  स्त्रियांनी देखील सुरुवातीपासूनच स्वतःचा आत्मसन्मान जपायला शिकले पाहिजे. बायको आहे आणि तीही फक्त गृहिणी आहे म्हणून केवळ नवऱ्याच्या हातात ऑफिस चा डब्बा, पाण्याची बाटली,  त्याचे पाकीट  देणे इतकंच काय तो गाडीत बसेपर्यंत बाहेर येऊन त्याच्या मागे त्याला खाऊ घालण्यासाठी धावणे---- ह्या गोष्टी तरी कितपत योग्य आहेत?   स्त्री जरी बाहेर कुठे काम करत नसली तरी ती संपूर्ण  कुटुंबाची जबाबदारी घेते, ती निभावते हे देखील तिचे कर्तृत्व च नाही का?   असो.  
  शेवटी एकच सांगावं वाटतं,  अनेक मान्यवर लेखकांनी म्हटल्यानुसार जर नवरा बायकोचे नाते हे मुरलेल्या लोणच्या सारखे असते, एकाच रथाची दोन चाके वगैरे---- तर मग  हातून घडलेल्या "कधीतरी च्या" चुकीसाठी दोघांनी एकमेकांना समजून घेऊन माफ करणं पुढील आयुष्य सुकर होण्याच्या दृष्टीने संयुक्तिक नाही का? सगळ्यांसाठीच?  तुम्हाला काय वाटतं? 
   गुलजारच्या ओळींनीच शेवट करते, 
" अगला पल  जीने के लिये
पिछले पल को विदा तो कर लो
 कल जो गया, वो गया नहीं है
मनोका बोझ लेकर चल रहे हो
बहुत भारी है, बोझा लेकर चलना
उम्मीदे कम करो, सफर लंबा है"        





माणिक नेरकर.

माझे वैद्यकीय अख्यान भाग-2

या विषयावर लिहायला सुरुवात केल्यावर उगाचच आत्मचरित्र लिहिल्यासारखे वाटते आहे! पण एकापाठोपाठ एक येणाऱ्या आयुष्याच्या टप्प्यातून जातांना सुरुवात कुठून ,कशी झाली हे आठवणे हा एक विसावा वाटतो आहे. मला स्वतःला या सगळ्या प्रसंगांचे घटनांचे पुन्हा स्मरण करणे आनंददायी वाटते आहे आणि म्हणूनच पुढे याबद्दल लिहीते आहे. काही मैत्रिणींनी वाचून सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने हुरूप अजून वाढला आहे .
बी ए एम एस ला ऍडमिशन घेतल्याचे मागच्या भागात सांगितले होते. त्या प्रवेश प्रक्रियेच्या कामासाठी पहिल्यांदा महाविद्यालयात गेले तर आमच्या शाळा आणि ज्युनियर कॉलेज पेक्षा लहान असलेली बिल्डींग बघून मला आश्चर्यच वाटले. दोन मजल्यांचे पूर्ण झालेलं बांधकाम ,तिसऱ्या मजल्यावर अपूर्ण अवस्थेत काही भाग ,अगदीच साधारण क्षमतेचा वाहनतळ आणि पटांगण वगैरे तर कुठे दिसतच नव्हते. असे कसे हे कॉलेज? असे वाटून गेले. आत विद्यार्थ्यांची थोडीफार गर्दी बघून प्रवेश प्रक्रिया कुठे कशी करायची ते बघावं म्हणून चौकशी कक्षाकडे वळले. मागून कोणीतरी पाठीवर हात ठेवून बोलावले. बघते तर माझी ज्युनिअर कॉलेजमध्ये जनरल ग्रुपला असलेली  मैत्रीण दिसली. तिने माझं नाव आधीच लिस्टमध्ये वाचल होतं .खूप उत्साहात ती मला आपण दोघीही कशा एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतोय सांगू लागली .आणखी एका शाळेत तीन वर्षे एकत्र असलेल्या मैत्रिणीचे नावही लिस्टमध्ये बघितले .इतर नावांमध्ये काही विद्यार्थी नागपूरचे तर बहुतेक विद्यार्थी चंद्रपूर, गोंदिया, लातूर, बीड, नाशिक-पुणे इत्यादी ठिकाणचे दिसले. 
60 मुलांच्या वर्गामध्ये आम्ही तिघी पहिल्या दिवशी एका बेंचवर बसलो. काय तर पूर्वी कधीमधी एकमेकींना भेटायचो ,थोडीफार ओळख होती म्हणून. दिवसभर एकत्र बसल्यावर लक्षात आले की आम्हाला तिघींनाही या कॉलेजमध्ये रॅगिंग होऊ शकते, सिनियर्स कसे जूनियर्स ची टिंगल करू शकतात इत्यादी गोष्टींनी बहुतेक जास्त जवळ आणले होते !त्या पहिल्या दिवसापासून आम्ही एकत्र आलो ते कायम एकत्र राहिलो .इतक्या घट्ट मैत्रीच्या धाग्यात बांधल्या गेलो की आजही एकमेकींच्या संपर्कात आहोत. बरेवाईट अनुभव एकमेकींना सांगून, गप्पा मारून दूर असलो तरी मनाने खूप जवळ राहू शकलो आहोत.
 पहिल्या वर्षी वैद्यकीय महाविद्यालयात अँनाटाँमी फिजिओलॉजी या दोन विषयांशी सामना(?) करावा लागतो. बी ए एम एस च्या विद्यार्थ्यांची गंमत तर अशी की त्यांना प्राचीन आयुर्वेद ग्रंथातील अभ्यास आणि तितकेच मॉडन मेडिकल सायन्स चे ज्ञान आत्मसात करावे लागते. म्हणजे हे दोन्ही केले तरच खरे परीक्षा देऊन पुढे प्रॅक्टिस आत्मविश्वासाने करता येते. उदाहरण द्यायचे झालेच तर ॲनाटोमी अर्थात शरीरशास्त्र विषयासाठी मानवी शरीरावर डिसेक्शन करायचे ,त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच वेळी चरकाचार्यांनी कुठल्या रक्तवाहिनीला कुठल्या नावाची धमनी म्हटले आहे ते लक्षात ठेवायचे. डायग्राम काढायचा आणि लेबल शास्त्रोक्त इंग्रजी आणि ग्रंथोक्त संस्कृत अशा दोन्ही भाषांमध्ये करायचे.
 संस्कृत हा एक स्वतंत्र पेपर परीक्षेला होता. शाळेत संस्कृत विषय असल्याने राम, नदी, लता ,इ शब्द "चालवणे "वगैरे संस्कृत समजत होते. पण आता तर लघुसिद्धान्तकौमुदी म्हणजे संस्कृत व्याकरण तपशीलवार शिकायचे होते !त्यासाठी सगळेच विद्यार्थी ट्युशन लावतात असे सिनियर्स कडून कळल्याने आमची अख्खी बॅच सकाळच्या सहा च्या संस्कृत क्लासला जाऊ लागली. त्या सरांना कॉलेज  मध्ये सगळे पंडितजी म्हणायचे. त्यांचा वेषही लालूप्रसाद यादवां सारखा धोतर नेसलेला असा होता. केशभूषा मात्र चांगली होती!! त्या क्लासला पण आम्ही तिघी मैत्रिणी एकत्र जायचो. दोन गाड्या शेअर करायचो -एक लुना आणि एक कायनेटिक होंडा. पंडित जी आमच्याशी कायम शांतपणे, प्रेमाने बोलायचे आणि आम्ही कशा नियमित अभ्यासू आहोत वगैरे कौतुक करायचे .त्यामुळे दररोज सकाळी पाच वाजता उठण्याचा त्रास कमी जाणवायचा!!

पहिल्या वर्षी आणखी एक अनाकलनीय विषय- पदार्थविज्ञान -याचाही पेपर होता .यातील संकल्पना समजून वाचून आपण डॉक्टर कमी आणि तत्वज्ञ अधिक बनतोय का वाटायचे! मात्र हा विषय शिकवणारे सर तिशीचे ,तरुण, उत्साही होते .कॉलेजच्या अनेक कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घ्यायचे आणि विद्यार्थ्यांना पण सहभागी करून घ्यायचे. त्यामुळे त्या विषयाकडे मी जरा कमी तिरस्काराने बघू लागले. स्वतः नोट्स काढून त्याचा अभ्यास वगैरे केला म्हणून की काय त्यातही डिस्टिंक्शन चे मार्क पडले होते.
 अशा काही संमिश्र अनुभवांमधून आमचा वैद्यकीय प्रवास सुरू होता. त्याच वेळी कुठे आरोग्य विषयक शिबिरे असली की आम्ही जूनियर्स तिथे हजर असायचो. समोर गर्दी केलेल्या इतर डॉक्टरांच्या खांद्यांवरून ,मधून  जितकं दिसायचं ऐकू यायचं त्यातून काही  स्वतःच्या नोंदी करून  ठेवायचो. प्रॅक्टिस सुरू केल्यावरही बरीच वर्षे या वह्या मी जपून ठेवल्या होत्या .ओपीडी मध्ये रुग्ण पत्रक लिहायला उभ राहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटायची. प्रॅक्टिशनर सांगायचे लिहा- नाडी अमुक-तमुक, श्वसन असे, हे एवढं भराभर केस पेपरवर उतरवत आमचे क्लिनीक सुरू झाले होते .शिवाय मोठ्या सुट्ट्यांमध्ये ओळखीच्या डॉक्टरांच्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये जायला सुरुवात केली होती. सगळ्यात मजा म्हणजे आठवड्याचे तीन दिवस अलोपॅथी प्रॅक्टिशनर कडे आणि तीन दिवस आयुर्वेद प्रॅक्टिशनर कडे असा वात-पित्त-कफ आणि ब्लड प्रेशर, ईसीजी,  ब्लड टेस्ट चा समन्वय साधता साधता पुढील वैद्यकीय प्रवासाचे मनसुबे रचत पहिल्या वर्षीची परीक्षा दिली होती

Monday, March 2, 2020

दिसतं तसं नसतं

आज मला 'दिसतं तसं नसतं' या उक्तीचा प्रत्यय आला. आज एका आजीबाईंनी banket उपस्थित सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. 
 झालं असं की मी दुपारी काही कामानिमित्त banket गेले होते. Banket नुतनीकरणामुळे सर्व कारभार लहानशा कोप-यात हलविण्यात आला होता. साहजिकच तेवढ्याशा जागेत कर्मचाऱ्यांना आणि banket येणाऱ्या लोकांना adjust करावे लागत होते. Banket deposit आणि withdrawal साठी येणाऱ्यांची रांग मुंगीच्या गतीने पुढे सरकत होती. अचानक माझ्या समोर एक लौकिक अर्थाने "कु रु प" वृध्दा आली. तिला पाहून मला काही महिन्यांपूर्वी सोशल मिडिया गाजवणारी "राणू मोंडल" आठवली. (आता ही राणू मोंडल कोण? ती रेल्वे स्टेशनवर गाणी म्हणणारी भिक्षेकरी जिला हिमेश रेशमियाने "रास्तेसे उठाके रातोरात स्टार बनाया" तीच) 
हं....तर मी सांगत होते ती स्त्री सुध्दा तशीच "रास्तेसे आयी हुई" गरीब बिचारी दिसत होती. पांढरे कम् भुरकट मोकळे केस, कशीबशी गुंडाळलेली साडी, रखरखीत पायात सरकवलेली स्लिपर चप्पल अन् हातात कागदपत्रांच्या ओझ्याने फाटलेली पिशवी! माझ्या पासून सहा सात जणांच्या अंतरावर ती बसली होती. तिच्या अवतीभवती नुकत्याच आलेल्या सुस्वरूप, सुस्थितीतील तिघी चौघी बसल्या होत्या. आजीबाईंनी पेन मागितला. माझी पर्स उघडायच्या आत एकीने तिला पेन दिला. पेनवालीला वाटलं आता ही आपल्याला 'form कसा भरू?' हे विचारेल. पण झालं भलतंच! आजीने जवळचं पासबुक काढून भराभरा form भरलाच वर झोकात इंग्लिश मध्ये सही सुध्दा केली. त्या सुस्वरूप स्त्रीने लगेच "दिसतं तसं नसतं" म्हंटल अन् 'आपल्याला कसा अजूनही bankecha form वगैरे भरताना इतरांची मदत घ्यावी लागते' ह्याची कबुली दिली.
 माझा नंबर आल्याने आजीबाईंनी अजून कुणाकुणाला आणि कसे कसे आश्चर्याचे धक्के ते कळलं नाही. पण "दिसतं तसं नसतं" हे मात्र खरं!

- श्वेता पांडे - चिमोटे
अकोला

Sunday, March 1, 2020

सोहळा :ग्लोबल विवाहाचा.

नात्यातील एकीचा फोन आला. लेकीच्या लग्नाला बोलावणे केले. लग्न समारंभ छोटासाच आहे घरचेच लोक आहेत अगदी आटोपशीर करणार आहे, पत्रिका पण छापल्या नाही, व्हॉटस् अप वरच टाकते आहे तुला पण टाकली आहे, बघ आणि लग्नाला ये. असा आमचा फोनवर एकतर्फीच संवाद झाला. मी पत्रिका बघितली काही केल्या मुलाचे नाव काय लक्षात येईना. अर्थातच मुलगा जाती धर्माचा तर सोडाच पण दुसर्‍या देशाचाच आहे हे मला दुसर्‍या एका जवळच्या नातेवाईकांकडून समजलं होतं. मला हसू आलं म्हटलं इथे आपल्याला नाव वाचता येईना ही मुलगी प्रेमात काय पडते आणि लग्न पण करते.  लग्न पण ग्लोबल होऊ लागली आहेत की काय? कारण मोठा जावई (मुस्लिम) बोहरी आहे आणि हा ख्रिश्चन. मोठ्या मुलीच्या लग्नाच्या वेळीच आमची एक भुवई वर आणि डोळे ताणले गेले होते. कारण लव्ह जिहाद चे इतके काही ऐकले होते म्हणून मुलीची काळजी वाटणं स्वाभाविक होतं. पण आमच्या आणि तिच्याही सुदैवाने बोहरी लोकं चांगले आहे. या लहान मुलीच्या लग्नासाठी सहकुटुंब आले होते. गोंडस गोजिरवाण्या मुलाची आई पण झालीये ती मोठी मुलगी. 
आजकाल फोनवरचे आमंत्रण म्हणजे घरी येऊन दिल्या सारखंच असतं हा नवा रिवाज झाला आहे. हो नाही करता लग्नाला गेले. तिथला थाटमाट बघण्यासारखाच होता. हॉटेलच्या नावातच मॅजेस्टिक होतं मग काय आणखी हवं. मी मुलाकडच्या वर्‍हाडींना शोधू लागले तर ते इनमिन तीन लोकं. नवरा मुलगा, त्याची आई, आणि एक मित्र. लग्नाच्या  भारतीय पोषाखात ते तिघेही जरा अनकंर्फटेबलच होते. पण एन्जॉय करत होते. गुरुजींना इंग्रजी येणं शक्यच नव्हतं. म्हणून नवरी मुलगी प्रत्येक ओळीचे रुपांतर इंग्लिश मध्ये करून त्याला सांगत होती आणि तशी कृती त्याच्या कडून करून घेत होती. त्याच्या आईला तर इंग्लिश पण येत नाही फक्त फ्रेंच.  नवरीचे मित्रराष्ट्र भक्कमपणे उभे राहून सगळं व्यवस्थित पार पाडत होते. सगळं काही नवरी आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी ठरवलं. हॉल बुकिंग पासून तर अगदी हनिमून ला पाठवे पर्यंत सगळं. आणि ते ही सुरळीतपणे पार पडत होतं.
आजच्या मुली किती फॉरवर्ड आहेत. किती कॉनफिडंट आहे. मला खूप कौतुक वाटलं त्यांचं. कुठेही लाजणं, घाबरणं नाही इतक्या नातेवाईकांसमोर त्यांचा वावर अगदी बिनधास्त होता. किंबहुना त्यांचाच वावर जास्त होता. कार्यक्रमाचे संचलन असू दे की डान्स करणं असू दे एकदम परफेक्ट! कुठेही अडखळणं नव्हतं.
विवाहाचे महत्त्वाचे विधी, जसे की हळकुंड हातात बांधले, मंगळसूत्र गळ्यात घातले, कन्यादान, सप्तपदी इ. इ. मोठ्या हौसेने केले. पण विहिणबाई अगदी निर्विकार चेहर्‍याने बघत होत्या. सप्तपदीला रंगीत ब्लाउजपीसवर फुलांची सजावट केली होती. तीन तीन फोटोग्राफर होते. एक फक्त फोटो काढत होता, दुसरा फक्त व्हिडिओ चित्रीकरण करत होता आणि तिसरा स्पेशल इफेक्ट्स देत होता. हे भारतीय पध्दतीने झालं मग संचालन करणार्‍या मैत्रिणीने घोषणा केली वधूवर ड्रेस चेंज करून येईपर्यंत वर्‍हाडी मंडळींनी जेवून घ्यावे. इटालियन रेड, व्हाईट पास्त्यापासून तर थेट महाराष्ट्रीयन श्रीखंडापर्यंत व्हाया पंजाबी पदार्थ अशा डिशेसची रेलचेल होती मेनूत. सगळ्यांची जेवणं आटोपतायता तोपर्यंत  वधूवर निरनिराळ्या पोझ देऊन फोटोसेशन करून मग ड्रेस, मेकअप बदलवून आले ते थेट ख्रिश्चन पध्दतीचे कपडे घालून. मग केक कटींग, रिंग सेरेमनी, एकमेकांना वचनं देणे (ख्रिश्चन धर्मानुसार) आणि मग खास वधूवरांचा एका इंग्लिश रोमॅन्टिक गाण्यावर डान्स,  हल्ली हा डान्स म्हणजे लग्नाच्या विधीतील अनिवार्य भाग झाला आहे त्याशिवाय लग्न झाले असे मानले जात नाही. मग तिचा इंग्लिश उखाणा आणि त्याचा मराठी उखाणा. विवाह संपन्न झाला. मला तर ते लग्न न वाटता एखाद्या सिनेमाचं शूटिंग वाटत होतं. कारण काही वेळापूर्वी हौसेने बांधलेले मंगळसूत्र गळ्यात नव्हतं, डान्स करता करता हळकुंड पण कुठेतरी जाऊन पडलं होतं. काय अर्थ होता का त्या विधींना! उगाच काहीतरी देखावा वाटला. आणि आम्ही प्रेक्षक! फक्त बघे लोकं!अगदी आईवडील सुध्दा प्रेक्षकांच्या भूमिकेत वावरताना वाटत होते. नाही म्हणायला जन्मदातेच असल्याने थोडीफार involment होती.
सगळंच करायचं हे पण ते पण! आणि सगळ्यांना ते दाखवायचं अगदी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम सगळीकडे. आजच्या या so called bridal आणि groom च्या पार्श्वभूमीवर पूर्वीचे नवरा नवरी म्हणजे अगदीच वेगळी वाटतात. पूर्वीची नवरी कावरीबावरी दिसायची आत्ताच्या या ब्रायडल सराईता सारख्या दिसतात. लाजणं, घाबरण वगैरे काही नाही उलट ग्रुमशी मस्त गप्पा, हास्यविनोद करतात. (अरेंज्ड मॅरेज असले तरी) आपण सासरी जाणार, आईवडीलांना सोडून जाणार ही हुरहुर जराही नसते. कारण संपर्काचे कितीतरी साधनं बोटाच्या एका क्लिकवर उपलब्ध आहे. अजूनही बरीच कारणं आहेत. मुली शिक्षणा निमित्त घरापासून दूर राहतात , लग्न होईपर्यंत वयाने मोठ्या होतात आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असतात. वगैरे.
माझी पिढी कितीतरी मागे होती. काळ बदलला, बदलाचा वेगही प्रचंड आहे. माझ्या पिढीला न झेपणारा.   आपल्या पिढीचे त्यावेळचे लग्न आणि आत्ताच्या पिढीचे लग्न अशी समांतर मांडणी मनातल्या मनात सुरू होती. काळानुरूप पिढ्या बदलतात, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, त्यांच्या जडणघडणीनुसार त्यांचे विचार बदलले की आपोआप जगण्याबद्दलच्या अनेक संकल्पना बदलत जातात. त्यात प्रेमाची संकल्पनाही बदलणारच. दोन पिढ्यांमधील अंतर जाणवू लागले. त्यावेळी आपली पिढी गोंधळलेली होती. त्यावेळी आपल्या पिढीचे लग्न आणि आत्ताच्या पिढीचे लग्न त्या अर्थाने ही पिढी प्रेम, लग्न समारंभ यात गोंधळलेली नाहीत. त्यांचे विचार, आचार ठाम आणि चोख आहेत.         
पारंपरिकता आणि आधुनिकता यांचे फ्युजन म्हणजे हल्लीचे विवाह सोहळे असे वर्णन करता येईल थोडक्यात. मेंदी, हळद हे पूर्वीच्या तुलनेत अधिक सोपे आणि मनोरंजक झाले आहे. 
हे लग्न बघून माझे मन धास्तावले आहे सून आणि जावई कसे असतील? पण मनाची तयारी करण्याची संधी या विवाह सोहळ्यामुळे मला मिळाली... पण मग विचार येतो की "वसुधैवकम् कुटुंबम् " हीच आपली भारतीय संस्कृती आहे नाही का!  आशीर्वाद दिले नांदा सौख्य भरे!
अंजली