शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना ?...हे काय बॉ नवीन काहीतरी चायनीज ? तर हा माझा आणि माझ्या मुलाचा कोडवर्ड आहे. मी केलेला एखादा खाद्यप्रकार बिघडला कि आम्ही एकमेकांना सांगतो की आज 'हनी चिली' झालेलं आहे.
मुळात मी काही सुगरण नाही उलट एक घाबरट गृहिणी आहे , म्हणजे आधी पदार्थ करायची मारामार आणि त्यात तो बिघडायला पण नको , त्यामुळे नेमकं प्रमाण असल्याशिवाय मी फार काही करायला धजावत नाही . बिघडलेल्या पदार्थात सुधारणा करायची म्हणजे तर आधी माझ्या कपाळावर आठ्या निर्माण होतात , त्यात राशीला अनेक सुगरण मैत्रिणी आलेल्या मग काय विचारता , पण खरंतर त्यांच्यामुळेच आणि घरच्या सदस्यांमुळे माझी पाकशास्त्रात बरी प्रगती झालीय ( असं इतर कोणी म्हणो न म्हणो मीच म्हणते ). तर ' हनी चिली ' ची सुरवात माझ्या कॉलेज जीवनातच झालेली आहे म्हणजे अगदी डाळींमधला फरक ओळखू न येणे , त्यामुळे त्या धांदरटपणे एकत्र करणे , मग आई घरी परत येण्याच्या आता त्या पुन्हा वेगळ्या करणे ह्या अगदी प्राथमिक चुकांपासून मी सुरवात केलीय . एकदा मी आणि माझा भाऊ दोघेच घरी असताना सगळ्या उरल्यासुरल्या भाज्या संपवायच्या म्हणून मी पावभाजीचा बेत केला , आणि एवढ्या भाज्यांमध्ये काय कळणार म्हणून गवारीची भाजी सुद्धा त्यात घातली पण तिनी तिचं वेगळेपण आम्हा दोघांनाही दाखवून दिलंच . 'रुचिरा' ह्या मौल्यवान पुस्तकातले पदार्थ मी अगदी मन लावून वाचत असे आणि घरच्यांना वाचून दाखवत असे. लग्नाळू होईपर्यंत मला चहा,पोहे , अडीनडीला उपयोगी पडणारी खिचडी ( कदाचित आईला माझे भविष्य दिसले असावे) आणि बेसिक स्वयंपाक येऊ लागला पण बाकी प्रगती शून्य!!...पण मी म्हटलं 'देख लेंगे , उसमे क्या है!!' पण इकडे आल्यावर तर काय ! सासुबाई तर सुगरणच मग आपलं अज्ञान झाकलं जाईल अशा बेताने माझे स्वयंपाकघरातले काम सुरु झाले, हळूहळू आशेचे किरण दिसु लागले . तरी एकदा तेलात फटाफट फुटलेले उडदाचे वडे , साबुदाण्याचे वडे , तट्ट फुगून खाली बसलेला केक , कडक झालेले लाडू , वड्या हे अधूनमधून होतंच होते . अशात एकदा कुठेतरी खाल्लेले हनी चिली पोटॅटो मुलाला खाऊ घालू म्हणून घरी केले आणि ते फसले . चिरंजीवांना आता शिंग फुटू लागल्याने आतापर्यंत मुकाटपणे आईनी केलेला पदार्थ खाणारा माझा गुणी बाळ फिदीफिदी हसायला लागला आणि त्यामुळेच की काय धीर येऊन त्याचे बाबा इतक्या वर्षांचं साचलेलं हसू व्यक्त करू लागले ( अर्थात आता मी पण निगरगट्ट झाले होते त्यामुळे मी ते फारसे मनावर घेतले नाही ) पण तेव्हापासून मी ओट्याशी काहीतरी खुडबुड करतेय हे पहिले कि तो धास्तावून मला , ' आई , हनी चिली नाही ना ?' असं विचारतो
आज हे सगळं आठवण्याचं कारण आता तुमच्या लक्षात आलं असेलच , करेक्ट , आज परत ' हनी चिली ' झालंय , पण आता चिरंजीव इथे नसल्याने जे झालंय ते आरामात मुकाटपणे सगळ्यांच्या पोटात गेलंय.
No comments:
Post a Comment