इजिप्त टूरचा पहिला साईट सिंइगचा स्पॉट होता, गिझा पिरॅमिड्स! हॉटेलमधून धूसर दिसणारे पिरॅमिड्स प्रत्यक्ष पाहायची खूप घाई झाली होती. पूर्ण वालुकामय भागांतून आमची बस वर पोचली आणि आणि खाली उतरलो, तर जगातले प्राचीन आश्चर्य डोळ्यांसमोर होते. आपण ते प्रत्यक्ष बघतोय यावर विश्वासच बसत नव्हता.
आम्ही इतर फोटो प्रेमींच्या मध्ये न अडकता, पटकन् पिरॅमिड्सवर चढलो. आम्हाला वाटलं की आत जाण्यासाठी रांग आहे, पण तिथे गेल्यावर समजलं की त्यासाठी वेगळे तिकीट आहे. ते काढून आत पाहायला जाण्याइतका वेळ आमच्या टूर मॅनेजरने दिला नव्हता. पण मग जे आत जाऊन बाहेर येत होते त्यांना विचारलं, तर ते म्हणाले की, आत आता बघण्यासारखे काही नाही. बोगद्या सारखा, चढणीचा, ओबड-धोबड रस्ता आहे. किल्ल्याच्या गुप्त भुयारा सारखा! भिंतीत फक्त चौकोनी विवरे आहेत.त्याच्यावर ना नक्षी आहे, ना चित्र!मग खट्टू झालेल्या मनाला थोडे बरे वाटले.
मग खाली खडकाळ रेतीत येऊन वर पिरॅमिडकडे पाहिलं, खूफू पिरॅमिड! एकावर एक रचलेले प्रचंड आकाराचे दगड, नुसतेच एकावर एक असे रचून ठेवलेले ,त्यांच्यामध्ये सिमेंट किंवा चुना असे काहीही भरलेले नाही. आश्चर्य वाटले ना? पूर्वी म्हणे, त्यांच्या वरच्या भागावर इलेक्ट्रमची म्हणजे सोन्या-चांदीच्या मिश्र धातू ची त्रिकोणी टोपी बसवलेली होती. ग्रीस मध्ये पिरॅमिड म्हणजे कणकेचा बसका केक!ग्रीकांना पिरॅमिड लांबून पाहून केक ची आठवण झाली म्हणतात.
त्या भागात तीन पिरॅमिडस आहेत.आजोबा ,वडील आणि नातू या तिघांनी बांधलेली ही अद्भूत स्मारकं! त्या पिरॅमिड्सच्या दगडांना मी खूप वेळा कुरवाळले.
. हजारो वर्षांत, त्यांनी कुठल्या नैसर्गिक आपत्तींना तोंड दिले नसेल? पण तरी तितकेच स्वच्छ, चकचकीत दगड! अडीच टन वजनाचा एकेक असे पंचवीस लाख दगड यात वापरले आहेत. ते इतक्या उंचीवर कसे नेले असतील? सगळेच अद्भुत!
4500 वर्षांपूर्वी खूफूची ममी इथे ठेवली गेली होती. काही शतकं तिला काहीही ही झालं नव्हतं, पण पिरॅमिड फुटल्यानंतर, लाखो करोडो लोक इथे येऊन गेले. त्याचा परिणाम पिरॅमिड्स वर झाला. नाहीतर ममी कायमची टिकावी म्हणून हवाबंद असा पिरॅमिड बांधला होता. आजही इथे सफरचंद ठेवलं आणि दार बंद करून घेतलं तर ते वर्षभर तसंच टिकतं असं म्हणतात. ग्रेट ना!
खुफू ,खाफ्र आणि आणि मेंनकावरे असे 3 पिरॅमिड्स पाहून आम्ही निघालो ते Sphinx च्या दिशेने
पिरॅमिडसच्या जरा खालच्या बाजूला sphinx आहे. हे इजिप्तमधील सर्वात प्रसिद्ध, महा प्रचंड असं शिल्प! इजिप्तचे प्रतीक! सव्वादोनशे फूट लांब, सत्तर फूट रुंद आणि साठ फूट उंच! चुनखडीच्या एका अखंड खडकात कोरलेले! या शिल्पाभोवती अनेक दंतकथा,अंधश्रद्धा आहेत. Sphinx म्हणजे बसलेल्या सिंहाचं शरीर आणि त्याला मानवी शिर, ते शिर स्त्रीचं की पुरुषाचं, हे पण नक्की सांगू शकत नाही. त्यावरही वाद आहेत. कारण केशरचना पाहिली, तर बाईची वाटते. त्यामुळे हे पाहून आपल्याला अनेक प्रश्न पडतात? हे शिल्प कुणी,कधी उभारलं असेल?कारणं काय असतील? हे कसं साकारलं गेलं असेल? पण यापैकी कुठल्याच प्रश्नाला अजून तरी उत्तर सापडलं नाहीये. ( इजिप्तमध्ये हा अनुभव बरेचदा येतो.)केशवसुत म्हणतात तसं, 'कोडे घालूनिया बसली कैदाशीण, उकलिल्यावीण खाईल ती!'(सध्या त्याच्या नाकाचा शेंडा आणि डावा भाग नष्ट झालाय, नेपोलियनने केली म्हणतात ही दशा! वाईट वाटले पहाताना! )
तिथून आम्हाला संपूर्ण वालूकामय भागात नेलं,चारी बाजूंना सगळीकडे वाळूच वाळू! तिथे खूप मोठ्या परिसरात नऊ पिरॅमिड्स आहेत. लांबून ते जवळजवळ भासतात,पण प्रत्यक्षात ते एकमेकांपासून काही अंतरावर आहेत.
इथे उंटवाले,घोडेवाले, घोडागाडीवाले यांची गर्दी होती. प्रत्येकजण हाका मारून राइडसाठी मागे लागले होते. पण आम्ही उंटावर बसायचे टाळून, घोडागाडी प्रेफर केली. वाळूवर मध्येच उंचवटे, मध्येच गाडी घसरत खाली यायची. ....मजाही येत होती आणि थोडीशी भीतीही वाटत होती. घोडागाडी पिरॅमिडसच्या अगदी जवळून नेतात, तिथे लहान नऊ आणि मागे. ..ते 3 मोठे पिरॅमिड्स असे आहे.लख्ख उन्हातले ते द्रुष्य म्हणजे पर्वणीच! त्या घोडागाडीवाल्याने आमचे वेगवेगळ्या पोझमध्ये इतके फोटो घेतले. तोच पोझेस् सांगायचा ,आम्ही आज्ञाधारकपणे तशा द्यायचो. ...तेही भराभर. ..हे सगळे फोटो तो घसरत्या वाळूत घोडा, गाडी, स्वतःला बॅलन्स करुन काढत होता.मला तर राइड संपूच नये, असं वाटत होतं.
इतका grand experience! असं काही पाहिलं की वाटतं. ...आपण हे फोटोत नाही कैद करु शकत! तेव्हा उगाच भारंभार स्वतःचे फोटो काढत बसण्यापेक्षा, त्यांना जितकं शक्य तेवढं डोळ्यांत साठवावं,मनात ते खूप खोल कसं जाईल ते पहावं. ..म्हणजे कधीही स्मरण केल्यावर ,ताज्या अनुभवाची अनुभूती येईल. ..असं मला वाटतं.
नंतर जेवायला ज्या हॉटेलमध्ये गेलो, तिथे Indian food होते. तिथला कुक लखनौचा होता. तो अगदी घरी आपण ज्या अगत्याने वाढतो, तसं, मॅडम, आचार खाके देखो! निंबूका है. ...खीर जरुर लेना..असा आग्रह करत होता.
आम्हाला ब्रेकफास्ट इजिप्शियन असायचा, त्यातमसूरउसळ,त्यावर चाटमसाला इ. टाकून चटपटीत, . छोटे छोटे समोसे, (आतलं सारण वेगळंच होतं )मूगवडे म्हणू शकू असे वडे ,विविध प्रकारचे ब्रेड, केक्स, ताजी फळं, खजूर खारकेची फळं. छान लागतात ती!तिथे मधाच्या पोळ्याचा तुकडा ठेवलेला असायचा,त्यातून मध ठिबकत असायचं. मी fruit dish बनवून त्यात मध घालून खायचे! एकदम यम्मी!इजिप्तमध्ये मिठाईचे खूपच प्रकार आहेत. शेवयांचा वापर करून केलेल्या वड्या हा वेगळा प्रकार वाटला. लंचनंतर आम्ही परफ्यूम फॅक्टरी कम् सेल इथे गेलो. खूप सुंदर आकाराच्या,अतिशय नाजूक डिझाइनच्या परफ्यूमच्या बाटल्या पाहून मन आधीच सुगंधित झाले. नंतर एका माणसाने सर्व प्रकारच्या परफ्यूमस् ची माहिती द्यायला सुरुवात केली. त्यात दम्यावरचा उपाय, वेगवेगळ्या सुगंधी अत्तरांचे विविध उपयोग, अशी माहिती देत असतानाच, त्याने specially for MEN &WOMEN म्हणून जी माहिती दिली आणि ज्या पद्धतीने. ....?मला तर खाली -खाली मान घालून,तुटते की काय? अशी वेळ आली. इतकी लाज वाटत होती सगळ्या gents समोर! तरी त्याच्या मदतनीस सर्व मुलीच होत्या. त्या मस्त हसत होत्या..?त्याचा सेल मात्र चांगला झाला.मला रागच आला,मी काहीच घेतलं नाही.
डिनरला आम्ही fish boat hotel ला गेलो. तिथे उंचेपुरे,गोरेपान इजिप्शियन गायक,वादक होते. त्यांचे संगीत, त्यांच्या भाषेतील गाणी मन शांत करणारी होती. चारही बाजूंनी पाणी आणि इजिप्शियन संगीत. .मस्त वाटत होतं. त्यानंतर Gala dinner होते. मजा-मस्ती,डान्स झाल्यावर पुन्हा हाॅटेलला आलो.झोपताना मात्र डोळ्यांसमोर फक्त पिरॅमिडसच् होते
क्रमश:...
No comments:
Post a Comment