या आमच्या टूरला वेगळीच पार्श्वभूमी आहे. सर्व बुकिंग वैगरे केव्हाच झालेलं होतं. ट्रीप १७ नोव्हेंबरला होती आणि दसर्यापासून मुकुंदच्या आधीच बऱ्या नसलेल्या तब्येतीने खूपच कॉम्प्लिकेटेड असे वळण घेतले, त्यामुळे आपण इजिप्तला जाऊ शकू, असं एकदाही मनात आलं नव्हतं. पण एखादी गोष्ट घडायची असेल तर ती घडतेच ! याचे प्रत्यंतर या ट्रीपमुळे आले.
अयन म्हणजे मार्ग! आमचा प्रवास,अकोल्याहून पुणे, तिथले डॉक्टर्स---त्यांनी अनपेक्षितपणे प्रवासाला दिलेली परवानगी--- नंतर मुंबई मार्गे कैरो असा घडला. म्हणून मेधा पोळ यांचे हे इजिप्तायन! ऐका म्हणजे वाचा---
मुंबईहून कैरो साठी रात्री उशिरा म्हणजे २:५० ची फ्लाईट होती. मी ओव्हरनाईट विमानप्रवास याआधी कधीही केला नव्हता, त्यामुळे थोडा नविन अनुभव! साधारण साडेतीन तास लागतात पण टाईमझोन मधील फरकामुळे ते सात होऊन आम्ही सकाळी नऊच्या सुमारास कैरोला पोहोचलो.
एक हटके डेस्टिनेशन, मनात अतिशय उत्सुकता होती. आमचे ला मेरिडियन पिरॅमिडस हाॅटेल थोडंसं शहराबाहेर होतं. रुममधुन एरवी कसं बीच वैगेरे दिसतं, तसे इथे सतत पिरॅमिडस डोळ्यासमोर होते, मस्त ना!
Pacific world travels चे टूर मॅनेजर्स चांगले होते. बरोबर ईजिप्शियन गाइड होता, त्याचे इंग्लीश तसे सोपं व कळत होतं, पण काही काही शब्द अगदी वेगळेच उच्चारायचा, ईजिप्शियन अॅक्सेंट होता थोडा! त्यामुळे आपण शब्द जाणून घेईपर्यंत तो फास्ट उड्या मारत कुठल्या कुठे पोहोचलेला असायचा. कुणी ऐको न ऐको , तो आपला सिन्सिअरली सगळी माहिती देत रहायचा. माझी ट्रॅव्हल्स बरोबर ट्रीप करायची ही पहिलीच वेळ, तीही एवढया मोठय़ा ग्रूपबरोबर (९० जणांचा) मनमानी नव्हती करता येत! ते जरा खटकत होतं, पण ग्रुप बरोबरची मजा वेगळीच! असो.
आता थोडंसं इजिप्त विषयी....
इजिप्त- फेरोंची प्राचीन भूमी! त्यांच्या अस्तानंतर खूप परचक्रं आली.इ.स.पूर्वी १००० वर्षं इथं परकीय सत्तेनं प्रथम पाय रोवले. गेली तीन हजार वर्ष इथं पर्शियन, ग्रीक, रोमन, तुर्की अशा अनेक परक्या लोकांचं राज्य होतं. एक सत्ता जाऊन,दुसरी आली, तरी ती परकीयच असे.१९५२ साली प्रेसिडेंट नासरने इंग्रजांना घालवून सत्ता हाती घेतली.ह्याचे वर्णन म्हणजे फार मोठा माणूस! संबंध अरब जगताचा लाडका,धैर्याचा महामेरू!
इजिप्तचे २ भाग- लोअर इजिप्त आणि अपर इजिप्त! नकाशात पहाताना, लोअर म्हणजे दक्षिण आणि अपर म्हणजे उत्तर असं आपण मानतो.इथं त्याच्या बरोबर उलट आहे.
अपर इजिप्त- लुक्साॅर ,आस्वान इ. च्या दक्षिणेकडचा भाग.
लोअर इजिप्त-कैरो,अलेक्झांड्रिया इ. चा उत्तर भाग .
( आम्ही फक्त लोअर इजिप्त पाहिले)
हे असं उलटं का? नाईल नदीमुळे! नाईल ही निसर्गाची इजिप्तला देणगी असली तरी "इजिप्त ही नाईलची जगाला देणगी आहे." हे हेरोडोटस॒॒ या प्राचीन ग्रीक इतिहासकाराचं वाक्य आपल्याला माहितच आहे.
इजिप्तमध्ये ९४% वाळवंट आणि फक्त ६ % पिकाऊ जमीन आहे, तीही नाईलच्या किनारी, तिच्याच गाळाने निर्माण झालेली. यामुळेच मूळ वास्तव्य, थोर संस्कृती तिच्याच किनारी बहरली. तिच्या प्रवाहाची दिशा तीच इजिप्तच्या जीवनाची दिशा! त्यामुळे जिथून नदी देशात शिरते, तो अपर भाग, आणि खाली येऊन समुद्राला मिळते तो लोअर भाग. मग नकाशा काही का म्हणेना!
नाईल नदी-- डोळ्यांत मावत नव्हती. पाण्याने अगदी गच्च भरलेली. रुंद शब्द तोकडा पडावा इतकं मोठं पात्र, स्वच्छ पाणी!. आपल्याला प्रवासात खूप ठिकाणी भेटत रहाते. मुक्कामाच्या दुसऱ्या रात्री नाईल नदीवर क्रुझ डिनर पार्टी होती. रात्रीची नाईल , वेगळीच सुंदर भासली. आणि मुख्य म्हणजे कुठेही गलिच्छपणा नाही, गडबडगोंगाट नाही. खूप छान वाटले नाईल किनारी!
तिथे क्रुझवर बेली डान्सचा अनुभव घेतला, या आधी दुबईतही घेतला होता अर्थात! पण प्रत्येक ठिकाणच्या नृत्यप्रकारात थोडासा वेगळेपणा असतोच. हा नृत्यप्रकार फेरोंच्या प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. प्राचीन थडग्यावरच्या भिंतींवर याची कितीतरी चित्रं आहेत. हा नृत्यप्रकार पहाणे हा एक खासच अनुभव आहे. एक अतिशय सुंदर ईजिप्शियन ललना तो सादर करत होती, त्यामुळे सगळे खुषीत पहात होते.
दुसरा skirt-dance हा Egyptian folk danceचा एक प्रकार!एक नर्तक रंगीबेरंगी skirt,ज्यावर विविध रंगांचे छोटे लाइट्स लावलेले असतात,एकाच दिशेने, साधारण ४०-४५ मिनिटे ,न थांबता गिरक्या घेत फिरत असतानाच, विविध नृत्यछटा साकारतो.हा थक्क करणारा नृत्यप्रकार,प्रत्यक्षच पहायला हवा!
(क्रमशः)
No comments:
Post a Comment