Tuesday, January 7, 2020

फुकेट-क्राबी टुर (पार्ट-2)

क्राबी चा मुक्काम आटोपला.दुसऱ्या दिवशी  फुकेट ला निघायचं होत.सकाळी उठल्यावर पहिले बीच वर फिरून आलो,सामान आवरून ब्रेकफास्ट केला, अन फुकेट ला निघालो. तोच सुंदर रस्ता परत अनुभवला!
फुकेट मधे शिरल्यावर मात्र हॉटेल ला पोचेपर्यंत ट्रॅफिक मुळे खूप वेळ लागला. 
क्राबी कोकणातल्या खेड्यासारखं होत, तर फुकेट मेट्रो सिटी ! 
इथलं ही हॉटेल रामदा इन् !  हॉटेल छानच होत, पण शहरी लुक असलेलं. झाडीच्या कुशीतल क्राबी च रामदा जास्त आवडलं.

संध्याकाळी 6 ला 'फंटासिया शो'ला निघालो.
 बाहेर सुंदर लायटिंग ,कृत्रिम तलाव अन धबधबा,स्वागताला थाई वेशभूषेतल्या मुली,असा सगळा माहोल होता.
आत प्रशस्त जागा,त्यात छोटे- मोठे, मनोरंजन करणारे शो,आणि डायमंड  ज्वेलरी पासून तर कपड्यांपर्यंत मोठी मोठी दुकान होती. आधी डिनर अन मग  शो होता.
डिनर चा हॉल भला मोठा ,4000 लोक एका वेळेस जेऊ शकतील एवढा! सगळ्यांना टेबल नं. दिलेला होता अन बुफे मध्ये  सगळ्या प्रकारचे अगणित  पदार्थ मांडले होते.आतली सजावट अप्रतिम होती. एवढे लोक एकावेळी जेवत असून ,कुठेही गडबड गोंधळ नव्हता.
शो ची वेळ झाली. ऑडीटोरियम अतिशय भव्य होत. थाई संस्कृती आणि दंतकथा गुंफलेल्या ह्या शो मधे, 15 हत्ती, गायी -म्हशी ,कोंबड्या ,बकऱ्या ,कबुतर,तर होतेच ,शिवाय स्टेज च्या वरून खालून ,बाजूनी,प्रेक्षकांच्या डोक्यावरून ,मधून जिथे जिथे शक्य होत तिथून अवतरणारे आकर्षक वेशभूषा असलेले 150 कलाकार,यांचा ही सहभाग होता.शो अदभूत नसला तरच नवल!

त्यानंतर आम्ही बांगला स्ट्रीट ला जायचं ठरवलं. 400 m.असलेली बांगला स्ट्रीट म्हणजे फुकेट च नाईट लाइफ !
निऑन लाइट चा झगमगाट ,ओळींनी असलेले बार ,डान्स बार,अन हॉटेल्स इथे आहेत. बऱ्याच बार मधे लाइव्ह बँड सुरू होता.बार मधे मुली टेबल वर पोल डान्स अन अक्रोबॅटस करून लक्ष वेधून घेत होत्या. बार च्या बाहेर उभ्या असलेल्या मुली बार मधे चालण्यासाठी गिऱ्हाईका ला भरीस पाडत होत्या.रस्त्यावर खुल्लमखुल्ला देहविक्रयाचे सौदे (भाषा आणि चलनाच्या फरकामुळे कॅलक्यूलेटर वर हिशोब वगैरे करून ) सुरू होते.
फुल विकणारे ,आपल्या बार ची जाहिरात करणारे ,रस्त्याच्या मधोमध आपल्या करामती दाखवणारे,या बरोबरच सगळीकडल वेगवेगळ म्युझिक ,हे  एकमेकात मिसळून एक संमिश्र कलकलाट त्या गजबजलेल्या रस्त्यावर होता.रस्ता इतका गजबजलेला की मुंगीच्या पावलाने पुढे जावं लागतं होत. 
एकदा नाइट लाईफ बघायचं म्हणून तिथे गेलो खर ,पण तोकड्या कपड्यात टेबल वर नाचणाऱ्या मुली ,त्यांच्याभोवती दारू पीत बसलेले आंबट शौकीन ,भडक मेकअप करून गिऱ्हाईक पटवणाऱ्या मुली हे सगळं बघून उबग आला.कशी बशी एक चक्कर मारून परतलो.एक मात्र खरं ,वेश्याव्यवसाय सोडला,तर तिथलं बाकी वातावरण मात्र अतिशय जिवंत अन झिंग आणणार  होत.

दुसऱ्या दिवशी सकाळी फुकेट दर्शन ला निघालो.
बरोबर गाईड होता। सगळ्यात आधी कॅरोन व्यू पॉईंट ला गेलो. उंचावरून दिसणारे निरनिराळे आयलंडस् , चमचमणारे निळेशार पाणी अन पांढरी शुभ्र वाळू ,यामुळे सुंदर दिसत होते.
तिथून मग फुकेट च्या सगळ्यात जुन्या चलॉंग टेम्पल ला गेलो।तीन मजली असलेलं हे टेम्पल खूप मोठं आहे. भिंती अन छतावर बुद्धाच्या आयुष्यातील  स्टेजेस रंगवले आहेत.बुद्धांच्या अनेक  सोनेरी मुर्ती तीनही मजल्यांवर आहेत.खूप शांत अन प्रसन्न वाटलं तिथे. त्यासमोरच आता एक नवीन टेम्पल बांधलाय.तिथे दोन मूर्ती होत्या. लोक कागदाच्या पुडीत आणलेला सोन्याचा वर्ख त्या मूर्तींना चिकटवत होते. बाहेर  विटांची उंच भट्टी होती. आपली मनातली इच्छा पूर्ण झाली की इथे येऊन फटाके फोडायचे ,अशी प्रथा आहे. तिथे लोकांनी आणून दिलेले फटाक्यांचे खूप बॉक्स ठेवले होते.एक माणूस ते थोड्या थोड्या वेळानी भट्टीत टाकून फोडत होता.
त्यानंतर आम्हीं टायगर किंगडम ला गेलो. टायगर किंगडम म्हणजे झू सारख काही असेल जिथे वाघाच्या करामती दाखवत असतील अस वाटलं, प्रत्यक्षात तिथे गेल्यावर कळलं की वाघाजवळ उभं राहून त्याला हात लावायचा अन फोटो काढायचे ! ते वाघ ही सिडेटिव्हस दिलेले! इतका रुबाबदार प्राणी, सुस्त असल्यामुळे अतिशय केविलवाणा दिसत होता. लोक त्याच्यावर झोपून,शेपटी ओढून ,त्याचा पाय धरून फोटो काढत होते. पाहून खूप वाईट वाटलं ,केवळ पैसे भरले म्हणून आम्ही आत जाऊन फोटो काढून आलो.थायलंड ला एका मनेका गांधींची आवश्यकता आहे असं तीव्रतेने वाटलं .टायगर किंगडम हुन हॉटेल ला येताना ,जुन्या फुकेट मधून आलो। अतिशय अरुंद गल्या, थाई ,चायनिज श्राइन्स अन ऐतिहासिक इमारती असलेला तो भाग होता. 
हॉटेल येऊन आराम केला.संध्याकाळ शॉपिंग साठी राखून ठेवली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 लाच फी -फी आयलंड ला निघालो. स्पीड बोट नी जायला दोन तास लागले. तो सगळा प्रवास आम्ही जागेवर न बसता डेक वर उभं राहून केला.चारही बाजूला नजर जाईल तिथपर्यंत निळेहिरवे  स्वछ पाणी, त्यामध्ये लाईम स्टोनच्या झाडांनी आच्छादलेल्या सुळक्यांच्या रांगा ,छोटे छोटे आयलँड्स,सगळं मन भरेस्तोवर पाहिलं.
फी फी ला पोचलो. तिथे बघितलेल्या आयलँड्स पैकी फी- फी सगळ्यात सुंदर आहे. बारीक शुभ्र वाळू, ओळींनी असलेले नारळाची, पाम ची झाड, स्फटिकसारखं स्वछ पाणी,अन एका बाजुनी कड करून उभे असलेले उंचच उंच लाईम स्टोन चे निरनिराळ्या आकाराचे सुळके! एखाद आखीव रेखीव चित्र आपण बघतो आहोत असं वाटलं। इथे लिओनार्दो कॅपरिओ  अभिनित  'the beach' मुव्ही चे शूटिंग झाल्यापासून हा बीच जास्त प्रसिद्ध झाला. ऊन बरच होत,तरी समुद्रात मनसोक्त डुंबलो.  तिथलं सौंदर्य अनुभवत बीच चेअर वर शांतपणे पडून राहिलो. लंच तिथेच होता.तो काही जमला नाही ,पण समुद्रात इतक्या दूर जेवण मिळालं हे काय कमी आहे!  
परत दोन तास प्रवास करत ,फुकेट ला परतलो. ट्रिप चा शेवटचा दिवस असल्याने बाकी वेळ हॉटेल मधेच गप्पा मारत घालवला.

दुसऱ्या दिवशी सकाळी 3 लाच हॉटेल हुन एअर पोर्ट ला निघायचं होत. 7 च फुकेट दिल्ली फ्लाईट 12 ला दिल्ली ला पोचल. तिथून नागपूर, पुढे अकोला एवढा पल्ला आम्ही रात्री 1 ला गाठला.
सुरुवातीचे छोटे मोठे घोळ वगळता ,फुकेट क्राबी ट्रिप खूप मस्त झाली!

  


No comments:

Post a Comment