माझे बाबा आईची गम्मत करून सांगायचे की माझा जन्म झाला तेव्हा माझी आई खूप रडली होती कारण मी दोन बहिणींच्या पाठीवर जन्मलेली तिसरी मुलगी होती!( गमतीचा भाग सोडला तर आता माझ्या बहिणी तक्रार करतात की "आईचा सगळ्यात जास्त तुझ्यावरच जीव आहे")
माझं बालपण वाशीम मध्ये असलेल्या PKV च्या quarter मध्ये निसर्गरम्य वातावरणात अगदी रम्य म्हणावं असं गेलंय .त्या बंगल्यात आमच्या परसदारी खूप मोठ्ठी फळं आणि भाज्यांची बाग होती त्यात एका कोपऱ्यात मोठ्ठ चाफ्याच झाड होतं . ज्याच्यावर चढून फुलं तोडणं हा माझा आवडता उद्योग होता. आई नेहमी ओरडायची चाफ्याची फांदी नाजूक असते म्हणून त्यावर चढत जाऊ नको ,एखाद्या दिवशी फांदी तुटली तर तू पडशील पण मी कधीच ऐकलं नाही . अनेकदा निर्विघ्नपणे चाफ्यावर चढून उतरायची. अशातच माझा पाचवा वाढदिवस आला . आईने मोरपंखी रंगाचे परकर पोलक शिवलं. त्याला छान टिकल्या लावल्या. मी खूप हरखून गेले . केव्हा एकदा तो ड्रेस घालुन नटते असं झालं होतं. त्या काळी नाटण्याचा एकमेव पर्याय होता फुलं ,गजरा, शेवंतीची किंवा बुचाच्या फुलांची वेणी, या कानापासून त्या कानापर्यंत माथ्यावर लावणं. त्यातच आईनी केसाला लावण्याचा कापडी बँड आणला . मग काय त्या बँड मध्ये खोचायला चाफ्याची फुलं हवी म्हणून अस्मादिक नेहमीप्रमाणे चढले झाडावर...पण कावळा? बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ..कडाड काड.....आणि मी जमिनीवर! पण तेव्हा वय लहान म्हणून थोडं खर्चटण्या पलीकडे काही झालं नाही. '
पुढे आम्ही वाशीम च्या अगदी मध्यभागी असलेल्या वस्तीत राहायला गेलो कदाचित मी 5 व्या वर्गात असेन . तेव्हा आईने वाढदिवसासाठी खूप छान बेबीपिंक रंगाचा घेरदार फ्रॉक शिवला ,त्यावर नाजूक भरत काम केलं होतं. तयार झाल्यावर वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आईने घालून बघायला सांगितला . खूप आवडला मला तो फ्रॉक ,म्हणून धावतच घरासमोरच्या मैत्रिणीला दाखवायला गेले. संध्याकाळ उलटली होती . कौतुकाच्या चार गोष्टी करेपर्यंत अंधार झाला. मी घरी यायला निघाले तर रस्ता पार करेपर्यंत लाईन गेली . पण सरावाची पायवाट आणि पायऱ्या असल्याने मी न थांबता तशीच घरी निघाले. आमच्या त्या घराला लोखंडी ग्रीलचे गेट होते त्याला जाडजूड लोखंडी चौकट होती. मी जपून पावलं टाकत पायऱ्या चढले आणि एकाएकी कोणीतरी धक्का द्यावा अशी घेरी येऊन त्या चौकटीवर माझा कपाळमोक्ष झाला . झालं ! मग काय वाढदिवसाच्या दिवशी कपाळावर भलं मोठं टेंगुळ घेऊन ,सुजलेल्या चेहऱ्याने वाढदिवस साजरा झाला !
पुढे बाबांचं आजारपण, बहिणींची लग्न,या धामधुमीत ,माझा वाढदिवस केव्हा आला केव्हा गेला हे विशेष आठवत नाही. लग्नानंतर ही घरी मोठ्यांचे वाढदिवस साजरा करण्याची फारशी पद्धत नव्हती .
नौकरी लागल्यावर सुरुवातीला माझ्या वाढदिवसाला विद्यार्थिनींनी भेटवस्तू दिली होती ,जी घेण्यासाठी त्यांच्याजवळ खरंच पैसे नव्हते तरी पण मॅडम च्या प्रेमाखातर त्यांनी पॉकेट मनी खर्च केला होता.त्यामुळे मला आनंदापेक्षा वाईटच जास्त वाटलं.तेव्हापासून विद्यार्थिनींना माझी जन्म तारीख कळूच नाही देत.
मधल्या काळात फारशी धडपड न होता ,मैत्रिणींनी ,नातेवाईकांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्या पलीकडे ,वाढदिवस साजरा केल्याचं फारसं काही आठवत नाही.....नाही म्हणायला अंजु, भाग्यश्री,शमा आठवणीने वाढदिवसाला माझ्या आवडीचा पदार्थ न चुकता आणून देत. आणि 1,2मैत्रिणी प्रेमाने दरवर्षी भेटवस्तू देत असत.
पण....2011 मध्ये माझ्या विद्यार्थिनींनी कुणाला तरी विचारून माझी जन्मतारीख शोधली आणि अतिशय गुप्तता पाळून केक आणून वाढदिवस साजरा केला. माझ्या कोणत्याच विरोधाला न जुमानता, मला केक कापायला लावली. उपास असल्याने मी कापलेल्या केक चा तुकडा जेवतांना खाईन असे म्हणून डब्यात घेतला. आणि रोजच्या रस्त्याने घरी निघाले.चौकात रस्ता पार करतांना काय झालं कुणास ठाऊक मी करकचून दोन्ही हातातले ब्रेक दाबले . आणि गाडीसकट जोरदार फरफटत पडले. गाडी माझ्या डाव्या गुडघ्यावर पडली आणि या गोंधळात मागून येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा ब्रेक लागेपर्यंत रस्त्यावर पडलेल्या माझ्या उजव्या हाता वरून ट्रॅक्टर चे समोरचे चाक गेले आणि मोठे चाक उजव्या गुढघ्यावर येऊन थांबले. आणि जीवावर बेतलेला अपघात, हात आणि गुडघ्यांवर निभावला. याप्रकारा नंतर माझी मुलं खूप धास्तावली म्हणून त्यांच्या आग्रहाने त्यानंतर पुढचे 2-3 वर्ष माझ्या वाढदिवसाला आम्ही सहलीला गेलो . तिथे सुद्धा सगळे जण वाढदिवसाच्या दिवशी माझी खूप काळजी घेत होते.
तरी पुन्हा एकदा कठीण वाढदिवस आला . मोबाईल नसल्यामुळे लँड लाईन फोन वर दिवसभर वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत होते. संध्याकाळी फोन वाजला तर सौरभने उचलला आणि मला हाक मारली . मी त्याच्या मागून घाईने समोर यायला आणि तो त्वरेने मागे सरकण्याला एकच वेळ आली . त्यात त्याची टाच माझ्या डाव्या पायाच्या करंगळी आणि त्याच्या बाजूच्या बोटात फसली आणि दोन बोटांची हाडं डीसलोकेट झाले!
काही वर्ष सगळं सुरळीत सुरू होतं .याच शृंखलेत पुन्हा एकदा 2020 चा वाढदिवस अविस्मरणीय ठरला. सकाळी रोजच्या प्रमाणे कॉलेज ची तयारी केली .थंडी खूप होती म्हणून निघतांना स्वेटर आणि स्टोल चढवला . दार लावून निघाले सुद्धा पण घड्याळ बघितले तर अजून 10 मिनिटे वेळ होता . तेवढ्यात वरच्या मजल्यावर पल्लवीचा आवाज आला आणि मला आठवलं की तिला काहीतरी द्यायचं राह्यलंय म्हणून पुन्हा दार उघडून घरातून वस्तू घेऊन निघाले वरच्या मजल्यावर! पल्लविला वस्तू देण्यासाठी हात पुढे केला आणि शेवटच्या पायरीवर पाय ठेवण्यापूर्वी काही कळायच्या आत तिच्या घरातून टोबो सुसाट धावत ,भुंकत आला आणि त्याने हात तोंडात धरला आणि त्याच्या पूर्ण शक्तीनिशी माझ्यावर हमला केला ! मग काय अस्मादिक गडगडत खाली ठेवलेल्या कुंड्यांवर चारी मुंड्या चित! तेव्हा तर मी उठून खाली आले . पण 10 मिनिटांनी पायाचा घोटा आणि डाव्या बाजूला बर्गडीच्या खाली आणि मागे पाठीला जबरदस्त दुखू लागले .पुन्हा दवाखाना, इंजेक्शनस,एक्स रे ,बेडरेस्ट !या घटनेचा शॉक ट्रॅक्टर वाल्या अपघाता पेक्षा जास्त होता.कारण मला सारखं वाटत होतं आता पुन्हा माझे काही दिवस वाया जाणार ,म्हणून दिवसभर थोड्या थोड्या वेळाने रडू येत होतं. कदाचित फोन वर माझा आवाज ऐकून ,मला बघून मैत्रिणींना मला आलेलं नैराश्य दूर करण्याची इच्छा झाली आणि संध्याकाळी प्रत्येकीने 1 पदार्थ बनवून आणला. एवढंच काय माझ्या घरच्यांना काही करावं लागू नये म्हणून ताटल्या, वाट्या, चमचे ,इत्यादी वस्तू पण पल्लवीने तिच्या घरून आणल्या ! पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी केक कापून वाढदिवस साजरा झाला!दोस्त राष्ट्र जिंदाबाद!
वरीलपैकी बऱ्याच घटनांचे साक्षीदार असलेले काही लोक म्हणतात तुझी जन्मतारीख बदल (यंदा मलाही असच वाटल)तर काही लोक म्हणतात प्रत्येक वाढदिवसाला माझा पुनर्जन्म होतो!
आता वाचकांनीच याचा निवाडा करावा!
© मीनल सोमण
No comments:
Post a Comment