प्रत्येक धर्माची शिकवण सारखीच आहे फक्त मांडणी वेगवेगळी आहे. आज थोडसं जैन तत्वांबद्दल जाणून घेऊया. चातुर्मास सुरू झाला की लगेच भाद्रपद महिन्याचे वेध सुरू होतात. लगेच कॅलेंडर बघून पर्युषण पर्व कधी पासून सुरू होतय ते बघितले जाते. पर्युषण पर्व कसा, कुठे करायचा, एखाद्या तिर्थक्षेत्री जर जायचे असेल तर तशी तयारी सुरू केली जाते. जैन धर्मातील सर्वात पवित्र पर्व म्हणजे पर्युषण किंवा दशलक्षण पर्व होय. परि म्हणजे पूर्ण रुपाने उषण म्हणजे एका जागी स्थिर राहणे. वर्षातून एकूण तीन वेळा हे पर्व असते परंतु भाद्रपद शुध्द पंचमी पासून चतुर्दशी पर्यंत हे पर्व सर्वत्र मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने साजरे केले जाते. कारण पूर्वीच्या काळी पावसाळ्यात प्रवास करणे अवघड होते साधनांची सुलभता पण नसल्याने व्यापार आदि कार्य आपोआप कमी होत असत. अहिंसक वृत्तीचा समाज असल्याने धर्म आदेशानुसार चार महिने साधू, मुनी विहार थांबवून एकाच ठिकाणी राहतात. मुनींचा सत्संग जास्त वेळ लाभत असे. वेळही उपलब्ध असे म्हणून भाद्रपद महिन्यात हे पर्व साजरे केले जाते. वास्तविक प्रत्येकाने सदैव या आत्म्याच्या दहा गुणांची शिकवण घेऊन आत्म्यामध्ये वीतराग भाव जतन करणे अपेक्षित आहे. धर्म तर आत्म्यामध्ये प्रगट होतो तिथी, वारात नाही. 365 दिवसांची उर्जा, प्रेरणा या भक्तिपूर्ण आणि सश्रद्ध,मंगलमय अशा दिवसात मिळवली जाते. या पर्वाचा संबंध खेळ खेळून, प्रसाद खाऊन सण साजरा करण्याशी नसून त्यागाशी आहे. या दिवसात यथाशक्ती संयम, नियम, व्रत, उपवास, पूजाअर्चा करतात. स्वाध्याय आणि तत्वचर्चेला अधिकांश वेळ देतात. हे पर्व भोगमय नसून त्यागमय आहे. त्याची महानता त्यागामध्येच आहे.
पर्युषण पर्वाला दशलक्षणधर्म पर्व पण म्हणतात. आत्माला दुःख देणारे कर्ममल दूर सारण्यासाठी 10 उपाय सांगितले आहे. आत्म्याचा मूळ गुणधर्म काय आहे ते या दहा तत्त्वात सांगितले आहे. १- उत्तम क्षमा २ - उत्तम मार्दव ३ - उत्तम आर्जव ४ - उत्तम शौच ५ - उत्तम सत्य ६ - उत्तम संयम ७ - उत्तम तप ८ - उत्तम त्याग ९ - उत्तम आकिंचन्य १० - उत्तम ब्रम्हचर्य. हे ते दहा गुण आहेत.
वरील दहा लक्षणांना जोडलेला 'उत्तम' शब्द सम्यक् दर्शन, ज्ञान, चरित्र होय. (Right belife, Right knowledge, Right character/ behavior) यानां रत्नत्रय असं समर्पक नाव आहे. या रत्नत्रयींचे तत्व समजून उमजून पूजाअर्चा करतात. मोक्षाच्या इच्छेने अथवा नरकाच्या भितीने नव्हे तर इष्ट अनिष्टाच्या पलिकडे जाऊन कुठल्याही परिस्थितीत स्थिर राहून, समतोल साधून आपल्यात हे गुण आणण्याचे प्रयत्न केले जावे ही शिकवण दिली जाते.
१)उत्तम क्षमा - क्रोधाचा अभाव होणे हा क्षमा धर्म आहे. क्रोध करण्याचे कारण उत्पन्न झाले तरी जो क्रोध करत नाही तो क्षमा धर्मधारी आहे. हा आत्म्याचा मूळ स्वभाव आणि महान गुण आहे. म्हणून म्हणतात क्षमा विरस्य भूषणम् 
२)उत्तम मार्दव - मृदोर्भावः मार्दवं. मनाचा कोमलपणा. ज्ञान, कुल, रूप, बुध्दी, तप, बल यांचा अभिमान न करणे हा मार्दव धर्म आहे.
३)उत्तम आर्जव - ऋजोर्भावः आर्जव. सरळ स्वभावाला आर्जव म्हटले आहे. हा गुण समजून घेतांना मन वचन काया हे माध्यम उपयोगात आणवे लागते. मन में होय सो वचन उच्चरिये वचन होय सो तन से करिये। पण हे कसं हवं तर शुध्द हवं. विचार उच्चारले तर फुलांचा वर्षाव व्हावा आणि कार्यान्वित झाले तर जगाचे कल्याण व्हावे.
४) उत्तम शौच - शुचेर्भावः शौच. लोभाचा त्याग करणे शौच धर्म आहे. समस्त पापाचे मूळ लोभ आहे. फक्त पैशाचा लोभ म्हणजे लोभ असे नसून लोभ अनेक प्रकारचा आहे. यशाचा, नावाचा, कामभोग इ. इ. २५ प्रकार आहेत. लोभाच्या आहारी जाऊन मनुष्य अनेक चुकीच्या गोष्टी करतो आणि स्वतः चे पतन करून घेतो.
५) उत्तम सत्य - ऋतं सत्यं। न ऋतं अनृतं, असत्यं।सत्य हे नेहमी शिवरूप, कल्याणकारी, सुंदर आहे. स्थूल किंवा सूक्ष्म खोटे बोलू नये. हित - मित व प्रिय वचन बोलावे. कठोर अप्रिय बोलायची वेळ आली तर बोलूच नये. मौनम् सर्वार्थ साधनम्।
६) उत्तम संयम - मन - वचन - कायेच्या अशुभ प्रवृत्तींचा त्याग करणे, इंद्रियांना ताब्यात ठेवणे हा संयम धर्म आहे. सयंम दोन प्रकारचा आहे. १- प्राणी संयम - सर्व जीवांच्या रक्षणाचे भान ठेवणे. २- पाच इंद्रियांना आणि मनाला नियंत्रित ठेवणे.
७) उत्तम तप - इच्छानिरोधस्तपः अर्थात इच्छांचा निरोध करणे हे तप आहे. तप्यते इति तपः ज्याप्रमाणे सोने अग्नीत तापवल्यामुळे शुध्द होते त्याप्रमाणे आत्माआपल्या ज्ञानरूपी अग्नि मध्ये तापवून शुध्द होतो.
८) उत्तम त्याग - अनुग्रहार्थ स्वस्यतिसर्गो दानं अनुग्रह बुध्दीने स्वतः च्या मालकीच्या वस्तू देणे म्हणजे दान करणे. सत्पात्रांना चार प्रकार चे दान देणे हा देखील उत्तम त्याग आहे. दानाचे चार प्रकार - १-आहारदान २- औषध दान ३- ज्ञानदान ४- अभयदान. परंतु दान आणि त्याग परस्परविरोधी गोष्टी आहेत. दाना मध्ये एवढे देऊन किती ठेवले हा विचार केला जात नाही. त्यागामधे किती ठेवले हे बघितले जाते. काही वस्तू, गोष्टी अशा आहेत की त्याचा त्याग होतो दान होत नाही, काही अशा आहेत की त्यांचे दान होते त्याग होत नाही. काही अशा देखील आहे त्याचे दानही होते आणि त्यागही होतो. उदाहरणार्थ राग, द्वेष, आई, वडील, स्त्री, पुत्र यांना त्यागता येते, दान देता येत नाही. ज्ञान आणि अभय दान देता येते पण त्यागता येत नाही. औषध, आहार रूपया इ. त्यागही करता येते आणि दान पण करता येते.
९) उत्तम आकिंचन्य - मम इदं इति अभिसंधीनिवृत्तिःआकिंचन्य। कोणत्याही वस्तूंचा, व्यक्तिंचा, इतर गोष्टींचा अपरिग्रह म्हणजे आकिंचन्य आहे. माझे शरीर आणि आत्मा वेगळे आहेत तर दुसर्या कोणत्याही वस्तू माझ्या कशा असू शकतात?
१०) उत्तम ब्रम्हचर्य - ब्रम्हाणि आत्मनि चर्यते इति ब्रम्हचर्य। आत्म्याचे आत्म्यात लीन होणे ते ब्रम्हचर्य होय.
दशलक्षण पर्वानंतर लगेच दुसर्या दिवशी क्षमावली असते. दहा दिवसांच्या कडक उपवासा नंतर सुंठसाखर आणि नारळाचे तुकडे देऊन क्षमा मागायची आणि करायची असते. वैरभाव, मनोमालिन्य मिटवण्याची संधी वर्षातून एकदा मिळते. वैरभाव तर एक दिवसही ठेवण्यासारखा नाही. विकारांना जिंकणे हीच खरी वीरता आहे. क्षमा विरस्य भूषणम् म्हणून म्हटलं आहे.
या पर्वाची अनादिअनंता शास्त्रसंमत आणि युक्तिसंमत आहे. ज्ञानानंद स्वभावी असूनही आत्मा अज्ञानी व दुःखी आहे. म्हणून क्षमादि उत्तम गुण असलेले हे पर्व! एका विशिष्ट संप्रदायाचे लोकच साजरा करीत असले तरी ते सांप्रदायिक पर्व नाही, तर सर्वांसाठी आहे. कारण आत्मा तर सर्वांचा सारखाच आहे. आत्मा गरीब श्रीमंत, उच्चनीच, जाति-धर्म याच्या पलीकडे आहे एकसमान आहे. म्हणून आत्म्यातील विकारी भावनांचा त्याग करून उदात्त, अविकारी भावनांचे ग्रहण हा या पर्वाचा आधार आहे जो सर्वांनाच हितकारी आहे. म्हणून हे पर्व सांप्रदायिक नसून सर्व प्राणीमात्रांना सुखकारक, सन्मार्गदर्शक आहे.
या तत्त्वांचा विचार येतो तेव्हा ते वैज्ञानिक आधारावर सांगितले आहे हे लक्षात येते. रात्री भोजन त्याग, पाणी गाळून पिणे, तिन 'म'कारांचा त्याग (मद्य, मास, मध) अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, पाच औदुंबरांचा त्याग (वड, पिंपळ, उंबर, पाकर, अंजिर), रोज देवदर्शन करणे इत्यादी गोष्टींचे पालन करणे म्हणजे हे तत्व आत्मसात करणे. यातील सर्व गोष्टी चांगल्या आणि योग्य आहेत. वैज्ञानिक आहे. आरोग्यकारक आहे. आत्म्याचे दहा गुण जे सांगितले ते तर्कसंगत आहे. त्यात कुठेही खोटेपणा नाही. अतिरेक नाही तर या दहा गुणांमुळे आत्म्याचे खरे स्वरूप समजायला मदतच होते. कर्मकांडात न जाता केवळ तत्वांकडे जर आपण लक्ष दिले तर जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगता येईल. हे तत्त्व इतके पुरातन असूनही आजही काळसुसंगत आहे किंबहुना या कलीयुगातच याची जास्त गरज आहे.
कर्मकांडात, व्रतवैकल्ये, पूजाअर्चा यामध्ये वेळ घालवणे पटत नाही परंतु सामान्य लोकांना चांगल्या वागणूकीचे शिक्षण देण्यासाठी याचाच आधार होता. त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांना शहाणं करणे हा या कर्मकांडांचा उद्देश होता. यामध्ये माणसे गुंतली तर निदान काही काळ तरी वाईट प्रवृत्तींपासून परावृत्त होतील या चांगल्या भावनेने रुढी परंपरा, प्रथा सुरू झाल्या. पण त्याचं खूपच अवंडबर माजले. विपरीत परिणाम झाले. त्याचे स्वरूपच बदलून गेले आणि ते इतके भयावह झाले की नको तो धर्म नको ती पूजाअर्चा. सगळी शांतता, शिकवण, समाधान पार रसातळाला गेलं.
पिढ्यानपिढ्या कर्मकांड करून लोकं आता तरबेज झाले, शहाणे झाले. आता पुढची पायरी म्हणजे तत्व सोप्या शब्दात सांगून आत्मभान देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जेणे करून धर्माचे अवडंबर कमीत कमी होईल आणि " माणुसकी" हा एकच धर्म या पृथ्वीवर राहील.
No comments:
Post a Comment