Monday, January 13, 2020

इजिप्तायन

या आमच्या टूरला वेगळीच  पार्श्वभूमी आहे. सर्व बुकिंग वैगरे केव्हाच झालेलं होतं. ट्रीप १७ नोव्हेंबरला होती आणि दसर्‍यापासून मुकुंदच्या आधीच बऱ्या नसलेल्या तब्येतीने खूपच कॉम्प्लिकेटेड असे वळण घेतले, त्यामुळे आपण इजिप्तला जाऊ शकू, असं  एकदाही मनात आलं नव्हतं. पण एखादी गोष्ट घडायची असेल तर ती घडतेच ! याचे प्रत्यंतर या ट्रीपमुळे आले.
           अयन म्हणजे मार्ग! आमचा प्रवास,अकोल्याहून पुणे, तिथले डॉक्टर्स---त्यांनी अनपेक्षितपणे प्रवासाला दिलेली परवानगी--- नंतर मुंबई मार्गे कैरो असा घडला. म्हणून मेधा पोळ यांचे हे इजिप्तायन! ऐका म्हणजे वाचा---
      मुंबईहून कैरो साठी रात्री उशिरा म्हणजे २:५० ची फ्लाईट होती. मी ओव्हरनाईट विमानप्रवास याआधी कधीही केला नव्हता, त्यामुळे थोडा नविन अनुभव! साधारण साडेतीन तास लागतात पण टाईमझोन मधील फरकामुळे ते सात होऊन आम्ही सकाळी नऊच्या सुमारास कैरोला पोहोचलो.
         एक हटके डेस्टिनेशन, मनात अतिशय उत्सुकता होती. आमचे ला मेरिडियन पिरॅमिडस हाॅटेल थोडंसं शहराबाहेर होतं. रुममधुन एरवी कसं बीच वैगेरे दिसतं, तसे इथे सतत पिरॅमिडस डोळ्यासमोर   होते, मस्त ना!
   Pacific world travels चे टूर मॅनेजर्स  चांगले  होते.          बरोबर ईजिप्शियन गाइड होता, त्याचे इंग्लीश तसे सोपं व कळत होतं, पण काही काही शब्द अगदी वेगळेच उच्चारायचा, ईजिप्शियन अॅक्सेंट होता थोडा! त्यामुळे आपण शब्द जाणून घेईपर्यंत तो फास्ट उड्या मारत कुठल्या कुठे पोहोचलेला असायचा. कुणी ऐको न ऐको , तो आपला सिन्सिअरली सगळी माहिती देत रहायचा. माझी ट्रॅव्हल्स बरोबर ट्रीप करायची ही पहिलीच वेळ, तीही एवढया मोठय़ा  ग्रूपबरोबर (९० जणांचा) मनमानी नव्हती करता येत! ते जरा खटकत होतं, पण ग्रुप बरोबरची मजा वेगळीच! असो.

      आता  थोडंसं इजिप्त विषयी....
इजिप्त- फेरोंची प्राचीन भूमी! त्यांच्या अस्तानंतर खूप परचक्रं आली.इ.स.पूर्वी १००० वर्षं इथं परकीय सत्तेनं प्रथम पाय रोवले. गेली तीन हजार वर्ष इथं पर्शियन, ग्रीक, रोमन, तुर्की अशा अनेक परक्या लोकांचं राज्य होतं. एक सत्ता जाऊन,दुसरी आली, तरी ती  परकीयच असे.१९५२ साली प्रेसिडेंट नासरने इंग्रजांना घालवून  सत्ता हाती घेतली.ह्याचे वर्णन म्हणजे फार मोठा माणूस! संबंध अरब जगताचा लाडका,धैर्याचा महामेरू!
इजिप्तचे २ भाग- लोअर इजिप्त आणि अपर इजिप्त! नकाशात पहाताना, लोअर म्हणजे दक्षिण आणि अपर म्हणजे उत्तर असं आपण मानतो.इथं त्याच्या बरोबर  उलट आहे.
अपर इजिप्त- लुक्साॅर ,आस्वान इ. च्या दक्षिणेकडचा भाग.
लोअर इजिप्त-कैरो,अलेक्झांड्रिया इ.  चा उत्तर भाग .
( आम्ही फक्त लोअर इजिप्त पाहिले)
हे असं उलटं का? नाईल नदीमुळे! नाईल ही निसर्गाची इजिप्तला देणगी असली तरी "इजिप्त ही नाईलची जगाला देणगी आहे." हे हेरोडोटस॒॒ या प्राचीन ग्रीक इतिहासकाराचं  वाक्य आपल्याला माहितच आहे.
    इजिप्तमध्ये ९४% वाळवंट आणि फक्त ६ % पिकाऊ जमीन आहे, तीही नाईलच्या किनारी, तिच्याच गाळाने निर्माण झालेली. यामुळेच मूळ वास्तव्य, थोर संस्कृती तिच्याच किनारी बहरली.   तिच्या प्रवाहाची दिशा तीच इजिप्तच्या जीवनाची दिशा! त्यामुळे जिथून नदी देशात शिरते, तो अपर भाग, आणि खाली येऊन समुद्राला मिळते तो लोअर भाग. मग नकाशा काही का म्हणेना!
       नाईल नदी-- डोळ्यांत मावत नव्हती. पाण्याने अगदी गच्च भरलेली. रुंद शब्द तोकडा पडावा इतकं मोठं पात्र, स्वच्छ पाणी!. आपल्याला प्रवासात खूप ठिकाणी भेटत रहाते. मुक्कामाच्या दुसऱ्या रात्री नाईल नदीवर क्रुझ डिनर पार्टी होती. रात्रीची नाईल , वेगळीच सुंदर भासली. आणि मुख्य म्हणजे कुठेही गलिच्छपणा नाही, गडबडगोंगाट नाही. खूप छान वाटले नाईल किनारी!

तिथे क्रुझवर बेली डान्सचा अनुभव घेतला, या आधी दुबईतही घेतला होता अर्थात! पण प्रत्येक ठिकाणच्या नृत्यप्रकारात थोडासा वेगळेपणा असतोच. हा नृत्यप्रकार फेरोंच्या प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. प्राचीन थडग्यावरच्या भिंतींवर याची कितीतरी चित्रं आहेत. हा नृत्यप्रकार पहाणे हा एक खासच अनुभव आहे. एक अतिशय सुंदर ईजिप्शियन ललना तो सादर करत होती, त्यामुळे सगळे खुषीत  पहात होते.
दुसरा skirt-dance हा Egyptian folk danceचा एक प्रकार!एक नर्तक रंगीबेरंगी skirt,ज्यावर विविध रंगांचे छोटे लाइट्स लावलेले असतात,एकाच दिशेने, साधारण ४०-४५ मिनिटे ,न थांबता गिरक्या घेत फिरत असतानाच, विविध   नृत्यछटा साकारतो.हा थक्क करणारा नृत्यप्रकार,प्रत्यक्षच पहायला हवा!
(क्रमशः)

Saturday, January 11, 2020

अप्रूप

मला वाटतं आजकाल हा शब्दच मुळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कुणालाच कशाचंच अप्रूप वाटेनासं झालं आहे.  अर्थात हे व्यक्ती सापेक्ष आणि परिस्थिती सापेक्ष आहे हे ही तितकेच खरे आहे म्हणा! सगळं काही पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढं भरभरून मिळतं तेव्हा अप्रूप वाटेलच कसं कशाचं? खाण्यापिण्याचं म्हणा, कपड्यालत्याचं म्हणा, प्रवासाचं म्हणा की कसल्या हौसेमौजेचं म्हणा. मनात काही येण्याचाचं अवकाश कि सगळं कसं अल्लाउद्दीनचा दिवा घासल्याबरोबर त्यातल्या राक्षसाने हात जोडून, 'हुकूम सरकार!' म्हणत पुढे आणून ठेवावे तस्से हजर असते.  मला वाटतं अजून पुढच्या पिढीला तर अल्लाउद्दीन वगैरे कथा म्हणजे एकदम भंकस वाटतील. त्यांना वाटेल की अल्लाउद्दीन कशाला हवा असतो बुवा, सगळं काही तर मनात येण्यापूर्वीच मिळत असतं विनासायास!

पण आम्ही खरंच भाग्यवान! आमच्या लहानपणी तसं नव्हतं काही. आम्हाला खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचंही अप्रूपच  असायचं. आम्ही राहायचो अंजनगावला. छोटेसे टुमदार गाव. एकदम खेडंही नाही म्हणता येणार आणि शहरही नाही असे. मस्त भरपूर मोकळी जागा, भरपूर सवंगडी खेळायला, आणि भरपूर वेळ सुद्धा. अभ्यासाचं, निरनिराळ्या क्लासेसचं  आणि जीवघेण्या स्पर्धेचं मुळी सुद्धा टेन्शन नव्हतं. खायचं, प्यायचं आणि बागडायचं असं ते रम्य बालपण. आमच्या गावात ब्रेड वगैरे सुद्धा नाही मिळायची तेव्हा! त्यामुळे त्या साध्या ब्रेडचं सुद्धा अप्रूपच असायचं आम्हाला. कधीमधी बाबांना शाळेच्या कामासाठी अमरावतीला जावे लागायचे, तेव्हा बाबा मग तेथून पालेकरची मोठ्ठी ब्रेड आणायचे. कोण खुश व्हायचो आम्ही तेव्हा! ब्रेड ला येणारा व्हॅनिला चा तो मंद मंद सुवास,त्या पांढऱ्या पांढऱ्या, मऊ मऊ चौकोनी स्लाईसेस,  त्याच्या त्या खरपूस विटकरी रंगाच्या कडा, त्याची ती स्पंज सारखी जाळी! दुधात बुडवून खातांना अक्षरशः सुखाची परमावधी वाटायची तेव्हा!  

आणखी तशीच तेव्हाची आणखी  एक चविष्ट आठवण म्हणजे आमच्या दारावरून  " द~हि .. व~डे.. कचोरी~ये.... !" असे मोठ्ठ्याने ओरडत जाणारा रोजचा कचोरीवाला. त्याच्या त्या आवाजाने तोंडाला असं पाणी सुटायचं की  काही विचारू नका. यायचा रोजच पण तेव्हा असं सर्रास बाहेरच खाण्याची पद्धत अजिबातच नव्हती. त्यामुळे कचोरी आम्हाला क्कचितच मिळायची. तीन चार  महिन्यातून एखाद्या वेळेला बाबा म्हणायचे "आज आपण घेऊ बरं का कचोरी दुपारी!" झालं, आम्ही दुपारी केव्हा तो कचोरीवाला येतो याची वाट बघत बसायचो. एकदाचा दुरून त्याचा नेहमीचा परीचित आवाज ऐकायला यायला लागला की आम्ही फाटकापाशी धावत जाऊन  त्याला बोलवायचो. त्या कचोरीवाल्याचा तो काहीसा कळकट मळकटलेला वेष अजूनही माझ्या चांगला लक्षात आहे. पांढुरक्या रंगाचा थोडासा आखूड पायजामा, कोणत्यातरी फिक्कट रंगाचा शर्ट, डोक्यावर काळपट रंगाची टोपी, पायात तुटक्याफुटक्या वहाणा, काखेत एक अवर ग्लास च्या आकाराचे लोखंडी स्टॅन्ड आणि डोक्यावर  पसरट आकाराचे एक मोठठे टोपले! त्यात कचोऱ्या आणि बाकीची सामग्री रचून ठेवलेली असायची. जवळ आल्याआल्याच कचोरीचा तो खमंग वास थेट नाकात जायचा आणि केव्हा एकदा कचोरी खातो असं होऊन जायचं. आल्याआल्या त्याचं ते लोखंडी स्टॅन्ड जमिनीवर ठेऊन त्यावर तो डोक्यावरचे पसरट टोपले काढून ठेवायचा. मग एक एक टप्पोरी कचोरी काढून त्यात दही, बारीक चिरलेला पातीचा कांदा, तिखट, मीठ, बारीक शेव असं सगळं टाकून एकदाची ती कचोरी आमच्या हातात यायची. त्या दह्यात अर्धवट भिजलेल्या खमंग, खुसखुशीत कचोरीचा  पहिला घास जिभेवर कसा अलगद विरघळायचा! मिटक्या मारत मारत आम्ही पोटभर त्या कचोऱ्या खायचो. मग काही एकच मिळेल वगैरे काही बंधन नसायचं. आमची आई नेहमी म्हणायची खातांना कसं मन तृप्त होईल असं खावं, त्यामुळे मग मनसोक्त खाऊन घ्यायचो. अजूनही त्या कचोरीची चव आठवली कि तोंडाला पाणी सुटतचं. बाकी तसं खाण्याच्या गोष्टींचं जास्त कौतुक नसायचं एरवी. कारण भरपूर करणे आणि पोटभर खाऊ घालणे हा आमच्या आईचा आवडता उद्योग होता. त्यामुळे आम्ही भावंडं नेहमी कसे तृप्त असायचो. 

नवीन कपड्यांचं पण अप्रूप असायचंच. अर्थात कपडे वगैरे आमच्या चॉईस ने नसायचेच कधी. म्हणजे त्यात काही चॉईस असतो हेच आमच्या गावी नव्हते. आमचे कपडे बाबाच आणायचे. एवढे मात्र खरे कि बाबा नेहमीच चांगल्या प्रतीचे कपडे घ्यायचे आम्हा भावंडांना. पण कपडे आणायच्या वेळा ठरलेल्या. एक ड्रेस दसऱ्याला, एक दिवाळीला, रोज घालायचे दोन, आणखी एखादा अधेमधे आणि शाळेचे दोन युनिफॉर्म.  एवढे कपडे अगदी रग्गड वाटायचे.

सगळ्यात मज्जा यायची ती तर श्रावण महिन्यात आमच्या गावात  काठीची यात्रा भरायची त्यात. त्यात आम्हाला अगदी मनसोक्त खरेदी करता यायची. चक्क 15, 20 रुपये मिळायचे तेव्हा आम्हाला खर्चायला. आमच्यासाठी ती एक पर्वणीच असायची. केव्हढा उत्साह असायचा तेव्हा. उठल्यापासूनच 4 वाजताचे वेद लागायचे आम्हाला. सगळ्याजणी मैत्रिणी जमायचो आणि चिवचिवत निघायचो जग खरेदी करायला निघाल्याच्या थाटात. तिथे पोहचल्यावर तर त्या सगळ्या छोट्या छोट्या दुकानां मध्ये काय नसायचं ते विचारा . . !  छोटे छोटे रंगीबेरंगी प्लास्टिकचे खेळणे,भांडी, गाड्या,विमानं, फुलं, बॉल,बांगड्या, कानातले, गळ्यातले, टिकल्या आणीक काय काय ... बुढढीचे बाल काय, खरमुरे काय अन पॉपकॉर्न काय, आईस फ्रुट काय,... केवढं अप्रूप असायचं त्या सगळ्या गोष्टींचं! सगळं त्या 15, 20 रुपयात मस्त जमायचं. खरेदीचा मनसोक्त आनंद लुटायचो तेवढ्याश्या पैशात आम्हीं. छोट्या छोट्या गोष्टींचा भरभरून आनंद लुटता येण्याचे ते रम्य दिवस. आता ते सगळं आठवलं कि खूप हसायला येतं. पण मन त्या आठवणींमध्ये रंगून जातं अन देवाला प्रार्थना करावीशी वाटते की देवा, वय कितीही वाढू दे पण एखाद्या गोष्टी बद्दल अप्रूप वाटण्याएवढं मन बालीश नक्की ठेव.  कशाचंच अप्रूप नाही वाटलं तर जगण्यात मजा तरी काय येईल हो? खरंय की नाही?     

सौ. मधुमती वऱ्हाडपांडे 
अकोला

Friday, January 10, 2020

गारवा !

थंडी पडायला सुरुवात झाली की गरम कपड्यांसोबतच आठवण होते ती शेकोटीची. रात्री सगळं आटोपल्यावर मस्त शेकोटी भोवती गोल करुन गप्पा करत करत हातपाय शेकणे  म्हणजे मजाच असे .किंवा घरातल्या घरात घमेल्यातच असा शेकोटीचा आनंद घेता येतो पण खेड्यातली मजा ती औरच, त्याला तोडच नाही. सकाळी दात घासायला सुद्धा पाणी तापवायला ठेवलेल्या चुलीसमोर बसुन दात घासणे .तिथेच बसुन दूध किंवा चहा पिणे इतकेच काय तर एखादा बटाटा किंवा रताळ त्याच चुलीत भाजून नास्ताही उरकणे. आहे की नाही गंमत ! ....एक गहू तिचे प्रकार बहू ह्याच म्हणीप्रमाणेच... एक चूल तिचे उपयोग फुल्ल! ...जरा गमतीने जुळवलय पण मान्य करु शकतो.
थंडीच्या मोसमात भरताची वांगी ,हुरड्याची डहाळी, हरबर्याची डहाळी तिथल्यातिथे गरमागरम भाजून खाणे म्हणजे तर पर्वणीच! हा रानमेवा तर रसना तृप्त   करतो पण मन भरत नाही  असं काहीसं होतं...........पेरु, बोरं ,आवळा ,संत्री हे तर अजुन रांगेत उभे केलेच नाही. एकीकडे थंडीने येणारा सर्दी ,खोकला आणि ह्या फळांचे आगमन म्हणजे तुझं नि माझं जमेना पण तुझ्याविना करमेना असे. तोंडाला चव आणणारे नि मिटक्या मारत खाणारे हे सगळे प्रकार आपल्याला खुणावतातच.जेवण झाल्यावर मस्त ऊन्हात बसुन ही फळं खाणे म्हणजे स्वर्गसुखच.!............... त्यात भाज्याही कुठेच मागे नाही संपूर्ण बाजार हिरव्यागार रसरशीत पालेभाज्या ,फळभाज्यांनी भरलेला. कोंथिबीरीची वडी खावी ती याच दिवसात तर उंधियो प्रकारची मिक्सभाजी सर्वगुणसंपन्न अशी आणि भरीत भाकरीचा बेत म्हणजे तर अस्सल वर्हाडी मेनू. कधी दह्यातल भरीत धांड्यांच्या दांडीने हुरड्यासोबत शेतात खाल्लेल तर कधी खानदेशी चमचमीत भरीत भाकरी ठेच्यासह खाल्लेलं अवर्णनीय!  ........ह्याच थंडीत शरीराच भरण पोषण करणारे मेथीडिंकाचे लाडू किंवा संक्रातिचा तीळगुळाचा लाडू आवश्यकच शरिराला उर्जा मिळावी म्हणून ! खा......खा....नि खा मस्त तब्येत करा हे या ऋतूच तंत्र!.............................   

वसंताची चाहूल लागते तशी झाडेही लदलदून तयार झालेली. तिला लागलेली टवटवीत तजेलदार फुले तर मनमोहकच! शेवंती,गुलाब ह्या बहारदार फुलांनी सजलेली झाडे बघून आपलिही अवस्था एखाद्या भुंग्यासारखी न झाली तर नवलच! आणि अशा सुंदर मनभावन काळात येणार्या सणांच्या आगमनाने ते साजरे करण्याचा हर्षोल्हास द्विगुणीत होणंही तितकच साहजिक म्हणूच वाटतं की,
         
        ऋतू मागुनी ऋतू येती
          वसंताची त्यात ख्याती
         फुले ,फळे, भाज्या त्या किती
          नवरसना तृप्त करिती  !!!
@अर्चना मुळ्ये.

Wednesday, January 8, 2020

Birthday mischeifs


माझे बाबा आईची गम्मत करून सांगायचे की माझा जन्म झाला तेव्हा माझी आई खूप रडली होती कारण मी दोन बहिणींच्या पाठीवर जन्मलेली तिसरी मुलगी होती!( गमतीचा भाग सोडला तर आता माझ्या बहिणी तक्रार करतात की "आईचा सगळ्यात जास्त तुझ्यावरच जीव आहे")

       माझं बालपण वाशीम मध्ये असलेल्या PKV च्या quarter मध्ये निसर्गरम्य वातावरणात अगदी रम्य म्हणावं असं गेलंय .त्या बंगल्यात आमच्या परसदारी खूप मोठ्ठी फळं आणि भाज्यांची बाग होती त्यात एका कोपऱ्यात मोठ्ठ चाफ्याच झाड होतं . ज्याच्यावर चढून फुलं तोडणं हा माझा आवडता उद्योग होता. आई नेहमी ओरडायची चाफ्याची फांदी नाजूक असते म्हणून त्यावर चढत जाऊ नको ,एखाद्या दिवशी फांदी तुटली तर तू पडशील पण मी कधीच ऐकलं नाही . अनेकदा निर्विघ्नपणे चाफ्यावर चढून उतरायची. अशातच माझा पाचवा वाढदिवस आला . आईने मोरपंखी रंगाचे परकर पोलक शिवलं. त्याला छान टिकल्या लावल्या. मी खूप हरखून गेले . केव्हा एकदा तो ड्रेस घालुन नटते असं झालं होतं. त्या काळी नाटण्याचा एकमेव पर्याय होता फुलं ,गजरा, शेवंतीची किंवा बुचाच्या फुलांची वेणी, या कानापासून त्या कानापर्यंत माथ्यावर लावणं. त्यातच आईनी केसाला लावण्याचा कापडी बँड आणला . मग काय त्या बँड मध्ये खोचायला चाफ्याची फुलं हवी म्हणून अस्मादिक नेहमीप्रमाणे चढले झाडावर...पण कावळा? बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ..कडाड काड.....आणि मी जमिनीवर! पण तेव्हा वय लहान म्हणून थोडं खर्चटण्या पलीकडे काही झालं नाही. '

        पुढे आम्ही वाशीम च्या अगदी मध्यभागी असलेल्या वस्तीत राहायला गेलो कदाचित मी 5 व्या वर्गात असेन . तेव्हा आईने वाढदिवसासाठी खूप छान बेबीपिंक रंगाचा घेरदार फ्रॉक शिवला ,त्यावर नाजूक भरत काम केलं होतं. तयार झाल्यावर वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आईने घालून बघायला सांगितला . खूप आवडला मला तो फ्रॉक ,म्हणून धावतच घरासमोरच्या मैत्रिणीला दाखवायला गेले. संध्याकाळ उलटली होती . कौतुकाच्या चार गोष्टी करेपर्यंत अंधार झाला. मी घरी यायला निघाले तर रस्ता पार करेपर्यंत लाईन गेली . पण सरावाची पायवाट आणि पायऱ्या असल्याने मी न थांबता तशीच घरी निघाले. आमच्या त्या घराला लोखंडी ग्रीलचे गेट होते त्याला जाडजूड लोखंडी चौकट होती. मी जपून पावलं टाकत पायऱ्या चढले आणि एकाएकी कोणीतरी धक्का द्यावा अशी घेरी येऊन त्या चौकटीवर माझा कपाळमोक्ष झाला . झालं ! मग काय वाढदिवसाच्या दिवशी कपाळावर भलं मोठं टेंगुळ घेऊन ,सुजलेल्या चेहऱ्याने वाढदिवस साजरा झाला !

         पुढे बाबांचं आजारपण, बहिणींची लग्न,या धामधुमीत ,माझा वाढदिवस केव्हा आला केव्हा गेला हे विशेष आठवत नाही. लग्नानंतर ही घरी मोठ्यांचे वाढदिवस साजरा करण्याची फारशी पद्धत नव्हती .
       नौकरी लागल्यावर सुरुवातीला माझ्या वाढदिवसाला  विद्यार्थिनींनी  भेटवस्तू दिली होती ,जी घेण्यासाठी त्यांच्याजवळ खरंच पैसे नव्हते तरी पण मॅडम च्या प्रेमाखातर त्यांनी पॉकेट मनी खर्च केला होता.त्यामुळे मला आनंदापेक्षा वाईटच जास्त वाटलं.तेव्हापासून विद्यार्थिनींना माझी जन्म तारीख कळूच नाही देत. 
        मधल्या काळात फारशी धडपड न होता ,मैत्रिणींनी ,नातेवाईकांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा  स्वीकारण्या पलीकडे ,वाढदिवस साजरा केल्याचं फारसं काही आठवत नाही.....नाही म्हणायला अंजु, भाग्यश्री,शमा आठवणीने वाढदिवसाला माझ्या आवडीचा पदार्थ न चुकता आणून देत. आणि 1,2मैत्रिणी प्रेमाने दरवर्षी भेटवस्तू देत असत.
         पण....2011 मध्ये माझ्या विद्यार्थिनींनी कुणाला तरी विचारून माझी जन्मतारीख शोधली आणि अतिशय गुप्तता पाळून केक आणून वाढदिवस साजरा केला. माझ्या कोणत्याच विरोधाला न जुमानता, मला केक  कापायला लावली. उपास असल्याने मी कापलेल्या केक चा तुकडा जेवतांना खाईन असे म्हणून डब्यात घेतला. आणि रोजच्या रस्त्याने घरी निघाले.चौकात रस्ता पार करतांना काय झालं कुणास ठाऊक मी करकचून दोन्ही हातातले ब्रेक दाबले . आणि गाडीसकट जोरदार फरफटत  पडले. गाडी माझ्या डाव्या गुडघ्यावर पडली आणि या गोंधळात मागून येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा ब्रेक लागेपर्यंत रस्त्यावर पडलेल्या माझ्या उजव्या हाता वरून ट्रॅक्टर चे समोरचे चाक गेले आणि मोठे चाक उजव्या गुढघ्यावर येऊन थांबले. आणि जीवावर बेतलेला अपघात, हात आणि गुडघ्यांवर निभावला. याप्रकारा नंतर माझी  मुलं खूप धास्तावली म्हणून त्यांच्या आग्रहाने त्यानंतर पुढचे 2-3 वर्ष माझ्या वाढदिवसाला आम्ही सहलीला गेलो . तिथे सुद्धा सगळे जण वाढदिवसाच्या दिवशी माझी खूप काळजी घेत होते.

        तरी पुन्हा एकदा कठीण वाढदिवस आला . मोबाईल नसल्यामुळे लँड लाईन  फोन वर दिवसभर  वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत होते.  संध्याकाळी फोन वाजला तर सौरभने उचलला आणि मला हाक मारली . मी त्याच्या मागून घाईने समोर यायला आणि तो त्वरेने मागे सरकण्याला एकच वेळ आली . त्यात त्याची टाच माझ्या डाव्या पायाच्या करंगळी आणि त्याच्या बाजूच्या बोटात फसली आणि दोन बोटांची हाडं डीसलोकेट झाले!

             काही वर्ष सगळं सुरळीत सुरू होतं .याच शृंखलेत पुन्हा एकदा 2020 चा वाढदिवस अविस्मरणीय ठरला. सकाळी रोजच्या प्रमाणे कॉलेज ची तयारी केली .थंडी खूप होती म्हणून निघतांना स्वेटर आणि स्टोल चढवला . दार लावून निघाले सुद्धा पण घड्याळ बघितले तर अजून 10 मिनिटे वेळ होता . तेवढ्यात वरच्या मजल्यावर पल्लवीचा आवाज आला आणि मला आठवलं की तिला काहीतरी द्यायचं राह्यलंय म्हणून पुन्हा दार उघडून घरातून वस्तू घेऊन निघाले वरच्या मजल्यावर! पल्लविला वस्तू देण्यासाठी हात पुढे केला आणि शेवटच्या पायरीवर पाय ठेवण्यापूर्वी काही कळायच्या आत तिच्या घरातून टोबो सुसाट धावत ,भुंकत आला आणि त्याने हात तोंडात धरला आणि त्याच्या पूर्ण शक्तीनिशी माझ्यावर हमला केला ! मग काय अस्मादिक गडगडत खाली ठेवलेल्या कुंड्यांवर चारी मुंड्या चित!  तेव्हा तर मी उठून खाली आले . पण 10 मिनिटांनी पायाचा घोटा आणि डाव्या बाजूला बर्गडीच्या खाली आणि मागे पाठीला जबरदस्त दुखू लागले .पुन्हा दवाखाना, इंजेक्शनस,एक्स रे ,बेडरेस्ट !या घटनेचा शॉक ट्रॅक्टर वाल्या अपघाता पेक्षा जास्त होता.कारण मला सारखं वाटत होतं आता पुन्हा माझे काही दिवस वाया जाणार ,म्हणून दिवसभर थोड्या थोड्या वेळाने रडू येत होतं.  कदाचित फोन वर माझा आवाज ऐकून ,मला बघून मैत्रिणींना मला आलेलं नैराश्य दूर करण्याची इच्छा झाली आणि संध्याकाळी प्रत्येकीने 1 पदार्थ बनवून आणला. एवढंच काय माझ्या घरच्यांना काही करावं लागू नये म्हणून ताटल्या, वाट्या, चमचे ,इत्यादी वस्तू पण पल्लवीने तिच्या घरून आणल्या ! पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी केक कापून वाढदिवस साजरा झाला!दोस्त राष्ट्र जिंदाबाद!

        वरीलपैकी बऱ्याच  घटनांचे साक्षीदार  असलेले काही लोक म्हणतात तुझी जन्मतारीख बदल (यंदा मलाही असच वाटल)तर काही लोक म्हणतात प्रत्येक वाढदिवसाला माझा पुनर्जन्म होतो!
    आता वाचकांनीच याचा निवाडा करावा!

                   © मीनल सोमण

Tuesday, January 7, 2020

फुकेट-क्राबी टुर (पार्ट-2)

क्राबी चा मुक्काम आटोपला.दुसऱ्या दिवशी  फुकेट ला निघायचं होत.सकाळी उठल्यावर पहिले बीच वर फिरून आलो,सामान आवरून ब्रेकफास्ट केला, अन फुकेट ला निघालो. तोच सुंदर रस्ता परत अनुभवला!
फुकेट मधे शिरल्यावर मात्र हॉटेल ला पोचेपर्यंत ट्रॅफिक मुळे खूप वेळ लागला. 
क्राबी कोकणातल्या खेड्यासारखं होत, तर फुकेट मेट्रो सिटी ! 
इथलं ही हॉटेल रामदा इन् !  हॉटेल छानच होत, पण शहरी लुक असलेलं. झाडीच्या कुशीतल क्राबी च रामदा जास्त आवडलं.

संध्याकाळी 6 ला 'फंटासिया शो'ला निघालो.
 बाहेर सुंदर लायटिंग ,कृत्रिम तलाव अन धबधबा,स्वागताला थाई वेशभूषेतल्या मुली,असा सगळा माहोल होता.
आत प्रशस्त जागा,त्यात छोटे- मोठे, मनोरंजन करणारे शो,आणि डायमंड  ज्वेलरी पासून तर कपड्यांपर्यंत मोठी मोठी दुकान होती. आधी डिनर अन मग  शो होता.
डिनर चा हॉल भला मोठा ,4000 लोक एका वेळेस जेऊ शकतील एवढा! सगळ्यांना टेबल नं. दिलेला होता अन बुफे मध्ये  सगळ्या प्रकारचे अगणित  पदार्थ मांडले होते.आतली सजावट अप्रतिम होती. एवढे लोक एकावेळी जेवत असून ,कुठेही गडबड गोंधळ नव्हता.
शो ची वेळ झाली. ऑडीटोरियम अतिशय भव्य होत. थाई संस्कृती आणि दंतकथा गुंफलेल्या ह्या शो मधे, 15 हत्ती, गायी -म्हशी ,कोंबड्या ,बकऱ्या ,कबुतर,तर होतेच ,शिवाय स्टेज च्या वरून खालून ,बाजूनी,प्रेक्षकांच्या डोक्यावरून ,मधून जिथे जिथे शक्य होत तिथून अवतरणारे आकर्षक वेशभूषा असलेले 150 कलाकार,यांचा ही सहभाग होता.शो अदभूत नसला तरच नवल!

त्यानंतर आम्ही बांगला स्ट्रीट ला जायचं ठरवलं. 400 m.असलेली बांगला स्ट्रीट म्हणजे फुकेट च नाईट लाइफ !
निऑन लाइट चा झगमगाट ,ओळींनी असलेले बार ,डान्स बार,अन हॉटेल्स इथे आहेत. बऱ्याच बार मधे लाइव्ह बँड सुरू होता.बार मधे मुली टेबल वर पोल डान्स अन अक्रोबॅटस करून लक्ष वेधून घेत होत्या. बार च्या बाहेर उभ्या असलेल्या मुली बार मधे चालण्यासाठी गिऱ्हाईका ला भरीस पाडत होत्या.रस्त्यावर खुल्लमखुल्ला देहविक्रयाचे सौदे (भाषा आणि चलनाच्या फरकामुळे कॅलक्यूलेटर वर हिशोब वगैरे करून ) सुरू होते.
फुल विकणारे ,आपल्या बार ची जाहिरात करणारे ,रस्त्याच्या मधोमध आपल्या करामती दाखवणारे,या बरोबरच सगळीकडल वेगवेगळ म्युझिक ,हे  एकमेकात मिसळून एक संमिश्र कलकलाट त्या गजबजलेल्या रस्त्यावर होता.रस्ता इतका गजबजलेला की मुंगीच्या पावलाने पुढे जावं लागतं होत. 
एकदा नाइट लाईफ बघायचं म्हणून तिथे गेलो खर ,पण तोकड्या कपड्यात टेबल वर नाचणाऱ्या मुली ,त्यांच्याभोवती दारू पीत बसलेले आंबट शौकीन ,भडक मेकअप करून गिऱ्हाईक पटवणाऱ्या मुली हे सगळं बघून उबग आला.कशी बशी एक चक्कर मारून परतलो.एक मात्र खरं ,वेश्याव्यवसाय सोडला,तर तिथलं बाकी वातावरण मात्र अतिशय जिवंत अन झिंग आणणार  होत.

दुसऱ्या दिवशी सकाळी फुकेट दर्शन ला निघालो.
बरोबर गाईड होता। सगळ्यात आधी कॅरोन व्यू पॉईंट ला गेलो. उंचावरून दिसणारे निरनिराळे आयलंडस् , चमचमणारे निळेशार पाणी अन पांढरी शुभ्र वाळू ,यामुळे सुंदर दिसत होते.
तिथून मग फुकेट च्या सगळ्यात जुन्या चलॉंग टेम्पल ला गेलो।तीन मजली असलेलं हे टेम्पल खूप मोठं आहे. भिंती अन छतावर बुद्धाच्या आयुष्यातील  स्टेजेस रंगवले आहेत.बुद्धांच्या अनेक  सोनेरी मुर्ती तीनही मजल्यांवर आहेत.खूप शांत अन प्रसन्न वाटलं तिथे. त्यासमोरच आता एक नवीन टेम्पल बांधलाय.तिथे दोन मूर्ती होत्या. लोक कागदाच्या पुडीत आणलेला सोन्याचा वर्ख त्या मूर्तींना चिकटवत होते. बाहेर  विटांची उंच भट्टी होती. आपली मनातली इच्छा पूर्ण झाली की इथे येऊन फटाके फोडायचे ,अशी प्रथा आहे. तिथे लोकांनी आणून दिलेले फटाक्यांचे खूप बॉक्स ठेवले होते.एक माणूस ते थोड्या थोड्या वेळानी भट्टीत टाकून फोडत होता.
त्यानंतर आम्हीं टायगर किंगडम ला गेलो. टायगर किंगडम म्हणजे झू सारख काही असेल जिथे वाघाच्या करामती दाखवत असतील अस वाटलं, प्रत्यक्षात तिथे गेल्यावर कळलं की वाघाजवळ उभं राहून त्याला हात लावायचा अन फोटो काढायचे ! ते वाघ ही सिडेटिव्हस दिलेले! इतका रुबाबदार प्राणी, सुस्त असल्यामुळे अतिशय केविलवाणा दिसत होता. लोक त्याच्यावर झोपून,शेपटी ओढून ,त्याचा पाय धरून फोटो काढत होते. पाहून खूप वाईट वाटलं ,केवळ पैसे भरले म्हणून आम्ही आत जाऊन फोटो काढून आलो.थायलंड ला एका मनेका गांधींची आवश्यकता आहे असं तीव्रतेने वाटलं .टायगर किंगडम हुन हॉटेल ला येताना ,जुन्या फुकेट मधून आलो। अतिशय अरुंद गल्या, थाई ,चायनिज श्राइन्स अन ऐतिहासिक इमारती असलेला तो भाग होता. 
हॉटेल येऊन आराम केला.संध्याकाळ शॉपिंग साठी राखून ठेवली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 लाच फी -फी आयलंड ला निघालो. स्पीड बोट नी जायला दोन तास लागले. तो सगळा प्रवास आम्ही जागेवर न बसता डेक वर उभं राहून केला.चारही बाजूला नजर जाईल तिथपर्यंत निळेहिरवे  स्वछ पाणी, त्यामध्ये लाईम स्टोनच्या झाडांनी आच्छादलेल्या सुळक्यांच्या रांगा ,छोटे छोटे आयलँड्स,सगळं मन भरेस्तोवर पाहिलं.
फी फी ला पोचलो. तिथे बघितलेल्या आयलँड्स पैकी फी- फी सगळ्यात सुंदर आहे. बारीक शुभ्र वाळू, ओळींनी असलेले नारळाची, पाम ची झाड, स्फटिकसारखं स्वछ पाणी,अन एका बाजुनी कड करून उभे असलेले उंचच उंच लाईम स्टोन चे निरनिराळ्या आकाराचे सुळके! एखाद आखीव रेखीव चित्र आपण बघतो आहोत असं वाटलं। इथे लिओनार्दो कॅपरिओ  अभिनित  'the beach' मुव्ही चे शूटिंग झाल्यापासून हा बीच जास्त प्रसिद्ध झाला. ऊन बरच होत,तरी समुद्रात मनसोक्त डुंबलो.  तिथलं सौंदर्य अनुभवत बीच चेअर वर शांतपणे पडून राहिलो. लंच तिथेच होता.तो काही जमला नाही ,पण समुद्रात इतक्या दूर जेवण मिळालं हे काय कमी आहे!  
परत दोन तास प्रवास करत ,फुकेट ला परतलो. ट्रिप चा शेवटचा दिवस असल्याने बाकी वेळ हॉटेल मधेच गप्पा मारत घालवला.

दुसऱ्या दिवशी सकाळी 3 लाच हॉटेल हुन एअर पोर्ट ला निघायचं होत. 7 च फुकेट दिल्ली फ्लाईट 12 ला दिल्ली ला पोचल. तिथून नागपूर, पुढे अकोला एवढा पल्ला आम्ही रात्री 1 ला गाठला.
सुरुवातीचे छोटे मोठे घोळ वगळता ,फुकेट क्राबी ट्रिप खूप मस्त झाली!

  


Monday, January 6, 2020

मागे वळून पाहताना

 मध्यंतरी एका वक्त्याने त्याच्या भाषणात म्हटले होते की जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे कष्ट करू वर्ग आणि दुसरा कष्ट कसे टाळू वर्ग. माणसांमध्ये तर सगळ्याच बाबतीत वर्गीकरण होऊ शकतं. कारण प्रत्येकाची वृत्ती, प्रवृत्ती भिन्न असणारच. असाच अजून एक महत्वाचा फरक असतो,तो म्हणजे काही जण "टॉप" असतात, नेहमीच, काही "निम्न्न" पातळीवर रहातात, कायमच,आणि काही---- धड  टॉप लाही नाही आणि पूर्णतः बॉटम लाही नाही, मधेच लोम्बकळत रहातात, माझ्यासारखे.😌 गुलजार ह्यांच्या फारच सुरेख पंक्ती आहेत,
" टहनी पर बैठा था वो
डुबनेसे डर लगता था
न तैरा, न डुबा, न उडा
बस,टहनी पर बैठे बैठेही सुख गया"
    अगदी इतकी वाईट परिस्थिती जरी नसली आमची आणि सतत धडपड जरी सुरू असली,काहीतरी मिळवण्याची,तरी आम्ही नेहमी असेच लोम्बकळत रहातो, मधल्यामध्ये.😄असो.

 परवा शीतलच्या सासूबाईंनी इराचा म्हणजे आमच्या  गोड नातीचा व्हिडीओ पाठवला, स्पोर्टडे चा. त्यात ती फर्स्ट आली आणि तिला मेडल मिळाले. मुलांचे कौतुक तर असतेच,असते;पण नातवंडांचे अधिक असते, काकणभर तरी, हे निर्विवाद सत्य आहे. इराला स्पर्धेत जिंकताना पाहून ऊर अभिमानाने भरून आला, डोळ्यात कौतुक दाटून आलं आणि नकळत मनात विचारचक्र सुरू झालं, आपल्याला कधी मिळालं होतं,असं पहिलं बक्षीस वगैरे?किंबहुना आपण अशा कितीशा स्पर्धेत भाग घेत होतो?घेत तरी होतो की नाही? मन भूतकाळात शिरत गेलं, आपोआप, मागे-----खूप खूप मागे----.

      पहिली ते चवथी मी मराठी,सरकारी शाळेत शिकली. खरं तर आमची आई स्वतःच त्या शाळेत शिक्षिका होती. माझी वर्गशिक्षिका, ढोले बाई आणि आई चांगल्या मैत्रिणी देखील होत्या; पण तरीही माझ्या वर्गशिक्षिकेला माझ्यात फारसं कौतुक करण्यासारखं काही वाटलंच नसावं. तिसरीत असताना आमच्या वर्गाचा नाच बसवला होता बाईंनी, ' माझ्या ठकीचं लगीन, वऱ्हाडी कोण कोण--' त्यात देखील वरमाय किंवा वधुमाय होण्याचा मान मनात असूनही मिळाला नाही, तो मान मिळाला, रंजना कोठारी आणि निलिमा एकतारे ह्या दोघींना. आमची वर्णी,साहजिकच 'वऱ्हाडात'अर्थात, 'जेनेरल वार्ड' मध्ये.  परीक्षेत कधीही 'पहिल्या नंबर' चा आनंद घेता आला नाही, काही विषयात उत्तम गती असूनही. कायम दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर, पण पाचच्या आत.  नंतर पाचवीत   हायस्कूल मध्ये गेली, "द्रौपदीबाई कन्याशाळेत" .फार भारी वाटत होतं. सगळंच वातावरण नवीन; पण मुलीपण माझ्या पेक्ष्या भारीच. शाळेचे कुठलेही कार्यक्रम असोत, सांस्कृतिक, खेळाच्या वा भाषणाच्या स्पर्धा---सतत ही जाणीव होत गेली की आपण कुठेतरी कमीच पडतो, कायमच. आणि एकप्रकारचा 'न्यूनगंड' तयार होत गेला मनात.अभ्यासात मात्र मी बऱ्यापैकी हुशार होती. अगदी गोंधळात देखील माझा अभ्यास छान होत असे. रेडिओ लावून गाणी ऐकताना तर फारच भारी वाटे अभ्यास करायला.  पण तरीही इंग्रजीचे सर मला त्यांच्या आवडत्या विध्यार्थीनी पेक्ष्या 1/ 2 मार्क नेहमी कमीच द्यायचे. गणित--अंकगणित आणि बीजगणित तसेच मराठी हे दोन्ही विषय आवडीचे आणि त्यात गतीही चांगली होती. अंकगणितातील गतीच मला आयुर्विम्याच्या (L I C) परीक्षेत यश देऊन गेली,हेही तितकेच खरे म्हणा. नंतर मती कुंठित झाल्याने गती थांबली हे दुर्दैव. असो. नववीत असताना आमच्या शाळेत एक नवीन मुलगी आली होती, निर्मला ठोसर म्हणून. ती अर्थात दुसऱ्या तुकडीत होती. खूप हुशार होती.  वार्षिक परीक्षेत अर्थशास्त्र विषयाचा पेपर नेमका फुटला, ती ज्या तुकडीत होती,त्या तुकडीचा. म्हणजे पेपर इंग्रजीचा आणि प्रश्नपत्रिका अर्थशास्त्राच्या विषयाची वाटली गेल्याचे आणि ते लक्ष्यात आल्यानंतर बदल केल्या गेल्याचे आमच्या तुकडीला नंतर समजले. तरी त्या विषयात निर्मलाला 74 आणि मला 75 मार्क्स मिळाल्याने मला स्वर्ग दोन बोटं उरल्याचा भास त्यावेळी झाला होता. 10 वीच्या बोर्ड परीक्षेत ती पहिली आणि मी दुसरी होते, शाळेतून; पण तिथेही हमारी तकदिर मार खा गयी. तोपर्यंत 11 वी मॅट्रिक होती.  त्याच वरशापासून 10 वी मॅट्रिक ठरवण्यात आली. म्हणजे आमची 10 वी मॅट्रिक ची पहिली बॅच आणि 11 वी च्या मुलींची मॅट्रिकची शेवटची. सगळी पहिल्या दुसऱ्या नंबर ची बक्षिसे 11 वीतील मुलींना दिली गेली . छान मोठ्ठी निळ्या रंगाची प्लॅस्टिक ची बादली पाहून माझा जीव कसा तिळ तिळ तुटला होता तेव्हा.😔 

वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या,तेव्हाही अस्मादिकांचा सहभाग सहसा नसायचाच. कधी विचार केलाच तर स्टेज वर गेलं की त त फ फ व्हायची. काही मुली  तर आयत्यावेळच्या भाषणातही भाव खाऊन जायच्या. च्या मारी, कसं जमायचं त्याना देवच जाणे. आमच्या वरच्या वर्गातल्या ,ललिता गर्गे, सुषमा देवधर,  भांडारकर, देशमाने ह्या मुली अशा काही जोशात भाषण ठोकायच्या की ऐकतच रहावं. एकदा "बंद" हा विषय दिला होता,वक्तृत्व साठी. एकीने सुरुवातच अशी भारी केली, " बंद!बंद! म्हणजे काही बुटाचे वा पिशवीचे बंद नव्हेत.तर ह्या बंद च्या मागे दडलेला गभीतार्थ आपण समजून घेतला पाहिजे"  'ओ तेरे की---' मी पण भाग घेतला होता,कारण मी लिहीत छान असे,( असं माझं स्वतःचं मत होतं अर्थात)  मग काय, माझा निबंध एकदा चक्क हेडबाईंनी पूर्ण वर्गाला वाचून दाखवला होता. कोणता म्हणून विचारता? "मृत्यु नसता तर ?" इतका कठीण विषय होता तो. तर निबंधाचे कागद हातात घेऊन आमची स्वारी स्टेज वर गेली आणि  आमची बोलतीच बंद झाली की हो.समोरच्या कागदांवर ची अक्षरेही धड दिसेनात. त्या भाषणाचा स्तर माझ्या अत्यंत खोल गेलेल्या आवाजामुळे अजूनच खाली आला. निवडणुकीसाठी मत मागताना किंवा policy मिळवताना एखाद्या अभिकर्त्याची व्हावी तशी लाचार अवस्था झाली होती माझी. गायन, वादन, अभिनय ह्या बाबतीत तर बोंब च होती, त्यामुळे आशा कुठल्याही स्पर्धेत भाग घेण्याचे धाडस कधी केलेच नाही. हा, म्हणायला एक चिमुकला मानाचा तुरा, जो घरच्यांनी च खोवलेला आठवतो. मी अगदी पाच/सहा वर्षांची असताना " हम प्यार का सौदा करते है एक बार---" हे गाणं मस्त अभिनय करून म्हणजे डोळे वगैरे मोठ्ठे करून म्हणत असे आणि त्यावर नृत्य देखील करत असे( ,घरातल्या घरात)  आणि तो नाच बघायला आई शेजारच्या बायकांना बोलावून आणत असे अशी वंदता असल्याचे वडीलधारी मंडळी सांगत बुवा.😄  '
पण मग सतत न्यूनगंडाची भावना, स्वतःला कमजोर लेखायची सवय ह्यामुळे मागे मागे रहात गेले. आणि त्या नकळत्या वयात तर सगळ्या सुप्त इच्छा मी मनातल्या मनातच पूर्ण करून घेत असे. म्हणजे कल्पनेतच स्वतःला "टॉप" पोझिशन वर ठेवून सगळी बक्षिसे, कौतुक मिळवत असे.स्वप्न रंजनात काय, सगळी बक्षिसे, कौतुकाची थाप आपल्याच मालकीची. 

      पुढे कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. तिथल्या वातावरणात तर कधीच समरस होऊ शकले नाही. हा, आमचा चार जणींचा गृप होता त्यात आपसात मात्र बरीच मजा केली. त्यात टीचर्स ची टर उडवण्याचा आवडता छंद होता. ही न्यूनगंडाची भावना तोपर्यंत पाठपुरावा करत राहिली, जोपर्यंत मी जॉब साठी L I C त अर्ज केला नव्हता. जॉब साठी क्लास जॉईन केला नासिक मध्ये आणि हळूहळू  बदल घडत गेला, धीटपणा येत गेला, माझ्याही नकळत. आत्मविश्वास वाढत गेला.जॉब मिळाल्यानंतरचा सुरुवातीचा  ट्रेनिंग चा काळ, जॉइनिंग काळ अतिशय मजेत घालवला. अमळनेरला असताना तर ऑफिस तर्फे मी चक्क नासिक ब्रँच ला कॅरम, थाळीफेक, चेस अशा खेळांमध्ये भाग घेण्यासाठी सुद्धा जाऊन आले. आकडेमोड, अकाउंट्स हे आवडीचे विषय असल्याने ऑफिस कामात उत्कृष्टपणे ठसा उमटवता आला.

 लग्नानंतर गृहिणी पद संभाळूनही इतकी वर्ष झालीत पण अजूनही मी काही बाबतीत कमीच पडते,असे वाटते. उदा. मला अजूनही उत्तम प्रेस करता येत नाही कपड्याना.  कपड्यांच्या घड्या नीट घालता येत नाही. स्वयंपाक उत्तम येत असला तरी पुरणपोळी सारखे अवघड पेपर अजूनही सोडवता येत नाहीत. चाळिसाव्या वर्षी गाडी चालवायला शिकले खरी, पण एक्स्पर्ट सारखी गाडी कधीच चालवता आली नाही.  शेवटी आमचे देशपांडे सर म्हणत तसं, "जॅक ऑफ ऑल, बट मास्टर ऑफ नन" अशीच गत आजतागायत आहे.  साधं उदा. द्यायचं तर पुस्तक बीसी मधलं वाचन असो किंवा खादाड बीसी मधले कुठले गेम खेळणं असो, आमच्या वाट्याला "बक्षीस" नावाच्या ह्या सांताक्लॉज ने कधीही कृपा केली नाही.  तर हे सगळं एकंदरीत असं आहे.  
  पण शेवटी मी नेहमीप्रमाणे माझ्या मनाची समजूत काढून घेते. सगळीच माणसे सगळ्याच बाबतीत  "टॉप" असून कसं चालेल? कुणीतरी "बॉटम" किंवा सामान्य पातळीवर  असल्याशिवाय "वरच्या" पातळीवरील लोकांकडे कोण बघणार? तुलना, तुलनेतून जिद्द, जिद्दीतून प्रयत्न आणि प्रयत्नातून यशाचा मार्ग कसा दिसणार?  आणि मी भले एखाद्या कामात, एखाद्या कलेत, एखाद्या क्षेत्रात उत्तम नसेनही; पण-------
     पण "एक माणूस" म्हणून मी निश्चितपणे उत्तमच आहे ,हे मी स्वतःविषयी स्वतःच खात्रीने सांगू शकेन. 🙏😊


माणिक नेरकर
अकोला.

आशियाना (भाग 2)

घरटं कोण बांधतय तो की ती हे नक्की कळत नव्हते. एक पक्षी कायम बाहेर बसलेला आणि एक आत घरटं बांधणी करायचा. घरटे नक्कीच तिने बांधले असणार. खाली बागेत तुळशीच्या काड्या चोचीने खेचून आणायची. फार मनोरम आणि कुतुहल निर्माण करणारा अनुभव होता तो! तिच्या किलबीलण्यावरून मला वाटलचं घरट्यात अंडी दिली आहेत. मग काय रात्रंदिवस तिचे अंडी उबवण्याचे काम सुरू झाले. बाहेरून दुसरा बुलबुल साद घालायचा मग आतला पक्षी उडून कडुलिंबाच्या झाडावर जायचा. मग दोघे कुठेतरी उडून जायचे. मला वाटतं काही खायला (अळ्या, किडे) जात असावे. पुन्हा येऊन अंडी उबवणे सुरू. एक पक्षी बाहेर कडुलिंबावर बसून असायचा. तिला पूर्ण साथ देत होता.
घरट्याचा आकार मोठ्या वाटीसारखा होता. कडा आत वळलेल्या होत्या, पिल्लू खाली पडू नये म्हणून असावे. घरट्याची जागा, पध्दत कौतुकास्पद होती. बाहेरच्या झाडावर बसलं तरी आतलं घरटं सहज दिसेल अशी! आणि मी स्टूलावर उभी राहून देखील मला घरट्यात किती पिल्लं आहेत ते दिसत नव्हते. कॅमेर्‍यात फोटो काढूनच समजले घरट्यात तीन अंडी होती. बोराहून थोडी मोठी, तपकिरी ठिपके असलेली. बरोबर 10 दिवसांनी परत तिचा एक ठराविक आवाज काढणं सुरू. आनंद, खुशी व्यक्त करत होती. झाडावर खबर मिळाली तो खिडकीत येऊन बसला. तिच्या आनंदात सहभागी झाला. त्यांचं ते थुईथुई नाचणं, गाणं बाळराजे आल्याची वर्दी देत होतं. ती बाहेर गेल्यावर. लगेचच मी स्टूलावर चढून फोटो काढले. एक पिल्लू आणि दोन अंडी घरट्यात दिसत होते.
आता दोन्ही पक्षी चोचीत काही बाही  आणून पिल्लाला भरवत होते. चोचीत अळ्या, बारीक किडे आणत आणि विशिष्ट आवाज काढून त्या पिल्लाला उठवायचे. तो आवाज इतका कोमल, लाड केल्यासारखा होता जणू म्हणत होते बाळा ऊठ हे खाऊन घे, तुला उडायचं न बाहेर उंच आकाशात... इतकं लाडावल्यावरही पिल्लू उठले नाही तर स्वतःच चट्टामट्टा करायचे. पावसाळ्यात अळ्या किडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात बरोबर तेव्हाच पक्षी पण अंडी घालतात. जादू झाल्यासारखे पिल्लू वाढत होते. एका आठवड्यात त्याला बर्‍यापैकी पंख आले. दुसर्‍या अंड्यातूनही पिल्लू बाहेर आले. मग काय विचारता त्या दोघांची नुसती धावपळ सुरू झाली. स्वतः खावून यायचे पिल्लांसाठी आणायचे. 12, 13 दिवसात पिल्लं आकारात आले. त्यांचं झोपणं कमी झालं. भूक वाढली. फोटो काढायला गेलं की ची ची करायचे. त्यांना वाटायचं मी काही खायला देते का?'

 चोची उघडून खायला तयार. मग मी खिडकीत केळी, चिकू, डाळिंबाचे दाणे असं एका ताटलीत मध्ये ठेवू लागले. बुलबुल सोबत सातभाई, साळुंक्या पण ते फळ खायला आले. केळी, चिक्कू स्वतः ही खात होती आणि पिल्लांना पण भरवत होती. केळी आवडतात बुलबुल पक्षाला. तिच्या अगदी जवळ असलं तरी ती उडत नव्हती. एकदा तर हातातल्या ताटलीतून केळी उचलली तिने.  तो मात्र लांबच असायचा. बुलबुल पक्षी त्यामानाने खूप धीट असतात. त्यांच्यापेक्षा मोठ्या आकाराच्या पक्षांना ते अगदी भंडावून सोडतात. त्यांच्यावर हल्ला करून त्यांना अक्षरशः पळवून लावतात. यामध्ये कोकिळेशी त्यांचं फार वैर आहे. खूपदा मी त्यांचं भांडण बघितलं आहे. भांडण कसलं युध्दच असतं ते. अगदी कर्कश आवाजात त्या कोकिळेच्या डोक्यावरून उडत जायचं आणि चोच मारायची असं करून तिला हुसकावून लावायचे. बहुतेक पिल्लांना उडणं, शिकार शिकवत असताना कोकिळेचा त्रास होत असेल म्हणून ते असे करत असतील.

इकडे घरट्यात पिल्लं मोठी होत चालली त्यांची भूक भागवतांना त्या बुलबुल पक्षांची चांगलीच दमछाक सुरू होती. मोठे पिल्लू घरट्यात नीटसे मावत नव्हते. त्या पिल्लाची आई त्यांच्या भाषेत मोठ्या पिल्लाला उडण्याची सूचना देत असावी. कारण तिचं चिवचिवणं, भिरीभिरी हाॅल मध्ये उडणं खूप वाढलं होतं.
 ती एकदा खिडकीतून एकदा दारातून उडून दाखवत होती. मार्ग दाखवत होती. जणु सांगत होती खिडकी, दार कुठूनही उड पण उड चल आता बाहेर आकाशाखाली. पिल्लाची काही हिंमत होत नव्हती. आईबाबांची शिकवणी पिल्लू काही मनावर घेत नव्हतं. आठ दहा दिवस तर ते पिल्लू नुसतं बघत होतं. घरट्याच्या काठावर येऊन इकडे तिकडे टुकुटुकु पाहत बसायचे. त्याच्या जोडीला ते छोटं पिल्लू पण वर यायचं.असं सुरू असताना एक दिवस दुपारी चार च्या सुमारास बुलबुल पक्षी दोघेही खूप आवाज करीत होते. इकडे तिकडे हॉलभर भुर्रर्र भुर्रर्र उडत होते, त्यांचा तो टिपेला पोहोचलेला आवाज आणि उडणं पिल्लाला जोश देवून गेलं आणि ते पिल्लू हॉलच्या दाराकडे झेपावलं... आणि बाहेरच्या गॅलरीच्या दारावर जाऊन आदळलं खाली बसलं. मला क्षणभर धास्ती वाटली श्वास रोखून मी हा उड्डाण सोहळा प्रथमच पाहत होते. झाडावर ते दोघे पक्षी अखंड त्या पिल्लाशी बोलत होते. दुसर्‍या क्षणी ते परत उडालं हॉलच्या खिडकीवर बाहेरच्या बाजूने बसलं. तिथून त्याला त्याचे आईवडील दिसत होते. झाड न्याहाळत तिथे बसला थोडावेळ आणि एकदम भुर्रर्र उडाला की झाडावर आई बाबांजवळ... ते दोघे इतका चिवचिवाट करीत होते त्या पिल्लांची पहिल्या उड्डाणाची भिती गेली ही खात्री, आनंद, शाबासकी सर्व त्यातून जाणवतं होतं.

तिथून मग त्या पिल्लाला त्यांनी आणखी दूर समोरच्या घराच्या बागेत नेलं. मला खात्री आहे त्या पिल्लाला उडण्याची खूप मज्जा आली असणार. तिथूनही आणखी दूर गेले दिसले नाही. मला हुरहुर वाटली त्याच्या जाण्याने पण घरट्यात अजून एक उड्डाणाच्या तयारीत होता हे आठवून बरं वाटलं. इतर मोठे पक्षी कोकिळ, कावळा, भारद्वाज कुत्रा, मांजर यापासून त्या पिल्लाचे रक्षण होऊ दे मी मनोमन प्रार्थना केली आणि घरात आले. संध्याकाळी घरट्यातले पिल्लू हळूहळू आवाजात ओरडतं होतं. त्यालाही एकटं एकटं वाटत असेल आणि उडायची घाई पण झाली असेल.

अंजली