अति भाषणे वीटती बुद्धिवंत
अति मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत
खरे तत्त्व ते अल्प शब्दे ठसावे
प्रमाणामध्ये सर्व काही असावे
मोजक्या शब्दात अर्थपूर्ण संदेश देण्याचे महत्त्व सांगणारा हा रामदास स्वामींनी लिहून ठेवलेला श्लोक आहे. आपल्या संस्कृतीतील बोधकथा या पण अशाच थोडक्यात महत्वपूर्ण संदेश देणाऱ्या असतात.
मध्यंतरी अशीच एक बोधकथा वाचण्यात आली. व्यक्तिमत्व कसे असावे याचे सार त्या बोधकथे मध्ये सांगितलेले आहे. एका मुलीला कायम परिस्थितीबद्दल कुरकुर करण्याची सवय असते. मला मिळालेले अपुरे आहे, मला अनेक समस्या आहेत, माझे पुढे कसे होणार अशी सारखी तक्रारीचा सूर असलेली विचारांची व बोलण्याची तिची पद्धत होती .कशाचेही समाधान तिच्या वागण्या-बोलण्यातून दिसत नव्हते .मुलीच्या वडिलांनी ही गोष्ट लक्षात आल्यावर एक युक्ती काढली. त्यांनी तीन मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले. पहिल्या पातेल्यामध्ये बटाटे टाकले .दुसऱ्या पातेल्यामध्ये अंडी टाकली आणि तिसऱ्या पातेल्यामध्ये कॉफीच्या काही बिया ठेवून उकळू दिले. झाकण ठेवून पाणी भरपूर उकळल्यावर त्यांनी ते तिन्ही पातेले विस्तवावरून उतरवले .मुलीला बोलावले आणि तिला प्रत्येक पातेले उघडून आतील पदार्थाला तपासायला सांगितले .पहिल्या पातेल्यातील कडक असलेले बटाटे उकळल्यानंतर मात्र मऊ असे हाताला लागले. दुसऱ्या पातेल्यातील वरच्या कडक कवचा मधील द्रवरूप पदार्थ असलेली अंडी उकळल्यावर आतून घट्ट झालेली दिसली तर तिसऱ्या पातेल्यातील पाणी उकळल्यावर कॉफीच्या बियांमधील अर्क पाण्यामध्ये उतरला आणि संपूर्ण पाणी कॉफीच्या सुगंधाने दरवळून गेले .वडिलांनी मुलीला प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासायला सांगून हे असे का झाले यातून आपण काय शिकायचे असा प्रश्न विचारला. मुलीला नेमका अर्थ सांगता आला नाही. मग वडिलांनी तिला सांगितले. पाणी उकळण्याची क्रिया प्रत्येक पदार्थाला सारखी होती. त्यातून बटाटे मुळात कडक असलेले मऊ झाले. अंड्याच्या आतील द्रवपदार्थ घट्ट झाला तर कॉफीच्या बिया उकळल्याने पाण्यामध्ये आपला सुगंध सोडून गेल्या. असेच प्रत्येक व्यक्तीची कठीण परिस्थिती आल्यावर त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची पद्धत निराळी असते. खरे पाहता तीच व्यक्ती सर्वांग परिपूर्ण म्हणता येईल जी वाईट परिस्थितीतही इतरांशी व्यवहार करताना वरून नरमाईने वागणारी पण आतून घट्ट खंबीर एकसंध असलेली आणि कुठल्याही परिस्थितीत आपला सकारात्मकतेचा दरवळ पसरवणारी अशी व्यक्ती सर्वांना हवीशी वाटते. खरंच किती गहन अर्थ आहे या कथेमध्ये .फार कमी जणांना असे जमते. ज्या काही व्यक्ती अशा पद्धतीने स्वतःला परिस्थितीतून निभावून नेतात त्या खऱ्या अर्थाने अजातशत्रु असतात आणि सुखी होतात.
No comments:
Post a Comment