Tuesday, November 12, 2019

भेट

मध्यंतरी मला उगाचच सारख उदास वाटत रहायचं ,पावसामुळे असेल  कदाचित् !...सततच्या   आभाळी वातावरणाने मनावर मळभ चढले होते दिव्यावर काजळी धरल्याने अंधुक प्रकाश पसरावा अगदी तसेच.......माणिक म्हणाली होती की अर्चना, आपण जायचे कां गं केकतउमर्याला दिवाळीचा फराळ घेऊन ?.....मी नाही म्हणाले कारण खरोखरच जमत नव्हते माझं तेव्हा कारण दोन दिवसांनी मुलगा,मुलगी,जावई यायचे होते आणि माझी काहीच तयारी झाली नव्हती. ती पण बिचारी शांत बसली कारण माझ्यासारखच आणि दोघी तिघी मैत्रिणींच देखील याच कारणाने जमत नव्हतं. 
       दिवाळी आटोपली होती, पाहुणे  आपआपल्या गावी परतले होते.पुन्हा माणिकने हळूच सूर काढला कां गं मुलींनो चलायच कां? कोण कोण येतय सांगा गं जरा म्हणजे सगळी नीट व्यवस्था करता येईल!....आणि तीथेपण नीट कळवता येईल...............आता तशा सगळ्या मोकळ्या झाल्या होत्या दिवाळीची सुट्टी संपायच्या आत जाऊ गं असं एकीने सुचवलं आणि रविवार पक्का झाला.
        रेल्वेचा प्रवास !.....अकोला वाशिम असा !. या वर्षीच्या सतत सहा महिन्याच्या पावसाने रखरखत्या ऊन्हाच्या झळांना काबुत केले होते. .सर्वत्र हिरवाईचे दर्शन होत होते. त्यामुळे आपोआपच मरगळ दूर झालेली. रिझर्व्हेशन असल्याने प्रवासही सुखकर! गप्पांच्या ओघात वाशिम कधी आले ते कळले देखील नाही.मी ,माणिक,सुषमा,कल्पना आमचं चौकोनी मैत्र निघालो केकतउमराच्या वाटेने.आणखी एका सखीने दिप्तीने तिच्या भाच्याला सांगून आमची चांगलीच सोय करुन दिली होती. त्यांच्याच कारमधून आम्ही निघालो ते थेट त्यांच्या घरी!....
         "चेतन उमरीतकर" अशा खड्या अक्षरातल्या पाटीने  लक्ष वेधून घेतले.आणखी लक्षवेधून घेतले ते त्यांच्या परिसरातल्या दाट वनराईने जणू एखाद्या सहलीच्या  ठिकाणी आपण आलो की काय इतके मनोवेधक होते ते.दाट वनराईत लपलेल घर जसजस जवळ जवळ जात होतो तसतस ठळक होत होतं. सगळ्या झाडांना पाटानं जाणार झुळझुळ पाणी आपल्या लयबद्ध नादाची हळूच जाणिव करुन देत होतं. वड ,पिंपळ,आंबा ,लिंबू,केळी ,जास्वंद असा वनराईंनी सजलेला परिसर आणि तो हिरवाईचा तजेलदारपणा मनाला तिथेच निक्षूण  सांगत होता जणू आम्ही दृष्टीहीन असुनही टवटवीत ताज्या मनाचे आहोत. .. ................................संपूर्ण टिनांच तीन खोल्यांच सुटसुटीत घर आणि घरातील माणसे आपआपल्या कामात गुंतलेले. चेतन "हा पांडूरंग उचितकरांचा १३/१४वर्षाचा जन्मांध मुलगा मोठी बहीण bscकरुन mpscचे लक्षठेवून असणारी. १००वर्षाच्या आसपास असणार्या चुणचुणीत आजी, आई-बाबा आणि देवाने पदरात टाकलेले आणखी १४मुले असा भरगच्च परिवार! विशेष म्हणजे त्यात दोन अंध जोडपी! वय वर्ष११ते २६  असा सगळा भरलाभुरला परिवार   !. .......... आम्ही आलोय याचा आनंद त्यांच्या चेहर्यावरुन आणि डोळ्यातुन ओसंडून वहात होता. आपआपल्यापरिने सगळ्यांनीच आमचे स्वागत अतिशय प्रेमभराने केले. कितीतरी जुनी ओळख असल्यासारखे कुठलाही आडपडदा न ठेवता म्हणजे संकोच न करता गप्पा करु लागले.मला त्यांच्या आनंदाचे सगळे भाव त्यांच्या डोळ्यात दिसत होते. नवीन बांधकाम केलेली इमारत दाखवताना  आणि आम्ही उत्सुकतेने पाहताना जाणवले की,उचितकरांनी सगळ्या मुलांना दैनंदिन व्यवहार, वागणूक,आगतस्वागत,बोलण्यातील आब यात एकदम तरबेज केले होते. प्रत्येकांच्या खोलीत गेल्यावर एक लोखंडी कपाट,एक पलंग त्यावर नीटनेटकी चादर अंथरलेली ,सोपसुपारीचे पानदान असा सगळा सांसारिक रितीभातीचा मेळ बघून माझे डोळे आश्चर्याने अवाक् झाले.
      मनात सहजच विचार डोकावून गेला की आपण सगळ्या गोष्टींची अनुकुलता असुनही छोट्याशा कुंटुबातही कुरबुरी करत राहतो पण हा सगळा पसारा सांभाळताना चेतनच्या आईबाबांना अनेक कसोटीच्या क्षणांना सामोरे जावे लागले असेल अनेक संकंट अचानकच समोर आली असतील पण उचितकर दाम्पत्यांच्या हसर्या सेवाभावी चेहर्याकडे बघून हेच वाटत होते की यांना दैवीशक्तीच मिळाली आहे त्याच शक्तिच्याआधारे ते इतक्या जणांचा आज चिकाटीने सांभाळ करित आहेत.श्री.उचितकरांनी अतिशय हलाखित आणि कष्टातून शिक्षण घेतले .सात भावंडात एकमेव शिकलेले पण कमालिची जिद्द चिकाटी आणि परिस्थितीशी सामना करुन पुढे कसे गेले  हे त्यांनी आम्हाला सविस्तर कथन केले.आता मुलांना उत्साह आला होता. आम्हाला प्रशस्त हॉल मध्ये बसवून वाद्यसामग्रींनी सुसज्ज असलेल्या स्टेजवर सगळीजण बसून प्रत्येकाने सुंदर सुंदर गाणी आमच्यासमोर सादर केली. चेतन तर सिंथेयाझर उत्तम वाजवतो.कुणी ढोलकी,कुणी तबला असे तरबेज .आणि स्वरज्ञान उत्तमच कुठे अडखळण नाही की कुठे निराशा नाही.आम्हाला गाणी ऐकवण्याची अहमहमिकाच लागलेली होती. छोट्या१०वर्षाच्या विजयने तर कमालच केली टाळ्यांच्या रिदमवर जणगणमन इतक सुंदर वाजवल की ,स्वरही फिके पडावेत!... अस माझ्या ऐकण्यात आहे दृष्टीहिनांचा  low scale -m5 इतका स्ट्राँग असतो म्हणून दृष्टीहिनांचा कल गाणं,वादन संगितादी कलेकडे असतो. जसे रविंद्र जैन ,प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यासारखी थोर मंडळी माहितीचआहेत.
   ............नंतर त्या सगळ्यासोंबतच आम्ही जेवणाचाही आस्वाद घेतला आणि आम्ही आणलेली फुल नाहीपण फुलाची पाकळी भेट त्यांच्या सुपूर्द केली. ह्यात आमचा अजिबातच मोठेपणा नाही खरतर त्याबदल्यात आम्हीच त्यांकडून बरच घेऊन चाललो होतो. परतिच्या वाटेला पुन्हा भेटण्यासाठी!


        कळ्यांचे फुलणे माहीत होते
        नव्हते माहीत अंधार असा
         चालत चालत काटे उचलत
            वाटा झाल्या प्रकाशमान !
            वाटा झाल्या प्रकाशमान!!!

@अर्चना मुळ्ये.

No comments:

Post a Comment