Friday, August 13, 2021

घ्या पेढा !

 तो धावतच आला. मी जाता-जाता वळून पाहिले तो माझ्याशी बोलायलाच आला होता. जवळपास दीड वर्षानंतर बघितलं पण आठवला, चेहरा विसरणं शक्यच नव्हतं. 

नुकत्याच पौगंडावस्थेत जाणार्‍या त्याला पहिल्यांदा त्याचा मामा माझ्याकडे घेऊन आला होता. गप्प गप्प राहतो, फारसा कोणामध्ये मिसळत नाही, कधी आनंदी वाटत नाही, इ, इ,  कोण? तर हा 12-13 वर्षांचा मुलगा! खोड्या, दंगामस्ती, हट्ट करणारी नुकतीच येऊ लागलेली अंगातली रग जिरवताना कधी रागवणारी या वयातली मुलं!  पण "हा" वेगळा होता. 

लहानपणापासून आईवडिलांची भांडणं आणि विकोपाला जाणारे वाद बघतच मोठा झालेला. दुर्दैव इतकं की तो 10 वर्षांचा असताना आई कसल्याशा आजाराने वारली. मायेची सावली कायमची गेली. वडील याच्याशी बरे वागत पण नवीन आईबरोबर त्याला ठेवायचे नाही म्हणून मामा त्याच्या घरी घेऊन आलेला. तिथे वर्षभरात तो त्याचे खाणेपिणे, अभ्यास, शाळा इतपत करत होता. पण एकटा-एकटा राहतो हे नं बघवल्याने मामा माझ्याकडे घेऊन आला. काही उपाय सांगा -त्यांचे निःशब्द करणारे शब्द अजून तसेच आठवतात. 

काही दिवस तो माझ्याकडे नियमित आला. नंतर एकटाही यायला तयार झाला. आमचे बोलणे, अॅक्टिव्हीटीज त्याला आवडायच्या. घरी आला की उजळलेला चेहरा बघून मामाच्या जीवात जीव यायचा. पुढे वर्षभरात त्याचे काही चांगले मित्रही झाले. काही स्पर्धांमध्ये, शालेय उपक्रमांमध्ये भाग घेऊन त्याने चांगली प्रगती साधली. कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून माझ्याकडे त्याचे अधूनमधून येणेही बंद झाले. स्वतःहून फोन वगैरे नव्हते केले त्यांनी कधी. माझ्याही स्मृतीच्या पडद्याआड गेली अनेक केसेस प्रमाणे ही पण केस. 
परवा मात्र दहावीच्या निकालानंतर तो भेटला. क्षणाचाही विलंब नं करता त्याच्या बोलण्याचा धबधबा वाहू लागला. सुरुवातीला आॅनलाईन अभ्यासाचा कंटाळा यायचा, दुसरीच टॅब उघडून इतर गोष्टींकडेच लक्ष द्यायचो इथपासून सगळं त्याने सांगायला सुरुवात केली. हळुहळू सरावलो. प्रयत्न सुरू केले पूर्वीसारखाच अभ्यास करण्याचे.प्रयेक गोष्टीची पीडीएफ, व्हिडीओ बघणं, वाचणं पुढे पुढे कंटाळवाणं वाटू लागलं. स्वतःहून पूर्वीसारख्या नोट्स काढायच्या तर ढोरमेहनत करतोय का अशी शंका येऊन ते अर्धवट रहायचं. आॅनलाईन परीक्षा खूप  घेतल्या शाळेनी पण उत्तर आलं नाही की पटकन कॉपी करण्याचा मोह व्हायचा. कळायचं चुकतय पण वळायचं नाही.... सगळं सगळं बोलत होता तो. 

           सुरुवातीला कधीही झोपा, कुठलेही कपडे घाला, आंघोळीचं, जेवणाचं काही गणितच नव्हतं.घराबाहेर पडायचं नाही आणि सतत त्याच चार भिंतीत चार लोकांनाच बघणं नंतर नंतर नकोसं वाटू लागलं. सोबतीला भरीस भर बाहेरच्या जीवघेण्या बातम्या सतत आदळत असायच्या. कोरोनामुळे, लाॅकडाऊन, मृत्यू, अत्यवस्थ, इतके " शे",इतके "हजार" याशिवाय काही ऐकूच येत नव्हतं. मित्रांचीही तीच गत. स्वतःहून फोनवर बोलणे, आॅनलाईन अॅक्टिव्हीटीज करणे, यामुळे तात्पुरतं बरं वाटायचं. लेकिन वो बात नहीं थी!

आज शाळा संपली हा विचार केला की छाती धडधडते. नवीन आयुष्याला सुरुवात करताना पाय कापतात. पळून जावंसं वाटतं कुठेतरी लांब. पण माझ्यामुळे आधीच सगळे चिंतेत असायचे. कशाला त्यांचा त्रास वाढवायचा म्हणून शूरपणाचा, सगळं नॉर्मल असल्याचा मास्क घालून फिरतो. पण हे किती काळ चालणार? 
आरोग्याचा धोका, सामान्यांचे हाल, सगळंच उदासवाणं. त्यातही मूठभर स्वार्थी माणसं आपल्या पोळीवर तूप कसं पडेल या फिकीरीत. खूप त्रास होतो विचार केला की. कधी एखादी चांगली गोष्ट घडली, काही आशादायक घडल्याचे कळले की मात्र पुन्हा उभारी वाटते. 

आज हे सगळं सगळं बोलून बरं वाटतंय. हा घ्या पेढा! दहावी पास झाल्याचा नाही बरं हा! तो निकाल तर सगळ्यांनीच आमची ईश्वरचिट्ठी निघाली म्हणून घोषित केलाय आधीच ! त्याचही काही वाटत नाही. यापुढे मात्र आल्या प्रसंगाला हसत सामोरा जाईन, मार्ग काढत राहीन. स्वतः अडणार नाही, कोणी अडलेला दिसला तर मदतीचा हात देईन. हा निश्चय पक्का केल्याचा पेढा घ्या! 

वर्षा

No comments:

Post a Comment