Wednesday, April 14, 2021

मैत्र

 लहानपणीच्या मैत्रीच्या माझ्या आठवणी जरा वेगळ्या आहेत. आम्ही मुलुंडला त्यावेळच्या वाडीत राहायचो, भरपूर घरे होती तिथे! पण एकजात सगळे गुजराथी! काही मोजकी महाराष्ट्रीयन घरे तळमजल्यावर होती,पण तरीही माझ्या बरोबरीच्या अशा मुली फारशा नव्हत्याच. त्यामुळे लहानपणी मला खेळायला मैत्रिणी नाहीत, ही खरं तर माझ्या आईची समस्या होती. त्यातून माझा स्वभाव मुळूमुळू! त्यामुळे सगळ्या माझ्यावर दादागिरी करून घेत. एक वयाने थोडी मोठी असलेली मुलगी (नावही तिचं बेबा) सगळ्यांची बाॅस होती. तिने सांगितलं  की,सगळ्यांची माझ्याशी कट्टी! मी यायचे घरी रडत! मग माझी आई मध्यस्थी करणार, त्या बॉसची अट असायची, खासच! काय? तर माझं नाव पन्नास वेळा घेतलं मेधाने, तर बोलेन परत ! मग काय? अस्मादिक नामस्मरण करताना घेतात, तसे तिचे नाव ती म्हणेल, तितक्यांदा घ्यायचे. मग सगळ्या मला खेळायला घ्यायच्या! मला आजही ते आठवलं की स्वतःचा राग येतो, इतकी कशी मी ------ होते!

         जरा समजायला लागल्यावर, म्हणजे पाचवीत असताना, माझा शेजारी मित्र, अंबरीश,आफ्रिकेतून परत आला. आम्ही दोघेही एकाच वर्गात! आमची दोघांची इतकी गट्टी झाली की,मी त्या तथाकथित मैत्रिणींना मग कधीच भाव दिला नाही. आमचं दोघांचं खूप पटायचं, मैत्रिणींपेक्षा जवळचा असा माझा हा मित्र होता, सगळं शेअर करायचो आम्ही दोघं! आजही ती मैत्री कायम आहे. तो चेष्टेने सगळ्यांना सांगतो की, अगदी रिबीनी आणल्या तरी मला दाखवायची मेधा!अगदी निरागस, निर्मळ, निर्व्याज मैत्री!
              पुढे शाळेत खूप मैत्रिणी झाल्या. त्यात मिनाक्षी केतकरशी खास सूर जुळले, सतत सगळीकडे दोघीही बरोबर! कधीच भांडलो नाही, स्वभावात खूप तफावत असूनही!
आजही दोघांशी नेहमी फोनाफोनी, मेसेजेस नसतात, पण आमच्यापैकी कोणीही प्रॉब्लेम मध्ये असले तर ,खूप काळजी वाटते व आनंदात खूप एन्जॉय करतो. भेटलो की खूप गप्पा रंगतात. अंतराचा काहीही परिणाम झाला नाही ,अशी मैत्री! शाळेतल्या  मैत्रिणीही,मी मुलुंडला गेल्याशिवाय कुठलेही गेट टुगेदर ठरवित नाहीत.प्रेम थोडंही कमी झालं नाहीये.
         नंतर काॅलेज मध्येही मैत्रिणी झाल्या, पण खूप घट्ट अशी मैत्री नाही झाली कुणाशी! पुढे लग्न लवकर झाल्याने,graduation नंतर लगेच अकोल्यात आले. इथे बंगले--- एरियात घरं कमीच! तरी समोर रहाणार्यांना पाच मुली---- त्यांच्याशी तेव्हा जी मैत्री  झाली किंवा बहिणींचं नातं आजही तसेच कायम आहे. मग इथे ओळखी व्हाव्यात, म्हणून मी बीसी जॉईन केली, काही समवयस्क, काही वयाने मोठ्या अशा अनेक मैत्रिणी मिळाल्या. आणखीन एका ग्रुपला जॉईन झाले,तिथे एका विशिष्ट ज्ञातीच्या सर्वजणी होत्या, पण समवयस्क, मी एकटीच वेगळी! पण मला कॉस्मोपॉलिटन वातावरणाची सवय असल्याने कधीच वेगळे वाटले नाही व त्यांनीही मला सामावून घेतले. आजही त्या माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणी आहेत! नंतर ब्राम्हण व्यापारी संघ, मेडिकल ग्रुप असा मैत्रिणींचा विस्तार झाला. अकोल्यात पोस्ट ग्रॅज्युएशन external केलं,तेव्हा ट्युशन लावली.तिथे एका मुस्लीम मुलीशी छान मैत्री झाली होती, ती खूपच खमकी होती. आम्ही सगळे विरुद्ध ती, असे आमचे केव्हातरी वाद चालत, पण मजा यायची. तिच्याही घरी वगैरे गेलो होतो तेव्हा आम्ही! परधर्मीय अशी ती एकच मैत्रीण!
          नंतर एल. आर.टी. कॉलेज व पुढे एन. के. गोखले कॉलेज तसेच भारत विद्यालय इथे काही वर्ष नोकरी केली. गोखले कॉलेज मध्ये असलेली मैत्रिण,सनातन संस्थेशी निगडीत होती, आमचं खूप पटायचं. पण हा विषय निघाला की, मी माझी मतं स्पष्टपणे मांडायची, बाकीचे टिचर्स वयाने लहान होते. त्यांना आश्चर्य वाटायचं, पण आम्ही एकमेकींना मान्य केलं होतं व मैत्रीत काही बाधा आली नाही त्यामुळे! भारत विद्यालयातही खूप छान मैत्रिणी मिळाल्या. त्यातील काही सख्ख्या मैत्रिणी झाल्या पुढे! नंतर बी.एड .करतानाही मैत्रिणींमधे भर पडली. पुढे भाग्यश्रीने अक्षरा गृपबद्दल मला सांगितलं, नुकतीच अक्षराची सुरवात झाली होती. निकीता त्यावेळी ९-१० वीत होती बहुतेक! तर मी लगेच जाॅइन न करता, थोडं नंतर अक्षरा गृप जॉईन केला! आणि तुम्हाला सांगते की ,मला हव्या असलेल्या मैत्रिणींचा जणू खजिनाच सापडला! कारण इतकी वर्षं नुसती वाचत होते लहानपणापासून! पण वाचलेलं शेअर करायला, चर्चा करायला असं कुणीच आजपर्यंत मिळालं नव्हतं. प्रेम, जिव्हाळा या बरोबरच बौद्धिक भूकही असते माणसाला! या वयाने थोड्या लहान,पण समविचारी अशा मैत्रिणी अक्षरा मुळे लाभल्या. मैत्रीचं एक खास पर्व सुरू झालं. महिन्यातून एकदाच अक्षराची मिटींग का असते असं तेव्हाही वाटायचं आणि आताही! आम्ही केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमातून, इतक्या वर्षांच्या सहवासातून ही मैत्री अगदी पक्की झालीय आता!
( वेगळंच समाधान देणारं मैत्र)
संवाद घर ग्रुप हा आमचा आणखीन एक ग्रुप! इथे सगळ्या समवयस्क, समविचारी! समवयस्क मैत्रीची लज्जत वेगळीच! ती चाखल्याशिवाय नाही कळत! वाटेल त्या विषयावर वाट्टेल ते बोलायचं, वय विसरून दंगामस्ती, एकमेकींची खेचाखेची, नुसती धमाल. आम्ही एकत्र केलेल्या वेगवेगळ्या ट्रिपसमुळे आम्ही आणखीन जवळ आलो. हा ग्रुप म्हणजे एंजॉय आणि फक्त एंजॉय! ( अर्थात संवाद घरचे उपक्रम ही तेवढेच एंजॉय करतो) लहानपणची मैत्री वेगळी, ह्या वयात मात्र सूर जुळावे लागतात, तसे ते खूपजणींशी जुळून आलेत. 
       आपल्या चेहऱ्यावरून आपल्या मनातले ओळखणारी, उगाच हो ला हो न करता स्पष्टपणे काय ते सांगणारी, उगाच खोटं कौतुक न करणारी, आपल्या चुका परखडपणे सांगणारी, आपल्या तब्येतीची आपल्यापेक्षा जास्त काळजी वाटणारी, हक्काने रागवणारी पण तितकाच जीवही लावणारी ( गुळाच्या पोळ्या आवडतात म्हणून आवर्जून पाठवणारी) अशी एकतरी मैत्रिण लाभली तरी तुम्ही भाग्यवान! मी याबाबत खरच खूप भाग्यवान आहे! 
          एका पुस्तकातलं वाक्य आहे की खरा मित्र कोण? तुमच्या संकटकाळात, दुःखात धावून येतो तो! पण नाही, तुमच्या आनंदात जर तो मनापासून सहभागी होऊ शकला, तुमच्याइतकाच आनंद त्याला झाला, तर तो खरा मित्र! मला हे अगदी पटतं! असं मैत्र मला लाभलय! आणखीन काय हवं? 

No comments:

Post a Comment