पण ही “महाराष्ट एक्सप्रेस”च न?
माझं लग्न झालं त्यानंतर एक-दोन वर्षातला हा किस्सा! पीयुष अगदी तान्हा होता तेव्हाची गोष्ट. थोडी पार्श्वभूमी सांगते आधी. माझी MSc ची परीक्षा झाल्या झाल्या मला अकोल्यालाच शिवाजी कॉलेजला जॉब मिळाला आणि त्याच दरम्यान लग्नही ठरलं. अकोल्याला चालू सेशन पूर्ण करून मी वर्धेला सासरी आली. लगोलग बाळराजेंचंही आगमन झालं. त्याच दरम्यान वर्धेच्या एकुलत्या एक सायन्स कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू होते म्हणून मी तेथे गेली., इंटरव्ह्यू वगैरे छान झाला आणि इंटरव्ह्यू बोर्ड मध्ये असणारी तीन चार प्रतिष्ठित मंडळी, जी माझ्या सासऱ्यांच्या चांगल्याच परिचयाची होती. त्यांनी सासऱ्यांना सांगितले “सुनबाई ची डिग्री इलेक्ट्रॉनिक्स मधली आहे आणि आपल्याकडे तर जागा कम्प्युटर सायन्स मध्ये आहे, त्यामुळे तुम्ही आपल्याच कॉलेज मध्ये असलेला नागपूर युनिव्हर्सिटी चा एक वर्षाचा “पोस्ट बीएससी डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स” करायला सांगा. मग पुढल्या वर्षी बघू या.”
झालं! मग मी त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्याच्या मागे लागली. ऍडमिशन फॉर्म वगैरे भरला. पण एक अडचण होती. अजून मी युनिव्हर्सिटीतून टीसी आणलेला नव्हता. त्यामुळे तो आणण्यासाठी मला अमरावती ला जावे लागणार होते. मग दुसर्या दिवशी मी आणि सोबत म्हणून कॉलेजमध्ये शिकणारी माझी चुलत नणंद मृदुला( जिला सगळे मधुच म्हणायचे)अशा आम्ही दोघी वर्धेहून सकाळीच निघालो. दोन एक तासात बडनेराला (तेथून नंतर ऑटो ने दहा बारा मिनिटात अमरावतीला) पोहोचलो. थेट युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन काम आटोपले. टीसी घेतला , एका ठिकाणी थोडी पोटपूजा केली आणि निघालो परत जायला.
काम झटपट आटोपले म्हणून मी खुश होती. आम्हाला दोन वाजताची महाराष्ट्र एक्सप्रेस पुन्हा बडनेराहून पकडायची होती. तेव्हा ती नागपूर-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस होती. नंतर ती गोंदिया-कोल्हापूर अशी झाली. बरं मी नेहमीच अकोला-वर्धा महाराष्ट्र एक्सप्रेसने जायची, यायची. कारण लग्नानंतरही तीन चार महिने, चालू सेशन संपेपर्यंत माझा अकोल्याचा जॉब सुरूच होता. त्यामुळे शनिवार-रविवार अकोला-वर्धा चकरा असायच्याच. बडनेरा दोघांच्या मधलं स्टेशन. त्यामुळे घरातल्या सगळ्यांना वाटले काळजीचे काही कारण नाही. जातांना स्टेशन वर कुणीतरी सोडून देईलच. येतांना महाराष्ट्र एक्सप्रेसने येतील आरामात परत.
आम्ही दोघी पावणेदोन ला स्टेशनवर पोहोचलो सुद्धा . दहाबारा मिनिटातच गाडी आली. बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीला मी कन्फर्म करायला विचारले “महाराष्ट्र एक्सप्रेसच आहे न ही ?” तो म्हणाला, “हो, महाराष्ट्र एक्सप्रेसच आहे!”. मग मी अन मधूने पटकन मस्तपैकी खिडकीजवळची जागा पटकावली अन बसलो गप्पा करत. तेव्हा रिझर्वेशन वगैरे एवढं काही प्रस्थ नव्हतं. नंतरच्या स्टेशनवर चहा घेतला. बाजूच्या माणसाने विचारले, “कुठलं स्टेशन?” त्यालाही सांगितलं मुर्तीजापुर आहे म्हणून. पुन्हा आमच्या गप्पा सुरु. थोड्यावेळाने सहजच बाजूच्या बाईने विचारलं, “कुठे जाताय?” आम्ही सांगितलं, “वर्धेला!”. ती थोडीशी विचित्र नजरेने बघत म्हणाली, “वर्धा तर कधीचच गेलं हो ताई!” पण मी तिला अगदी कॉन्फिडंटली सांगितलं, “नाही हो! आता येईल वर्धा!” ती माझ्याकडे “दिसते तर बापडी चांगली शिकली सवरलेली!” अशा काहीश्या नजरेने बघायला लागली. आता बाकी डब्यातल्या इतर लोकांनीही कान टवकारले आणि तेही उत्सुकतेने गंमत बघायला लागले. सगळ्यांचे चेहरे बघून परत एकदा कन्फर्म करायला मी बाजूच्या माणसाला पुन्हा एकदा विचारलं “महाराष्ट्रच आहे न हो ही?” तो “हो” म्हणाला अन मी निश्चिंत होऊन परत मधूशी काहीतरी बोलणार तोच जवळचा एक प्रवासी, ज्याला काय गडबड झाली असावी ते लक्षात आलं, तो म्हणाला, “अहो ताई, तुम्ही बडनेराला चढल्या न गाडीत? ही नागपुर-कोल्हापुर एक्सप्रेस आहे. कोल्हापूरला चाललीय!” तरीही आम्ही निर्विकार! तेव्हा तोच पुन्हा म्हणाला “ताई, तुम्ही चुकीच्या गाडीत बसल्या आहात बहुदा! आता अकोला येईल. तुम्ही तिथे उतरा, दुसरी एखादी गाडी पकडून वर्धेला जा!”
मला काही कळेना. मी पुन्हा म्हटलं, “अहो, पण ही महाराष्ट्रच आहे न ?“ त्याला आता आमची कीव आली असावी. तो समजावणीच्या सुरात म्हणाला “होय ताई! बडनेरा ला दोन वाजता एकाच वेळी दोन्ही महाराष्ट्र एक्सप्रेस येतात. एक कोल्हापूर ला जाणारी आणि एक नागपूरला जाणारी. तुम्ही गडबडीत चुकीच्या गाडीत चढलेल्या दिसताहेत!” आता बाकी काय घोटाळा झाला हे लक्षात येऊन आमचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. डब्यातल्या इतर लोकांचीही चांगलीच करमणूक होत होती. आता इतरही सल्ले द्यायला पुढे सरसावले. “तुम्ही आता अकोल्याहून कोणकोणती गाडी पकडू शकता आणि केव्हा पोहचाल, तुम्ही एस टी ने पण जाऊ शकाल, नाहीतर अकोल्याला मुक्काम करून उद्या सकाळीच जा” इत्यादी इत्यादी अनेक सल्ले पुढे येऊ लागले. आम्ही दोघीही चुपचाप हो ला हो करत बसलो. दुसरा पर्याय तरी काय होता म्हणा!
सुदैवाने अकोला माझे माहेरच असल्याने काही प्रॉब्लेम नव्हता. अकोल्याला उतरून थेट आईकडे गेलो. अचानकच न कळवता कशी काय आली म्हणून सगळे जण चकित! त्यांना सगळं रामायण सांगितलं. STD बूथ वर जाऊन भावाने वर्धेला फोन केला. मोबाईल वगैरे काही नव्हते तेव्हा! नंतर जेवणखाण आटोपून रात्री साडेआठच्या नवजीवनने निघालो परत वर्धेला जायला. रात्रभर आराम करून दुसऱ्या दिवशी पण जाऊ शकलो असतो पण तान्हा पीयुष घरी होता त्यामुळे माझी तगमग सुरू होती. शेवटी रात्री बाराला एकदाचे वर्धेला पोहोचलो. स्टेशनवर आम्हाला घ्यायला नवरोजी उभेच होते मिस्कील हसत, मला चिडवायला एक सॉलिड पॉईंट मिळाला म्हणून! घरी पोचल्यावर सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झालेली! तेव्हापासून महाराष्ट्र एक्सप्रेस म्हटली की अजूनही हा किस्सा आठवून खूप हसायला येतं. खरं म्हणजे दोन्ही महाराष्ट एक्सप्रेस आजूबाजूच्या प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी येत असल्याने आणि ते माहिती नसल्याने असा घोटाळा होणं सहजच शक्य होतं. पण नंतर पुढे कितीतरी दिवस मग “काय तरी हुश्शाssर बॉ तुम्ही दोघी मधू!” म्हणत आमच्या त्या बावळटपणाचा उद्धार अनेकदा झाला, हे सांगणे न लगे!
©मधुमती वऱ्हाडपांडे
No comments:
Post a Comment