चलो खामोशियों की गिरफ्त में चलते है
बातें ज्यादा हुई तो जज्बा़त खुल जायेंगे
आपल्या खऱ्या भावना इतरांपर्यंत पोहोचवणं कठीण नाही पण त्यासाठी तशी इच्छा हवी .इतरांना खरा /खरी मी समजू नये असा प्रयत्न बहुतेकांचा असतो. "खुली किताब" होणे प्रत्येकालाच काही पटत नाही.
आम्ही परवा नवी कार घेतली पण काही सांगत बसलो नाही बुवा सगळ्यांना! मागच्या आठवड्यात मुलाला अजिबात बरे नव्हते, धावपळ करून दवाखान्यात ऍडमिट करावे लागले. कळवले नाही कोणाला अजून!!
म्हणजे दुःख झाले तरी लपवालपवी, आनंदाचे क्षणही चोरट्या सारखे अनुभवणे असे काहीसे बदलत्या जमान्यातील बदलत्या लोकांचे वागणे झाले आहे.
काय काय लपवले जाते बहुतेकांकडून? पूर्वी अनुभवास आलेले वाईट प्रसंग, सध्या एखाद्या अडचणीच्या परिस्थितीतून जात असू तर ते ,दुःख किंवा राग यासारख्या भावना ,आपले एखाद्या व्यक्ती किंवा प्रसंगाविषयी चे मत, आपल्या गरजा ,कमतरता एवढेच नव्हे तर आपल्या व्यक्तिमत्वातील एखादा पैलू लपवून इतरांसमोर नं आणण्याची गरज बहुतेकांना सतत वाटत असते.
पूर्वीपासूनच हा स्वभाव विशेष एक मानसिक गरज म्हणूया अशी आहेच.अलिकडच्या काळात त्यात खूप जास्त भर पडली आहे. शब्दातून व्यक्त होण्यापेक्षा "इमोजी" टाकणं जास्त सोपं वाटतंय .चार शब्द लिहिण्यापेक्षा एक "लाईक" ठोकला की खरे मत कळायला मार्ग नाही. शिवाय आम्ही सहभागी आहोत हे दाखवायला मोकळे. तर अशा मोकळेपणाने व्यक्त नं होण्याची कारणे काय असू शकतील ते समजून घेऊया.
एखादा प्रसंग किंवा कामाबद्दल लाज वाटून ती लपवण्याची इच्छा होते .कारण बुद्धी सांगत असते हे योग्य नाही पण मनाला भुरळ पडलेल्या गोष्टी कराव्याशा वाटतात. मग त्या इतरांपासून लपवून ठेवण्यासाठी आटापिटा करावा लागतो. उदाहरणार्थ एखादे व्यसन.
आपण काही सांगितले तर इतरांच्या त्यावर प्रतिक्रिया काय येतील या भीतीने, त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया देण्याच्या अंदाजाने, राग येण्याच्या शक्यतेने, लपवून ठेवलेले /नं सांगितलेलेच बरे असे वाटते.
बरेचदा इतरांनी आपल्याला चांगले म्हणावे सगळ्यांना आपण आवडावे म्हणून एखादी दुखरी नस -एखादी कमजोर कडी पडद्याआडच ठेवली जाते.
स्वतःला कमी लेखून ,स्वप्रतिमा चांगली नसल्याने ,आत्मविश्वास कमी, म्हणूनही काही गोष्टी आवश्यक असूनही न सांगणे /मागणी न करणे आणि मनातच ठेवणे असे वर्तन घडते.
वेदनादायक अनुभव इतरांना सांगताना आपली चिंता वाढणे ,मन:स्वास्थ्य बिघडण्याच्या धास्तीपोटी ते आतच दडवून ठेवून वरवर सर्व आलबेल दाखवण्यासारखे उदाहरण दिसतेच.
असुरक्षिततेची भावना ,कोणीही भरवसा ठेवण्यासारखे नाही या विचाराने गोष्टी इतरांपासून लपवून ठेवण्याची सवय जडते.
पूर्वी एकमेकांशी संपर्काची माध्यमं कमी असूनही बहुतेकांना एखाद्याची अंतर्बाह्य माहिती असायची. हल्ली संपर्काची माध्यमं वाऱ्याच्या वेगाने काम करूनही बरेचदा इतरांच्या वरवरच्याच गोष्टी माहिती असतात किंबहुना तेवढ्याच दुसऱ्या पर्यंत पोहोचवल्या जातात.
पण अशा भावना /मतं/ घटना लपवून अनेक तात्कालिक आणि दीर्घकालीन परिणाम दिसतात. एक तर ते सतत लपवण्याची काळजी, कोणाला कळणार तर नाही ना याची भीती वाढतच जाते. आपली भावनिक शक्ती यात प्रचंड प्रमाणात खर्ची पडते.
इतरांशी बोलताना वरवरचे बोलणे किंवा सुरक्षित वाटणाऱ्या विषयांवरच संवाद साधणे म्हणजे थोडक्यात "हवापाण्याच्या गप्पा" मारणे यांनी आपसातील नाते घट्ट राहणे शक्य होत नाही. परस्परांमध्ये विश्वास जवळीक, आत्मीयता निर्माण होत नाही. भावनांचा ओलावा न राहता व्यावहारिक कोरडेपणा तेवढा असतो. आपल्यासाठी असुरक्षित मानसिक, भावनिक, कौटुंबिक, सामाजिक वातावरण आपणच तयार करत असतो आणि पर्यायाने एकटे पडत जातो.
संशोधनानेही सिद्ध झाले आहे की खरे व्यक्त न होण्याच्या, इतरांपासून बऱ्याच गोष्टी लपवून ठेवण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींमध्ये अकाली मृत्यूचे तीस टक्के आणि कर्करोगाचे सत्तर टक्के अधिक प्रमाण दिसते.
आपली व्यक्त होण्याची, इतरांशी संवाद साधण्याची सवय हळूहळू वाढवता येऊ शकते. काही मानसिक विकारांनी किंवा अनुवंशिक कारणांनी ही सवय सहजपणे बदलता येत नसल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने, समुपदेशनाने यात निश्चित बदल घडवून आयुष्य अधिक सहज आणि समाधानी करता येऊ शकते.
लेखनाच्या विशिष्ट पद्धतीने आपल्या सवयींच्या बाहेर छोट्या-छोट्या पायर्यांनी पडता येते. आत्मविश्वास वाढवून अधिक सहानुभूतीपूर्वक सर्वांशी नाते ठेवण्यास यातून मदत होते.
Connection is the energy that exists between people when they feel seen, heard and valued.
योग्य वेळी योग्य व्यक्ती जवळ योग्य पद्धतीने व्यक्त होणे आणि त्यातून आपसातील संबंध जवळिकतेचे ठेवणे महत्त्वाचे आहे.
No comments:
Post a Comment