जल,जंगल,जमीन.... शिवाय माणूस जगूच शकत नाही असं कुठसं वाचल्याच आठवतं. जल आणि जमीनीचं महत्त्व आपण लहानपणापासुन प्रत्यक्ष अनुभवतो, त्याची अनिवार्यताही माहिती असते पण तितकसं जंगलाची अनिवार्यता कळायला जाणिवांच्या कक्षा वाढण्याची गरज असते. जरा समज आल्यावर, जाणिवा रुंदावत गेल्यावर त्याची महती हळूहळू कळू लागली.
आठवणीतलं यवतमाळ!.. जे माझं माहेर, ते चारही बाजुंनी जंगलांनी वेढलेलं होतं. एका बाजुला करळगावच जंगल, एका बाजुला उमरीच तर एका बाजुला निळोणाच जंगल.. .ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही लोकं डबापार्टीच्या निमित्ताने भटकंती करायचो . सागाची उंचच झाडं आणि पळसाच रान यांनी जंगलाचं सौंदर्य वाढवलेलं . आता लग्नानंतर अकोल्यातल्या वास्त्यव्यात जवळजवळ वीस पंचवीस वर्षे झालीत. इथल कोरडं रुक्षवातावारण मनाला तितकस रुचेचना पण काय करणार आले या भोगासी म्हणावं नि गप रहावं. .................. पण , गेल्या पाच सहा वर्षापासुन होत असलेली pkv ची ओळखं म्हणजे वाळवंटात पाण्याच सुंदर सरोवर दिसाव अगदी तसच आणि तितकच असोशिचं ठिकाण ! . .......रणरणत्या उजाड अकोल्यासाठी छानसा गारवा देणारं मनाची हिरवळ टिकवून ठेवणार हे ठिकाण मनाच्या कोपर्यात आनंदाचा झरा सदैव वाहत ठेवणार असं आहे.
आधी फक्त morning walk पुरतच जाण्याच हे ठिकाण होतं पण हळूहळू तिथल्या पक्षी वैविध्यतेने मनाला भुरळ घालायला सुरुवात केली. Pkv म्हणजे मोरांच साम्राज्य! हे अख्ख्या अकोलेकरांना माहिती आहे .ह्या पक्षीराजाने आपला दबदबा कायमच राखला आहे. त्याला कितीही वेळेला पाहीलं तरी आपलं मन खचितच भरेल . त्याची गर्द निळी मखमली उंच मान व त्यावरील काजळ घातल्यागत पांढरा स्वच्छ चकचकीत डोळा आपल्या डोळ्यात साठवू बघतोन बघतो तोच त्याचे तुरुतुरु चालणे लक्ष वेधुन घेते ! तर कधी आपल्या भरगच्च पिसार्याच सौंदर्य खुलवून दाखवण्यासाठी तो आतुरलेला दिसतो. तर कधी आपला भरजरी परकर(पिसारा) सांभाळत एकीकडून दुसरीकडे सवंगड्यांना भेटण्यासाठी उडती भरारी मारतो ना तेव्हा तर आपण अगदी खलासच होतो आणि त्याच्या दुप्पट प्रेमात पडतो. त्याचे मान उंच करत चालणे,त्याचे उडणे ,त्याचे पिसारा फुलवणे त्याच्या प्रत्येक हालचालींची मनमोहक अदा म्हणजे एकप्रकारे
नृत्याविष्कारच असतो.
* मोरा रे मोरा काय तुझा तोरा *
हे अगदीच पटतं !...या मयुरपुराणानंतर वाट वळवते ती नीलगायींकडे .!अतिशय शामळू लाजाळू असा हा प्राणी ! कळपात राहणारा . हरीण आणि गायीचा मिलाफ असणारा . फिमेल.... गायीच्या वर्णाचा, तर मेल..... काळसर करड्या वर्णाचा .डोक्यावर दोन छोटी शिंग बाळगणारा जरासा अबोल वाटणारा म्हणजे आपल्याच कोषात वावरणारा हा प्राणी आहे पण याचा जंगलातला वावर फारच सुखकारक वाटतो.
आम्ही जिथे गाडी लावतो तिथेच एका गुलमोहराच्या ढोलीत याच वास्तव्य असतं . हा आपलं स्वागत करायलाआपल्या ढोलीच्या दारात सदैव हजर असतो ! हा दिसताच मनाची प्रसन्नता दामदुप्पट वाढते.गोल गरगरीत डोळ्यांचा गुबरा गुबरा गडी कोणाला आवडणार नाही ? खरतर ह्याला पाहीलं की मस्त पिचकायची इच्छा होते. पण ते शक्य नसल्याने त्याला हाय बाय करुन त्याच कुटूंब आजुबाजुला शोधतच पुढे चालू लागते. .३६०च्या कोनात मान हलवणारा हा गुबरा गडी इतका लोभस आहे ना की ज्याच नांव ते! सध्या pkvत यांची संख्या बरीच वाढलेली दिसते आहे .त्याचे तीन चार अड्डे तर आम्हालाच माहिती आहे. यांच त्रिकोणी किंवा चौकोनी कुटूंब बघून उगाच माणसाची आठवण येते आणि हो , हे कुटूंबवत्सल असतात हे विशेष .!
वातावरण कोणतही असो pkv त सृष्टीबदलाचे वारे आल्हाददायकच वाहतात .कदाचित् हे त्या जागेबद्दलच प्रेमच बोलत असेल माझ्या मनातलं... .आत्ता इतक्यातलीच गोष्ट! .... हिरवाईत लपलेले मोकळाण आता उन्हामुळे थेट दिसत आहेत .हिरवाईने जमिनीचाच रंग ल्यालेला असल्याने काटक्यांचा रंग जमिनीच्या रंगात बेमालुम मिसळला आहे. त्या मोकळाणात तिथे होणार्या केवळ हालचालींवरुन काहीतरी असण्याची जाणीव झाली .बघतो तर काय चक्क हरणांचा कळप!.....दुरुन निटसे दिसत नसल्याने जवळ जावं ह्या विचारात होतो आणि काटेकुटे तुडवत आवाज होणार नाही अशी दक्षता घेत जवळ जात होतो पण कसचं काय आपल्या आधीच आपला हलकासासुद्धा आवाज त्यांच्या कानात शिरतो. त्यांनी मस्त लाँगजंप घेत आमच्यापासून पळ काढत पोबारा केला सुद्धा . पण ते उड्या मारत पळणारे हरणं बघतांना जे नेत्रसुख मिळाले ना त्याला तोड नाही. मघाशी मी जेव्हा आमच्या गुबर्यागाली पक्षाचा उल्लेख केला ......हो तो च तो (घुबड)!.....काही जण त्याच्या नावाचा उल्लेख करण सुद्धा टाळतात . म्हणे अपशकुनी असतं ते!...खुद्द लक्ष्मीच वाहन आहे म्हंटल्यावर कसं असेल अपशकुनी.! मला तर तो दिसला नाही की उलट अपशकुन वाटतो .अर्थात मनात हा असला विचार कधीच नसतो . ...बरं ते जाऊ द्या मला उलट सांगायच वेगळच आहे. तर त्या दिवशी आम्ही संध्याकाळ होत आली असल्याने परतीच्या वाटेला लागलो होतो तर अचानक टकाचोराचा आवाज ऐकू आला .आवाजाचा कानोसा घेत कुठे बसला हे शोधतच होतो तर तीथेच झाडाच्या दुसर्या फांदीवर हा माझा लाडका गुबर्या बसला होता . छान शांत निवांतपणाचा आस्वाद घेत होता .पण!....
पण हा बदमाश टकाचोर मोठमोठ्याने आवाज करत जणू चल ऊठ ही माझी जागा आहे म्हणत त्याला हुसाकवत होता .हा बिचारा उडून शहाण्या बाळासारखा दुसर्या फांदीवर बसला तर हा आगाऊ त्याला तिथेपण बसु द्यायला तयार नाही .बिचार्याला आपल्या कर्णकर्कश आवाजाने त्याला बेजार करुन सोडत होता, तर हा गुबर्या हतबल होऊन शेवटी दुसर्या झाडावरच गेला अगदी निमुटपणे त्याच्या स्वभावानुसार .पण ऐकेल तर टकाचोर कसचा. एखाद्या हट्टी द्वाड मुलासारखा माझ्या गुबर्याला अक्षरशः टोचे मारुन तिथुनही हाकलुन लावले. जस काही तिथला एरिया ह्याच्याच बा....चा आहे .ते दृश्य बघताना खरच अवाक् व्हायला झालं !असं तर आपण माणसं वागतो खर तर !...पण हे पक्षीसुद्धा !.....? विचार केला की ,असेल ह्या अशा वागण्याचं लाॕजिक त्यांच्याकडे सुद्धा !. शेवटी प्रत्येकाला आपल्या जिवाची काळजी असतेच ,सुरक्षेचा प्रश्न असतो नाही कां शेवटी. ? त्यांची त्यांची नियमावलीपण असेलच की !
जगण्यासाठी संघर्ष मात्र सर्वच सजीवांना करावा लागतो हे मात्र चिरंतन सत्य आहे. अशाच किश्शांची पोतडी भरुन दिली आहे pkv ने ....... कान ,नाक ,डोळे ह्या ज्ञानेंद्रियांना अधिक तीव्र करण्याचा इशारा पण ! चला तर मग भेटूया परत पुढच्या किश्श्यांसह !
No comments:
Post a Comment