रोज सकाळी वर्तमानपत्र (लोकसत्ता) आलं की, आधी ठळक बातम्या, मग अग्रलेखावर नजर, खूप इंटरेस्टींग विषय असेल तर लगेच वाचायचा अग्रलेख, नाहीतर सवडीने! आणि मग वळायचे सुडोकूकडे!
रोज सकाळी आकड्यांशी थोडफार खेळलं की मला बरं वाटतं! का कुणास ठाऊक! असो. कधीकधी पटकन सोडवून होतं, तर काही वेळा डोक्याचा अगदी भुगा करतं हे सुडोकू! पण जर पहिल्या फटक्यात सोडवलं गेलं, तर इतका आनंद होतो म्हणून सांगू, दिवसच छान जातो मग राव! 

अरे हो! सुडोकू विषयी थोडेसे.....
काही वर्षांपासून मी सुडोकू सोडवत आहे. आधी मोबाईलवर थोडे सोपे सुडोकू सोडवून, आता पेपर मधले नियमीत सोडवते. बेसिक आयडिया एकदा समजली, की झालं.
त्यात एक मोठा चौकोन असतो. आणि आत ३×३ असे नऊ छोटे चौकोन असतात. त्या प्रत्येक छोट्या चौकोनात, आणखीन नऊ छोटे चौकोन असतात. आता 1 ते 9 अंक त्यात असे बसवायचे की, कुठल्याही उभ्या-आडव्या (row and column) रेषेमध्ये अंक रिपीट व्हायला नको. तसेच प्रत्येक छोट्या चौकोनात पण अंक रिपीट होऊ द्यायचा नाही.
आज सकाळी सुडोकू सोडवताना माझ्या मनात विचार आला की, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचाही असाच एक चौकोन असतो.एक मोठा चौकोन !लहानपणी आई वडिलांचे घर, मग नवऱ्याचं घर! आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांमध्ये तर अगदी सुरक्षित,ऊबदार असा मोठा चौकोन!आतले छोटे-छोटे चौकोन , म्हणजे शाळा, कॉलेज, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, नोकरी, व्यवसाय, राजकारण, कला इ.इ. आयुष्य पुढे पुढे जातं तसं, छोट्या चौकोनामध्ये हे सगळे अंक हळू हळू विराजमान होऊ लागतात. कधी कधी अगदी सहजपणे तर कधी थोड्या संघर्षानंतर! उभ्या-आडव्या रेषा, एक ते नऊ अंकाची मांडणी , यात आपण गुंतत जातो. जसजसे आपण पुढे जातो, तसे आपल्या लक्षात येते की आपल्याला वाटला तेवढा हा उभ्या-आडव्या रेषांचा खेळ सोपा नाहीये. मग आपण आपल्या परीने प्रयत्न करतो, त्यात आपल्याला हवे तसे अंक फिट करण्याचा !जेणेकरून एक ते नऊ अंक नेमके भरले जावेत! कधी सौजन्याने ,कधी तडजोडीने,कधी वैतागून ,कधी जिद्दीने, कधी हुशारीने आपले प्रयत्न सुरूच रहातात.
पण अचानक एखाददिवशीचं सुडोकू इतकं क्लिष्ट येतं की मती गुंग करून टाकतं! कुठल्याच मार्गाने ते सुटत नाही. आपण आधी आश्चर्यचकित होतो, अरे ,एवढं सोपं आपल्याला जमत नाही! Accept करायला मन तयार होत नाही. कधी आपण त्रागा करून घेतो, कधी खूप निराश होतो ,का?का?( का सुटत नाही ?) याचा खूप विचार करतो .मग थोडं शांत झाल्यावर लक्षात येतं की ,अरे ,आपण एकाच ठिकाणी थांबलोय खूप वेळ!जरा वेगळा विचार करूया ना!
आणि मग अचानक १,२,३,४....... सगळेजण भराभर आपापल्या जागी जाऊन बसतात. अरेच्चा! असं होतं होय? सुटलं की! मिळालं सुडोकूचं उत्तर! (उगाच एवढा वेळ आणि एनर्जी वाया घालवली.)
काहीवेळा मात्र सर्व युक्त्या, क्लुप्त्या वापरूनही,जेव्हा वर्तमानपत्रातलं,आयुष्यातलं सुडोकू सुटत नाही,तेव्हा मला वाटतं, चक्क सोडून द्यावं!
Because,every tomorrow brings you a new sudoku!
So hope and wait for a better sudoku!
Anyways I love sudoku!
No comments:
Post a Comment