Wednesday, October 14, 2020

अधीर झालोया, मग बधीर झालो

एक मुलगी परवा भेटायला आली. इंग्लिश शिकायचंय म्हणाली. कोर्सबद्दल चौकशी केली. मीही  तपशीलवार माहिती दिली. तिचा लगेच प्रश्न, " एका महिन्याच्या कोर्सनंतर मला पूर्ण इंग्लिश येईल ना? म्हणजे मी काहीही वाचू शकेन, समजू शकेन ना? आणि मी दुसऱ्यांना इंग्लिश शिकवू सुद्धा शकेन ना?"

मला हसावं की रडावं ते कळेना. 
आजकाल प्रत्येकाला सगळं काही इन्स्टंट हवं आहे. त्यासाठी पैसे मोजायची त्यांची तयारी आहे. पण कष्ट बिष्ट घेणे ही संकल्पना त्यांना माहीत नाही. संयम, धीर वगैरे शब्द त्यांच्या शब्दकोशातून हद्दपार झाले आहेत. सगळं काही मनात येताच पुरं व्हावं अशी अपेक्षा नव्हे, मागणी आहे. 'आज आत्ता ताबडतोब' हा एकच काळ समजतो आहे, जाणवतो आहे. 

आज जगून घ्या, पुढचं कुणी पाहिलंय? यासारखे विचार सोशल मीडियावर व्हायरलच नव्हे, पॉप्युलर होत चालले आहेत. हा विचार पहिल्यांदा मांडणाऱ्या व्यक्तीने ज्या उद्देशाने मांडला असेल, तो फार वेगळा असावा. भूतकालाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर वागवणारे किंवा भविष्याची  सतत चिंता करत वर्तमानातील आनंद उपभोगू न शकणारे काही लोक असतात. त्यांनी आपल्या आणि इतरांच्या वर्तमान आनंदाची विनाकारण वाट लावू नये यासाठी असे विचार त्यांना सांगितले जातात. 

मात्र याचाही अतिरेक करणारे अनेक जण अवतीभवती असतात. याच अतिरेकी विचारसरणीचं बाय प्रोडक्ट म्हणजे इन्स्टंट चा आग्रह. एखाद्या गोष्टीसाठी वाट पाहणं, थांबणं यांना मान्यच नाही. साधं स्वयंपाक करताना सुद्धा पदार्थ शिजायला जो वेळ लागतो, तो द्यायची यांची तयारी नाही. मुलांना सगळं काही लगेच आलं पाहिजे, हे म्हणणारे यांचेच चुलतभाऊ असतात. आम्ही गावातल्या बेस्ट क्लास ला मुलाचं नाव टाकलंय, चांगले वीस हजार रुपये ताबडतोब भरलेत, मग तो साठ टक्क्यांवरून नव्वदवर लगेच पोहचला पाहिजे. यात त्या मुलाची बुद्धी, आकलनक्षमता, विषयाची आवड इ गोष्टी गौण असतात. मग पालकांची बुद्धी इ. चा तर विचारच करायचा नाही. पैसा फेको, तमाशा देखो, असं प्रत्येकच बाबतीत झालंय.

आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेणे ही केवढी जबाबदारी ची गोष्ट. मात्र त्यातही घाई. एकदा एका पालकत्वाच्या सेमिनारमध्ये मी पालकांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. एका पालकाने मला 'कमर्शियल आर्ट ' हे क्षेत्र मुलींसाठी कसं आहे आणि त्या क्षेत्रात त्यांच्या मुलीला नेमक्या काय आणि किती संधी उपलब्ध असतील याची माहिती मागितली. मी मुलीचा बॅकग्राऊंड, आवड इ ची चौकशी केली. त्यांनी मला तिची चित्रं (त्यांच्या भाषेत just a few sketches, showing her genius) दाखवली. मग "हा मोर बघा, मॅडम ,आणि ही तिची आवडती मांजर. विमान बघा कसलं काढलंय" इ सुरू झालं. मला त्यातलं काहीही ओळखता येईना. मात्र आपली चित्रकलेची समज इतकी कमी असेल, यावरही माझा विश्वास बसेना. शेवटी मी त्यांना विचारलं, 'ती सध्या काय करते' , तर त्यांनी अभिमानाने 'जस्ट सेकंडला गेलीय' असं सांगितलं. तरी मी निर्लज्जपणे "कुठे? जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये का?" असं विचारलं तर ती इयत्ता दुसरीत गेलीय आणि आत्तापासूनच करिअरची दिशा निश्चित करणं कसं आवश्यक आहे इ ज्ञान मज पामराला प्राप्त झालं. 

जी गोष्ट करिअरची, तीच लग्नाची. लग्न करायची घाई, मग ते मोडायचीही घाई. दोघांनीही एकमेकांना समजून घेण्यासाठी कितीतरी काळ लागतो, पण तेवढा वेळ आहे कुणाकडे? 
रस्त्याने दुचाकी चालवताना एवढा वेग, की जणू काही यांच्यावाचून भारत चीन संबंधातली आंतरराष्ट्रीय बैठक खोळंबलीय. मग कुणाला कट लागला, कुणी ज्येष्ठ नागरिक घाबरून गेले तर ते सर्व 'स्लो' असतात, हा निष्कर्ष निघतो. 

या अशा लोकांची मानसिकता आधी 'अधीर झालोया, मग बधीर झालोया' अशी होत चाललेली दिसते. मनोवेगाच्या वारूवर सैराट झालेले हे लोक आहेत. मीडिया आणि सोशल मीडिया मधून त्यांच्या विचारप्रवाहाला खतपाणी मिळतंय. ही वाटचाल नेमकी कोणत्या दिशेला सुरू आहे? 

नाही, मला घाई नाही, मी थांबायला तयार आहे, फक्त मला अभ्यासपूर्ण उत्तर हवंय.

No comments:

Post a Comment