Tuesday, October 13, 2020

बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है.....???

 " फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन अँड मोस्ट इम्पॉर्टन्ट इंप्रेशन " असं म्हणण्याच्या पद्धतीनुसार व्यक्ती नेहमीच आपलं इंप्रेशन जपण्याकरता स्वतःला टिपटाप ,नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करत असते .आपणसुद्धा प्रथमदर्शनी कुठलीही व्यक्ती बघून पेहेराव, राहणीमान यावरून तिच्या  व्यक्तीमत्वाला जाणण्याचा प्रयत्न करत असतो .  एखाद्या व्यक्तीचे कपडे , रंगरंगोटी  ,वेशभूषा - केशभूषा बघून काही एक मत आपलं त्या व्यक्तीबद्दल तयार होत असतं . गंमत म्हणजे कित्येकदा नावांवरून, आडनावावरूनही आपण व्यक्तीबद्दल मनातल्या मनात अंदाज बांधायला लागतो.  खरं तर हा आपल्या मनाचा एक वेगळाच खेळ असतो आणि कधी कधी आपण लावलेले अंदाज साफ चुकलेले आहेत असं नंतर आढळून येतं .मला व पु काळे यांच्या कथाकथनातलं एक वाक्य आठवतं की " ज्यांचं आडनाव पटवर्धन असतं ते एक्झॅक्टली  रीसबुडांसारखे का दिसतात ? " तर असंच आपण बांधलेल्या आडाख्यांचंही होतं .

           एकूणच काय तर समोर येणाऱ्या माहितीवरून आपण थोडंफार अनुमान लावण्याचा प्रयत्न करत असतो ,की एकूण हे व्यक्तिमत्व कसं असेल? म्हणूनच समोरच्या व्यक्तीचं निरीक्षण करणं किंवा तिच्याबद्दल न बोलताच जाणून घेणं यासाठी देहबोली विज्ञानाचा उदय आणि विकास झाला आहे .त्यात आता एका नवीन संकल्पनेचा उदय गेल्या काही वर्षांपासून झाला आहे. ही संकल्पना आहे " डिजिटल बॉडी लैंग्वेज " नावाची. डिजिटल बॉडी लैंग्वेज म्हणजे काय ?आणि त्यावरून एखाद्या व्यक्तीबद्दल आपण अनुमान कसे लावतो ? याचे रोजच्या जीवनातील उदाहरण म्हणजे व्हाट्सअपच्या डीपी वरून किंवा फोनच्या स्टेटस वरून आपण व्यक्तीबद्दल काही विशिष्ट अनुमान लावतोच की नाही?एखादी व्यक्ती हसतमुख,मनमिळावू असेल किंवा नाही हे एकदा पाहिलेल्या फोटोवरून ठरवण्याचा प्रयत्न करतोच की नाही?खरं तर आपण सर्वोत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आहोत असं भासवण्याचा प्रयत्न  कळत नकळत सगळेच करत असतात. भेटीतून असो की डीपी,फेसबुक प्रोफाईल असो ,फ्रेश दिसायला,खूष दिसायला सगळ्यानाच आवडत असतं.
               अलीकडे फोनचा डीपी, फेसबुकचे प्रोफाईल याबाबत लोक बरेच जागरूक असायला लागले आहेत,काळजी घेऊ लागले आहेत. विशेषतः युवापिढीत याबाबत खूप निरनिराळ्या  कल्पना  आहेत . मी माझ्या विद्यार्थी समूहामध्ये खूपदा असं बघितलं आहे की ,जेव्हा कॉलेजमध्ये  शांतता आणि एकांत असतो ,अशावेळी काही मुलं मुद्दाम कॉलेजला येतात , मग अंगणातल्या हिरवळीवर किंवा व्हरांड्यात उभं राहून ; पिलरला टेकून किंवा चक्क  गाडीच्या सीटवर लोळून, गॉगल लावून ,गॉगल काढून, कमरेवर हात ठेवून ,वगैरे वगैरे फोटो काढले जातात आणि हे फोटो काढण्यासाठी मुलं आपल्याबरोबर आपल्या मित्रांनाही घेऊन येतात .आणि मग काढलेल्या फोटोतून त्यातल्या त्यात "  हॉट "  फोटो सिलेक्ट करून तो डीपी म्हणून,  फेसबुक स्टेटस म्हणून ठेवला जातो . त्याला अनेक कमेंट्स आणि लाईक्स मिळतात. पण हे समाधान दोन किंवा तीन दिवस टिकतं.आणि मग परत शांत वेळेला कॉलेज गाठावं  लागतं ,नवनवीन डीप्यांची सोय करण्यासाठी !! मी  जाता येता असे लडिवाळ  " सोहळे "अनेकदा पाहिले आहेत. युवा पिढी मधील मित्र-मैत्रिणी या फोटोंवरून खरोखरच एकमेकांबद्दल अंदाज बांधत असतात .तसही फोटो काढणार्‍या व्यक्तीला आपला टार्गेट ग्रुप माहित असतो .कोणासाठी हे फोटो स्टेटस मध्ये डीपी मध्ये ठेवले आहेत, याची त्या व्यक्तीला पूर्ण जाणीव असते. त्यांना खूप अपेक्षित फीडबॅक सुद्धा बरेचदा मिळत असतात.  पण त्यामुळे  होणारी गंमत अशी  आहे की " हॉट " नसणारी मुलंमुली सुद्धा " हॉट"  वाटू लागतात . तसंच कुटुंबवत्सल नसणारी व्यक्ती सुद्धा फार प्रेमाने कुटुंबातील व्यक्तींसोबत रहात आहे ,असा अंदाज लावता जातो .काही महाभाग(त्यांना खरंच या कला अवगत आहेत असे सन्माननीय अपवाद सोडून) स्टेटस मध्ये  स्वतःचं गाणं किंवा नृत्य टाकून आपण प्रचंड खूष असल्याचा संदेश देत असतात. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती अगदीच याविरुद्ध असते . डिजिटल बॉडी लँग्वेजचं विज्ञान नेमक्या या तफावतींवर काम करतं.कधी पुस्तकांचा ढीग फोटोत दिसतो ,तर कधी घाम येईपर्यंत व्यायाम केल्याचा अविर्भाव असतो.पण खरंच दमछाक होईल इतका अभ्यास,व्यायाम केला असतो का? तर मुळीच नाही! खरीखुरी चित्रणं यात नसतात बोचदा.मला तर आज पर्यंत कोणतीही व्यक्ती डीपी किंवा स्टेटस मध्ये नाराज किंवा उदास पाहिल्याचंही आठवत नाही. याचा अर्थ असा आहे का की कोणीच नाराज किंवा उदास कधीच नाही ? प्रश्नच आहे खरा! . " भावासाठी क्काssय पन " असं स्टेटस ठेवणारा मुलगा प्रत्यक्षात आपल्या भावाशी,मित्राशी  कडकडून भांडणारा असू शकतो . " रिलेशनशिप्स आर मोअर इम्पॉर्टंट  दॅन इगोज्  " असं स्टेटस् ठेवणारा माणूस प्रत्यक्षात मात्र भयंकर  रागीट- अहंकारी आणि त्यामुळे नाती तोडून टाकणाराही असू शकतो.  कडेवर-  खांद्यावर आपल्या छोट्या मुलीला घेऊन हौसेनी फोटो काढून तो डीपी किंवा स्टेटस मध्ये ठेवणारा माणूस, आपल्या मुलीच्या संगोपनाची,तिला सांभाळण्याची जबाबदारी घेत असेलच, असं सांगता येत नाही. लॉकडाऊनच्या काळात तर केर काढण्याचे ,स्वतः चहा करत असल्याचे - स्वयंपाक करत असल्याचे फोटो(विशेषतः पुरुषांचे) मुद्दाम स्टेटस मध्ये किंवा फेसबुक वर शेअर केले गेले . याचा अर्थ ही माणसं घरातली जबाबदारी घेत असतीलच असं सांगता येत नाही . " नाssssद  नाssssय  करायचा!!  " असं स्टेटस ठेवणारी माणसं प्रत्यक्षात भित्रट,पळपुटी नसतील  हे कशावरून?  पुलंच्या कथाकथनात एक किस्सा आहे की, त्यांच्या मित्राने ट्रीपला गेल्यावर , नेपाळी गुरखा लोक जवळ ठेवतात तशी कुकरी आणली ! पु लं यावर मिष्कील  टिपणी करतात,"  की पोस्टमनला पाहून चळाचळा कापणारा आमचा हा  मित्र या कुकरीचं काय करणार आहे ? हे देवच जाणे! पण येता-जाता ज्याला-त्याला ती कुकरी दाखवून शूरपणाचा आव आणून त्यानी आम्हा सगळ्यांना मात्र अगदी वात आणला होता !"  अगदी अशाच प्रकारे मैत्रीचा ,सिंसियर असल्याचा, कुटुंबवत्सल असल्याचा ,आणि विशेषतः खूप आनंदी असल्याचा मुखवटा घालून , तसं भासवून माणसं कधीकधी वात मात्र खरंच आणत असतात. डिजिटल बॉडी लँग्वेजचं विज्ञान या खऱ्या खोट्याची शहानिशा सहजतेनी करू शकतं.  खऱ्याखुऱ्या भावना फोटोत चित्रित केल्या असत्या, आणि त्यासकट फोटो डीपी किंवा स्टेटस मध्ये ठेवले असते, तर सुशांतचं उद्या  काय होणार आहे?  हे आदल्या दिवशीच्या त्याच्या फोन स्टेटस वरूनच आपल्याला कळलं नसतं का? यावरून आपण नक्कीच विचार करू शकतो.


              काही लोक उधार उसनवार स्टेटस ठेवतात .एकदा मी माझ्या मैत्रिणीचे स्टेटस वाचले त्यात सुंदर अशा निसर्गदृश्याखाली काहीतरी मनाला स्पर्श करणारा मेसेज लिहिला होता. मात्र मी त्या फोटोवर बोटे टेकवून थोडं स्क्रीनवर हलवून पाहताच वरच्या भागात मला माझ्या मैत्रिणीच्या  नावाबरोबर " राजा ,नागपूर " अशी अक्षरं ओव्हरलॅप झाल्यासारखी  दिसली .मी माझ्या मैत्रिणीला
," राजा ... फ्रॉम नागपूर कोण आहे ? "असं विचारताच ती भडकली.  मी तिची मैत्रीण असताना ,तिला न सांगता, मी तिच्या  ओळखीच्या "  राजा ,नागपूर "  ला कसं काय ओळखते? असं वाटून ती माझ्याशी कडकडून भांडायला लागली.मी शांतपणे जरा वेळ तिचं आकांडतांडव ऐकून घेतलं आणि  हसून तिला सांगितलं की " राजा कोण हे मला माहीत नाही,पण त्या  राजाचं स्टेटस तुला आवडलेलं दिसतंय . कोणाचं आवडलेलं स्टेटस , स्वतःच्या फोनचं स्टेटस म्हणून  ठेवायचं असलं , तर, स्क्रीनशॉट काढल्यावर निदान नीट  क्रॉप तरी करायला नको का? तुझं स्टेटस पाहून ते तुझं नाही तर  कुठल्याशा राजाचं आहे,हे कळतंय ना सुंदरे !! "  तेव्हा कुठे तिच्या लक्षात आलं ,की मला काय म्हणायचं आहे !                     
                एकदा एका वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ मी एका व्यक्तीच्या स्टेटस मध्ये पाहिला, त्याचीही गोष्ट सांगूनच टाकते.  ऑलरेडी लावलेलं आणि छान वाढलेलं,आळं करून ठेवलेलं झाड होतं ते ,ज्याच्या जवळ ही व्यक्ती पोझ देऊन  " फावडं "  घेऊन उभी होती. आणि खाली वाकून ती समोरच्या मुलांना विचारत होती की "रेडी का रे? "  मग व्हिडिओमध्ये न दिसणाऱ्या मुलांचे,  "हो हो "  असे आवाज आले . आणि मग वृक्षारोपणवाल्या व्यक्तीने जीव नसल्यासारखं उगाच काहीतरी जमिनीला त्या फावड्याने खाजवायला सुरुवात केली . लगेच वर पाहून " झालं का रे?" असं पण विचारलं .पुन्हा मुलांनी " हो " म्हटलं .आणि व्हिडिओ बंद झाला. हा व्हिडिओ निदान  थोडा एडिट करायचा, किंवा आपण व्हिडिओ लोकांसमोर पाठवतोय  तर निदान स्वतःच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग पुरतं तरी नीट वागायचं नं?  एवढं सुद्धा भान व्हिडिओ पाठवणाऱ्या व्यक्तीला नसतं का?   यातून तुम्ही किती नाटकी आहात हे देखील कळतं आणि तो नाटकीपणा झाकायचा तुम्ही प्रयत्न सुध्दा करत नाही आहात, हे देखील कळतं .
       म्हणूनच या जगाला " आभासी जग " असा शब्द देणार्‍याचं कौतुकच केलं पाहिजे. एकूणच हा सगळा वरवरचा मामला आहे, आभासाचा पसारा आहे . ज्याला या आभासी जगातलं व्यक्तिमत्त्व आणि प्रत्यक्षातलं व्यक्तिमत्त्व यातलं अंतर कळत नाही, त्याची फसगत नक्की होऊ शकते.

 
          हा आभासाचा पसारा जरा तरी आवरता यावा म्हणूनच डिजिटल बॉडी लैंग्वेज नावाचा अभ्यास उदयाला आला असावा .डिजिटल बॉडी लँग्वेज मध्ये तुम्ही डिजिटल माध्यमातून जगाला कसं दिसण्याचा किंवा काय भासवण्याचा प्रयत्न करत आहात , त्याचा तर अभ्यास केला जातोच ,पण सत्यता - वास्तव आणि आभासी चित्र यातील गॅप्स शोधण्याचा प्रयत्नही केला जातो.  उदाहरणार्थ हसर्‍या चेहर्‍याकडे बघतांना व्यक्तीच्या ओठांची टोकं वर वळली आहेत का? आणि डोळे जरा बारीक होऊन डोळ्याभोवती हलकी तरी रेषांची जाळी दिसते आहे का ? यावरून फोटोतील स्मितहास्य हे खरंखुरं हास्य आहे की नुसतं " स्माईल प्ली    ssssज " वालं हास्य आहे , याचा पत्ता अभ्यासकांना बरोब्बर लावता येतो. उभं राहण्याची पद्धत कशीही असली तरी हात कसे आणि  कुठे ठेवले आहेत ? हाताची बोटं,हालचाली, चेहऱ्यावरचे भाव , डोळे या सगळ्या गोष्टीं एकमेकांशी मॅच होत आहेत  किंवा नाही ? यावरून व्यक्तीच्या संदेशातील खरेखोटेपणा शोधता येतो .
      डिजिटल बॉडी लँग्वेजचे अभ्यासक डिजिटली प्रदर्शित केलेल्या छबीचे नीट विवरण करू शकतात. याबरोबरच  लॅपटॉप वापरताना सुद्धा एखादी व्यक्ती कुठल्या पद्धतीने बोटं कि-बोर्ड वर फिरवते, किंवा टेबलावर तिनी तिचं कोपर कसं टेकवलेलं असतं ,किंवा स्क्रीन वरचे मेसेज वाचताना व्यक्तीचे चेहऱ्यावरचे भाव कसे कसे असतात , या वरून सुद्धा डिजिटल लैंग्वेज अभ्यासकांना एकूण एक पत्ता व्यक्तिमत्वाबद्दल लागत असतो.  एखाद्या ई मेल किंवा मेसेजला व्यक्ती काय उत्तर देते किंवा उत्तरच देत नाही किंवा उत्तर द्यायला किती वेळ घेते यावरून सुद्धा अभ्यासक अंदाज लावतात ,आणि निष्कर्ष काढतात. एखाद्या व्यक्तीचा व्हीडीओ  बारकाईने पाहून, त्यातल्या व्यक्तीच्या हालचाली आणि चेहऱ्यावरचे हावभाव, डोळे बघून , त्या व्यक्तीबद्दल एक ठाम मत तयार करू शकतात.  कार्पोरेट सेक्टरमध्ये तर आता इंटरव्यू पॅनलवर डिजिटल बॉडी लैंग्वेज स्टडी करणारा माणूसही असतो. तो उमेदवाराच्या ईमेल आयडी मध्ये किती स्टार्स,कोणते नंबर्स आहेत, इथपासून तर उमेदवाराच्या फोनच्या, फेसबुकच्या प्रोफाइल फोटो-  स्टेटस पर्यंत सगळ्याचा अभ्यास करून त्या व्यक्तिमत्वाबद्दल पक्के अंदाज लावू शकतो . किती वेळात कशाप्रकारे कोणकोणत्या मेसेजेस आणि ई मेलला कशी  उत्तर पाठवली आहेत ,यावरूनही अंदाज लावू शकतो. मेलमध्ये वापरलेली भाषा आणि शब्द यावरून स्वभावाबद्दल अंदाज बांधू शकतो . ऑनलाइन इंटरव्यू मध्ये व्यक्ती कॅमेर्‍याला कसे फेस करतेय,त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ,डोळे काय बोलतात ? यावरून व्यक्तिमत्वाची नीट पारख करू शकतो.  लॅपटॉप, माऊस किंवा मोबाईल या वस्तू  उमेदवार कसा हाताळतो ? त्याच्या बोटांची पकड कुठे कशी आहे ? यावरून तो पुढे कितपत जबाबदारीने काम करेल, याचाही अंदाज लावता येतो .आणि याच सगळ्या अभ्यासाला ' डिजिटल बॉडी लैंग्वेज स्टडी'  असं म्हणतात .या विद्याशाखेचा बोलबाला असण्याचेच दिवस आहेत सध्या.तेव्हा आता आपण फोन कसा वापरतो?  कीबोर्ड कसा हाताळतो? आपला डीपी काय आहे ? स्टेटस काय आहे ? कोणी त्यावर कौतूक किंवा कमेंट केल्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो? आपण नेमकं काय भासवण्याचा प्रयत्न करतो? याकडे जरा बारकाईने बघू यात का यानंतर??म्हणजे बघायलाच हवं......

( लेखातील सर्व  अनुभव आणि प्रसंग काल्पनिक  आहेत .कोणाला कुठल्या घटनांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!?!.......)

No comments:

Post a Comment